विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 9 April 2020

महाराष्ट्रातील शिलाहार घराणे भाग 4

महाराष्ट्रातील शिलाहार घराणे
भाग 4
शेवटचा शिलाहार नृपती सोमेश्वर (कार. सु. १२५५–६५) यानेही याच पदव्या घेतल्या होत्या. त्याच्या काळी देवगिरीच्या यादवांची सत्ता वृद्धिंगत होत होती. त्यांना शिलाहारांच्या या पदव्या सहन होणे शक्य नव्हते. यादव सम्राट कृष्ण याने आपला सेनापती मल्ल यास कोकणावर स्वारी करण्यास पाठविले होते. त्याने विजय मिळविला असे म्हणतात पण यादवांचा फायदा झालेला दिसत नाही. नंतर कृष्णाचा भाऊ महादेव याने पुन्हा युद्धास सुरुवात करून गजसेनेसह कोंकणावर स्वारी केली. सोमेश्वराने जमिनीवर पराभव पावल्यावर समुद्राचा आश्रय घेतला पण तेथेही महादेवाने त्याचा पाठलाग करून त्याला जलसमाधी दिली. या प्रसंगाचे शिल्प बृहन्मुंबईत बोरिवली येथे सापडले आहे. हे युद्ध सु. १२६५ मध्ये झाले असावे. यानंतर यादवांनी आपला अधिकारी अच्युत यास कोंकणावर राज्यपाल म्हणून नेमले. त्याचा इ. स. १२७२ चा लेख मिळाला आहे.
शिलाहारांचे दुसरे घराणे दक्षिण कोकणात कार्यरत होते. आठव्या शतकाच्या द्वितीयार्धात राष्ट्रकूट नृपती पहिला कृष्ण याने दक्षिण कोकण जिंकून तेथे शिलाहारवंशी सणफुल्ल (कार. सु. ७६५–८५) याची प्रशासक म्हणून नेमणूक केली. या घरण्याच्या अकरा पिढ्या या प्रदेशावर राज्य करीत होत्या. प्रथम त्यांची राजधानी चंद्रपूर (दक्षिण गोवे प्रांतातील चांदोर) येथे होती. सणफुल्लाचा पुत्र धम्मियर याने बहुधा चंद्रपुरावर शत्रूचे आक्रमण झाल्यामुळे समुद्रकिनाऱ्यावर बलिपत्तन नगर स्थापून तेथे आपली राजधानी नेली. यातील काही राजांनी उत्तर कोकणच्या शिलाहारांशी व गोव्यातील कदंबांशी युद्ध करून विजय मिळविले होते.
हे शिलाहार आपले सम्राट राष्ट्रकूट यांच्याशी शेवटपर्यंत एकनिष्ठ राहिले पण उत्तरकालीन चालुक्य सत्याश्रय याच्या कारकिर्दीत या घराण्याचा शेवटचा ज्ञात पुरुष रट्टराज (कार. सु. ९९५–१०२४) याला चालुक्यांचे स्वामित्व मान्य करावे लागले. पुढे चालुक्यांची सत्ता दुर्बल होताच त्याने त्यांचे वर्चस्व झुगारून देण्याचा प्रयत्न केला. नंतर गादीवर आलेल्या चालुक्य सम्राट जयसिंहाने या बंडखोर मांडलिकाचा उच्छेद करून त्याचे राज्य खालसा केले. दक्षिण कोकण जिंकल्यावर कोल्हापूर येथे तळ असताना जयसिंहाने दिलेला ताम्रपट १०२४ सालचा आहे. तेव्हा हे घराणे इ. स. सु. ७६५ ते १०२४ पर्यंत म्हणजे सु. अडीचशे वर्षे राज्य करीत होते.Image may contain: one or more people

No comments:

Post a Comment

छत्रपती संभाजी महाराजांनी केलेली सर्वात मोठी लढाई

  छत्रपती संभाजी महाराजांनी केलेली सर्वात मोठी लढाई संभाजी महाराजांनी बुऱ्हाणपूर मध्ये हल्ला करून अशी दहशत निर्माण केली की बुऱ्हाणपूरच्या मौ...