विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday 30 October 2019

बाजीरावांच्या काळात जवळपास सर्व भारत मराठा साम्राज्याकडे असताना शेजारचा मराठी प्रभाग (मराठवाडा) निजामाकडे कसा राहिला?



याचे विजय आपटे यांनी सांगितलेल्या कारणासोबतच आणखी एक कारण आहे. मराठवाडा आज जरी मागास दिसत असला तरी पूर्वी तसे नव्हते. कमी परंतू भरवशाचे पर्जन्यमान आणि गोदावरी, पूर्णा, मांजरा, सिंदफणा इ. नद्यांच्या खोर्‍यातील सुपीक जमीन यामुळे मराठवाडा हा पूर्वीपासून ज्वारी सारखी धान्ये आणि कापसाचे कोठार म्हणून ओळखला जायचा. याउलट, पश्चिम महाराष्ट्राचा सह्याद्रीचा भाग हा जास्त पावसामुळे तर पूर्वेकडचा भाग हा पर्जन्यछायेच्या प्रभावात असल्याने बहूतांश भाग हा शेतीसाठी उपयुक्त नव्हता. यामुळेच पूर्वीपासून मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रापेक्षा तुलनेने अधिक संपन्न होता. इथे राज्यकरणारे सहाजीकच मग संपन्न होेते. अर्थातच शेकडो वर्षे इथे अनेक राज्ये होउन गेली. पुढील गोष्टी इथे लक्षात घेण्यासारख्या आहेत.
१. दोन मोठी संपन्न मराठी साम्राज्ये सातवाहन आणि सेऊन-यादव यांच्या राजधान्या आजच्या मराठवाड्यात अनुक्रमे प्रतिष्ठान (पैठण) आणि देवगिरी इथे होत्या.
२. सातवाहन, वाकाटक काळात मुख्य व्यापरी मार्ग हा मराठवाड्यातून जात असे. भोकरदन (जालना जि.), तेर (उस्मानाबाद जि.) हि व्यापाराची मोठी केंद्रे होती.
३. राष्ट्रकूट, चालूक्य या काळात राजधानी जरी मराठवाड्यात नसली तरी मराठवाड्याचे महत्व अजीबात कमी झाले नाही.
४. शिवाजी महाराजांची देवगिरीवर भगवा फडकविण्याची इच्छा होती (कदाचित राजधानी बनविण्याची इच्छा असावी). दुर्दैवाने त्यांच्या हयातीत ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही.
५. मराठवाड्यावर मुघलांचा कब्जा होण्याआधी निजामाने (मूळ भारतीय) त्यांच्याशी तीव्र संघर्ष करणे तसेच मुघलोत्तर निजामाने (मूळ तुर्की) लवचिक धोरण अवलंबने.
या सगळ्या गोष्टी मराठवाड्याचे महत्व सांगतात.
मराठवाडा स्वराज्यात घेण्याची संधी चालून आली ती छ. शाहू-बाजीराव पे. यांच्या काळात. परंतू विजय आपटे यांनी याच प्रश्नाला उत्तर देतांना सांगितल्या प्रमाणे अल्पसंतुष्ट असल्याने मराठे युद्धात जिंकत पण तहात हारत. मराठवाड्यासारखा संपन्न प्रदेश निजाम इतक्या सहजासहजी सोडेल याची शक्यता मुळीच कमी होती. यातूनच मग १७४३ मध्ये झालेल्या पालखेडच्या तहात निजामाने मराठ्यांना चौथाई आणि सरदेशमुखी देण्याचे मान्य केले. अर्थातच निजाम हा कर स्वत:च्या खिशातून देणार नव्हता. हा भार पडला तो थेट सामान्य जनतेवर. इथे बाजीरावांनी मराठी भाषिक प्रदेश स्वराज्यात घेण्या ऐवजी तिथून मिळणार्‍या कराला महत्व दिले. मराठा साम्राज्याच्या भारतभर झालेल्या विस्तारात या कराची मोठी मदत झाली असणार. मग मराठवाडा स्वराज्यात आहे काय किंवा नाही काय, पेशव्यांनी त्याचा विचार केला नाही.
माझ्यामते मराठवाडा स्वराज्यात न घेणे ही पेशव्यांची केवळ चूक नव्हती, तर आपल्याच जनतेवर केलेला मोठा अन्याय होता. याचे मराठवाड्यावर दूरगामी परीणाम झाले. मराठवाड्याची आर्थिक स्थिती खराब होण्याला इथुनच सुरूवात झाली. दीर्घकाळापर्यंत इथे चांगले वैचारिक नेतृत्व येऊ शकले नाही. प. महा. आणि मराठवाड्यात आज एक मोठी वैचारीक, सामाजिक, आर्थिक दरी दिसून येते. मराठवाड्याच्या आजच्या वाईट स्थितीचे मूळ असे एका चूकीच्या तहात दडले आहे. मराठवाड्याने ई.स. पू. २०० ते ई.स.१५०० असे जवळपास १३०० वर्षे महाराष्ट्राचे भाषिक व सांस्कृतिक नेतृत्व केले पण त्याच मराठवाड्याला आज सावत्र वागणूक देण्यात येते. जर मराठवाडा स्वराज्यात असले असते तर कुणास ठाऊक, आज देवगिरी अखंड महाराष्ट्राची सांस्कृतिक व राजकीय राजधानी असली असती

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...