विनोद जाधव एक संग्राहक

Friday 29 May 2020

कल्याणच्या सुभेदाराची सून

शिवचरित्र वाचत असताना किंवा, छत्रपती शिवाजी महाराजांचं चारित्र्य अभ्यास करताना. बऱ्याचदा आपल्याला कल्याण च्या सुभेदाराच्या सुनेच्या पात्रा विषयी वाचायला मिळतं अनेकदा अनेक भाषणांत ऐकाला देखील मिळतं. त्या पत्राविषयी शिवकालीन इतिहास अभ्यासकांमध्ये दोन गट पडलेले आपल्याला दिसतात.

एक जे हे पात्र(कल्याणचा सुभेदाराची सून) नाकारतात आणि दुसरे जे या पात्राचं पात्राचं म्हणण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांनी जे धोरण स्वीकारलं त्या बद्दल जे धोरण स्वीकारलं त्या धोरणाचं समर्थन करतात. 

सर्वात अगोदर हे प्रकरण नक्की काय आहे इतिहासात नेमकं कुठं सापडलं आणि कधी घडलं याचा अभ्यास करूयात. कल्याणच्या सुभेदारच्या सुनेच्या कथेची माहिती आपल्याला समकालीन नसली तरी ऐतिहासिक बखरींत सापडते. पहिली बखर आहे शककर्ते शिव छत्रपती महाराज आणि दुसरी बखर आहे शिवदिग्विजय.

आबाजी सोनदेव यांजकडे कल्याण प्रांताचा सुभा होता. त्या प्रांतामधील गडकोट यांच्या तटा बुरुजांच्या निगराणी ची जबाबदारी महाराजांनी त्यांजवर सोपविली. ज्या वेळी कल्याण प्रांत महाराजांनी घेतला त्यावेळी ‘मुलाणा हयाती’ नावाचा विजापूरकरांचा सुभेदार त्या प्रांतावर होता.

स्वराज्य वृद्धीसाठी कल्याणच्या सुभ्यावर मराठ्यांनी हल्ला करून अमाप संपत्ती हस्तगत केली. त्याकाळचे आक्रमक यवन स्वराज्याच्या लेकी बाळी बाटवण्यासाठी उचलून नेत असे. म्हणून की काय कोण जाणे कल्याणच्या सुभेदाराची सुंदर सून आबाजी पंतांनी उचलून आणली. व सुंदर “भेट” शिवरायांना उपहार म्हणुन पाठविली. या “उपहारावर” कडवी प्रतिक्रिया व्यक्त करीत शिवरायांनी आबाजीपंतांना खडे बोल सुनावले.

यापुढे असे कोणत्याही स्त्रीच्या बाबतीत असे वर्तन होता कामा नये असा सज्जड दम भरला. इतकेच नव्हे तर त्या सुभेदाराच्या सुनेची खणानारळाची ओटी भरून पालखीत बसवून मुघल छावणी मधे तिची सुखरूप रवानगी केली. या सुनेच्या विषयी शिवराय म्हणाले की जर आम्ही या सुंदर माऊलीच्या पोटी जन्मलो असतो तर आम्ही ही असेच सुंदर असतो.

ही ढोबळ कथा कमी अधिक फरकाने दोन्ही बखरीमध्ये उपलब्ध आहे. बखर ऐतिहासिक असल्यातरी त्या समकालीन नक्की नव्हत्या. कारण पहिली बखर आहे ‘शककर्ते श्री शिव छत्रपती महाराज’ जी लिहिली मल्हार रामराव चिटणीस यांनी, १८१० साली सातारा छत्रपती दुसरे शाहू उर्फ प्रतापराव ह्यांच्या आज्ञेवरून त्यावेळच्या गादीचे चिटणीस मल्हार रामराव यांनी हि बखर लिहिली.

बाळाजी आवजी चित्रे यांच्या नातवाने ही बखर ऐकीव माहिती नुसार आणि वडिलोपार्जित जी कागदपत्रे त्यांच्या संग्रही होती त्या नुसार ही बखर लिहिली.

दुसरा उल्लेख आढळतो ती बखर आहे शिवदिग्विजय. ही बखर कोणी लिहिली याचा उल्लेख कुठे आढळत नाही, परंतु बडोद्याच्या पांडुरंग रामचंद्र नंदुरबारकर व लक्ष्मण काशिनाथ दांडेकर यांनी  १८९५ साली हा दस्त प्रकाशित केला. हि बखर प्रकाशित झाली तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे निर्वाण झाल्यावर लगेचच लिहिली असं प्रकाशकांच मत होतं.

समकालीन एकही पुरावा नसल्याने ही एक दंतकथा आहे असं म्हणायला वाव आहे. परंतु शिवकालीन इतिहासाचा अभ्यासपूर्ण लेखन करणारे वा सि बेंद्रे यांनी अश्याच आशयाची कथा सांगितली आहे.

वाई जवळच्या गोळेवाडी च्या सुभेदाराची सून भेट म्हणून महाराजांच्या समोर पेश केली त्यावर महाराजांनी ब्राम्हण सरदाराला (पुस्तकात तसा उल्लेख आहे जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर शुद्ध अंतःकरणाने माफी मागतो) शिवाजी महाराजांनी तिखट प्रतिक्रिया देऊन काशीस जाण्यास सुनावले. ही १९७२ साली कथा छत्रपती शिवाजी महाराज यांचे चिकित्सक चरित्र खंड एक पान क्रमांक ११४ वर उपलब्ध आहे. 

जर ही घटना आहे अशी समजली तर कल्याणच्या छाप्या दरम्यान कल्याणच्या सुभेदाराची सून कदाचित घाबरून पेटाऱ्यात लपली असू शकते. तो पेटारा तसाच मराठयांनी आणला आणि हा प्रसंग घडला असू शकतो असा तर्क आपण लावू शकतो. पण आबाजी सोनदेव हे प्रतिष्ठित आणि विश्वासू सेवक असल्याने ते असं जाणीवपूर्वक करतील असं वाटतच नाही.

इतिहासात जर तर आणि तर्काना काही अर्थ निश्चितच नसतो. परंतु हा प्रश्न असा पडतो कि ज्या गौरवशाली इतिहासाचे दाखले देऊन आपण नवीन पिढी घडवण्याचे स्वप्न पाहतो निदान त्या इतिहासाने तरी आमच्या काय किंवा शत्रूंच्या लेकीबाळीवर न्याय केला आहे का नाही?

‘परस्त्री ही मातेसमान’ मानणाऱ्या आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा उदात्त विचार किती गंगे समान निर्मळ आहे याचा एक ऐतिहासिक पुरावा म्हणून ‘कल्याणच्या सुभेदाराची सून’ ह्या प्रकरणाकडे आपण नक्की बघू शकतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘परस्त्री विषयी असलेले आदरयुक्त धोरण’ एवढाच शुद्ध हेतू ला लेख लिहिण्या मागे आहे.

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...