विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 6 March 2026

शिव छत्रपती स्वारी बसरुर.

 १६६५ रोजी, छत्रपती शिवाजी महाराजांची "बसरुर" मोहिमेची सुरुवात ज्या ठिकाणी झाली ते ठिकाण म्हणजे "मालोंड बंदर" 

🚩

छत्रपती शिवाजी महाराजांनी मालोंड या बंदर शहराची पाहणी केल्यानंतर या ठिकाणी तळ उभारला होता. केरळातील डच वखारी याच छत्रपतींच्या आरमाराने हल्ला करून फोडल्या होत्या. याची नोंद इतिहासामध्ये आहे. मालवण तालुक्यातील मसुरे गावाचा उल्लेख मसुरे नगरी असा व्हायचा. मसुरे गावातील मालोंड हे प्रसिद्ध बंदर होते. तत्कालीन बंदरपेठ म्हणून मालोंड बंदराचा मालती बंदर असादेखील उल्लेख केला जात असत. मालोंड पर्यंत येणारी नदी गडनदी या नावाने ओळखली जाते. तर पुढे ती मसुरे, रेवंडी, तोंडवळी असा प्रवास करत कालावल खाडीच्या रूपाने सर्जेकोट येथे अरबी समुद्रास मिळते. त्यामुळे मसुरे ते सर्जेकोटपर्यंतच्या दोन्ही किनाऱ्यावर तयार होणाऱ्या मालाचे विक्रीकेंद्र म्हणून मालोंडला बाजारपेठेचे स्वरूप होते.

● शिवाजी महाराज मालोंड गावचे पाटील यांच्याशी संवाद साधताना :
“राजे पराडकर आल्याती..”
मालोंड गावचे पाटील असणाऱ्या पराडकरांनी येत राजांची भेट घेतली. राजे दोन दिवसांपूर्वीच गावी आले होते. परंतु गावचा पाटील काही कारणाने गावात नसल्याने त्यांना जशी बातमी मिळाली तसे येऊन भेटत पाटलांनी आपली औपचारिकता पूर्ण केली.

"आम्ही बाहेर येतो.."
राजे स्वतः उठत पाटलांना भेटण्यासाठी आपल्या शामियान्याच्या बाहेर आले. पाटील म्हणजे पिकलं पान. त्यांच्या वडीलकीचा साऱ्या मालोंडला आधार होता. साऱ्यांशी प्रेमाने आपुलकीने वागणे, व्यवहारिकपणाही तितकाच चोख, गावातील तटे जातीने लक्ष देऊन सोडवणे, आजूबाजूच्या पंचक्रोशीतील गावांतून चांगला संबंध असल्याने पराडकर सोयरिकी जुळवायची कामे एक जबाबदारी म्हणून पार पाडत असत. अगदी घाटावर जाऊन लोकांच्या सोयरिकी यांनी जुळवल्या होत्या. आताही पाटील जागेवर नसण्याचे कारण एका सोयरीकीचेच होते.

“राजे आपल्या येण्याने आमचा गाव, आमची पांढरी, अगदी धन्य झाली बघा. तेवढा मीच एक कमनशीबी ज्याला राजांचे हे दर्शन काहीसे उशिरा झाले. "
“पाटील आम्ही यायच्या आधीच तुम्ही गावातून गेले असल्याचे समजले होते आम्हाला, त्यामुळे आमची काही तुम्हावर खफा मर्जी नाही” राजे आता तुम्ही राज्यकर्ते. स्वाऱ्या, मोहिमा यामुळे तुमच्या येण्याजाण्या विषयी तुम्हाला गुप्तता पाळणे तसे स्वाभाविकच आहे; पण तरीही आज हेच वाटतेय की तुमच्या येण्याची आम्हाला वर्दी मिळाली असती तर आम्ही तुमचे तसे मनाजोगं स्वागत करू शकलो असतो. तुमचा चिंतामणी येऊन भेटला आम्हाला पाटील, त्याने आमचा अगदी व्यवस्थित पाहुणचार केलाय...

राजे आपण खरंच आमच्यावर रागावला नाहीत ना ! हवं तर पाय धरतो तुमचे..! अहो हे काय करताय बाबा. आम्ही राजे असलो तरी तुमच्या सारख्या वयस्कर माणसाने पाया पडणे योग्य नाही, आणि आमच्या प्रजेचे फक्त मुजरे आणि सत्कार स्वीकारण्यासाठी का आम्ही हा स्वराज्याचा पसारा वाढवलाय...

नाही राजे असे नाही, पण आपण स्वत:च उठून बाहेर आलात अन् आमच्या काळजात धस्स झाले. “अहो तुमच्यासाठीच आम्ही उठून आलोय खास, तुमच्या कामाची आम्ही चांगलीच तारीफ ऐकली आहे..”
राजं एवढा बहुमान तुम्ही आम्हाला देऊन आमच्या साऱ्या आयुष्याचेच सोने केलं जी, आम्हाला फक्त आता आज्ञा करा राजे, आम्ही आपल्यासाठी काय करू तरी काय..?

'आम्हाला तुमचा गाव दाखवा पराडकर'...
राजांचे हे मागणे ऐकून म्हातारं काहीसे चकित झाले. नक्की आपण काही चुकीचे तर ऐकले नाही ना, असा पाटलाला प्रश्न पडला. महाराजांच्या सांगण्या बरहुकूम पाटलांनी मालोंड गाव आणि आजूबाजूचा परिसर दाखवायला सुरुवात केली. मालोंड-मालडी या दोन्ही नावांनी ओळखला जाणाऱ्या या गावाला नदीच्या प्रवाहाने थोरले अन् धाकटेपण दिले. मालवण तालुक्यातील मसुरे गावचा जुना उल्लेख मसुरे नगरी असा व्हायचा अन् या मसुरे गावचे हे मालोंड प्रमुख बंदर होय. कोकणात पूर्वापार चालत आलेल्या नासवण्याच्या बाटवण्याच्या शापानेच माणसांचे जोर जबरदस्ती जात, धर्म, पंथ बदलले गेले, अन् एका मोठ्यां गावात एकदिलाने राहणारी ही मंडळी वर्णभेदाने, जातीभेदाने लांबून वाड्या-वस्त्या निर्माण झाल्या, तर कुठे धर्मवादाने नव्या वाड्या उदयाला आल्या. पुढे गावाची गावकी मोडलेल्या या कारभारातून असंख्य वाड्यांचीच स्वतंत्र गावे निर्माण झाली...

त्यामुळे कधी कुठल्या काळी एक नाव असलेल्या गावाची अशा धर्मांतर, युद्ध, वा आणखी एखाद्या मोठ्या प्रसंगातून वेगवेगळी नावे पडल्याचे लक्षात येते. मसुऱ्याच्या या बंदराला कधी काळी मालती बंदर म्हणूनही ओळखले जात असे. याच मालती शब्दाचा नको तो अपभ्रंश होऊन मालडी हे नाव पुढे आले असल्याचाही एक मतप्रवाह आहे. या बंदराच्या काठाने पूर्वी वाणी समाजाची मोठी वस्ती होती, त्यामुळे याला साधूवाण्याचे बंदर म्हणूनही संबोधले जात. (सत्यनारायण कथेतील साधूवाण्याचे बंदर ते हेच.) तळाशीलच्या खाडीपासून सह्याद्री पर्वतापर्यंतच्या सर्व गावांना माल पुरवणारे प्रमुख केंद्र म्हणून या बंदराचा सर्व व्यापारी वर्गात चांगलाच बोलबाला झाला होता. मालोंड बंदरात असंख्य व्यापाऱ्यांचा दिवस रात्र असणारा राबता, ही तशी नित्याचीच बाब होऊन बसली होती. घाटावर उगम पावणाऱ्या गडनदीचा तसा प्रवास हा मोठाच. त्यात तिला रेवंडी, तोंडवळी, मसुरे अशा अनेक उपनद्या येऊन मिळतात. कालावल खाडीच्या येथे ही नदी समुद्रास जाऊन मिळते...

हे गाव जसे नदी आणि बंदरामुळे लोकांच्या परिचयाचे असले तरी गावचे जुनेपण अगदी आदीमानवापासून अबाधित आहे. मसुरे, डांगमोडे, मालोंड, बेलाचीवाडी इथल्या उंच माळ रानावर, सड्यावरील कातळावर बरीच जुनी कातळीशल्प आढळून येतात. त्यामुळे माणसाच्या उत्पत्तीदरम्यानच्या ज्या गोष्टी आपणास ठाऊक आहे त्या पद्धतीने या गडनदीच्या काठानेही एक मानवी संस्कृती इथे नांदत असल्याच्या खुणा आहेत. नदीच्या उतारामुळे त्या काळीसुद्धा इथे मानवी वस्ती वास्तव्य करत असल्याचा संभव अधिक आहे. स्वराज्यात सामील होण्याआधी इथे आदिलशाही अंमल अस्तित्वात होता; परंतु शिवाजीराजांनी ज्या पद्धतीने कोकण घुसळून काढले. त्यामुळे १६६५ च्या काही काळ आधीपासून इथे असलेला सुलतानी अंमल नष्ट झाला आणि ही मोक्याची जागा अलगद मराठ्यांच्या हाती येऊन पडली...

गडनदीच्या काठाने वसलेल्या या गावाचे भौगोलिक महत्त्व तसे विशेष होते. दोन्ही किनाऱ्यावर होणाऱ्या मालाचे विक्री केंद्र म्हणून मालोंडला दुमदार बाजारपेठेचे स्वरूप प्राप्त झाले होते. गडनदीचे हे पात्र खोल असल्याने या बंदरामध्ये अरबी समुद्रातून खुश्कीच्या मार्गाने अगदी आखातापर्यंत व्यापारी मालाची ने-आण सुरू असायची. धाकट्या मालडीकडे नैसर्गिक थांब्याची सोय जास्त चांगल्या प्रकारची असल्याने त्या बाजूला तारव्या- तराफ्यापासून विविध नौकांचा राबता जास्त असायचा तर थोरल्या बाजूला गाव वसे. यातही अनेक व्यापाऱ्यांनी इथे आपली घरे, माल साठवणुकीसाठी छोटेखानी बांधकाम केले होते. इथे उतरवला जाणारा माल बैलगाडी, ओझी वाहणारी गाढवं, खच्चड यांच्या साहाय्याने फोंडा, रामगड पेठ, बिडवाडी पेठ, खारेपाटण असा सर्वत्र पोचवला जात तर घाट चढून जाण्यासाठी वाहतुकीच्या जनावरांसह हमाल लोकांवरच सारी भिस्त असे...

मालोंडच्या निसर्ग संपन्नेत भर घालण्याचे काम हे या गड नदीने केले असले तरी, अनेक घटकांमधील ती नदी एक घटक आहे असे म्हणावे लागेल. एका बाजूला भिंतीसारखा सरळसोट भव्य, बारामाही हिरवागार असणारा दरडीचा डोंगर, या डोंगराला सरळ जाऊन धडकतच नदी आपला प्रवाह डाव्या बाजूला काइळ गावाच्या दिशेने वळवते, त्यामुळे इथले वातावरण हे नेहमीच हिरवेगार भासते. दुसऱ्या बाजूला असणारी डोंगरासारखीच असणारी, लाल दगडाची काप. या कापाच्या आधारानेच थोरली मालडी विसावली आहे. तर मालडीच्या तिसऱ्या बाजूस भटवाडी निवांतपणे विसावली आहे. सगळीकडून भरगच्च रान माजले असल्याने या ठिकाणी रानात भेकरे, रानडुक्कर, ससे, लाव्हे, असे बरेच प्राणी आढळतात. नदी, डोंगर यासह निसर्गाच्या किमयेतून इथे अस्तित्वास आलेल्या समृद्ध बंदरामुळे इथले वातावरण काही वेगळेच होते. शेतकामासह बंदरात येणारे मोठमोठे पाडाव खाली करण्याच्या कामातून इथल्या नागरिकांना तसा चांगला रोजगार मिळत असे. व्यापारी मालाच्या ने-आणीतून हे बंदर रात्रभर माणसांनी भरलेलं असतं. आणि यामुळेच मालडी रात्रभर जागीच असते असे सांगितले जाते...

शिवकाळात बंदरे ही मुख्य किनाऱ्यापासून तशी आतच असत कारण वाऱ्याच्या तडाख्यापासून, समुद्राचा रुद्रावतार व चाचांच्या उपद्रवापासून बंदराचे रक्षण व्हावे व जमिनीवरील सैन्याची मदत बंदराच्या रक्षणार्थ व्हावी, हा मुख्य हेतू होता. हिंदुस्थानच्या पश्चिम किनाऱ्यावरील हिंदू काळातील सर्व बंदरे भौगोलिक दृष्ट्या अशीच आत वसलेली होती. खंबायत, भडोच, सुरत, गणदेवी, सुपारी ठाणे, नागोठणे, चौल, राजापुरी, महाड, चिपळूण, संगमेश्वर, साठवली, राजापूर, खारेपाटण, ताम्हणे, मालवण, गोवे ही बंदरे अशीच वसवली होती. समुद्राच्या भरतीचे पाणी जिथपर्यंत आत तारवे आणू शकेल तीच बंदरांची जागा ठरे. काठांवरील बंदरे ही पाश्चात्यांनी स्थापन केली व भरभराटीस आणली. महासागरातून सफर करणारी त्यांची मोठाली जहाजे, काठांजवळील खोल पाण्यातच थांबण्यासारखी होती...

या बंदरांपासून देशावर सह्याद्रीच्या घाटवाटांतून जनावरांच्या पाठीवर माल वाहून नेला जाई. परदेशाहून येणारा माल कोकणातील स्थानिक याच रीतीने हिंदुस्थानात दूरवर घेऊन जात व सर्वत्र फैलावत. राजधान्यांची मुख्य शहरे राज्यातील मुख्य बंदरांना जोडलेली असत. सुरतेचा माल खानदेशात, कल्याणकडील वाहतूक नाशिककडे, चौलास उतरणारा माल जुन्नर व तेथून अहिल्यानगर छ.संभाजीनगर असा पुढे जात असे. मध्ययुगीन चौल बंदरात उतरवणारा माल अष्टमी, पाली वगैरे गावांवरून कुवारी गडाजवळील शहापूर पेठेच्या मार्गाने पवनेच्या खोऱ्यातून तवेगावजवळ पोहोचून इंद्रायणी ओलांडून इंदुरी, नऊलाख उंबरे, कडूस, घोडे, या गावांवरून जुन्नरास जाई व तेथून अहिल्यानगरास व पुढे बेदरासही पोहोचे...

महाडपर्यंत तारव्यातून येणारा माल वरंधा व पार घाटाने नीरा व भीमेच्या खोऱ्यातून पंढरपूर, सोलापूर, विजापूरपर्यंत पोहोचे. तीच गोष्ट चिपळूणवरून कराडास जाणाऱ्या मालाची. राजापूर बंदराचा अनुस्कुरा घाटाने कोल्हापूर, मिरज, अथणी व तेथून पुढे विजापूरपर्यंत वाहतूक केली जाई. खारेपाटण बंदरातून फोंडा घाटाने निपाणी, रायबाग, या मार्गाने कृष्णेच्या दक्षिणेकडील प्रदेशांत मालाचा पुरवठा होई. मालवण बंदरातून नरडाव्याच्या घाटानी, पाडगाव, गारगोटी या कोल्हापूरच्या दक्षिणेकडील भागात माल पोहोचे. वेंगुर्ल्याहून बेळगाव, सापगाव, धारवाड, हुबळी, गदग, कोपळपर्यंत व्यापार होई...

वर उल्लेखलेल्या या बंदरांतूनच परदेशी माणसे आपल्या बंदुकीच्या दारूस आवश्यक असा ‘सोरा' हे खनिज, कापड, सूत व मसाल्याचे पदार्थ मुख्यतः आपल्या देशांत नेत तर कोकणातून देशावर जाणारा आवश्यक माल म्हणजे मीठ, कोकम, सुंभ, नारळ, सुपारी व परदेशांतील खजूर, खारीक, बदाम, बेदाणे, हींग व निरनिराळे धातू होय. हा माल आपल्याच बंदरातून व घाटातून वर जाऊन आपल्या जकातीचे उत्पन्न वाढावे याकरिता दुसऱ्या राजसत्तेच्या अखत्यारीत असणाऱ्या घाट रस्त्यावर सातत्याने काही ना काही तंटे बखेडे, लूटमारसदृश घटना घडत. यामुळेच मराठ्यांच्या अखत्यारीत असणाऱ्या घाटवाटांतून बराच माल वर चढत असे...

:

शिव छत्रपती स्वारी बसरुर.

―――――――――――――
#इतिहासकर्ते_मरहाट्टे #बसरुर #मालोंड_बंदर
#छत्रपतीशिवाजीमहाराज #आरमार
#गडवाट #रणमार्तंड_मरहट्टे #स्वारी_बसरुर

No comments:

Post a Comment

“बसरूर स्वारी”

  २२ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी १६६५... बखरीतील जळपती सर्जा शिवछत्रपतींची, “बसरूर स्वारी”.... इ.स.१६६५ च्या फेब्रुवारी महिन्यात शिवाजी महार...