विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 10 May 2019

हैदरअली आणि मराठा वीरांची लढाई भाग 5


हैदरअली आणि मराठा वीरांची लढाई
भाग 5
इ.स. १७७८ त इंग्रजांनी फ्रेंचांची पाँडेचरी हस्तगत केली, तेव्हां हैदरास अर्थातच वाईट वाटलें पुढें इंग्रजांनी त्याचें माही बंदरहि काबीज करण्याचा बेत केला. तेव्हा, ही वसाहत माझ्या राज्यांत असल्याकारणानें ती माझ्या आश्रयाखाली आहे. असें जाहीर करुन त्या ठिकाणाचे रक्षण करण्याची त्यानें पुष्कळ धडपड केली, व इंग्रजांनी त्या ठिकाणास वेडा दिला असता त्यानें फ्रेंच निशाणाशेजारी आपलें निशाणहि उभारलें. परंतु इंग्रजांनी तिकडे लक्ष न देतां इ. स. १७७९ च्या मे महिन्यांत तें स्थळ हस्तगत केलें आणि पुढें त्याची तटबंदी पाडून टाकाली. इ. स. १७७९ च्या एप्रिल महिन्यांत मद्रासकर इंग्रजांनी वसालतजंगाशीं तह करून त्याजपासून त्याचा गंतूर प्रांत खंडानें आपल्याकडे घेतला. परंतु हैदरास ही गोष्ट रुचली नाहीं. कारण यामुळें त्यानें नुकताच पादाक्रांत केलेला मुलूख त्याच्या राज्यापासून तोडला जात होता. म्हणून इंग्रज जेव्हां तो प्रांत आपल्या कबजांत घ्यावयास निघाले. तेव्हा हैदरानें लागलीच त्यांनां मार्गात अडथळा करण्याकरितां आपलें सैन्य पाठविलें. त्याच्या सैन्यानें कर्नल बेली याचा पराभव केला (१७८०) असतां वारन हेस्टिंग्जनें कलकत्त्याहून सर अय्यर कूट याला त्याच्यावर पाठविलें. कूटनें त्याचा पोटों नोव्हो, पॉलिलूर, व शोलिंगड या तिन्ही लढायांत पराभव केला. ब्रिटिश आरमारानें नेगापट्टम् काबीज केलें. तेव्हां त्यानें आपला मुलगा टिप्पू याला फ्रेंच आरमाराची मदत मिळविण्याकरितां पश्र्चिम किनाऱ्याकडे धाडलें . पण इतक्यांत चित्तूर येथें त्याचा अंत झाला (१७८२). १८ व्या शतकांत उत्तरेस रणजितसिंग व दक्षिणेंत हैदर असे दोघे शूर व राज्यसंस्थापक उदयास आले. दोघेहि निरक्षर व उलट्या काळजाचे होते. हैदरच्या ठिकाणीं नीति, धर्म किंवा दया काहीं नव्हतें. तो स्वत: सर्व काम पहात असून फार कडक रीतीनें अंमल चालवी. त्यामुळें त्याच्या राज्यांत सर्व एकतंत्री चाललें, होतें. त्याला पाच भाषा चांगल्या बोलतां येत होत्या. व तो सर्व काम झटपट उरकी. त्याची स्मरणशक्ति फार दांडगी असून अवघड आंकडेमोडींतहि तो वाकबगार असे. तो लोकांचा स्वभाव व गुण ओळखण्यांत तरबेज असल्यानें त्याला आपल्या भोंवतीं कार्यक्षम माणसें गोळा करतां आलीं. हा एक अलौकिक पुरुष होऊन गेला यांत शंका नाहीं.

No comments:

Post a Comment

! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!

  ! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...