#प्रौढप्रतापपुरंदर - (भाग -३)
"भाऊ..भाऊsss..."
दारू-धुळीत माखलेला बाबाजी धावत पळत बारुदखान्यापाशी आला. घामाने निथळून गेलेल्या बाबाजीला धाप लागली होती. यशवंतराव काही मावळ्यांसह दारूच्या कोठारापाशी उभे होते. सोबतच्या चार-दोन गड्यांना तार स्वरात हातवारे करून सूचना देत होते. परिस्थितीचा अंदाज घेऊन पुढच्या योजना ठरवत असावेत. गडाच्या चोहोबाजूंनी तोफांचा प्रचंड धडधडाट सुरू होता. बंदुकांचे आणि हाथनळ्यांचे कडकडणारे आवाज, आरडा-ओरडा, किंकाळ्या, आरोळ्या घुमत होत्या. ह्या सगळ्या कोलाहलात त्यांना बाबाजीच्या हाका ऐकूच आल्या नाहीत.
"भाऊsss " - बाबाजी बेचैन होऊन अगदी जवळ येऊन ओरडला! यशवंतराव वळले आणि बाबाजीला पाहताच त्यांचा पारा चढला!
"बाबा? तू इथं? मोर्चा कोणास विचारून सोडलास?" यशवंतराव चिडून खेकसलेच.
"भाऊ...भाऊ लवकर चल...तिकडे गनीम आवरत नाही! आणि...आणि भांडे बघ केवढे आणलेत..." - बाबाजी चिंतातुर स्वरात ओरडला.
हे ऐकून यशवंतरावांच्या पोटात गोळा फिरला! ते लगोलग बाबाजीला सोबत घेऊन उत्तरेकडच्या तटावर धावले. गडाच्या उत्तरेला मोंगल आणि मराठ्यांची भयंकरच जुंपली होती! मोंगलांचे थवेच्या थवे गड चढून येत होते. तटावरचे मराठे घाईघाईने बंदुका ठासून मोंगलांवर बार काढत होते. समोरून येणाऱ्या प्रत्युत्तरांना आडोसा घेऊन चुकवत होते. तटावरच्या तोफांची तोंडे सतत आग पाखडून लालबुंद झाली होती तर गनिमाच्या तोफांचे गोळे एका मागोमाग एक धडाधड तटावर येऊन आदळत होते. प्रत्येक धडाक्यानिशी बुरुजाची माती उधळली जाई. दगडांना चिरा पडत. कधी कुठून सट्टदिशी गोळी येईल किंवा सरसरून एखादा बाण सुटेल काहीच नेम नव्हता. धुळीचे अन् धुराचे लोटच्या लोट उठत होते. दारूचा वास जीव गुदमरून टाकीत होता. तोफांचे कानठळ्या बसवणारे आवाज घुमत होते. मोंगली शिपायांच्या आणि मराठ्यांच्या आरोळ्या गर्जनांनी अवघा परिसर दणाणून गेला होता. ह्या सगळ्या धामधुमीत तटाच्या झरोक्यातून यशवंतरावांनी पलीकडे नजर टाकली आणि त्यांच्या काळजाचा ठोका चुकला. असंख्य मोंगल हशम मराठ्यांच्या प्रतिकाराला तोंड देत नेटाने कासरा-कासराभर अंतर कापत आता बऱ्यापैकी वर चढून आले होते! त्यांचे अनेक नवे मोर्चे पहाडाच्या उतरणीवर गडाला कांजिण्या लागाव्यात तसे जागोजाग येऊन बसले होते. ह्या मोर्चांवरून तटावर गोळ्यांचा आणि हाथनळ्यांचा वर्षाव होत होता. मोंगली तोफखाना तर अखंड धडधडत होता! मोंगल शिपाई दगडा-धोंड्यांचा, झाडांचा, सांदी-कपाऱ्यांचा आडोसा घेत पुढे पुढे सरकत होते. तटावरच्या मराठ्यांना बाणाच्या आणि बंदुकीच्या टप्प्यात घेऊ पाहत होते. पुढे सरकणाऱ्या ह्या मोंगलांना रोखण्यासाठी मराठ्यांचा जीवतोड प्रयत्न चालला होता. पण तो प्रयत्न कमी पडत होता. मोंगलांचा जोर चौतर्फा होता.
मोंगली सैन्यासोबतच गडाच्या खड्या चढाईवरून एक भली थोरली प्रचंड तोफ साखळदंड आणि जाडजूड दोरखंडांच्या साहाय्याने ओढत खेचत वर आणली जात होती! तोफेचा आकार नजरेत ठरत नव्हता. वजन तर खंडोगणती असावे. पाचपन्नास मोंगली हशम अत्यंत कष्टाने आणि तेवढ्याच जिद्दीने, कण्हत कुंथत ती राक्षसी तोफ भर उन्हात बोट-बोटभर खेचत होते! ती अजस्त्र तोफ पाहताच यशवंतरावांच्या जीवाची तगमग उडाली!! ह्या तोफेने जर तटावर आग ओकायला सुरुवात केली तर मात्र आपल्या पुढ्यात काय वाढून ठेवले आहे ह्याचा त्यांना पुरेपूर अंदाज आला.
"बाबा...जा! तुला वेगळे सांगणे न लागे!" - यशवंतराव मोंगलांकडे आणि त्या तोफेकडे नजर रोखून जड आवाजात म्हणाले. यशवंतरावांच्या आवाजात जितकी हताशा होती, तितकाच निर्धार होता! बाबाजीने मान डोलावली! जे समजायचे ते समजला. पाठीवरचे धनुष्य हातात घेऊन घाईने बुरुजाकडे धावला!!
===================
पुरंदर आणि वज्रगडाला मोंगलांचा वेढा पडून आता आठवडा उलटून गेला होता. पुरंदर आणि वज्रगड एकाच डोंगरावर एका छोटेखानी दरीवजा खिंडीने विभागले गेलेले दोन किल्ले.
वज्रगडाची उंची पुरंदरच्या बालेकिल्ल्याइतकी होती. गडाचा घेर जेमतेम होता. गडाचा पसारा लहान असल्याने इथे फारशी शिबंदी नसे. वज्रगडाला लागून पुरंदरची विस्तीर्ण माची होती. समान उंची असल्याने वज्रगडावरून पुरंदराच्या बालेकिल्ल्यावर तोफांचा मारा अगदी सहज आणि अचूकरित्या होऊ शके. शिवाय खालची जवळ जवळ संपूर्ण माची बंदुका-बाणांच्या टप्प्यात आल्याने शत्रूच्या ताब्यात आलीच म्हणून समजावे! नेमकी हीच नस दिलेर आणि मिर्झाराजांच्या अनुभवी आणि चाणाक्ष नजरांनी पक्की हेरली होती! दिलेर खानाने मोंगली फौजेचा सगळा जोर वज्रगडावर केंद्रित केला!
आठ-पंधरा बुरुजांची तटबंदी असलेला लहानसा तो वज्रगड. गडात जेमतेम तीनएक-शे मराठ्यांची चिमुरडी शिबंदी. बरीचशी तर कोवळी मिसरूडं फुटलेली मावळातली मराठी पोरं! मोजक्याच तोफा-बंदुका, दारुगोळा आणि माणसे. गडाखालची मोंगली फौज किती? सुमारे पाऊण लाख!! शिवाय त्या फौजेत होत्या हजारो तोफा, लाखो बंदुका, अगणित खजिना, शेकडो हत्ती-उंट, अक्षरशः उतू जाणारी युद्ध सामुग्री, महिनोन्-महिने पुरावे इतके धान्य-धुन्य आणि तमाम हिंदोस्थानात नावाजलेले बडेबडे पठाण-राजपूत-बहेलिये-बुंदेले-रोझभानी-कुरेशी-गौड-जाट वगैरे युद्धकुशल नायाब सरदार!!
कुठेच, कसलीच बरोबरी नव्हती..पण तरीही एवढ्या प्रचंड मोठ्या फौजेसमोर पुरंदर आणि वज्रगडाने न डरता मोठ्या टेचात मांड थोपटली होती!
पुरंदराची मुरारबाजीकडे होती तशी वज्रगडाची अख्तीयारी दोन सख्ख्या भावांकडे होती. यशवंतराव बुवाजी प्रभू आणि बाबाजी बुवाजी प्रभू! दोन्ही भाऊ इरेसरीने मोंगलांशी झुंजत होते. कारण दावावर वज्रगड होता! वज्रगड म्हणजे जणू पुरंदराची चावी आणि पुरंदरावर कब्जा म्हणजे संपूर्ण कर्हे पठारावर कब्जा! वज्रगड हातचा गेल्यास पुरंदराचे मरण अटळ होते. ह्याची जाणीव असलेले हे दोन्ही भाऊ जीव खाऊन मोंगलांशी भांडत होते!
वेढा सुरू झाला आणि पुरंदराच्या उत्तरेकडून म्हणजे पुण्याच्या बाजूने मिर्झा राजांनी बादिल बख्तीयार, कुबाद खान, मीर आतिष, इंद्रामण बुंदेला, त्यांचा थोरला मुलगा किरतसिंह, हरिभान गौड, दिलेर खानाचे पुतणे मुझफ्फर आणि घैरत खान, मित्रसेन, राजा राय सिंह, सय्यद मकबूल आलम वगैरे वगैरे सरदारांची तैनाती केली होती. ह्या सर्व सरदारांनी आपापल्या सैन्यासह वज्रगडाविरुद्ध आघाड्या उघडल्या होत्या. गडाच्या ईशान्येला म्हणजे नारायणपुराच्या बाजूने डोंगराची एक खडी सोंड वज्रगडावर चढत जाते. त्यातल्या त्यात गडावर चढायला हीच एक वाट सोयीची असली तरी ही वाट अतिशय अवघड आहे. मीर आतिष खानाने आपला संपूर्ण तोफखाना ह्या खड्या चढाईवरून वर चढवायला सुरुवात केली होती. हे डोकं दिलेरखानाचं!! उद्देश हा की तोफा जास्तीत जास्त वर चढवून गडाच्या तटबंदीवर मारा करता यावा! गड चढताना मराठ्यांच्या तिखट प्रतिकाराला न जुमानता मोंगल फौज आणि तोफखाना गडाची चढाई नेटाने पार करू लागला!
ह्याचप्रमाणे गडाच्या पाठीमागे म्हणजे दक्षिणेच्या बाजूला काळदरी होती. दाऊदखान कुरेशी आणि रसूल बेग रोझभानी हे दोन सरदार भल्यामोठ्या फौजेसह संपूर्ण डोंगराला वळसा घालून काळदरीत उतरले. ह्याबाजूला पुरंदरचा केदार दरवाजा(खिडकी) होता. दाऊद खानाच्या निसबतीला शेरसिंह राठोड, राजसिंह राठोड, मोहम्मद खान, सय्यद झैनुल वगैरे सरदार होते. मीर आतिषप्रमाणे रोझभानीचा देखील प्रचंड मोठा तोफखाना काळदरीत दाखल झाला. जागोजाग मोर्चे उघडून रोझभानीच्या तोफा गडाच्या दक्षिणेकडून तर मीर आतिषच्या तोफा उत्तरेकडून वज्रगडावर कडाडू लागल्या.
पुरंदर-वज्रगडाची चारही बाजूनी पक्की मोर्चाबंदी झाली! आणि मोंगली फौजेचा सगळा जोर, सगळी ताकद, सगळी सकत आणि संपूर्ण शक्ती दिलेर खानाने वज्रगडावर एकत्रित केली! वज्रगडाचे नरडे आवळून पुरंदराला जेर करण्यासाठी दिलेरखान असुसला! वज्रगडाच्या चोहो बाजुंनी मोंगली फौजा इंचा-इंचाने वर सरकू लागल्या. वज्रगडावर एकच झोड उठली!!
मोंगली बंदुका आणि तोफांच्या माऱ्याखाली अवघा वज्रगड सडकून निघू लागला. मोंगली तोफखान्याने गडाला जणू अग्नीस्नान घालायला घेतले! गडावचे मराठे अहोरात्र मोंगलांचे हल्ले मोडून काढू लागले. पण मोंगलांची संख्या आणि ताकद इतकी प्रचंड होती की मराठ्यांना क्षणाचीही विश्रांती लाभेना. मोंगलांनी इंचभरही वर सरकलेले मराठ्यांना मान्य नव्हते! पण मोंगली जोर त्यांच्या शक्तीपलीकडचा होता!
वज्रगडाला लवकरात लवकर गुढग्यावर आणण्यासाठी दिलेर खानाने तीन प्रचंड तोफा गडाच्या उत्तरेकडून जास्तीत जास्त वर चढवण्याचा चंग बांधला. दक्खन काबीज करण्याकरता त्याने ह्या तीन कैदाशिणी खास बुऱ्हाणपुराहून ओढत कर्हेपठारावर आणल्या होत्या. ह्या तिन्ही तोफा विजापूरच्या 'मुलूखमैदान' आणि जंजिऱ्याच्या 'कलालबांगडी' इतक्याच खुंखार आणि विध्वंसक होत्या. पहिली होती 'अबुल्लाखान'. दुसरी होती 'फत्ते लष्कर' आणि तिसऱ्या राक्षसीणीचे नाव होते 'हवेली'!!खंडीभर बारुद खाऊन जेंव्हा ह्या तोफा मणभर वजनाचा गोळा ओकत तेंव्हा अतिभयंकर धडाका उडे. पाच पाच कोसांवर हा आवाज ऐकू जाई! खुद्द गोळा डागणाऱ्या गोलंदाजांची छाती दडपून जावी! शत्रूची काय हालत होत असेल?
ह्या तोफांचे शेकडो मणांचे वजन वागवत मोंगल हशम घाम गाळीत त्या तोफा गडाच्या चढाईवरून कसे बसे ओढू-खेचू लागले. भयंकर वजनाच्या त्या तोफा गडावर चढविण्यासाठी हत्ती-उंट-बैल वगैरे जनावरे अगदी निकामी होती. हे काम माणसांनीच करायचे! मोठाले साखळदंड बांधून आळीपाळीने मोंगली हशम छाती फुटेस्तोर ओढून त्या अजस्त्र धुडांना गडावर चढवू लागले! ह्या तोफा चढवताना मोंगलना अतोनात कष्ट होत होते. वरच्या मराठ्यांच्या तोफा, बाण आणि गोळ्या झेलत, चुकवत मोंगल निर्धाराने वर वर सरकत होते. तोफा खेचणारे कित्येक हशम मराठ्यांनी उडवले. पण मोंगलांकडे माणसांचा तुटवडा कुठे होता? हशम मरत असले तरी तोफा वर वर सरकूच लागल्या. मोंगलांचा तो हट्ट पाहून गडातल्या मराठ्यांची तळमळ तळमळ होत होती. मोंगलाना हुसकवण्यासाठी मराठ्यांनी अक्षरशः अकांत मांडला होता. पुरंदरावरून मुरारबाजीला हे सगळं दिसत होतं. पुरंदराच्या कंदकड्यावरून मराठ्यांनी भयंकर प्रतिकार केला. हुक्क्याचे बाण, उखळी तोफा, बंदुकांचा तुफानी मारा केला. पण मराठ्यांची शक्ती अगदीच कमी पडत होती. पुरंदर आणि वज्रगडावरची मंडळी मोंगलांचा तो नेट पाहून तळमळण्याखेरीज आणखी काहीच करू शकत नव्हती! दिवसेंदिवस मोंगली फौजांची नखे वज्रगडाच्या नरड्याच्या जवळ जवळ येऊ लागली!
मोंगलांच्या प्रत्येक मोर्चावर दररोज स्वतः दिलेरखान हजर असे. तो अगदी हट्टाला पेटला होता! कुठल्याही किमतीवर त्याला पुरंदर जल्दअज जल्द काबीज करून हवा होता. मिर्झाराजे देखील जातीने उपस्थिती लावून मोंगली फौजेला प्रोत्साहन देत. अखेर मोंगलांचे बळ, दिलेरखानाची जिद्द आणि मिर्झाराजांचे पाठबळ इतके एकरूप झाले की तिन्ही तोफा एकदाच्या दिलेरखानाला हव्या असणाऱ्या उंचीवर पोचल्या आणि वज्रगडाची परिस्थिती आता मात्र चक्रीवादळाच्या मध्यावर फसलेल्या दिव्यासारखी नाजूक झाली!! आणि त्या दिव्याभोवती तीनशे मराठ्यांची ओंजळ होती! अवघ्या तेरा दिवसात पुरंदरासारखा पाठीराखा असताना वज्रगड धोक्यात आला. कल्पना करा की मोंगलांचा जोर किती असेल?!!
अब्दुल्ला खान, फत्ते लष्कर आणि हवेलीच्या जबरदस्त माऱ्याखाली वज्रगडाचा बुरुज चिरफाळू लागला!! बुरुजावरल्या प्रत्येक वारासोबत यशवंतरावांच्या हृदयालाही घरे पडू लागली! वज्रगडाचे मरण जवळ आले..गड शिणला!
==========================
...आणि अखेर तिसऱ्या दिवशी वज्रगडाची घटका भरलीच!! 14 एप्रिल 1665!!
धडाsssड धडडडsss
धडाsssड धडडडsss धडाsssड धडडडsss
छाती दडपून टाकणारे आवाज सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात घुमले!!
'फत्ते लष्कर', 'अब्दुल्ला खान' आणि 'हवेली'च्या महाभयंकर जबड्यातून मणभर वजनाचे लालबुंद गोळे अगोदरच पिचलेल्या त्या बुरुजावर येऊन आदळले! बुरुजाच्या अक्षरशः चिरफाकळ्या उडाल्या. भलंमोठं खिंडार पडलं!!
बुरुज ढासळलेला पाहून यशवंतराव आणि बाबाजी कळवळले! मराठ्यांच्या जणू हृदयालाच खोक पडली..आता? आता???!
बुरुज पडलेला दिसताच आनंदाने मदहोश झालेले हजारो हजार मोंगली पठाण आणि राजपूत खिंडारावर धावले. गडावरची शिबंदी ती केवढी? अवघे तीनशे..बुरुजाला खिंडार पडल्याचे पाहून तळमळलेल्या मराठ्यांची ती चिमुकली फौज जिवाच्या आकांताने गनिमाला रोखायला धावली!
चढून येणाऱ्या मोंगलांची गर्दी पाहताच यशवंतरावांनी मोठ्या आशेने, कासावीस होऊन कंदकड्याकडे नजर टाकली...पुरंदरावरून सौंगाड्यांची एखादी तुकडी धावून येतेय का गनीमाला थोपवायला? आपल्या सोबत भांडायला? गड राखायला?
पण कसं शक्य होतं?! पुरंदरावर देखील चोहो बाजूनी हजारोहजार मोंगल चढाई करत होते. त्याना तोंड द्यायला पुरंदरावरचीच ताकद कमी पडत होती..तो कुमक कशी पुरवणार? मोंगलाना गडावर चढताना पाहून यशवंतरावांचा जीव एवढा एवढासा होऊन गेला..गडावरच्या सगळ्या मराठ्यांच्या मनात प्रचंड कालवाकालव झाली...
"राजे!! माफ करा राजे!! आम्ही कमी पडलो.."
एव्हाना मोंगल हिरवे झेंडे नाचवत खिंडारावर चढून आले! हिरवे मोंगली झेंडे गडावर चढून आलेले पाहताच यशवंतराव, बाबाजी आणि मराठ्यांच्या मस्तकात तिडीक गेली. संतापाने धुमसत मराठ्यांनी सपासप तलवारी उपसल्या...
आता अखेरचा हर हर महादेव!!
येळकोट येळकोटच्या गर्जनांनी गड दणाणून गेला!
खिंडरावर चढून आलेल्या मोंगलांच्या फौजेवर गडातला एकूण एक मराठा संतापाने बेभान होऊन विजेसारखा कोसळला! तलवारीला तलवारी भिडल्या, एकच खणखणाट उडाला. भाले पट्टे बेहोष होऊन नाचू लागले. बंदुकांच्या फैरींवर फैरी झडायला सुरुवात झाली! रक्ताचे पाट वाहू लागले. गडात जणू अग्नितांडव सुरू झाला! मराठ्यांनी पराक्रमाची अगदी शर्थ शर्थ केली..!!
पण हजारो बलाढ्य पठाणांसमोर त्या चिमुकल्या मराठा फौजेचा निभाव लागणार तो कितीसा? किती वेळ? समुद्राच्या लाटा कोणी कसा अडवेल? मोंगलांच्या फळ्यांवर फळ्या गडावर चालून आल्या. सर्व बाजूनी मोंगल तटावर चढले. एकच धुमश्चक्री उडाली. गडाचा दरवाजा सताड उघडा पडला!!
पठाण, राजपूत आणि बहलीयांनी लचके तोडायला सुरूवात केली. सह्याद्रीच्या वाघरांवर तरसा-लांडग्यांची झडप पडली...
मराठ्यांनी गड राखण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पण इच्छाशक्ती कितीही असली तरी ही शरीरे साथ देत नाहीत! तलवारी कापू लागल्या, भाले भोसकू लागले, बंदुकीच्या गोळ्या मराठ्यांची इमानी छाताडे भेदू लागल्या! मोंगलांशी भांडता भांडता असंख्य वार झेलून अखेर यशवंतराव पडला. ठार झाला! धाकटा बाबाजी प्रभू देखील रक्ताच्या थारोळ्यात पडला...वज्रगडाच्या रक्षणार्थ दोन सख्ख्या भावांची आहुती पडली! असंख्य मराठे हर हर महादेवच्या गर्जना करत वज्रगडाच्या अंगणात मरून पडले..!!
आणि उडाला...!! इतके दिवस वज्रगडाच्या मस्तकावर डौलाने फडकणारा जरतारी भगवा उडाला! त्याऐवजी औरंगजेबाचा सब्जहिलाली परचम् वज्रगडावर कायम झाला! वज्रगड बाटला! पुरंदरचा धाकटा भाऊ आता पुरंदरचा दुश्मन झाला! मोंगलांच्या झेंड्याची हिरवीगार विषारी सावली आता पुरंदराच्या अंगणात पडू लागली!!
भैरव खिंडीच्या पलीकडे...आपल्याच नजरेसमोर मोंगली श्वापदांनी आपल्याच लहान भावाचे नरडे फोडलेले पाहून संतप्त आणि तितकाच असहाय्य, अगतिक, हताश झालेला पुरंदर उभा होता!! आणि त्याच्या सफेद बुरुजावर सूडभावनेने मुठी आवळत मुरारबाजी उभा होता! वज्रगडावरचे मोंगली निशाण पाहून त्याच्या हृदयावरून जणू चरचरून किसणी फिरली...दुःख आणि संतापतिरेकाने त्याच्या आरक्त डोळ्यातून दोन कढत अश्रू ओघळले..!!
क्रमशः
- सूरज नरेंद्र उदगीरकर
- Suraj Udgirkar
=====================================
टीप : कहाणी रंगवताना काही संदर्भ चुकले, काही चूक-भूल झाली तर मोठ्या मनाने माफ करा 
आधीचे दोन्ही भाग पहिल्या कॉमेंटमध्ये.

No comments:
Post a Comment