विनोद जाधव एक संग्राहक

Friday 29 May 2020

शिवरायांनी बांधलेला एक पूल आजही आपल्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देत उभा आहे.

जावळीचं खोरं म्हटलं की आपल्या आठवतो तो शिवरायांनी दाखवलेला प्रताप आणि याच इतिहासाचा साक्षीदार किल्ला प्रतापगड. जावळीच्या खोऱ्यामुळे पडणारा मुसळधार पाऊस आणि कोयना नदीच्या जोरदार वाहणाऱ्या प्रवाहाच्या मुळे पावसाळ्यात प्रतापगडाच्या पायथ्याला येताना पावसाळ्यात येण्या जाण्यासाठी नेहमी अडचण असायची.

ज्यामुळे गावाचा संपर्क खंडीत व्हायचा. आणि म्हणून या भागातून प्रवास करणं फार मुश्किलीचं असायचं. यावर उपाय म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी आजूबाजूच्या परिसराची पाहणी केली आणि तत्कालीन पार्वतीपूर या गावात म्हणजे आताच्या पार या गावाजवळ दगडी चिऱ्यांचा पूल उभारला.

छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी किती होती याचं उत्तम उदाहरण म्हणून या पुलाचा आपण उल्लेख करू शकतो. कारण या पुलाची लांबी बावन्न मीटर लांब आहे, या पुलाची उंची ही पंधरा मीटर उंच असून याची रुंदी आठ मीटर रुंद इतकी आहे. आणि सर्वात विशेषतः ओळख सांगावी अशी बाब म्हणजे हा पूल अवघ्या काही महिन्यांत उभारला गेला. साडे तीनशे वर्षे उलटून सुद्धा ऊन वारा आणि मुसळधार पावसात सुद्धा हा पूल अजूनही भक्कम पणे उभा आहे.

सध्याच्या पार या गावात उभा असलेला या पुलाला पाच दगडी खांब आणि चार कमानी आहेत. या पुलामुळे छत्रपतींसह स्वराज्याच्या मावळ्यांचा प्रवास पावसातही सोपा झाला. गौरवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या या पुलाकडे पाहिल्यावर कळून येईल की आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाला आणि अभियंत्यांना लाजवेल असाच हा पूल आहे.

पुलासाठी लावलेला प्रत्येक दगडी चिऱ्यांचा काटकोनात घडवलेला, घडवलेला प्रत्येक दगड एका आकाराचा आणि वजन जर केलं तर कदाचित एकाच वजनाचा देखील भरेल इतकं अचूक काम. पुला खालून पाण्याच्या प्रवाहाने येणारे लाकडी ओंडके किंवा इतर काही चीज वस्तूंमुळे पुलाच्या खांबाला धोका पोहचू नये म्हणून ते खांब काटकोनात बांधले आहेत. ज्यामुळे पाण्यासोबत आलेली वस्तू या काटकोनी खांबांना आदळून त्याचे दोन भाग व्हावेत अशी यंत्रणा.

दोन खांबांना जोडणारी कमानही सुंदर गोलाकृती मध्ये कोनात जाणारी जणू मंदिरातील गाभऱ्यासारखीच किंवा एखाद्या बुरुजाप्रमाणे. कोरीव काम केलेल्या या शिवकालीन पुलाला आज तब्बल साडेतीनशे वर्षापेक्षा अधिक काळ झाला, पण हा पूल आजही त्याच ताकदीने सेवेसाठी उभा आहे. छत्रपती शिवरायांच्या काळात बांधलेल्या या पुलाचा उपयोग नंतर काळात कोकणात जाण्यासाठी होऊ लागला.

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...