विनोद जाधव एक संग्राहक

Thursday 18 April 2019

निळो सोनदेव


निळो सोनदेव-

हा हल्लींच्या वावडेकर अमात्य घराण्याचा मूळ पुरुष. याचें मूळ गांव ठाणें जिल्ह्यांत कल्याणजवळ होतें. याचा आजा नारोपंत हा मावळांत खेडेवारें येथें ठकारांच्या घरी लहानाचा मोठा झाला. त्यानें मालोजीच्या पदरी नोकरी करून लौकिक संपादिला. त्याचा पुत्र सोनोपंत, हा शहाजीचा पदरी असून कर्नाटकांत राज्यव्यवस्थेच्या कामीं त्याला उपयोगी पडला. त्याच्याकडे डबिरीचें काम असे. शिवरायांनी पुण्याची जहागीर स्वतंत्रपणे पाहावयास लावण्याच्या वेळी शहाजीनें त्याच्याबरोबर जी विश्वासाची मंडळी दिली तींत हा होता. शिवरायांनी सोनोपंतास तेंच काम सांगितलें होतें. औरंगझेब दक्षिणेचा सुभेदार असतां शिवरायांनी मोंगलांच्या ज्या आगळिकी केल्या होत्या त्याच्या परिमार्जनासाठी त्यानें सोनोपंतास औरंगझेबाच्या दरबारीं अनेकदां पाठविलें होतें व कांहीं दिवस त्याला वकील म्हणूनहि नेमलें होतें. शिवरायांनी पहिल्या मसलतींत व कार्यांत याचा त्याला पुष्कळ उपयोग झाला. हा स. १६४५ त मेल्यावर त्याचा निळोपंत या वडील मुलास शिवरायांनी सचीवगिरी दिली. निळोपंत व त्याचा धाकटा भाऊ आबाजी हे दोघेहि बापाच्या हाताखालीं व शिवरायांनी देखरेखीखालीं तयार झाले होते. कोंकण वगैरे प्रांताची व्यवस्था यानें चांगली लाविल्यामुळें याला मुजुमदारी मिळाली (१६४७). त्याचा भाऊ आबाजी (पहा) पराक्रमी होता; त्यानें कल्याण सुभा घेतला होता (१६४८) व पुढें तर कल्याणपासून थेट गोव्यापर्यंतचा मुलूख हस्तगत केला; तेव्हां त्याला या प्रांताचा सुभेदार नेमण्यांत आलें. पुढे (१६६१) शिवाजीनें स्वराज्याची जी नवीन व्यवस्था ठरविली, तींत निळोपंतानें लढाईवर न जातां मुलकी कारभार पहावा असें ठरविलें; तत्पूर्वी यालाहि पेशव्यांप्रमाणें लढायांवर जावें लागत असे. शिद्दीवरील लढायांत यानें प्रमुख भाग घेतला होता. त्यावेळची राज्याची हिशेबी पद्धत याच्याच हातची आहे. शहाजी मेल्यावर जिजाबाई सती जाती असतां यानेंच तिची समजूत घालून तिला थांबविलें. शिवरायांनी आगर्‍यास गेला असतां त्यानें मागें जें राज्य चालविण्यास कारभारी मंडळ नेमिलें त्यांत निळोपंत होता. याप्रमाणें त्यानें मराठी राज्याची अखेरपर्यंत चांगली सेवा केली व शेवटी स. १६७२ त हा मरण पावला. त्याच्या मागून त्याचा वडील मुलगा नारोपंत हा अमात्याचें काम पाहूं लागला; परंतु तो साधुवृत्तीचा असल्यानें त्याचा धाकटा भाऊ रामचंद्रपंत हाच काम करी. [सभासद; शिवदिग्विजय; वावडेकरांचा इतिहास.]

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...