सरदार श्री. विश्वासराव मेहेंदळे
अफगाणिस्तानचा बादशहा स्वाऱ्या करून मोगलांचे राज्य कुरतडत होता. अहमदशहा अबदाली आणि दिल्लीचे मोगल यांची सरहद कोणती असावी याचे भांडण चालू होते . पेशव्यांना अहमदिया करारामुळे त्यात लक्ष घालावे लागले.अफगाणिस्तानचा बादशहा अब्दाली याला ही सरहद्द सरहिंदची असावी असे वाटे तर भाऊसाहेब पेशव्यांच्या मते ही सरहद्द अटकची असावी असे वाटे.त्यामुळे हिंदुस्तानचे मालक कोण असा प्रश्न निर्माण झाला.सन १७६१ ची ही स्थिती . उत्तरेकडे गेलेनंतर भाऊसाहेब पेशवे यांनी दिल्ली सर करून पानिपत कुंजपुरापर्यंत धडक मारली. पुढे सरकून कुंजपुरा ताब्यात घेऊन पेशवे फौजांनी अबदालीपुढे मोठे संकट ऊभे केले.
पानिपतच्या लढाईत उत्तरेला मुकाबला करण्यास निघालेल्या सदाशिवराव भाऊंच्या नेतृत्वाखालील फौजेत बळवंतराव सामील होते. बळवंतराव यांची बहीण म्हणजे सदाशिवरावभाऊंच्या पत्नी होत्या. पेशव्यांचे असे जवळचे नाते असल्याने बळवंतराव नानासाहेब पेशवे यांच्या हाताखाली प्रसिद्धीस आले.
७ डिसेंबर १७६० रोजी मराठ्यांच्या पुढे गहिरे संकट उभे राहिले. रणमदाने धुंद झालेले रोहिले एकाएकी वगळीतून वर निघाले. सुडाने पेटून ,हवेत गरगरा हत्यारे फिरवीत मराठ्यांवर तुटून पडले. बेसावध मराठ्यांची मुंडकी कचाकच तुटून खंदकात पडू लागली. मराठे सावरले. अंगातली थंडी कुठल्या कुठे पळून गेली. पटापट घोड्यावर मांड ठोकुन, हातात तलवार, भाले घेऊन ते रोहिल्यांकडे झेपावू लागले .थय थय नाचत घोडी खंदकातल्या तरफावरून बाहेर झेपावू लागली.तोच रोहिल्यांचे आघाडीला भिडलेले स्वार बाजुला पळाले.धडा धड गोळ्या बाहेर पडू लागल्या. तसे हुजरातीचे स्वार उधळले जाऊ लागले.घोड्यांची दाणादाण उडू लागली. घोडी दोन्ही खूर हवेत ऊंचावून भयानक सुरात खिंकाळू लागली.कैक स्वार बाजूला फेकले तरी रिकिबीत पाय अडकल्याने घोड्याबरोबर मोळी होऊन ओढले गेले.खंदकात घोड्यांचा आणि राऊतांचा खच पडू लागला. रोहील्यांचे प्यादे बार उडवून बंदूक खचायला मागे पळू लागले .तशी आधीच बार भरलेली मागची पथके तयारीत पुढे सरकू लागली. गोळ्यांचा पाऊस पडू लागला.नेटाक,चपळ मराठी घोड्यांचा अतोनात नाश होऊ लागला. रोहिले खंदकावरचा एक तराफा ताब्यात घेऊन त्यावरून पुढे सरसावले.
केविलवाण्या आरोळ्यांनी, असह्य जखमांनी ,नहात्या घोड्यांच्या खिंकाळण्याने आसमंत शहारला. पानिपत गाव या लढाईमुळे थरथरून गेला. घराघरात गोरगरीब दारे खिडक्या लावून चूप बसले. मराठ्यांच्या अनेक तुकड्या बावरल्या. जिथे हल्लकल्लोळ माजला तिकडे उत्साही एकांडे हुकूम नसताना धावू लागले .आधीच दिवसभर डोके सरकलेले बळवंतराव धुंद झाले .त्यांचा घोडा आगीकडे धुंदकत चालला. ' अरे बघता काय? गिलच्याला हाणा ऽ मारा ऽ म्हणून ते आगीकडे झेपावू लागले. भाऊसाहेब घोड्यावर झेप घेऊन विजेसारखे धावत आले होते .आधीच खंदकाकडे समोरची हुजरातीची पथके उतरत होती. हजारभर स्वार खंदकापलीकडे गेले. पण आगीच्या मार्याला भिऊन पुन्हा आत सरकलून माघारा पळू लागले. तोच भाऊसाहेबांनी इशारा केला तशी लाठ्याकाठ्या ' सोटे घेतलेले बाजूचे पथक पुढे सरसावले. त्यांनी खंदकाच्या तोंडाला माघारा फिरलेले मराठी स्वार अडविले .घोड्यांच्या पायावर' स्वारांच्या पाठीत दणादणा रट्टे बसू लागले. रिकिबीत अडकलेले पाय सोट्याने सडकून काढले.पेकाट 'मणके हलके होऊ लागले. तशी हुजुरातीची घोडी नेटाने मागे वळली व रोहिल्यांवर आदळू लागली.
हातातल्या अफगाण बंदुकामुळे रोहिल्यांचा नांगा वरचढ होता. ते हटातटाने झटपटू लागले. तसे दोन-तीन कासर्यांवर गारद्यांचे तंबुर आणि पडघम वाजू लागले. इब्राहिमच्या तुकड्या पलीकडून खाली खंदक उतरल्या.गारद्यांच्या बंदुकांचा कडकडाट सुरू झाला. ते खंदकापलीकडून धावत रोहिल्यांच्या पाठीवर आले. गोळ्यांना गोळीने उत्तर देऊ लागले. भयंकर धुमश्चक्री माजली. इब्राहिमखान तोफच्यांवर ओरडू लागला. तोफांचा धडाका आणि आगीचा तडाखा सुरू झाला. पण आता दोन्हीकडील फौजांची सरमिसळ झाल्याने तोफेने डागायचे कोणाला आणि सोडायचे कोणाला?हेच कळेना . इब्राहिमने ओरडून तोफा बंद करण्याचा इशारा दिला. गारद्यांच्या जादा तुकड्या खंदक उतरू लागल्या. हाणा ऽ मारा ऽ म्हणून मेहेंदळे ओरडू लागले .
अंधारात आगीने आणि मृत्यूने धुमाकूळ घातला. घोड्यांना घोडी आणि माणसांना माणसे भिडली.रणचंडी थयथया नाचू लागली. हातातल्या तलवारीने रोहिले गारद करीत बळवंतराव मेहेंदळे मध्येच घोडा उडवू लागले. तोच एका रोहील्याची गोळी सूं ऽ सूं ऽ करीत आली आणि बळवंतरावांच्या छाताडात घुसली. रक्ताच्या चिळकांडी बरोबर बळवंतराव उडाले आणि घोड्याच्या पायाखाली आले. तसे सात आठ रोहिले
दिन दिनचा गजर करीत धावले.एकाने चवताळून पुढे जाऊन हिसडा मारून बळवंतरावांचे केस धरून मुंडके ओढले. पाय रक्ताने माखलेल्या छाताडावर ठेवला, दुसऱ्याने झटक्यात बळवंतरावांच्या अंगरख्याच्या गुंड्या तोडल्या. पहिल्याने दुसर्या हाताने मानेवर वार केला .तो बळवंतरावांची मुंडी कापू लागला. रक्ताचे उमाळे फुटले ' तोच ' 'बळवंतराव ऽ म्हणून गजर करीत खंडेराव नाईक-निंबाळकर यांनी खाली उडी ठोकली.आणि ते त्या रोहिल्याच्या अंगावर ढासळले .रोहिला बाजूला करून बळवंतरावांच्या देहावर आडवा झाले. लागलीच आठ-दहा मराठा स्वार त्या जागेवर चित्यासारखे झेपावले.बळवंतरावांच्या मुडद्याशी झोंबू लागलेल्या रोहिल्यांना त्यांनी धारदार विळ्यांनी बाजरीची ताटे तोडावीत तसे वासडून काढले.
मराठा सरदाराने केवळ सती पडावे तसे बळवंतराव मेहेंदळे यांच्या मुडद्यावर पडून त्यांचे शीर रोहिल्यास कापू दिले नाही. खंडेराव नाईक निंबाळकर हे निदान खानदानी माणूस याप्रमाणे कामास आले.त्यांना जखमा झाल्या तरी बळवंतराव मेहेंदळ्यांचा मुडदा ओढीत मराठी सैनिकाच्या गोटात आणला.
ह्या सर्व गलक्याने दूर असलेली होळकर शिंदे यांची पथके सुद्धा बेफान होऊन लढू लागली. सर्वांनी कोल्ही दांडलावी तशी रोहिल्यांना चोपून काढले. बळवंतरावांचा मुडदा ओडायचा प्रयत्न फसला .ऊभे रोहिले आडवे होऊ लागले. त्यांची संख्या रोडावली सहा हजारा पैकी निम्म्याहून अधिक रोहिला गारद झाला तसे ते मागे हटले. अंधारात पळू लागले .हजारो मुंडकी पडली आणि उरलेल्यांची अंगे सडकून निघाली , तरी त्यांना दुःख नव्हते. एक बळवंतराव मराठा पडल्याने ते आनंदाने वेडे झाले. लढाई जिंकल्याचा आव आणून शहाजणे वाजवीत' वेताळासारखे नाचत ' विकट हसत आपल्या तळाकडे पळू लागले.
लढाई थांबली. बळवंतरावांचे प्रेत बारगिरांनी भाऊसाहेबांपुढे आणून ठेवले. भाऊंनी त्यांच्या मुखावरून हळूवार हात फिरवला. निमअर्ध्या कापल्या मानेतून अजून रक्त ओघळत होते .' बळवंतराव ऽऽ' म्हणून त्यांनी जोरात हंबरडा फोडला. एवढा बहाद्दर सरदार पडल्याने साऱ्यांवर शोककळा पसरली होती. बाकीचेही सगळे टिपे गाळू लागले.भाऊंचे ह्रदय गलबलून गेले होते .अजून मोठमोठ्याने हंबरडा फोडावा अशी त्यांची भावना झाली. पण काळजावर दगड ठेवून त्यांनी मनाला आवर घातला .खासाच जर असा करू लागला तर शिपायांची अवस्था काय होईल ? मुडदा पालखीत घातला .भोई गोटाकडे चालू लागले.
मराठ्यांची खूप हानी झाली होती.तगडे हजारभर स्वारराऊत गारद झाले होते .मुडदे रक्ताने आणि मातीने माखले होते . मुडद्यात मुडदे मिसळलेले. मशालीच्या उजेडात बारगीर मुडद्यावर पाणी ओतू लागले.तोंडे धुवून रक्तमाती बाजूला करून ओळखू लागले.
मेहंदळ्याचा गोट गलबलून गेला. लक्ष्मीबाई धाय मोकलून रडू लागल्या. ' राव ऽ आंम्हाला का सोडून गेलात हो ऽऽ ' असा आकांत करीत त्या मुडद्यावर पालथ्या पडू लागल्या.पार्वतीबाई अक्कासाहेबांच्या शोकाला तर सीमाच नव्हती.' माझ्या बांधवा ऽ साजिंद्या ' वीरा ऽ , वासरा ऽऽ 'करून त्या मोठ-मोठ्याने ओरडत होत्या. अप्पाराव 'नाना सारेच शोकाकूल झाले होते.
लक्ष्मीबाई मेहेंदळे नवर्याबरोबर सती जाणार ही वार्ता वाऱ्यासारखी तळावर पसरली. पार्वतीबाईना भाऊसाहेब समजावू लागले. धाय मोकलून लक्ष्मीबाई म्हणाल्या. ' 'इकडची स्वारी लौकिक करून गेली. मी त्यांची सांगातीण होईन !
लक्ष्मीबाई सतीसाठी तयार झाल्या.रात्री काबुलीबागेजवळ सरण रचले लक्ष्मीबाईने पुतळ्या, अंगठ्या ,बाजूबंद ,पाटल्या नथ, कुड्या असे अंगावरचे सारे दागिने गोर गरिबांना दान केले. हा मंगलविधी पाहण्यासाठी व सतीदर्शनासाठी यात्रेकरूंनी मुंग्यांसारखी गर्दी केली होती. राजवशातल्या स्त्रियांनी, सरदारांच्या बायांनी लक्ष्मीबाईंचा मळवट भरला. हळदी - कुंकवाचे दान झाले. लक्ष्मीबाईंनी सारी शिल्लक ओतून ती ब्राह्मणांना दान केली. सभोवती वाद्ये वाजू लागली .चिता पेटली. जनकोजी मोठमोठ्याने रडु लागले. बराच उशीर झाला. चितेतले बाजूला पडलेले निखारे विझवून बायका-मुले तो पवित्र अंगारा पदरात बांधून तळाकडे परतू लागले.
भाऊसाहेब शोक करू लागले .पार्वतीबाई परोपरीने समजावून लागल्या.' पार्वती ऽ फार वाईट झाले ग ऽ ही काळरात्र, आमचा बालमित्र ' जिवाचा सखा हरण करून गेली. ही खोल पोकळी कोणीच भरून काढू शकत नाही. महिपतराव काय , त्र्यंबकराव काय, सदाशिव काय ' कोणी बोरूबाजीत बहाद्दर आहे, कोणाचा हात तलवारबाजीत कोणी धरू शकणार नाही. पण बळवंतराव यांची तर्हा काही औरच होती. तो समशेरीचा शेर आणी जिवाचा सखा होता. खरं सांगू पार्वती, बळवंतरावांच्या ह्या अवचित जाण्याने आमच्या डेर्याचा एक मजबूत खांब कोसळला.ऽ! पार्वती ऽ वाईट झाले ग !
७ डिसेंबर १७६० रोजी विश्वासराव मेहेंदळे यांचा पानिपताच्या रणांगणावर मृत्यू झाला .
अभिवादन
लेखन
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे
संदर्भ
श्री. गोपाळराव देशमुख
सोलापूर जिल्ह्याचा इतिहास
श्री. विश्वास पाटील
पानिपत

No comments:
Post a Comment