महाराष्ट्रातील शिलाहार घराणे
भाग 5
शिलाहारांचे तिसरे घराणे कोल्हापूर, सातारा, सांगली व बेळगाव या जिल्ह्यांतील काही प्रदेशांवर राज्य करीत होते. काही जुन्या लेखांत कोल्हापूरचे ‘क्षुल्लकपुर’ असे नाव येते. या शाखेची इष्टदेवता कोल्हापूरची महालक्ष्मी ही होती. तिचा वरप्रसाद आपणास प्राप्त झाला आहे, असे या शाखेचे राजे आपल्या ताम्रपटांत अभिमानाने सांगतात. हे घराणे राष्ट्रकुटांच्या पडत्या काळात उदयास आले म्हणून इतर शाखांप्रमाणे ते आपल्या आरंभीच्या ताम्रपटांत त्यांची वंशावळ देत नाहीत.
या शाखेचा मूळ पुरुष पहिला जगित हा इ. स. ९४० च्या सुमारास उदयास आला असावा पण तो व त्याचे दोन वंशज यांच्याविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. या राजांपैकी काहींनी पांड्य राजांप्रमाणे आपल्या भावांस राजपदवीसह प्रांताधिपती केलेले दिसते. तेव्हा वंशवळीत त्यांची नावे आलेली असली, तरी ते एकाच काळी राज्य करीत होते.
सहावा विक्रमादित्य (कार. १०७६–११२६) याच्या काळात या घराण्याचा चालुक्य सम्राटांशी वैवाहिक संबंध जुळून आला. काश्मिरी राजकवी ⇨ बिल्हणाने विक्रमांकदेवचरितात विद्याधर (शिलाहार) राजकन्या चंद्रलेखा हिने करहाट (कऱ्हाड) येथे स्वयंवरात सहाव्या विक्रमादित्याला वरले असे वर्णन केले आहे. ते ऐतिहासिक दृष्ट्या विश्वसनीय नाही. सौंदर्याबद्दल तिची ख्याती दूरच्या काश्मीरपर्यंत पसरली होती. काश्मीरनृपती हर्ष याने कर्णाट राजा पर्मांडी (सहावा विक्रमादित्य) याच्या चंदला (चंद्रलेखा) राणीचे चित्र पाहिले, तेव्हा तो तिच्या सौंदर्याने वेडा झाला असे काश्मिरी कवी ⇨ कल्हणाने वर्णिले आहे. तिच्या पित्याचे नाव राजतरंगिणीत दिले नाही पण तो शिलाहार नृपती मारसिंह (कार. सु. १०५०–७५) असावा.
यानंतर या वंशातील उल्लेखनीय राजा गंडरादित्य (कार. सु. ११०५–४०) हा होता. विक्रमादित्याने त्याला ‘निःशंकमल्ल’ अशी पदवी दिली होती. याचे अनेक ताम्रपट सापडले आहेत. त्याने इरुकुडी गावाजवळ गण्डसमुद्रनामक विशाल तलाव बांधून त्याच्या काठावर हिंदू, बौद्ध व जैन या तिन्ही धर्मांची देवळे बांधली होती. त्याचा पुत्र विजयादित्य (कार. सु. ११४०–७५) याने उत्तर कोकणचा राजा पहिला अपरादित्य याला त्याची गादी मिळवून देण्यास साहाय्य केले होते. विजयादित्याने कलचुरी बिज्जल यालाही चालुक्यांचा पराभव करून त्यांचे राज्य बळकाविण्यात मदत केली होती.
विजयादित्याचा पुत्र दुसरा भोज (कार. सु. ११७५–१२१२) हा या शाखेचा शेवटचा राजा होय. याला त्याच्या शौर्यामुळे ‘वीरभोज’ असे म्हणत. याने ‘राजाधिराज’, ‘परमेश्वर’, ‘पश्चिमचक्रवर्ती’ अशा सम्राटपदनिदर्शक पदव्या धारण केल्या होत्या. हे त्या काळी प्रबळ झालेल्या देवगिरीच्या यादवांना सहण होणे शक्य नव्हते. यादव नृपती ⇨ सिंघण (कार. १२१०–४६) याने त्याच्या राज्यावर स्वारी करून प्रणालक दुर्गाला (पन्हाळा किल्ल्याला) वेढा घातला आणि तो काबीज करून भोजाला त्याच किल्ल्यावर बंदीत टाकले. भोजाचा पराभव १२१२ च्या सुमारास झाला असावा. यानंतर यादवांच्या अधिकाऱ्यांचे लेख कोल्हापूर प्रदेशात मिळू लागतात. [→ भोज, दुसरा शिलाहार].
मिराशी, वा. वि.

No comments:
Post a Comment