विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday 23 June 2020

पतंगरावजी जाधवराव यांच्या समाधीचा शोध

पतंगरावजी जाधवराव यांच्या समाधीचा शोध:
चंदनवंदन किल्ल्याच्या पायथ्याशी सव्वातीनशे वर्षांनंतरही अस्तित्व टिकून,इतिहासाला उजाळा
मराठ्यांच्या अनेक लढायांचा साक्षीदार असलेल्या चंदनवंदन किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेल्या जांब-किकली गावात स्वराज्याचे सेनापती धनाजी जाधवराव यांचे थोरले पुत्र पतंगरावजी यांच्या समाधीचा शोध लागला
: मराठ्यांच्या अनेक लढायांचा साक्षीदार असलेल्या चंदनवंदन किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेल्या जांब-किकली गावात स्वराज्याचे सेनापती धनाजी जाधवराव यांचे थोरले पुत्र पतंगरावजी यांच्या समाधीचा शोध लागला आहे. समाधी सव्वातीनशे वर्षांपूर्वी बांधल्याचे मत इतिहासप्रेमींनी व्यक्त केले.
चंदनवंदन किल्ल्याच्या पायथ्यास मोगल सरदार हमीदउद्दीन खानाच्या सैन्यासोबत सेनापती संताजी घोरपडे यांच्या तुकडीची लढाई झाली होती. यावेळी संताजी घोरपडे यांच्या सैन्यात असलेले पतंगरावजी जाधवराव मोगलांकडून मारले गेले. या युद्धाचे वर्णन सेतुमाधवराव पगडी अनुवादित, ‘मोगल दरबाराची बातमीपत्रे’ यात आढळते. ९ सप्टेंबर १६९५ रोजीच्या मोगल बातमीपत्रात ‘हमीदउद्दीन खानाने चंदनवंदन किल्ल्याखालच्या वाड्या जाळण्यासाठी फत्तेहुल्लाखान याला पाठविले होते. संताजी यांना ही बातमी समजली. ते फत्तेहुल्लाखानावर चालून आले.
हमीदउद्दीन खानही तेथे पोहोचला. युद्ध झाले. धनाजी जाधवांचा मुलगा, एक मराठा सरदार व अनेक काफर सैनिकांचा पराजय झाला. गनीम किल्ल्यात जाऊन बसले. खानाने किल्ल्याखालील पेठा जाळून टाकल्या व गुरेढोरे पकडली. या लढाईत धनाजी जाधवरावांचे पुत्र पतंगरावजी जाधवराव मारले गेले.’ असे नमूद केले आहे.जांबच्या पूर्वेस, कृष्णा मंदिरासमोरील बागेच्या विहिरीजवळ शेतात पतंगरावजी जाधवराव यांची समाधी आहे. बांधकामाची शैली जाधवराव घराण्याच्या इतर समाधीप्रमाणेच आहे. या समाधीचा शोध वीरगळ अभ्यासक अनिल दुधाने, इतिहास अभ्यासक दामोदर मगदूम-नाईक, अजय जाधवराव, राजनरेश जाधवराव, रमेश चंदनकर तसेच जामचे इतिहासप्रेमी संकेत बाबर यांच्या प्रयत्नाने लागला. जिजाऊंचे खापर पणतू छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री जिजाऊ यांचे धनाजी जाधवराव हे पणतू तर पतंगरावजी जाधवराव हे खापर पणतू होत. छत्रपती राजाराम महाराज यांनी धनाजी जाधवराव यांना ‘जयसिंगराव’ हा किताब बहाल केला.
By लोकमत न्यूज नेटवर्क on Fri, June 29, 2018 11:17pm सचिन काकडे । सातारा

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...