विजयनगरच्या साम्राज्याचा थोडक्यात इतिहास व त्याला भेट देणारे परकीय प्रवासी. भाग-२
.....हे झाल्यावर मात्र दक्षिण भारत खडबडून जागा झाला. व पुढे काय वाढून ठेवले आहे याची सगळ्या सत्ताधिशांना कल्पना आली. पण मुबारकखानाचा खून झाला, खुस्रोचे राज्य फार कमी काळ टिकले व तुघलकांनी दिल्लीची सत्ता काबीज केली. घियासुद्दीन आता दिल्लीच्या तख्तावर बसला. अर्थात त्यामुळे दिल्लीश्वराचे दक्षिणेवरचे लक्ष काही कमी झाले नाही कारण दक्षिणेतील संपत्तीची मोजदाद अगोदरच झाली होती. ( म्हणजे येथे किती संपत्ती आहे याची कल्पना आली होती) नशिबाने घियासूद्दीन काही दक्षिणेत आला नाही. त्याची कारकिर्द त्याचे तख्त संभाळण्यातच गेली. दिल्लीवरून आक्रमण होत नाही असे पाहून वरंगळच्या राजांनी मुसलमान अंमलदारांना हटविण्याचा प्रयत्न केला पण घियासौद्दीनचा मुलगा महंमद तुघलकाने त्यांना रोखलेच नाही तर त्याचा पूर्ण पाडाव केला व अल्लाउद्दीनला जे जमले नव्हते किंवा त्याने जे केले नव्हते ते याने करून दाखविले. या विजयाने उन्मादीत होऊन त्याने एकामागून एक राज्ये घशात घालायचा सपाटा लावला. वरंगळ नंतर त्याने अजून दक्षिणेकडे जात पांड्य राजावर आक्रमण केले व त्याचाही पराभव करून मदूरेला मुसलमानी अंमल बसवला. अल्लाउद्दीनने या राजांना जिंकले होते पण त्याने तेथे अंमल कधीच बसवला नाही. तो नुसती खंडणी गोळा करत असे. महंमद तुघलकाने (म्हणजेच उलुघ खान) ही चूक केली त्यामुळे त्या प्रदेशातील त्याच्या राज्याची देखभाल करणे त्याला कठीण जाऊ लागले. दक्षिणेकडे त्याचा एक आत्तेभाऊ त्याने ठेवला होता. त्याचे नाव होते बहाउद्दीन गुरशास्प. या बहाउद्दीननेच महंमदाविरुद्ध बंड केल्यामुळे त्याच्या कटकटी अजूनच वाढल्या. महंमद तुघलकाला वेडा महंमद म्हणायला आपण आपल्या शाळेतील इतिहासात शिकलो पण हा एक अत्यंत धोरणी, शहाणा पण अत्यंत क्रूर असा सुलतान होता. उत्तरेकडे सगळे लुटून झाले होते, व दक्षिणेकडे अमाप संपत्ती होती अशा परिस्थितीत त्याने देवगिरीला राजधानी हलवायचा निर्णय घेतला तो अत्यंत योग्य होता असे म्हणावे लागेल.
(नुकत्याच एका(च) देवळात सापडलेल्या संपत्तीवरून आपल्याला दक्षीणेकडे असलेल्या अनेक देवळातून असलेल्या संपत्तीची कल्पना येऊ शकेल. केरळमधील या पद्मनाभस्वामीच्या देवळात नुसते सोनेच ९०,००० कोटी रुपयांचे सापडले. चांदी, रत्ने, हिरे, माणके इ इ.. वेगळेच ).
याच काळात त्याच्या एका सेनापतीने, जलाल-उद्दीन-हसनशा याने तामीळ प्रदेशही अंमलाखाली आणला. या शूर सरदारालाच महंमदाने मदूरेचा सुभेदार म्हणून नेमले. (आपण माझा इब्न बतूतवरचा लेख वाचला असेल तर आपल्या लक्षात आले असेल की याच्या मुलीचे इब्न बतूतशी लग्न झाले होते व त्यामुळे तो अडचणीत आला होता) याचा मुलगा इब्राहीम हा महंमद तुघलकचा खजिनदार होता. या बाप लेकांनी मुहंमद तुघलकाविरूद्ध बंड करून मदूरेच्या राज्याचे स्वातंत्र्य जाहीर केले. अर्थातच इब्राहीमला ठार करण्यात आले व मुहंमद तुघलकाने या जलाल-उद्दीनवर आक्रमण केले.
या सगळ्या धामधूमीच्या काळात कुठल्या ना कुठल्यातरी मुसलमान सत्तेची ठाणी सगळ्या रस्त्यांवर बसत व सामान्य हिंदू जनतेला त्याचा फार उपद्रव होई. होयसळमधे बल्लाळराजाला हे सर्व दिसत होते पण त्याची ताकद त्यावेळेस कमी असल्यामुळे त्याने गप्प रहायचे पसंत केले पण त्याची आतून तयारी चाललीच होती. त्याची राजधानी कन्ननूरच्या जवळ होती. आपल्या रयतेला मुसलमान सेनेच्या हालचालींमुळे अतोनात त्रास होतो असे कारण पुढे करून त्याने आपली राजधानी सुलतानाच्या परवानगीने तिरूवण्णामलई येथे हलविली. ती जागा आडमार्गावर असल्यामुळे त्याला तेथे स्वत:ची सैनिकी ताकद वाढवून मुसलमान अंमलदारांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे शक्य झाले. तो तेथे योग्य संधीची वाट बघत तयारीत बसला. लवकरच त्याला अशी संधी मिळणार होती.......
महंमद तुघलकच्या लहरी व अक्रस्ताळी क्रूर स्वभावामुळे त्याने असंख्य शत्रू निर्माण केले होते. मुसलमानांच्यातच त्याला विरोध होऊ लागला. अनेक ठिकाणी मुसलमान अंमलदारांनीच बंडे पुकारली. बहाउद्दीन गुरशास्प याने त्याला फार त्रास दिला. उत्तरेत सिंध गुजरात, बंगाल या प्रांताच्या सुभेदारांनी बंड केल्यावर मात्र त्याचे सिंहासन डळमळीत झाले. त्या काळी सुभेदार म्हणजे फार मोठे पद व अधिकार असे. (सुभेदार हे फार मोठ्ठा हुद्द होता. त्याच्या विभागाचा राजाच जणू हे लक्षात घेतले म्हणजे आपल्या हे लक्षात येईल की सुभेदारांचे बंड म्हणजे काय चीज असेल ते) या सगळ्या गोंधळामुळे तुघलकाचे लक्ष दक्षिणेकडून उडून उत्तरेकडे केंद्रीत झाले. हा काळ होता १३३५ सालच्या आसपासचा. हिंदूंसाठी अत्यंत महत्वाचा. आत्ताच काही केले तर... नाही तर कधीच नाही असा काळ.....या वेळी जर ही संधी हिंदू राजांनी घालवली असती तर मात्र भारतात हिंदू राहिले असते की नाही हे सांगता आले नसते....असा, महत्वाचा हा काळ.....
जयंत कुलकर्णी.
क्रमशः
छायाचित्रांचा आणि या इतिहासाचा तसा काही संबंध नाही. प्रत्येक छायाचित्रावर नंतर लिहिणार आहे..





No comments:
Post a Comment