विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 30 December 2025

मराठ्यांची इतिहासातील सेनापती धनाजी जाधवांचे स्थान...

 


मराठ्यांची इतिहासातील सेनापती धनाजी जाधवांचे स्थान...

🙏🚩
आतापर्यंत आपण मराठ्यांच्या इतिहासातील अभ्यासाच्या दृष्टीने उपेक्षित असणाऱ्या धनाजी जाधवांच्या कार्याचा आढावा घेतला. त्यावरून धनाजी जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज व महाराणी ताराबाईसाहेब (शिवाजीराजे दु.) यांची कारकीर्द आपल्या कर्तृत्वाने गाजविली...
मराठ्यांच्या बाजूने मोगलांशी सतत २६/२७ वर्षे लढा देणारा धनाजी जाधव हे, एकमेव सेनानी होते. त्यांचे इतिहासातील स्थान त्यामुळे आगळे-वेगळे ठरते. यादवांची महाराष्ट्रात सत्ता स्थापन झाल्यानंतर रामदेवरायाच्या काळात त्या सत्तेचा उत्कर्ष झाला, परंतु अल्लाऊद्दीन खिलजीच्या आक्रमणाने हे शेवटचे हिंदू राज्य रसातळाला गेले. पुढे लखुजीराजे जाधवांनी सिंदखेडचे वतन स्वपराक्रमाने आपला दरारा निर्माण केला. त्यांच्या पश्चात जाधवांच्या घराण्यात लखुजीराजेंच्या तोडीचा एकही पराक्रमी पुरुष निपजला नाही. सन १६५० ला मिळवून धनाजी जाधवांचा जन्म झाला. त्यांनी आपल्या सामर्थ्याने स्वतःचे मराठ्यांच्या इतिहासात निर्माण केले. त्यामुळे जाधव घराण्याला पुन्हा प्रतिष्ठान मानसन्मान मिळाला. स्वराज्यस्थापना, स्वराज्यरक्षण व स्वराज्यसंवर्धनात ज्या ज्या मराठा घराण्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, त्यामध्ये जाधव घराणे आघाडीवर होते. हा नावलौकिक धनाजी जाधवांमुळेच प्राप्त झाला...
विजापुरी सरदार युसुफखान व हुसेनखान मियाना या बंधूनी स्वराज्यातील जनतेला त्रास द्यावयास सुरुवात केली तेव्हा साजरा-गोजरा किल्ल्याच्या परिसरातील जनतेने सेनापती हंबीररावांकडे तक्रार केली, अशा वेळी त्यांनी मियाना बंधूवर स्वारी करून विजापुरी सैन्यास पळवून लावले. हंबीरराव यांच्या सोबत या सावनूरच्या युद्धात धनाजी जाधव होते. सावनूर विजयानंतर धनाजी जाधव शिवरायांना रायगडावर भेटले. तेव्हा धनाजी जाधवाची तारीफ करताना शिवराय उद्गारले :
“ही मनुस्ये प्रतिसृष्टी निर्माण करतील. आम्ही नसता बादशहाशी स्पर्धा करून मुलूख घेऊन गर्वरहित केला. आमच्या साह्यार्थ हे देवलोकीहून मनुस्यरूपी निर्माण झाले असे वाटते...”
सेनापती धनाजी जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवरायांच्या इच्छेप्रमाणे औरंगजेबाला पराभूत करून स्वराज्य वाचविले. ही प्रतिसृष्टीच त्यांनी निर्माण केली. मोगलांनी जो मुलूख गिळंकृत केला होता, तो मुक्त केला ही महान कर्तबगारीच होती. स्वराज्य संस्थापकाने जो विश्वास धनाजींवर टाकला होता तो त्याने अशा प्रकारे खरा करून दाखविला. मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराजास स्वराज्याचे छत्रपतीपद मिळू नये म्हणून राणी सोयराबाई, त्याबरोबरच त्यांनी थोर स्वामी निष्ठाही जोपासली. छत्रपती शिवरायांच्या अण्णाजी दत्तो, मोरोपंत पिंगळे, हिरोजी फर्जद ही मंडळी कार्यरत होती. या कटापासून सेनापती हंबीरराव मोहिते व धनाजी जाधव ही नव्या दमाची मंडळी अलिप्त होती. त्यांना स्वराज्याचा कायदेशीर वारस शिवपुत्र संभाजी महाराजच मान्य होते, म्हणून संभाजी महाराजांच्या विरोधकांना त्यांनी हाणून पाडले. संभाजी महाराजांच्या हत्येनंतर छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात स्वराज्याचा कारभार रामचंद्रपंत, शंकराजी नारायण, संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांच्यावर सोपविला गेला. याही काळात शत्रुशी संघर्ष देऊन स्वराज्याचे रक्षण धनाजींने केले. छत्रपती राजाराम महाराजांनी जो विश्वास या कर्त्यामंडळीवर टाकला होता, तो विश्वास खरा करून दाखविला. ताराबाईसाहेबांच्या काळात सेनापती या नात्याने धनाजी जाधवांनी अव्याहत मोगलांशी संघर्ष दिला. छत्रपती शाहूमहाराज आगमनाने तर त्यास छत्रपतीपद मिळवून दिले. ही सर्व धनाजींची स्वामीनिष्ठाच होती. त्यांच्या समस्त आयुष्यात स्वराज्य व स्वामीद्रोह घडला नाही...!
म्हणूनच त्यास मराठेशाहीचा खरा व यशस्वी सेनापती म्हटले पाहिजे. मोगल-मराठा संघर्षात सतत विजेसारखा चमकणारा व ठिकठिकाणी मोगलांना पराभूत करणारे धनाजी जाधव हे मराठ्यांच्या बाजूचा एकमेव सेनानायक होय. छत्रपती शिवरायांपासून ते महाराणी ताराबाईसाहेब काळापर्यंत धनाजींने मोगलांशी शेकडो लढाया दिल्या. औरंगजेब अगदी हताश अवस्थेत अहिल्यानगरला २० फेब्रुवारी १७०७ मध्ये मृत्यू पावला, तेव्हा मराठ्यांचे गेलेले सर्व किल्ले त्यांनी परत जिंकून घेतले. लोदीखानाचा पराभव करून पुणे-चाकण मुक्त केले. नर्मदेपासून कर्नाटकापर्यंतचा सर्व मुलूख काबीज करून मराठेशाहीची पुन्हा स्थापना केली. मोगल-मराठा संघर्ष औरंगजेबाच्या मृत्यूने संपला. मराठ्यांना हा शेवट फायदेशीर ठरला. या काळात मराठ्यांचे नेतृत्व धनाजी जाधवांनी करून अंतिमतः मराठ्यांना विजय मिळवून दिला. मोगल सैन्य निमूट पणे उत्तरेची वाटचाल करू लागले. मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध यशस्वी झाले. याचे सर्व श्रेय धनाजी जाधव यांच्याकडे जाते...
पंचवीस वर्षे, जवळ जवळ पावशतक औरंगजेब मराठ्यांशी लढाया करीत होता. त्यात त्याला काय मिळाले या बाबत स्मिथ म्हणतो, "महाराष्ट्राने औरंगजेबाच्या देहावरच थडगे रचले नाही तर त्याच्या साम्राज्यावरही..."
तर जदुनाथ सरकार म्हणतात, "महाराष्ट्राने केवळ औरंगजेबाचेच कार्य नव्हे, तर त्याच्या पूर्वजांचे कार्यही शून्यवत करून टाकले..." या पाठीमागे मराठा योद्धा सेनापती धनाजी जाधवरावांची तडफदार कामगिरी होती...!
तसेच धनाजी जाधवराव मराठ्यांच्या इतिहासातील एक मुरब्बी राजकारणी होते. मोगल-मराठा संघर्षात धनाजी जाधवरावांनी बादशहाशी लढताना कधीही शरणागतीचा विचार मनात येऊ न देता मोगलांवर धाडसी हल्ले केले. मोगलांच्या अफाट सैन्याशी धानजींनी शेकडो लढाया दिल्या. त्यातील बहुतेक लढाया मैदानात दिल्या. यावरून ते केवळ असामान्य सेनानीच नव्हते ते मुरब्बी राजकारणी होते. हे स्पष्ट होते. सन १७०३ व १७०६ मध्ये बादशहाने धनाजी जाधवांशी कामबक्ष व जुल्फिकारखानाच्या पुढाकाराने तहाचा प्रस्ताव मांडला पण दोन्ही वेळा वेळकाढूपणाने बादशहास झुलवीत ठेवण्यात त्यांनी मोठी मुत्सद्देगिरी दाखविली आणि मोगलांचे अंकित होण्याचे नाकारून आपला वेगळाच ठसा मराठ्यांच्या इतिहासात उमटविला. या शिवाय एक व्यक्ती म्हणून धनाजी सहिष्णुतावादी होते. हे खालील उदाहरणाने सिध्द होईल..
● मोगल इतिहासकार काफीखान म्हणतो :
“धनाजी जाधवांचे संताजी घोरपाड्यांवर सैन्य पाठवून त्याचा नाश केला” पण हे सर्वस्वी खोटे आहे. मल्हार रामराव चिटणीसाच्या मते, "संताजी घोरपडे हे काही कारणाने चंदीत महाराजांकडील लोकांशी तंटा करून झुंजले. यावरून त्याजवर माने सरदार पाठविले व हल्ला करविला. तेव्हा सरदार लोक यांनी बहुत रदबदली करून मातबर मानूस चाकरीवर मारावे, म्हणून राहविले, इतराजी जाहली. सेनापतीपद धनाजी जाधवास दिले..." यावरून धनाजी जाधवांनी काफीखान म्हणतो तसे “संताजीस मारविले" हे साफ खोटे ठरते. संताजींच्या विनाशामध्ये धनाजी जाधवाचे अंग नसून, उलट त्यांनीच छत्रपती राजाराम महाराजास दोन गोष्टी सांगून संताजींबद्दल रदबदली केली असेच वरील मजकुरावरून दिसते. पुढे म्हसवडकर नागोजी मानेने संताजीस ठार केले. त्याचा दोष धनाजींवर नाही. आपणास सेनापतिपद न देता ते संताजीस दिले, याबाबत धानजींनी कधीही नाराजी व्यक्त केली नाही, अथवा आपणास महाराजांनी सेनापतिपद दिले नाही याबद्दल जसे संताजी घोरपडे छत्रपती राजाराम महाराजांविरुध्द बंड करून उठले तसे धनाजी जाधवांनी केले नाही. यावरून धनाजी जाधव इतरांचा उत्कर्ष झाल्यास त्यात विघ्न न आणता संतोष मानणारे होते. या मधून धनाजी जाधवांची परोत्कर्ष सहिष्णुवृत्तीच नजरेस येते. या शिवाय धनाजी मराठ्यांच्या इतिहासातील एक चारित्र्यसंपन्न व्यक्ती होते...
छत्रपती राजाराम महाराजानंतर ताराबाईसाहेब-शाहूमहाराज काळातही धनाजींकडे मुलकी व लष्करी दोन्हीही खाती ताब्यात होती. तरी जहागिरीची सनद करून घेतली नाही. छत्रपती राजारामांनी बोरगाव व पाडळी ही दोन गावे सनद करून दिली होती. तसेच धानजींनी ब्राम्हण-मराठा असा भेद अंतःकरणात मुळीच बाळगला नाही. याप्रमाणे धनाजी जाधवांनी महाराष्ट्राकरिता मोठी कामगिरी करून १०/१५ लाखाचा मुलूख जहागिरी दाखल तोडून घेण्याऐवजी स्वार्थ त्याग करून फक्त दोन गावे छत्रपतींनी इनाम म्हणून दिली. त्यावरच समाधान मानले. या शिवाय एक हजार रुपये भरून पाच गावे व पुन्हा पाच हजार रुपये भरून एकशे अडतीस गावांची देशमुखी रीतसर खरेदी करून आपल्या कुटूंबाच्या उदरनिर्वाहाचे साधन करून ठेवले...
हा स्वार्थत्याग पुढे छत्रपती थोरले शाहूमहाराज कारकीर्दीत कोणत्याही शूर पुरुषांच्या चरित्रात आढळत नाही. पेशवेच स्वार्थी बनले, मग बाकीच्या सरदारांची काय कथा ! या प्रमाणे धनाजी जाधवांने आपल्या वडिलोपार्जित सिंदखेडच्या देशमुखी मध्ये वाटणी न मागता, आपल्या पराक्रमाने निराळेच वतन संपादन केले. त्या वतनाचा कारभार आपला ज्येष्ठ मुलगा सज्जनसिंह ऊर्फ संताजी जाधव याकडे सोपविला आणि आपण स्वतः व आपल्या चंद्रसेन व शंभुसिंग जाधव या मुलांच्या मदतीने स्वराज्यकार्य सुरू ठेवले. मुलकी व लष्करी दोन्ही कार्य शेवटास नेऊन स्वराज्यहित साधले...
सेनापती धनाजी जाधव एक उदार अंतःकरणाचे व्यक्ती होते. छत्रपती राजाराम महाराज नंतर सर्व राज्याच्या बंदोबस्ताचे कार्य धानजींकडेच होते. पुढे मोगलांशी लढण्याची संपूर्ण जबाबदारी धानजींवर पडल्याने सन १७०६ मध्ये त्यांनी वसुलीच्या कामाकरिता अंबाजी पुरंदरे व बाळाजी विश्वनाथ यांना आपल्या पदरी ठेवले बाळाजी विश्वनाथ हा लबाड व स्वार्थी असल्याचे चंद्रसेन जाधवांच्या नजरेस आले. त्याबद्दल त्याने वडिलास (धनाजी जाधव) हे आपल्या पदरी नसावेत म्हणून सांगितले. परंतु धनाजीने त्याकडे दुर्लक्ष केले. ते वयोवृध्द व उदार बुध्दीचे या कोकणस्थांचे गैरवर्तन त्यावेळी त्यांच्या लक्षात आले नसावे असल्यामुळेकिंवा लक्षात येऊनही त्याकडे दुर्लक्ष केले असावे. याशिवाय धनाजी जाधवांकडून छत्रपती शिवरायांच्या धोरणाचा विस्तार झाला. शिवरायांनी अमलात आणलेल्या गनिमीकावा युध्दपध्दतीत भौगोलिक घटकांचा समन्वय, युध्दतंत्र, युध्दशास्त्र व सुरक्षा यंत्रणेशी जोडून लोकांच्या वागण्याशी सांगड घातली. परिणामतः अत्युच्च ध्येयाने प्रेरित झालेल्या मराठ्यांची एक फळीच तयार झाली. "छत्रपती संभाजी महाराज हत्येनंतर चमकलेले सप्तर्षी” म्हणजे संताजी, धनाजी, रामचंद्रपंत, शंकराजी नारायण, परशुराम त्र्यंबक, खंडो बल्लाळ व प्रल्हाद निराजी हे शिवरायांच्या ध्येय धोरणाचाच परिपाक होत...
शिवछत्रपतींनी स्वराज्याचा विस्तार करताना भौगोलिक रचनेचे भान ठेवून स्वराज्याकरिता प्राणाची बाजी लावणाऱ्या मराठा सेनानींची मालिकाच विकसित केली. त्यामुळेच स्वातंत्र्य लढ्यात बलाढ्य शत्रूसमोर स्वराज्य टिकून राहिले. याचे कारण धनाजी मराठेशाहीतील उत्कृष्ट संघटक व व्यवस्थापक होता. त्याच्या संघटन व व्यवस्थापन कौशल्याची वैशिष्ट्ये यात आहे की कधी पराजय पदरी येत असताना जनतेचा त्याचेवरील विश्वास कधीच कमी झाला नाही. कधी त्यांच्या विरुद्ध त्याच्या सैनिकांनी बंडखोरी केली नाही. उलट सैन्यात तो प्रिय असल्याचेच मोगल इतिहासकारांचे मत आहे. जनता व सैनिक मोठ्या विश्वासाने त्याच्या सोबत व पाठीशी खंबीरपणे राहिली. मोगलांविरुद्ध आपणास निश्चित यश मिळेल ही त्यांनाही खात्री असावी. कारण अपयश आल्यास सर्वांचाच विनाश होता. त्याविरुद्ध खंबीरपणे लढण्याचा निर्धार धनाजी जाधव, त्याचे सैनिक, जनता व छत्रपतीनी केला होता. त्यात अखेर मराठे विजयी ठरले...
————————————
आर्टिस्ट : शेखर शिंदे.

No comments:

Post a Comment

गोव्याहून टेलरचे १४ डिसेंबर १६६४ चे पत्र सुरतेला गेले. त्यातील मजकूर :

  गोव्याहून टेलरचे १४ डिसेंबर १६६४ चे पत्र सुरतेला गेले. त्यातील मजकूर : "वेंगुर्ल्याच्या डच अधिकाऱ्याने वरवर तरी शिवाजी महाराजांपासून ...