दत्ताजी बावां सोबत भागीरथीबाईसाहेब..!!
इतिहासाने "बचेंगे तो और भी लढेंगे" म्हणणाऱ्या दत्ताजी शिंदेचा बाणा पाहिला. पण त्याच दत्ताजींच्या अर्धांगिनीचा, भागीरथीबाईंचा मूक रणसंग्राम त्याहून अधिक दाहक होता.
इकडे बुराडी घाटात नजीबखानाच्या आणि अब्दालीच्या फौजेसमोर शिंद्यांची समशेर तुटून पडली होती. दत्ताजींनी मृत्यूच्या डोळ्यांत डोळे घालून हिंदुस्थानचं रक्षण करताना देह ठेवला. तीन-तीन सख्खे दीर, वडील, भाऊ आणि स्वतःचा पती रणांगणावर कापला गेला. तरीही नियतीची तहान अजून भागली नव्हती.
त्यावेळी गरोदर असलेल्या भागीरथीबाई साहेब गलिच्छांच्या वेढ्यातून निसटत होत्या. पोटात शिंदे घराण्याचा वंश वाढत होता. प्रवासाच्या त्या जीवघेण्या धावपळीत, चंबळच्या भयानक खोऱ्यातून, काट्याकुट्यातून रक्ताळलेल्या पायांनी त्या सबलगढला पोहोचल्या. आणि तिथे पोहोचताच नियतीने शेवटचा घाव घातला. त्या वीर पत्नीने एका मृत बालकाला जन्म दिला.
ज्या स्त्रीने एकाच वेळी आपल्या पतीला गमावले आणि पतीची शेवटची निशाणी असलेल्या पोटच्या गोळ्यालाही गमावले, तिचं दुःख मोजायला जगात कोणतंही तराजू शिल्लक नाही.
रणांगणावर रक्त सांडून वीरमरण पत्करणे सोपे असते. पण जिवंतपणी मरणयातना सोसून, उरलेलं आयुष्य त्यागाच्या निखाऱ्यावर चालत काढणे, हे महाकठीण असते. शिंद्यांनी रणांगण गाजवलं, तर भापकरांच्या या लेकीने सहनशीलतेचा हिमालय उभा केला. स्वराज्याचा इतिहास या मातेच्या त्यागाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही..!!

No comments:
Post a Comment