हैदरअली आणि मराठा वीरांची लढाई
भाग 4
हरिपंतास याच वेळीं पुण्याला जाणें अवश्य झाल्यामुळें त्यानें याला चकविण्यासाठीं एक युक्ति योजिली; कोल्हापूराकडे महादजी शिंदे होता त्याच्या सैन्यास मिळण्याकरिता आपण जात आहों असें दाखवून हा मिरजेस आला. तेव्हां आतां हे आपणावर स्वारी करून येणार अशी हैदरास भीति पडून त्यानें युद्ध थांबविण्याविषयीं बोलणें लाविलें. यावेळीं हरिपंतानें बरेंच ओढून धरून याजपासून पुष्कळ पैसा उकळला. इ.स. १७७८ च्या मे महिन्यांत महादजी शिंदे व हरिपंत फडके उत्तरेस निघून गेल्यावर मराठ्यांचा मुलूख घशाखालीं घालण्यास याला पुन्हां संधि सांपडली. त्यानें धारवाड घेऊन उत्तरेस घटप्रभा व कृष्णा या दोन नद्यांपर्यंतचा मुलूख आपल्या अंकित करून त्यानें चित्रदुर्गहि काबीज केलें व कडप्पा जिंकून पूर्वेस आपल्या राज्याची मर्यादा वाढविली (१७७९). हैदर कडाप्पाच्या आसमंतांत असतां लाली नांवाचा फ्रेंच सरदार त्यास येऊन मिळाला. तो येण्यापूर्वीच हैदराच्या मनांत इंग्रजाविषयी द्वेष उत्पन्न झाला होता. त्यानें फ्रेंच लोकांशी कित्येक दिवसांपासून मित्रत्वाचा व्यवहार ठेवला होता. मॉरिशस बेटांतून माही बंदराच्या मागे आतांपावेतो त्याला फ्रेंचांकडून युद्धोपयोगी सामुग्रीची व कधी कधी शिपायांचीहि मदत मिळाली होती.
No comments:
Post a Comment