गाथा पानिपतच्या प्रतिशोधाची..!
भाग १
पानिपतच्या लढाईनंतर उत्तरेतील सुटलेली पकड मजबूत करण्यासाठी नवीन तरुण पेशवा माधवराव यांनी सुभेदार मल्हारराव होळकर, रामचंद्र गणेश कानडे, विसाजी कृष्णा बिनीवले याना नामजाद केले. खरे पाहता हे काम पेशव्यांचे काका रघुनाथराव यांनी करायचे असे ठरले होते, परंतु कर्तव्यशून्य राघोबाला ते पेलले नाही. दरम्यान सुभेदार होळकरांचा मृत्यू झाला. अशा परिस्थिती उत्तरेची जबाबदारी शिंदेच्या एकुलता एक वंशज महादजी शिंदे वर येणे क्रमप्राप्त होते आणि महादजींनी सुद्धा ती जबाबदारी समर्थपणे पेलली ह्यात शंका नाही.
पानिपतच्या पराभवानंतर मराठ्यांची उत्तरेतील पकड ढिली होऊ लागली. रोहिल्यानी उचल खाल्ली आणि दिल्ली काबीज केले. दुसऱ्या बाजूला प्लासी आणि बक्सारच्या लढाया जिंकून इंग्रजांनी दिल्लीला शाह द्यायची तयारी चालवली. पण प्रत्यक्ष दिल्लीवर कब्जा करण्याइतपत सामर्थ्य नसल्याने इंग्रजांनी मोगल बादशहा शहाआलमला ताब्यात घेऊन त्याला पाटणा, अयोध्या करीत शेवटी अलाहाबादेत स्थानापन्न केले.
यावेळी दिल्ली नजीबखानचा मुलगा झाबेतखानच्या ताब्यात होती. मराठ्यांनी अंतर्वेदीतील रोहिल्यांचा प्रदेश जिंकून झाबेताला शह दिला. दिल्लीमध्ये प्रवेश करून ७ फेब्रुवारी १७७१साली दिल्ली शहरात शहाआलमच्या सत्तेची द्वाही फिरवली. झाबेतखान लाल किल्ल्याचा ताबा द्यायला तयार नव्हता. महादजींनी एल्गार पुकारून अवघ्या ३दिवसात लाल किल्ल्यावर भगवा फडकवला..!

No comments:
Post a Comment