मराठेशाहीच्या होमकुंडातलीआहुती-सरदार ज्योतिबा शिंदे...
आपलं मराठ्यांचं साम्राज्य काही एका रात्रीत उभं राहिलं नाही, किंवा ते फक्त तहाने आणि बोलणी करून पसरलं नाही. त्यामागे हजारो मावळ्यांचं रक्त सांडलंय. काही लढताना पडले, तर काहींचा विश्वासघाताने बळी गेला. अशाच एका दुर्लक्षित, पण महान विराच बलिदान ज्योतिबा शिंदे..
शिंदे घराण्याचा इतिहास पाहिला तर लक्षात येईल, या घराण्याने स्वराज्यासाठी काय नाही केलं? राणोजी शिंदे, महादजी शिंदे,जयाजी,जनकोजी,साबाजी,शहाजी, फुलाजी,येसाजी,बयाजी, कर्नाजी,सुभानजी, दत्ताजी शिंदे... या व असंख्य नावाभोवती पराक्रम असा फेर धरून नाचतो की, साक्षात मृत्यूलाही यांच्यासमोर उभं राहायला विचार करावा लागायचा. पण जिथे समोरासमोरची लढाई जिंकता येत नाही, तिथे शत्रूने नेहमीच 'कावेबाजपणा' आणि 'दगाफटका' केला. आणि दुर्दैवाने याच दगाबाजीचा बळी ठरले, खुद्द सुभेदार राणोजी शिंदेंचे पुत्र.. ज्योतिबा शिंदे...
साल होतं १७४२. मराठ्यांचे घोडे उत्तरेत थेट यमुनेपर्यंत दौडत होते. बुंदेलखंडाच्या राजांना मराठ्यांचा धाक बसला होता. ओरछाचा राजा 'विरसिंहदेव' याने वरकरणी मराठ्यांचं वर्चस्व मान्य केलं होतं. खंडणी (चौथाई) द्यायला तो तयार झाला. ही खंडणी वसूल करण्यासाठी ज्योतिबा शिंदे काही मोजक्या सैनिकांसह झाशीच्या जवळ 'शंकरगडा'च्या पायथ्याशी मुक्कामाला होते. मराठे नेहमीच दिलदार. ज्योतिबांना वाटलं, राजाने एकदा जुळवून घेतलंय म्हटल्यावर आता दगाफटका होणार नाही. पण तिथेच चूक झाली. ज्या बुंदेल्यांनी मराठ्यांची मदत घेऊन आपली राज्ये वाचवली होती, त्यांच्यातच आता मराठ्यांबद्दल असूया निर्माण झाली होती...
एका काळरात्री, जेव्हा मराठा छावणी गाढ झोपेत होती, तेव्हा विरसिंहदेवने विश्वासघात केला. अंधाराचा फायदा घेऊन बुंदेल्यांनी छावणीवर अचानक हल्ला चढवला. मराठे सावरण्याआधीच कत्तल सुरू झाली. समोरून लढायची हिंमत नसलेल्या शत्रूने, झोपेत असलेल्या दीडशे मराठ्यांचे बळी घेतले. यातच वीर ज्योतिबा शिंदे कामी आले. इतकंच नाही, तर निर्दयपणे त्यांची मस्तकं कापून गडावर नेण्यात आली. हा केवळ हल्ला नव्हता, तर हा पाठीत खुपसलेला खंजीर होता...
● मराठ्यांचा बदला :
मराठ्यांच्या रक्तात गनिमी कावा होता, पण विश्वासघात कधीच नव्हता. ज्योतिबांच्या हत्येची बातमी समजताच मराठा छावणी पेटून उठली. पुत्रशोकात असलेल्या राणोजीरावांना सावरत, 'नारो शंकर' यांनी ओरछावर असं काही आक्रमण केलं की इतिहास हादरला. ज्या ओरछाच्या राजाने कपट केलं होतं, त्याचं राज्य बेचिराख झालं. विरसिंहदेवला जीव वाचवण्यासाठी अखेर मराठ्यांचे पाय धरावे लागले, पण त्याचं राज्य गेलं ते कायमचंच.. झाशी आणि ओरछा मराठ्यांच्या ताब्यात आलं. आजही ती साक्ष मिळते...!
आज आपण झाशीची राणी किंवा महादजी शिंदेंच्या पराक्रमाच्या गोष्टी अभिमानाने सांगतो. पण त्याआधी या मातीत ज्योतिबा शिंदेंचं रक्त सांडलंय, हे विसरून चालणार नाही. ओरछाच्या वेशीवरून वाहणारी 'बेतवा' नदी आजही त्या रात्रीची साक्ष देते. हा इतिहास सांगण्याचं कारण एकच की स्वराज्याचा जो डौल आज आपल्याला दिसतो, त्याचा पाया अशा अनेक ज्ञात-अज्ञात वीरांनी स्वतःच्या प्राणांची आहुती देऊन रचला आहे. अशा या निष्ठावान वीरास आणि त्याच्या सोबत्यांस मानाचा मुजरा...!
इतिहास अभ्यासक शेखर शिंदे.
――――――――――――――

No comments:
Post a Comment