विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 9 April 2020

राजपुतांच्या कांही कुळ्यांचे दक्खनी मूळ भाग 6

राजपुतांच्या कांही कुळ्यांचे दक्खनी मूळ

भाग 6

महावीर सांगलीकर

दक्खनच्या लोकांचे उत्तरेत स्थलांतर
दक्खनवरील राजघराण्यांनी राज्य विस्तारासाठी उत्तरेवर स्वारी केल्यावर त्यांच्या बरोबर कांही लोकांचे स्थलांतर होणे ही स्वाभाविक गोष्ट आहे. चालुक्य आणि राष्ट्रकूट यांनी जेंव्हा माळवा, राजपुताना, गुजरात या भागावर स्वारी करून तेथे आपले बस्तान बसवले, तेंव्हा दक्खने वरील अनेक लोकांनी तिकडे स्थलांतर केल्याचे दिसते. याचे अनेक भाषिक, सांस्कृतिक आणि धार्मिक पुरावे सापडतात.

पहिला म्हणजे राजस्थानी, मारवाडी, मेवाडी, माळवी वगैरे भाषांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरला जाणारा 'आई' हा शब्द. हा शब्द तेथे मुख्यत्वे देवीसाठी वापरला जात असला तरी तो 'आई' (Mother, माता) या अर्थानेच वापरला जातो. 'आई' प्रमाणेच 'बाई' हा शब्दही वरील भाषांमध्ये वापरला जातो. हे दोनही शब्द मराठी आहेत, आणि या प्रकारचे महत्वाचे शब्द एखाद्या भाषेत रुळायला ते शब्द वापरणा-यांचे स्थलांतर हेच महत्वाचे कारण असू शकते.

वरील दोन शब्दांप्रमाणेच 'वाड', 'वाडा' आणि 'वाडी' हे तिन्ही मराठी-कानडी शब्द राजस्थानी, मारवाडी, मेवाडी, माळवी वगैरे भाषांमध्ये आढळतात. गुजरात-राजस्थान मधील 'अनहीलवाड', मारवाड, भिलवाडा ही स्थळनावे पहा. दक्खनवरचे असेच नाव म्हणजे 'धारवाड'. राजस्थान मधील अनेक छोट्या वस्त्यांना 'वाडी' हा शब्द वापरला जातो. विशेष म्हणजे हे शब्द हिंदी वगैरे भाषेत दिसत नाहीत.

वरील शब्दांप्रमाणेच 'ळ' हे अक्षर कन्नड, मराठी, गुजराती, राजस्थानी, माळवी, मेवाडी, मारवाडी या सगळ्या भाषांमध्ये दिसून येते. हे अक्षर हिंदी, बंगाली वगैरे भाषांमध्ये नाही, आणि याचे मूळ द्रविडी भाषांमध्ये आहे, अर्थातच हे अक्षर राजस्थान-गुजरातमध्ये दक्षिणेतूनच गेले आहे.

मावली (माऊली), उकळ, सगळा, पाळी, पोळी, पावना (मराठी पाहुणा), लावणी (पिकाची लावणी), काळजो (काळीज), फळी, बामण, बंगडी (बांगडी), आंबो (आंबा), तोरण, उबो (उभा), उघाडो (उघडा), ढुंगा(ढुंगण), धिंगाणो (धिंगाणा), फुगो (फुगा), घाल (घालणे), ग्याबन (गाभण), जलम (जल्म), कागद, कुण (कोण), पेटी, उकाळ (उकळणे) असे कितीतरी शब्द मराठी आणि राजस्थानी, माळवी, मेवाडी, मारवाडी वगैरे भाषांमध्ये समान दिसतात, पण हे शब्द हिंदी भाषेत नाहीत.

ही भाषिक समानता बरेच कांही सांगून जाते. ही समानता केवळ शब्दांपुरती मर्यादित नाही, तर वाक्यरचना आणि कांही प्रमाणात व्याकरण यातही ती दिसून येते.

मारवाडी लोक मराठी भाषा इतरांच्या मानाने चटकन शिकतात याचे कारण मराठी आणि मारवाडी या दोन भाषेत असणारा सारखेपणा हेच आहे.

राजस्थान-गुजरात या दोन प्रदेशात जैन धर्म प्राचीन काळापासून असला तरी चालुक्य आणि राष्ट्रकूट यांच्या काळात या दोन्ही प्रदेशात हा धर्म भरभराटीला आला, कारण ही दोन्ही राज घराणी जैन धर्माचे आश्रयदाते होते. यांच्या काळात कर्नाटकमधील अनेक जैन भट्टारक पीठांच्या शाखा वरील दोन प्रदेशात स्थापन झाल्या. या दोन प्रदेशात जी जैन मंदिरे बांधली जात त्यातील जैन मूर्त्या त्या काळात कर्नाटकातून मागवल्या जात असत. इथे जैन मंदिरांना 'वसही' म्हंटले जाते. 'वसही' हा शब्द 'बसदी' या कन्नड शब्दाचा अपभ्रंश आहे. त्याच प्रमाणे जैन आचार्यांच्या स्मृतीसाठी बांधलेल्या मंदिरास येथे 'दादावाडी' म्हणतात, यातील वाडी या शब्दाचे मूळ मी वर दिलेलेच आहे.

या काळात वरील प्रदेशातील राजांच्या राण्या, राजघराण्यातील इतर पुरुषांच्या बायका अनेकदा कर्नाटकी असत, याचे अनेक उल्लेख त्या काळातील साहित्यात मिळतात.

यावरून असे दिसते की राजस्थान, माळवा, गुजरात येथील लोकांपैकी अनेकांचे पूर्वज हे दक्खनवरचे, विशेषत: उत्तर कर्नाटक आणि दक्षिण महाराष्ट्र या भागातील होते.

No comments:

Post a Comment

छत्रपती संभाजी महाराजांनी केलेली सर्वात मोठी लढाई

  छत्रपती संभाजी महाराजांनी केलेली सर्वात मोठी लढाई संभाजी महाराजांनी बुऱ्हाणपूर मध्ये हल्ला करून अशी दहशत निर्माण केली की बुऱ्हाणपूरच्या मौ...