विनोद जाधव एक संग्राहक

Saturday 23 March 2019

...आणि मराठ्यांच्या नुसत्या दहशतीने आलमगीर औरंगजेब बादशाह लंगडा झाला !!




...आणि मराठ्यांच्या नुसत्या दहशतीने आलमगीर औरंगजेब बादशाह लंगडा झाला !!
पोस्तसांभार :Raj Jadhav

१६९९ साली स्वतः औरंगजेब बादशाह मराठयांचे किल्ले जिंकण्यासाठी ब्रह्मपुरीच्या छावणीतून बाहेर पडला. साधारणपणे १७०० सालात औरंगजेब याने वसंतगड, सातारा, परळी आणि भूषणगड हे किल्ले जिंकले. मोगल किल्ले घेत असताना मराठे औरंगजेबाच्या छावणीभोवती घिरट्या घालत, त्याच्या छावणीवर हल्ला करत तसेच रसद आणण्यास निघालेल्या मोगल पथकांवर हल्ला करत. औरंगजेब महिनोमहिने किल्ले घेण्याचा प्रयत्न करत असे त्यामुळे किल्ला लढवता येईल तितका मराठे लढवत असत शेवटी मनुष्यहानी न होता प्रचंड खंडणी घेऊन किल्ला मोगलांना देत, मोगल किल्ला जिंकून पुढे गेले की तोच किल्ला मराठे जिंकून घेत. याच कालावधीत मराठ्यांनी मोगल सेनापतींना शेकडो मैल पायपीट करायला लावली शिवाय मराठे दक्षिणेत संचार करून मोगलांची ठाणे मारत, मोगल प्रदेश उध्वस्त करत अनेक मोगली सरदारांना कैद करून खंडणी वसूल करत असत.
२५ जुलै १७०० रोजी औरंगजेबाने भूषणगड ताब्यात घेतला, औरंगजेबाने आपल्या शहजाद्याला व इतर सरदारांना सैन्यासह निरनिराळ्या भागात पाठवले, हेतू असा की सैन्याला विश्रांती मिळावी. भूषणगडाकडुन औरंगजेब हा पन्हाळा जिंकून घेण्याच्या तयारीत होता. भुषणगडापासून निघाल्यानंतर औरंगजेब याने माण नदीवरील खवासपूर येथे आपली छावणी कायम केली. पावसाळ्याचे दिवस असल्याने माण नदीला रात्री एकाएकी पूर येऊन मोगल छावणीची भयंकर वाताहत झाली. अनेक माणसे जखमी झाली. या घटनेबद्दल साकी मुस्तेदखान म्हणतो " डोंगरावर पाऊस पडला. डोंगरातील पाणी नदीच्या पात्रात वाहू लागले. लोक गाढ निद्रेत होते. पुढे काय वाढून ठेवले याची त्यांना कल्पना नव्हती. एकाएकी त्यांना जाग आली तेंव्हा बिछान्यावरून ते पाहतात तो काय ? चहुकडून पाण्याचा पूर आला आहे. जिकडे तिकडे पाणीच पाणी, सगळा प्रदेश जलमय झाला आहे. असंख्य माणसे व जनावरे पाण्यात बुडून मेली. अजून रात्र शिल्लक राहिली असती आणि पूर दिवसाच्या चार पाच घटकेपर्यंत चालू राहिला असता तर एक मनुष्यही जिवंत राहिला नसता.
याच घटनेचा वृत्तांत देताना मोगलांचा इतिहासकार खाफिखान लिहतो " पाण्याचा पूर येताच छावणीतून विलक्षण आक्रोश उठला. रात्रीच्या भयंकर अंधारात जो आरडाओरडा झाला त्यामुळे वातावरण कंपनामय झाले. त्यावेळी बादशाह शौचालयात होता. त्याला वाटले की मराठयांनी लष्करावर अचानक छापा घातल्यामुळे छावणीत आकांत झाला आहे. तो घाईघाईने उठून बाहेर येऊ लागला. त्या गडबडीत त्याचे पाय घसरले त्याच्या गुडघ्याला भयंकर मार लागला. तो काही बरा झाला नाही. बादशाह शेवटपर्यंत लंगडतच राहिला.नाही तरी तो तैमुरलंगाचा वारसच होय "
मराठ्यांच्या दहशतीचे असे हे वेगळे आणि अलौकिक उदाहरण..

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...