■ #प्रौढप्रतापपुरंदर -
(भाग -१)
सूर्य आता बुडत आला होता. तांबड्या-भगव्या संधीप्रकाशाची उधळण संपूर्ण कर्हेपठारावर झाली होती. पण कर्हेपठारावरच्या दऱ्या-खोऱ्यात एरवी सुखात असणाऱ्या खेडोपाडी आज नेहमीचा प्रसन्नपणा नांदत नव्हता. ना माघारी परतणाऱ्या गाई-गुरांच्या गळ्यातल्या घंट्या-घुंगरांचे आवाज होते, ना बाया-बापड्यांची तिन्ही-सांजेची लगबग. मंदिरांमधून घंटा-आरत्या आज ऐकू येत नव्हत्या. कुठल्याश्या गावात पारापासल्या चावडीवर ना कोणत्या बुवांचे कीर्तन ऐकू येत होते ना टाळ गर्जत होते. ना अंगणातल्या तुळशीपाशी दिवे लागले होते, ना गोठ्यातल्या गायी-म्हशींच्या दुधाने चरव्या निथळत होत्या...नाही म्हणायला घरट्यांकडे परतणाऱ्या पाखरांचा कलकलाट तेवढा गुंजत होता.
सुमसाम झालेल्या संपूर्ण मावळात कसलासा सुन्नपणा भरून राहिला होता! जणू एखाद्या अनामिक भीतीपोटी सगळं मावळ खोरं चिडीचिप्प होऊन बसलं होतं! पण ही भीती अनाठायी नव्हती, अनामिक नव्हती...
आज स्वराज्याच्या माजघरातच एक भलामोठा अजगर वेटोळे घालून फुत्कारीत होता!!
राजेवाडीजवळ औरस चौरस पसरलेल्या महाप्रचंड मोंगल छावणीत घाई गडबड चालली होती! शेकडो तंबू-राहुट्या आणि शामियान्यातुन लगीनघाई असल्यासारखे वातावरण होते. उत्साह होता. पागेत हजारो हजार डौलदार घोडे उभे होते, साखळदंडात बांधलेले हत्ती सुस्तपणाने झुलत होते, दावणीला बांधलेले सामान वाहणारे बैल आणि खेचरे, शेकडो मोठं मोठाल्या तोफा, शुत्तरनाळा, पिलनाळा..शस्त्रांचे मोठाले कोठार..त्यात रचलेल्या तलवारी-भाले-बंदुकांच्या राशी, गाड्या भरभरून वागवले जाणारे धान्य, दारू गोळ्यांनी भरलेले भलेमोठे पेटारेच्या पेटारे...कापडा-चोपडांचे ढिगारेच्या ढिगारे, अगणित पालख्या, अंबाऱ्या, मेणे, छत्रे वगैरे सगळा जामानिमा डोळ्यात ठरत नव्हता! हजारो मोंगल सैनिक युद्धसज्जतेत गुंतलेले होते. मोठे मोठे सरदार आणि उमराव आपापल्या फौजफाट्याचा जायजा घेण्यात मश्गुल होते. कानावर बोरू अडकवलेले कारकून आणि बगलेत लखोटे बाळगणारे निरोपे इकडून तिकडे घाईने फिरत होते. तात्पुरत्या उभ्या केलेल्या भटारखान्याच्या दिशेने पोत्याने धान्याची भाज्यांची ने-आण अव्याहत सुरू होती. जागोजाग पेटलेल्या मशाली, दिवटे आणि मेहताबा छावणी उजळून काढत होत्या. एकूणच छावणीची अमिरी आणि भव्यता मोंगली सैन्याची सज्जता आणि सकत दाखवत होती..!
छावणीच्या एका बाजूला उंच शाही शामियान्यात मिर्झा राजे जयसिंह इंद्रामण बुंदेला, कुबाद खान, किरतसिंह इत्यादी मंडळीसह मसलतीत गुंतले होते. सैन्याचे पुढचे डावपेच, हालचाली आणि राजकारणावर खलबते सुरू होती. आजूबाजूचे कारकून कधी हिशोब, कधी नकाशे, कधी आलेली पत्रे अधून मधून बैठकीसमोर सादर करत. मिर्झा राजे एक एक नकाशा बारकाईने न्याहाळत असतानाच -
"खम्मा घणी...राजा जी की जय हो..." एका निरोप्याच्या आवाजाने मिर्झा राजेंची तंद्री भंगली. प्रश्नार्थक चेहरा करून त्यांनी निरोप्याकडे पाहिले.
"हुकूम, सरदार दिलेर खान पुरंदर गढ़ पोहोंच चुके हैं। उनकी ओर से ये संदेस आया है कि वह किसी कारणवश सासवड नहीं रुक सके। सीधे गढ़ के पास पहुंचकर उन्होंने घेराबंदी का काम आरम्भ कर दिया है। आपसे प्रार्थना है के आप स्वयं तुरंत गढ़ की तरफ कूच करें।" राजपुती निरोप्या अत्यंत नम्र आवाजात बोलला.
थेट पुरंदर...?
इतकं तडका फडकी...?
दिलेर तर सासवडला मुक्कामी थांबून दोन दिवसांनी वेढा सुरू करणार होता..!
मिर्झा राजेंना थोडं आश्चर्यच वाटलं... शिवाय आपण मुखत्यार असता दिलेर परस्पर वेढा सुरू करतो हे पाहून त्यांना किंचित विशाद देखील वाटला असावा...!
=======================
शेकडो वर्षांच्या गुलामगिरीत खितपत पडलेल्या हिंदुस्थानात तळहातावरल्या तिळाएवढा भाग मात्र स्वातंत्र्याच्या झळाळीने झगमगून निघाला होता...!
कंदहारपासून ते जिंजीपर्यंतचा संपूर्ण भूभाग एकाच सब्ज हिलाली हुकूमतीच्या अमलाखाली आणण्याची स्वप्ने रंगावणाऱ्या औरंगजेबाच्या नजरेत दक्खनवर उगवलेला हा ठिपका सलत होता, ठिपका मात्र दिवसेंदिवस वाढतच चालला होता! पारतंत्र्याच्या काळ्याकुट्ट अंधारात तळपणारी ही भगवी ठिणगी त्याला स्वस्थ बसू देईना...!
वेळीच आवर घातला नाही तर ही ठिणगी वणवा भडकावेल अशी त्याला भीती होती, भीती रास्त होती...!
पण आवर घालावा कसा...?
अमीर-उल-उमराव नवाब शाहिस्तेखान, जसवंत सिंह राठोड, कारतलब खान वगैरे बड्या बड्या मोंगल सरदारांना मराठ्यांनी अक्षरशः झोडपून बडवून काढले होते. हिंदुस्थानातल्या सर्वात मोठ्या सल्तनतीचे हे जंगबहाद्दूर बाशिंदें! सिंधू नदी पासून ते ब्राह्मपुत्रेपर्यंत पसरलेल्या मोंगल रियासतीचे शिलेदार!
अश्या ह्या नामवंत सरदारांना पिकात घुसलेल्या रानडुकरांना जसे हुसकावून लावले जाते तसे हाकून लावले कोणी? सह्याद्रीच्या खोऱ्यातल्या मराठ्यांच्या पोरा-सोरांनी! बरं ह्यांचे पराभव काय साधेसुधे होते..?
कोकण जिंकण्याचा मनसुबा बाळगून दहा हजार पठाणांसह उंबरखिंडीत उतरलेल्या कारतलबला मूठभरच मराठ्यांनी बुकल बुकल बुकलला! एवढा नावाजलेला सरदार कारतलब! अक्षरशः फक्त अंगावरच्या कपड्यानिशी कसा बसा माफीची भीक मागत माघारी चालता झाला! नवाब शाहिस्तेखान! खुद्द जहाँपनाहचे मामा. लाखभर फौजेच्या गराड्यात लाल महालात तीन वर्षे ठिय्या मांडून बसले होते! पाहून पाहून एकेरात्री महाराजांनी मामासाहेबांना असा दणका दिला की पुण्यात तीन वर्षे रमलेले मामा तीन दिवसात गाशा गुंडाळून पळून गेले! तीन वर्षांच्या बदल्यात मामाना तीन बोटे मात्र द्यावी लागली! महाराजांनी कयामतच्या दिनापर्यंतसाठी मामासाहेबांच्या बेइज्जतीची सोय करून टाकली!
असे कित्येक सरदार शेकून निघाले, शाही खजिन्यातले करोडो रुपये खर्चून झाले, तोफांच्या, बंदुकांच्या अगणित फैरी झाडून झाल्या, हजारो शिपाई, लाखो हत्यारे, खंडोगणती दारुगोळा ढगात गेला...तरीही शिवाजी नावाचे वादळ शमता शमेना! लवेना! झुकेना!
एवढेच कशाला? मोंगल रियासतीचे वैभव असणारी, धन-धान्य, पैसा-अडका, जड-जवाहिर, दुधा-तुपाने, सुख-समृद्धीने उतू जाणारी, संपन्नतेची असल मिसाल कायम करणारी, मुग़लिया सल्तनतीची शानोशौकत म्हणून मिरवणारी सुरत ह्या शिवाजीने लुटून धुवून नेली! उरले सुरले जाळून पोळून राख करून टाकले! दात कोरायला काडी शिल्लक ठेवली नाही. जणू मोंगलशाहीच्या कानफटात मारून मुकुटावरचा मणीच ओरबाडून नेला! इतका प्रचंड अपमान आणि फजिती आलमगीर औरंगजेबाला सहनच होईना. दक्खनच्या कोण्या एका पहाडी मराठ्याने स्वतःला 'आलमगीर' म्हणवणाऱ्या हिंदुस्थानच्या शेहेंशाहची दाढी मुठीत नुसती पकडलीच नव्हती तर हिसडे देऊन, अगदी उपटून हातात ठेवली होती. बेशक ह्या सर्व गोष्टी देशविदेशात देखील कळत असणार. मोंगल रियासतीच्या बेअब्रूचे किस्से चघळले जात असणार! हे विचार औरंगजेबाला सतत छळत होते.. पण करायचं काय?!
आणि मग एके दिवशी औरंगजेबाला खयाल आला तो एका बुलंदमियार सरदाराचा! कच्छवाह घराण्याचा वारसा सांगणारे, पिढीजात राजेपद मिरवणारे, प्रभू श्री रामाचे वंशज म्हणवणारे, परमप्रतापी, महापराक्रमी, मुत्सद्दी, हुशार, अनुभवी, तालेवार आणि समशेरबहाद्दूर - मिर्झा राजे जयसिंह!! मिर्झा राजेंच्या पिढ्यान् पिढ्या मोंगल बादशहांच्या सेवेत खर्ची पडल्या होत्या! इमानदारी, शौर्य आणि मुत्सद्देगिरी मिर्झा राजेंच्या ठिकाणी एकवटलेली होती. बस! इतका नायाब सेनापती दुसरा नाहीच! औरंगजेबाने लगोलग मिर्झा राजांना तलब करून दक्खनच्या मोहिमेची जबाबदारी त्यांच्या मजबूत खांद्यांवर टाकली!
"मिर्झा राजा, आपकी कुव्वते बाजू और शमसीर की ताकत से पुरा हिंदोस्तान मुखातिब है। आपकी दानिशमंदी से भी पूरी कायनात वाकिफ है। मुग़लिया सल्तनत पर मंडरानेवाली न जाने कितनी आफतों के खिलाफ आपने अपने बुलंद हौंसलों और ताक़तसे सल्तनत का दिफ़ा किया है। आज माँबदौलत फिर एक बार आपसे खिदमत की उम्मीद रखती है। दख्खन में सिवाजीने जालसाजी और मक्कारी से मुग़लिया किलों और शहरों पर कब्जा करने की जुर्रत की है। इस दगाबाजी और बद् दियानतीपर उसे सजा देने के लिए काफी सारे सिपहसालार रझामंद है। लेकीन माँबदौलत इस खुशकिस्मतीसे आपके मुकद्दर को नवाजना चाहते हैं...हमे आपकी बहादुरी और ईमानदारी पर पूरा ऐतबार हैं।"
औरंगजेबाला वास्तविक मिर्झा राजेंशिवाय दुसरा उपाय सुचत नव्हता. पण तो आव असा आणू पाहत होता जणू काय ही मोहीम चालू करून तो मिर्झा राजेंवर उपकारच करत होता!
बादशाहच्या ऐतबारीचा मान ठेवून मिर्झा राजेही जल्द अज जल्द दक्खनच्या दिशेने निघाले! औरंगजेबाने मिर्झा राजेंच्या दिमतीला अगणित खजिना, तोफा, हत्ती, उंट, दारुगोळा दिला. पन्नास हजार पायदळ आणि वीस हजार घोडदळ दिले. दिल्लीहून दक्खनला पोचता पोचता हा आकडा वाढत जाणार होता. सन 1665च्या जानेवारी महिन्याच्या सुमारास ह्या प्रचंड फौजेचा लोंढा दख्खनच्या दिशेने गडगडत सुटला.
मिर्झा राजे नर्मदा ओलांडून आधी दख्खनच्या दरवाज्यावर, म्हणजे बुऱ्हाणपुरात आले. औरंगजेबाचा मुलगा, शाहजादा मुअज्जम दक्खनचा सुभेदार होता. मुअज्जम साहेब मस्तमौला होते. उत्तमोत्तम पक्वान्ने खावीत, पोटभर दारू प्यावी, मनसोक्त शिकार करावी, दिलखेच जनानखान्याचा आस्वाद घ्यावा आणि निवांत हुक्का फुंकीत मुजरे पाहावेत एवढाच त्यांचा साधा सरळ कार्यक्रम असे. मराठ्यांसोबत, आदिलशाहीसोबत भांडणे करून मुघल राज्याचा विस्तार वगैरे भानगडीत त्याला अजिबात दिलचस्पी नव्हती!
बुऱ्हाणपुरात काही दिवस मुक्काम करून मिर्झा राजेंनी फौजांची जुळवाजुळव केली. तिथेच त्यांना दिलेर खान येऊन सामील झाला! दिलेर वतनात असताना त्याला मिर्झा राजेंना सामील होण्याचे फर्मान दिले गेले. शाही हुकुमाची तामील बजावण्यासाठी दिलेर पठाणी फौजेसह तडक बुऱ्हाणपुरात दाखल झाला. रुस्तुमेकंदाहार दिलेर खान जातीने पठाण होता. स्वभावाने काबुल-कंदहारच्या वाळवंटाइतकाच रखरखीत, क्रूर, गरममिजाज आणि करडा! धर्मप्रति जितका कडवा, औरंगजेबाप्रति तितकाच इमानी!
बुऱ्हाणपुराहून हा अजस्त्र मोंगली वरवंटा मार्च 1665च्या सुमारास स्वराज्यावर चालून आला! मिर्झा राजेंच्या मते आधी सर्व मैदानी मुलुख मारून डोंगर-किल्ल्यांची रसद तोडणे महत्वाचे होते. त्यानुसार त्यांनी हालचाली सुरू देखील केल्या. पुण्यात पोचून राजांनी कुतुबुद्दीन खान, बीमरदेव सिसोदिया, झाइद खान वगैरे सरदारांना फौजा देऊन जुन्नर, लोहगड वगैरे भागात पाठवले. रणदौलत खान, जानिसार खान वगैरे सरदारांना हजारोंच्या फौजा देऊन कानद खोरे, भोर मावळ, गुंजण मावळ, पौड खोरे इत्यादी भागांची पक्की नाकेबंदी करून ठेवली! अनेक सरदाराना फौजफाटा देऊन स्वराज्याच्या निरनिराळ्या भागात ठाणी काबीज करण्यास सोडले. शिवाजी महाराजांविरुद्ध यश मिळावे म्हणून मिर्झा राजेंनी इथे कोटीचंडी यज्ञ देखील केला! भरपूर दान-धर्म केला! देव देखील गालातल्या गालात हसले असणार! अधर्मी भक्त काय रावण देखील होता...
दिलेर खानाचा मनसुबा मिर्झा राजेंच्या अगदी उलट होता. त्याला आधी डोंगरी किल्ले जिंकून घेण्याची घाई लागली होती. एकदा का डोंगरी दुर्गम मुलुख हातात आला की मग शिवाजीला पनाह घेण्यास जागाच उरणार नाही असा त्याचा तर्क होता! पण सह्याद्रीचे किल्ले म्हणजे काय चिकणमातीची ढेकळे होती की काय सहज फुटायला?
पण अखेर मिर्झा राजेंनी दिलेरच्याच मनसुब्याला मान्यता दिली! मसलतीत पहिला गड निवडला गेला. पुण्याच्या आग्नेयेस असणारा स्वराज्याचा एक अभेद्य किल्ला!! किल्लेपुरंदर!!!
त्यानुसार मार्च महिन्याच्या अखेरीस मोंगली सैन्य लोणी-काळभोर मार्गे दिवे घाटाला वळसा घालून राजेवाडीस पोचले! छावणी पडली. सैन्याची आघाडी दिलेर खान स्वतः सांभाळत होता! इथून पुरंदर फक्त सात कोस!
===================
राजेवाडीहून मिर्झा राजेंचा निरोप घेऊन दिलेर खान सासवडच्या रोखाने रवाना झाला. राजेवाडीहून सासवड फार तर एक मजलभराचे अंतर. तो आघाडीची फौज घेऊन पुरंदरला वेढा घालणार आणि सुपे-शिरवळ वगैरे ठाण्यांचा बंदोबस्त करून मिर्झा राजे त्याला येऊन मिळणार असा बेत मुकर्रर झाला होता. त्याच्या निसबतीला सुमारे दहा हजार फौज होती. शिवाय पाच हजार हत्यारबंद आडदांड पठाण होते!
दुपार टळून गेली तसा दिलेर खान खळद, नारायण पेठ वगैरे ओलांडून दौडत सासवडास पोचला! मोंगली फौज येण्याची खबर लागल्याने गाव ओस पडले होते! जमेल तितके आणि जमेल तसे गाठीशी मारून गरीब रयतेचे जथ्थेच्या जथ्थे बायका पोरांसह डोंगर दऱ्यात पळून गेले! हीच परिस्थिती मावळतल्या अनेक गावांची होती. गेली कित्येक दशके-शतके हाच शिरस्ता होता. कुठल्या ना कुठल्या सुलतानाची फौज अचानक दौडत येई. घरे दारे लुटली जात, आया-बहिणी बाटवल्या जात, माणसांना पकडून गुलाम बनवले जाई, गायी-गुरांना फरफटत नेले जाई...शेतीची नासधूस आणि माणसांच्या कत्तली होत त्या वेगळ्याच!
सासवडच्या बाहेर मुक्काम करण्याची फौजेची तयारी सुरू झाली. बुणगे लगबग करून शामियाने-राहुट्या उभारू लागले. हत्ती-घोड्यांसमोर वैरण पडू लागली. सरदार आपापल्या शिलेदारांना ओरडून ओरडून हुकूम सोडू लागले. नोकर चाकर सामान सुमान वागवत धावपळ करू लागले.
थोड्या बाजूला दिलेर खान काही लोकांसह फौजेच्या हालचाली पाहत मोठ्या दिमाखात उभा होता. तो मध्येच एकदा फौजेकडे तर मधेच पुरंदरच्या दिशेला पाही! इथून पुरंदर फक्त अडीच कोस. इथून दिलेरला उंचच उंच डोंगरावर बालेकिल्ल्याच्या तटबंदीचा आकार पुसट दिसत होता...
"क्या कहते हो मुकर्रब? यह किला कितने वक्त में काबिज़ होगा?" - दिलेर कुर्र्यात बोलला.
"ज्यादा से ज्यादा हफ्ताभर हुजूर। हमारी तोपें इसकी दीवारों को देखते ही देखते ढहा देंगी। और फिर किले पर होंगे ही कितने लोग?" मुकर्रबखान किल्ल्याकडे पाहत उत्तरला.
"जितने भी होंगे मुकर्रब..हमारी शमशीर से मुखातिब होंगे तो दोजखही पोहोंच जाएंगे।"
"बहोत आला फर्माया हुजूर..."
हे बोलणे चालू असतानाच अचानक कल्लोळ उसळला! छावणीच्या मागच्या बाजूला भयातिरेकाने किंकाळ्या उठल्या. लोक सैरा-वैरा धावू लागले. दिलेर दचकला! एकदम काय झालं? एखादा हत्ती-बित्ती बिथरला की काय? दिलेर आणि मंडळी छावणीकडे दौडली. बघतात तो बुणगे वाट फुटेल तिकडे धावत होते, जनावरांसाठी रचलेल्या गवताच्या गंजी धडाधड जळत होत्या. धूर उठला होता! 'भागो भागो'च्या हाकाट्या उठल्या होत्या! दिलेर भंडावून गेला...जिकडे गोंधळ सुरू होता तिकडे धावला..आणि समोर पाहतो तर
शे-पाचशे मर्द मराठे गडी बेलाशक छावणीत घुसले होते...!
मराठे आले...? मराठे...?
खरंच आले...? कुठून...? कधी...? कसे...?
भगवे झेंडे थुई थुई नाचवत मराठा घोडेस्वार तलवारींनी दिसेल त्याला कापत सुटले होते, भाल्याने भोसकत आणि पट्ट्यांनी छाटत सुटले होते!!
होय...!!! पंधरा हजारांच्या पठाणांच्या फौजेवर त्या इवल्याश्या पण बेडर मराठा तुकडीने बिनदिक्कत, बेधडक छापा घातला होता!!
नुसती कत्तल कत्तल कत्तल!! दिलेर क्षणभर अवाक् झाला..मग संतापला!
तार आवाजात भराभर हुकूम सोडून त्याने सरदारांना हुशार केले. इतका वेळ नेमकं काय चाललंय हेच न कळल्याने सुन्न झालेले पठाण दिलेरच्या आरडा-ओरड्याने भानावर आले. ताबडतोब हत्यारे आणि पागा पेश केली गेली. मराठ्यांना हुसकून लावण्यासाठी दिलेर आणि मंडळी तीर तलवार घेऊन, बंदुका ठासून सज्ज झाली..
पण..
कुठायत मराठे?! गायब झाले! असे कसे गायब झाले? कुठे गेले? माहीत नाही...कुठून आले? पता नही! दिलेर खानाचे पाहिले स्वागत एकूणच जोरदार झाले. मराठ्यांनी बेसावध दिलेरच्या पाठीत जणू जोरखैच गुद्दाच घातला होता. जमेल तितकी कापाकापी आणि जाळपोळ करून मराठे पसार झाले होते!
छावणीची झालेली दुर्दशा पाहून दिलेर भडकला!!
"मिर्झा राजा को पैगाम भेजो। कहना सीधे किलेपर पोहोंचे.." संतापाने दातावर दात चढवून दिलेर कसा बसा पुटपुटला!
आणि मग फौजेला हुकूम सोडून तो स्वतः पुरंदरच्या दिशेने दौडत सुटला. मागोमाग काफीखान, मुकर्रबखान, मुसेखान वगैरे मंडळी देखील दौडत निघाले. दिलेर संतापाने धुमसत होता! एवढ्या मोठ्या सैन्यावर चिमूटभर उंडग्यांनी छापा घालायची हिम्मत केलीच कशी?! कशी? कशी म्हणजे काय? मराठ्यांना सवयच होती अशी मेहमाननवाजी करण्याची!
सासवड ऐवजी आता थेट पुरंदरच्या पायथ्याशीच मुक्काम घालायचा हा निश्चय करून तो फौजेसकट बेहाय दौडत पुरंदरपायथ्या जवळ आला.
आणि एवढ्यात! गनिमाची फौज किल्ल्याच्या जवळ येतेय हे पाहून अकस्मात किल्ल्यावरून तोफांची गडगडाटी सरबत्ती सुरू झाली! हल्ला होण्याआधीच पुरंदरवरून प्रतिहल्ला सुरू झाला! काही समजायच्या आतच तोफांचे गोळे येऊन फौजेवर अचूक आदळू लागले! दिलेर पुन्हा एकदा हैराण झाला...तोबा! हे मराठे म्हणजे माणसे आहेत का सैतान? दिलेर खानाला मराठ्यांशी झुंजायचं म्हणजे कोणत्या परिस्थितीला सामोरं जायचं हे समजून चुकलं! सांभाळून अंतर ठेवत फौज पायथ्याशी स्थिरावली!
घोड्यावरून उतरून अपमानाच्या आगीत होरपळलेल्या, सुडाने पेटलेल्या दिलेरने पुरंदराकडे नाकपुड्या फेंदारून जळजळीत नजर फेकली...
समोर उत्तुंग, बुलंद, बेलाग किल्लेपुरंदर माथ्यावर जरतारी भगवा मिरवत ताठ मानेने उभा होता!!
क्रमशः
Suraj Udgirkar
===================
टीप : कहाणी रंगवताना काही संदर्भ चुकले, काही चूक भूल झाली तर मोठ्या मनाने माफ करा

No comments:
Post a Comment