विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 30 December 2025

छत्रपती राजाराम माहाराजांचे स्वराज्याचे उद्योग..


 छत्रपती राजाराम माहाराजांचे स्वराज्याचे उद्योग..

फ्रेंच इस्ट इंडिया कंपनीचा एक अधिकारी फ्रॅन्सिस मार्टिन याच्या रोजनिशीतून..
फ्रॅन्सिस मार्टिन फ्रेंच इस्ट इंडिया कंपनीचा एक अधिकारी. दिनांक ३० डिसेंबर सन १७०६ रोजी पाॅन्डिचेरी येथे याचे निधन झाले. सन १६७७ च्या शिवछत्रपतींच्या दक्षिणदिग्विजयी स्वारीत शिवरायांना शरण जाऊन त्याने फ्रेंचांचा बचाव करून घेतला. फ्रॅन्सिस मार्टिन याचे स्वराज्याचे तीन छत्रपती म्हणजेच शिवाजी माहाराज, संभाजी महाराज आणि राजाराम माहाराज यांच्याशी व्यवहार घडले.
छत्रपती राजाराम माहाराजांच्या जिंजीच्या वास्तव्यादरम्यानची परिस्थिती समजण्यासाठी मार्टिनची रोजनिशी बरीच उपयोगी आहे. सन १६८९ ते सन १६९३ या पाच वर्षातील मराठा-मोगल संघर्ष, मोगल सेनापती झुल्फीक्वारखान व राजाराम माहाराज यांच्यातील झटापटी, अंतस्थ व्यवहार, राजाराम महाराजांची दूरदृष्टी, प्रतिकुल काळातील मराठ्यांचा दक्षिणेतील उद्योग, कृष्णाजी अनंत सभासदाची महत्तता आदी गोष्टींबाबत या अभूतपूर्व काळातील बरीच माहिती त्याच्या रोजनिशीत तपशीलवार आढळून येते.
औरंगजेबाच्या दख्खन गिळंकृत करण्याच्या महत्वाकांक्षेला राजाराम माहराजांनी स्थिरबुध्दीने साम, दाम, दंड भेद ही चतुःसुत्री वापरून सहकारी मराठा योध्यांच्या सहकार्याने तसेच मोगली भोगवृत्तीचा फायदा उचलत जबरदस्त धोबीपछाड दिला. स्वराज्य हे अदिलशाही, कुत्तुबशाही सारखे सहज गिळंकृत करता येणार नाही हे औरंगजेबाला सप्रमाण दाखवून दिले.
मोगल जर दक्षिणेत येऊन हैदोस घालू शकतात तर मराठेही मोगली प्रांतात हैदोस घालू शकतात हे नेमाड प्रांतातील छाप्यांमुळे सिध्द करून दाखविले. उत्तरेतील या स्वारीमुळे दिल्लीकरांचे साम्राज्य कोणत्याही क्षणी सह्याद्री हादरवू शकतो याची कल्पना आलमगीरास आली.
राजधानी रायगड व स्वतः स्वराज्याच्या राजधानीत व महाराष्ट्रातील स्वराज्यात नसतानाही दिल्ली जिंका म्हणून सांगणारे राजाराम माहाराज खरोखरच धन्य.. औरंगजेबास रामचंद्रपंत अमात्य, संताजी, धनाजी, कृष्णाजी आदी मराठे म्हणजे जणू प्रतीशिवाजीचा अवतार भासले असावेत..
{खाफीखानाचा मराठ्यांविषयीचा लेखप्रपंच तर फारच बोलका आहे..}
दक्षिणेकडील दोन पातशाह्या गिळणारा औरंगजेब उरावर आलेला असतानाही राजाराम माहाराज दक्षिणेत आल्यानंतर तेथील स्वराज्याचे सर्व शिलेदार आपला धनी आला या भावनेने माहाराजांसमोर नजराणा घेऊन हजर झाले. यातच शिवछत्रपतींची सार्वभौम स्वराज्याच्या बांधणीची विण किती मजबूत व घट्ट होती हे सहज लक्षात येते.
फ्रॅन्सिस मार्टिन याच्या फ्रेंच मधिल रोजनिशीचे सर जदुनाथ सरकार यांनी इंग्रजी भाषांतर केले. रियासतकारांनी त्याचा मराठी अनुवाद केला. त्यातील एक नोंद खालील छायाचित्रात देत आहे.
संदर्भ - फ्रॅन्सिस मार्टिन रोजनिशी
श्री पुष्कर रवींद्रकुमार पुराणिक.

No comments:

Post a Comment

गोव्याहून टेलरचे १४ डिसेंबर १६६४ चे पत्र सुरतेला गेले. त्यातील मजकूर :

  गोव्याहून टेलरचे १४ डिसेंबर १६६४ चे पत्र सुरतेला गेले. त्यातील मजकूर : "वेंगुर्ल्याच्या डच अधिकाऱ्याने वरवर तरी शिवाजी महाराजांपासून ...