विनोद जाधव एक संग्राहक

Thursday 29 August 2019

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे भाग 34


मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 34
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
दौलतराव शिंदे ह्यांचा मृत्यु.---------------------10

दौलतराव हे सर्व हिंदुलोकांप्रमाणे धर्माच्या बाबतींत परधर्मीयांशी फार सौम्यपणाने वागत असत. ते स्वतः कर्मनिष्ठ होते, परंतु मुसलमान साधूंविषयी व त्यांच्या देवस्थानांविषयी त्यांची पूज्य बुद्धि असे. त्यांनी मुसलमानांच्या पिरांचीं व फकिरांचीं वर्षासने चालविली होती. ग्वाल्हेर येथील शाह मनसूर ह्याच्या स्थानाबद्दल त्यांची पराकाष्ठेची भक्ति असे. ८. ह्याचे कारण, त्या अवलियाने महादजी शिंदे ह्यांस, दिल्लीपर्यंत तुला राज्य दिले आहे” असा वरप्रसाद दिला होता. त्याप्रमाणे पुढे घडून आलें, ह्मणून शिंद्यांच्या घराण्यांत त्या अवलियाविषयीं भक्तिभाव उत्पन्न झाला. तो अद्यापि चालू आहे. दौलतराव हे पुढे पुढे उदास झाले होते असे दिसून येते. त्यांच्याविषयीं एका युरोपियन गृहस्थाने अशी एक गोष्ट लिहिली आहे की, * इ. स. १८०७ सालीं एकदा धूमकेतू निघाला. त्या वेळी दौलतरावांच्या मुत्सद्दयांनीं व ब्राह्मणमंडळींनीं, राजे लोकांस हे अनिष्ट असून, कांहीं फेरफार होणार असे भाकित केले. त्या वेळीं दौलतराव शिंदे यांनी असे उत्तर दिले की, “माझे आतां कांहीं अनिष्ट होण्यासारखे राहिले नसून, माझ्या स्थितीमध्ये झाला, तर कांहीं इष्टच फेरफार होईल !! इ. स. १८०३-४ सालीं जनरल वेलस्ली व लॉर्ड लेक ह्यांनी दौलतराव शिंदे ह्यांचा पराभव करून सुर्जीअंजनगांवच्या तहामध्ये त्यांचे स्वातंत्र्य हरण केले, त्या मानहानीस अनुलक्षून हे उत्तर होते. दौलतराव शिंदे ह्यांचा काळ शास्त्रीय शोध व ज्ञानप्रसार ह्यांचा नसल्यामुळे, पाश्चिमात्य देशांतील कलाकौशल्य व शास्त्रीय सुधारणा ह्यांचे त्या वेळी लोकांस अपूर्व कौतुक व चमत्कार वाटत असे. अर्थात् शास्त्रीय शोधांच्या प्रगतीची लोकांस कल्पना नसल्यामुळे, पाश्चिमात्यवस्तू पाहून त्यांची मति थक्क होऊन जात असे; व ते शास्त्रीय ज्ञानाच्या अभावी असंस्कृत व भोळसर तर्क लढवून आपलें हास्यकारक अज्ञान मात्र व्यक्त करीत असत. त्यामुळे अनेक गमतीचे प्रकार वारंवार घडून येत असत. इ. स. १८१० सालीं, शिंद्याच्या दरबारचे ब्रिटिश रेसिडेंट मेजर मालकम ह्यांनीं, दौलतरावांकरितां एक उत्कृष्ट चार चाकी बगी इंग्लंडाहून तयार करून आणिली; व ती चार करड्या रंगाचे आरवी घोडे व त्यांचे उत्तम प्रकारचे कातडी सामान ह्यांसह त्यांस नजर केली. दौलतरावांनी व त्यांच्या दरबारी मंडळीने अशा प्रकारचा अश्वरथ पूर्वी कधीही पाहिला नव्हता. त्यामुळे त्यांस फार चमत्कार वाटला, व त्यांत कदाचित् दारूगोळा भरून ठेवला असेल असे समजून, त्यांनी त्या गाडीमध्ये प्रथम फकीर लोक बसविले ! अर्थात् मोठ्या प्रेमादरानें नजर केलेल्या बहुमूल्य अश्वरथांत फकीर बसलेले पाहून ब्रिटिश रेसिडेंटास काय वाटले असेल, ते निराळे सांगावयास नकोच. ह्याचप्रमाणे आणखी एक अशीच मजेची गोष्ट घडून आली. एकदां रेसिडेंटानें दौलतराव शिंद्यांकरितां एक भव्य व सुंदर तंबू तयार करवून त्यांस नजर केला. तो पिवळ्या रंगाचा असून त्याच्या अंतर्भगीं कांचेच्या तावदानांच्या प्रशस्त व रमणीय अशा खोल्या केल्या होत्या. ह्या तंबूमध्ये दौलतराव शिंदे ह्यांनी एक मोठा मेजवानीचा समारंभ केला. त्या दिवशीं, कर्मधर्मसंयोगाने, रोषनाई करितांना मशालजीच्या नजरचुकीने त्या तंबूस आग लागली, व तो सर्व जळून गेला. परंतु ही गोष्ट कोणाच्याच लक्ष्यांत न येऊन, जिकडे तिकडे अशी बातमी पसरली की, तंबूच्या कनातींमध्ये कळीच्या तोफा, दारूगोळा, व शस्त्रे ठेविली होती. त्यामुळे तो तंबू पेटून खाक झाला !! तात्पर्य, अशा गोष्टी त्या काळीं फार घडून येत असत, व त्यांच्या योगाने मराठी राज्यांत ज्ञानप्रसार कमी होता हे व्यक्त होत असे.Image may contain: one or more peopleNo photo description available.Image may contain: one or more peopleImage may contain: indoor

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...