मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 13
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
बायजाबाई शिंदे
ह्यांचा कुलवृत्तांत----------------------3
सखारामराव घाटगे हे हुशार, धीट व कारस्थानी गृहस्थ असल्यामुळे नाना फडनविसांची त्यांच्यावर मर्जी बसली; व त्यांनी परशुरामभाऊंकडून त्यांना मागून घेऊन, खुद्द पेशव्यांचे लष्करांत त्यांस खास पथकाची शिलेदारी दिली. अशा रीतीनें सखारामराव ह्यांचा पुणे दरबारात प्रवेश झाला. सखारामराव घाटगे पुण्यास आल्यानंतर लवकरच सवाई माधवराव पेशवे हे मृत्यु पावले; व पुणे दरबारांत गोंधळ होऊन, पेशवाईच्या गादीविषयीं तंटेबखेडे सुरू झाले. त्या प्रसंगी महादजी शिंदे ह्यांचे दत्तक पुत्र दौलतराव शिंदे, नाना फडनवीस आणि परशुरामभाऊ पटवर्धन ह्यांची अनेक कारस्थाने होऊन, अखेर बाजीराव पेशवे ह्यांस पेशवाईची गादी मिळाली. ह्या सर्व राजकारणांत सखारामराव घाटगे हे अंशतः सूत्रचालक होते, असे ह्मणण्यास हरकत नाहीं. सवाई माधवराव ह्यांच्या मृत्यूनंतर, पेशव्यांच्या गादीवर कोणास बसवावे ह्याबद्दल वादविवाद चालू असतां, दौलतराव शिंदे ह्यांचे दिवाण बाळोबातात्या व परशुराम भाऊ पटवर्धन ह्या दोघांचे व नाना फडनविसांचे वैमनस्य येऊन, नानांस पुण्यांतून पळून जाण्याचा प्रसंग आला. त्या वेळीं सखारामराव घाटगे हे आपल्या पथकानिशीं दौलतराव शिंदे ह्यांच्या नौकरीस जाऊन राहिले. तेथे रायाजी पाटलांचा व त्यांचा चांगला स्नेहसंबंध जडल्यामुळे त्यांची दौलतराव शिंदे ह्यांच्या दरबारांत चांगली चाहा झाली. अशा रीतीने शिंद्यांच्या दरबारात प्रवेश होतांच, सखारामराव ह्यांनीं, आपल्या गोड व मोहक वाणीनें, आपल्या उत्सवप्रिय व तरुण यजमानांचे मन तेव्हांच वेधून टाकिलें. अर्थात्, दौलतराव शिंदे ह्यांची सखारामराव घाटग्यांवर पूर्ण मेहेरबानी जडल्यामुळे, त्यांस पुणेंदुरबारांत आपले वर्चस्व स्थापन करण्यास विलंब लागला नाहीं. सखारामराव हे इतिहासांत सर्जेराव घाटगे' ह्या नावाने प्रसिद्ध आहेत. हे सर्जेराव घाटगे आमच्या चरित्रनायिका बायजाबाई ह्यांचे जनक होत.
बायजाबाईंच्या मातुल घराण्याची थोडीशी हकीकत येथे सादर केली पाहिजे. बायजाबाईचे वडील ज्याप्रमाणे पुरातन, घरंदाज, पराक्रमी व अस्सल मराठे घराण्यांतील होते; त्याप्रमाणे त्यांच्या मातुश्री ह्याही जुन्या व इतिहासप्रसिद्ध घराण्यांतील होत्या. हे घराणे अस्सल मराठ्यांपैकी असून, ह्यांतील पुरुषांनी महाराष्ट्रराज्यरक्षणाचे काम पराकाष्ठेचे साहाय्य करून, आपली स्वामिनिष्ठा व स्वदेशभक्ति व्यक्त केली आहे. औरंगजेब बादशाहाने दक्षिणेत येऊन सर्व महाराष्ट्रप्रांत काबीज केला; व छत्रपति शिवाजी महाराजांनी संस्थापित केलेले मराठी राज्य व महाराष्ट्रधर्म ह्यांचा समूळ विध्वंस होण्याचा बिकट प्रसंग प्राप्त झाला; त्या वेळीं, कर्नाटकप्रांतीं, राजाराम महाराजांस अप्रतिम साहाय्यकरून, ज्यांनी आपल्या अलौकिक शौर्याची, अचाट साहसाची, अतक्र्य देशभक्तीची, आणि अपूर्व स्वार्थत्यागाची सीमा करून दाखविली; आणि यवनांचा पराभव करून महाराष्ट्रराज्य व महाराष्ट्रधर्म ह्यांचे रक्षण केलें; त्या वंदनीय वीरश्रेष्ठांपैकी ह्या घराण्यांतील मूळ पुरुष एक होत एवढे सांगितले, ह्मणजे ह्या घराण्याच्या थोरपणाबद्दल किंवा कुलीनतेबद्दल अधिक प्रशंसा करण्याचे प्रयोजन नाहीं. हणमंतराव पाटणकर हे नांव महाराष्ट्राच्या इतिहासांत प्रसिद्ध आहे. ह्यांनी राजाराम महाराजांच्या चंदीच्या राजकारणांत उत्कृष्ट स्वामिसेवा केल्यामुळे त्यांस ‘समशेरबहादुर हा किताब व पाटणखोप्यांतील ४० गांवांची पाटण कसब्यासुद्धां जहागीर इनाम मिळाली होती. त्यांच्या पूर्वजांचे पूर्वीचे उपनांव साळुखे हे असून, हे पूर्वापार पाटणचे देशमुख होते. पुढे हे पाटणास राहू लागल्यापासून ह्यांस पाटणकर हे नांव प्राप्त झाले. ह्यांचे राहण्याचे ठिकाण पाटण हैं असून, ते साता-याचे नैर्ऋत्येस १५ कोसांवर कोयना नदीचे कांठीं आहे. येथे त्यांचा पूर्वीचा जुना वाडा वगैरे असून तेथील इनामदार ह्या नात्याने त्यांच्या वंशजांची योग्यता अद्यापि फार आहे; व दक्षिणेतील सरदारांच्या पटामध्ये ते उच्च प्रतीचे सरदार आहेत.
No comments:
Post a Comment