विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday 23 June 2020

शिवाजी महाराजांवर अगदी जवळून झालेले दोन प्राणघातक हल्ले.


शिवाजी महाराजांवर अगदी जवळून झालेले दोन प्राणघातक हल्ले.
शिवाजी महाराजांवर त्यांच्या आयुष्यात दोन प्रसंगी अगदी जवळून प्राणघातक हल्ले झालेले आहेत. पहिला हल्ला विजापूर सेनापती अफजझलखान प्रसंगी आणि दुसरा हल्ला सुरतेच्या स्वारीच्या वेळेस.
आता आपण ह्याचे मनोविज्ञानिक विश्लेषण पाहू.
विजापूरच्या अफझलखानाचा प्राणघातक हल्ला. ( हा जास्त महत्वाचा. कारण ह्यात अफझलखानाशिवाय आजून दोघांनी शिवाजी महाराजांवर प्राणघातक हल्ला केला.)
शिवाजी महाराज आणि अफझल खान ह्या दोघांनी 'भेटीस स-शस्र यावे' असा भेटीचा ठरावच होता. त्यामुळे शिवाजी महाराज आणि अफझलखान दोघेही आप-आपली शस्रे घेऊनच भेटीस आले.
ह्या भेटीत शिवाजी महाराजांवर पहिला हल्ला केला हा अफझलखानाने. लगेच दुसरा हल्ला कृष्णाजी भास्कर कुलकर्णी ह्याने केला आणि लगेच तिसरा हल्ला सय्यद बंडा ह्याने केला.
ऐतिहासिक पुराव्यांवरून असे वाटते कि अफझलखान प्रसंगी शिवाजी महाराजांस 'खान दगा करेल' ह्याची पूर्वकल्पना होती. पण खान दगा करीलच अशी १०० टक्के खात्री किंवा माहिती शिवाजीमहाराजांस नव्हती.
तरीही खानाविषयी शिवाजी महाराजांच्या मनात शंकाच होती.. ह्याला खानाचा पूर्वइतिहास कारण होता. बर खान दगा करील म्हणजे नेमकं काय करील? ह्याचेही खुप सारे विस्तृत अर्थ निघतात.
बडी बेगमेने अफझल खानास 'शिवाजीस जिवंत धरून किंवा नाहीच जमले तर जीवे मारून यश संपादावे' असे बजावून पाठविले होते.
ह्या वेळी खुद्द शहाजी महाराज हे विजापूरच्या दरबारात सेवेस असल्याने शहाजी महाराजांना दूर कर्नाटक प्रांती असतानाही आपल्या हेरांकरवी ह्या कटाची बातमी लगेच मिळाली असेल. ( शहाजी महाराजांच्या हेरांनी 'दग्याची' गुप्त बातमी शहाजी महाराजांस सांगितलीच असेल. हे नाकारताही येत नाही.) असो. कारण कुठलेही असो; पण शिवाजी महाराजांना 'खानाचे मन आपल्याविषयी काही साफ नाही' हे कळाले होते.
आता शिवाजीमहाराजांनी शंका घेण्याला काय कारण होते ते पाहू. सभासद बखरीत काय म्हणतात ते पहा: राजियांनी असा विचार केला कि अफझलखान यासी झुंज करावे. प्रतापगडास जावे. हा विचार केला. तेंव्हा सर्वांनी वारीले जे जुंज देऊ नये, सला करावा. त्यासी राजे बोलिले "जे सला केलियाने आगर भेट घेतलियाने संभाजीराजे ( शिवाजी महाराजांचे मोठे भाऊ) जैसे मारिले ऐसे आपणास मारतील; हे गोष्ट न घडे. मारिता मारिता जे होईल ते करू. सला करणे नाही." हा विचार करून राहिले.
ह्याचा अर्थच असा होतो कि शिवाजीमहाराजांस खानाचा काही भरवसा नव्हता. आणि खानाशी मारामारीच करावी हा बेत शिवाजी महाराजांनी त्यांच्या 'मनाशी' पक्का केला होता. फक्त 'जीवे मारण्याची' पहिली सुरवात कोणी करावी हाच प्रश्न होता.
पण इथे महाराज पूर्ण सावध होते.
इथं काही अत्यंत महत्वाच्या गमती आहेत.
शिवाजी महाराज हे प्रतापगडावरून चालत-चालत खानाजवळ भेटायला आले. आणि नेमकं ह्याच्या उलट खान हा आळश्यासारखा पालखीत बसून शिवाजीमहाराजांस भेटवावयास आला.
खान शामियानात बसून 'महाराजांस मारायचे' नियोजन करीत होता तर महाराज चालत-चालत 'खानास मारावयाचे' नियोजन करीत होते.
चालल्याने शरीरातील रक्ताभिसरण वाढते आणि मेंदूस जास्त ऑक्सिजनचा पुरवठा होऊन चालणाऱ्या व्यक्तीस जास्त हुशार आणि चपळ वाटते. ह्या उलट बसल्याने किंवा आराम फर्मावल्याने आळस वाढून बुद्दी मंद होते. खानाच्या बाबतीत नेमके हेच झाले. खान बुद्धीने कमी पडला. नाहीतर खानानेही शिवाजी महाराजांस मारण्याची पूर्ण तयारी केलीच होती.
समकालीन बखरकारांनी ह्याचे विस्तृत वर्णन केलेले आहे. बखरींची भाषा समजण्यास थोडी क्लिष्ट असल्याने बखरींबरोबरच आपण आपल्या भाषेत तीच विश्लेषण पाहू:
खासे राजियांनी बारीक जिरे मुंडी अंगात घातली. त्यावर कुडत बिलाखीची घातली. डोईस मंदिल बांधीला त्यात तोडा बांधिला. पायांत चोळणा काच्या घालून कासा कसली. हाती बिचवा एक वाघनख चढविले. आणि बराबर जीवबा महाला म्हणोन मोठा मरदाना होता त्याजवळ एक पट्टा (दांडपट्टा), व एक फिरंग (कर्नाटकी धोप तलवार), एक ढाल तसेच संभाजी कावजी महालदार याजवळ एक पट्टा, एक फिरंग, एक ढाल ऐसी दोघे माणसे बरोबरी घेतली.
प्रतापगडावरून चालत-चालत शिवाजी महाराज आता खानास भेटावयास निघाले.
महाराज आले म्हंटल्यावर खान हि उभा राहून सामोरा येऊन राजास भेटला. शामियान्यात आल्यावर दोघांच्या वकिलांनी रिवाजानुसार एकमेकांस दोघांच्या ओळखी करून दिल्या. आणि दोघांनीही आपली हातातील मोठी शस्रे आप-आपल्या वकिलांच्या हातात दिली. (दोघांनीही छोटी शस्रे स्वतःजवळच लपवूनच ठेवली. )
आलिंगन देण्यासाठी खानाने शिवाजी महाराजांना जवळ घेतले; आणि लगेच खानाने महाराजांची मुंडी डाव्या बगलेत कवटाळून उजव्या हाताने महाराजांच्या कुशीवर जमदाड ( कट्यारीसारखे शस्र ) चालविली.
महाराजांनी अंगात चिलखत (जिरेमुंडी) घातले असल्याने वार कारगर झाला नाही. जमदाड नुसतीच खरखरली. अंगास लागली नाही..
हे पाहून राजांनी तत्क्षणी डाव्या हाती वाघनख होते तो हात खानाच्या पोटास चालविला. खानाने अंगात नुसता झगाच घातला होता. वाघनखाचा मारा करिताच खानाचा कोथळाच बाहेर आला. उजव्या हातून बिचवा सपासप पोटावर चालविला. ह्याने खानाचे पोट फुटून सगळी आतडी बाहेर आली.
जसे खानाचे पोट फुटले तसे राजांनी मुंडी हासडून भेटीच्या चौथऱ्यावरून खाली उडी टाकून निघाले; पण तेव्हढ्यात खानाने गलबला केले कि 'मारिले मारिले' 'दगा दिधला' 'वेगीं धावा,' 'लव्हा लव्हा.'
हे पाहून खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी ह्याने खानाची आपल्या हातातील तलवार घेऊन राजांवर तलवारीचा वार केला. तो वार अडवून महाराज म्हणाले " ब्राम्हणास आम्ही मारणार नाही. शिवशंकर आम्हास हसेल. शहाजी महाराजांची आम्हास आन असे.. निघून जावे.." पण तरीही कृष्णाजी भास्कर कुलकर्णी महाराजांवर चालून आलाच. मग मात्र महाराजांनी त्याच्या ' ब्राम्हण्याचा' क्षणभरही विचार न करिता कृष्णाजीपंतास एकाच घावात ठार केले.
पण तेवढ्यात बाहेच्या लढाईच्या धामधुमीतून सय्यद बंडा पटाईत ( दांडपट्टा चालविणारा) शामियान्यात धावला. त्याने राजियाजवळ; पट्याचे वार राजियावरी चालविले. ( आता इथं महत्वाचे आहे.)
राजियाने जीवबा महालिया जवळील आपले हुद्दीयाचा ( स्वतःचा) पट्टा घेऊन व बिचवा ऐसे कातर (कात्री सारखे कोनात) करून सय्यद बंडियाचे चार वार वारिले. ( म्हणजे परतावून लाविले.)
पाचवे हाताने राजियास सय्यद बंडाने मारावे इतक्यात जीवबा महाला याने फिरंगीने ( सरळ पात्याची कर्नाटकी धोप तलवार ) खांद्यावरी वार सय्यद बंडियाशी केला. तो पट्याचा हात हत्यारासमवेत तोडीला. बंडा जीवे मारिला.
भोयांनी पालखी आणून खानास पालखीत घालून उचलून चालविला.
इतक्यांत संभाजी कावजी महालदार याने भोयांचे पाय मारून पालखी भुईस पाडून खानाचे डोसके कापून हाती घेऊन राजियाजवळ आला.
खानाचे शीर घेऊन राजे सीताब ( म्हणजे ताबडतोब ) गडावरी जिऊबा महाला व संभाजी कावजी महालदार ऐसे गेले.
ह्या पहिल्या हल्यात महाराजांनी, पहिला अफझल खान मारिला, दुसरा कृष्णाजी भास्कर मारिला आणि तिसरा सय्यद बंडा मारिला.
इथं महाराजांना विशेष सावधगिरी बाळगावी लागली . कारण बाकीचे दोन शिवाजीमहाराजांवर अचानक धावून आले.
आता दुसरा हल्ला सुरतेच्या स्वारीच्या वेळी झाला तो पाहू:
ह्या सुरतेच्या स्वारीच्या विषयी समकालीन लेखकांनी बरेच लिहून ठेवलेले आहे. आणि सगळ्यांचेच लिहिलेले हे 'कुतूहल' निर्माण करणारे आहे. आता सुरतेची स्वारी महाराजांनी का केली? ते आपण पाहू:
शिवाजीमहाराजांना दोन मोठ्या शाह्यांशी ( एक विजापूरची अदिलशाही आणि दुसरी दिल्लीची मुघल सल्तनत ) सतत तीन ते चार वर्ष लढून खूप मोठी आर्थिक हानी झालेली होती. अत्यंत निकडीने पहिली स्वराज्याची हि आर्थिक हानी भरून काढून स्वराज्य परत भक्कम उभे करणे क्रमप्राप्त होते.
शत्रू प्रदेशात खंडणी गोळा करूनच हि आर्थिक चणचण दूर होणार होती. त्यामुळे ह्याविषयी गुप्तपणे शोध सुरु झाला.
शिवाजी महाराजांच्या हेरखात्याचा प्रमुख बहिर्जी नाईक जाधव ह्याने सुरतेची हेरगिरी करून शिवाजी महाराजांस येऊन अत्यंत सखोल माहिती सांगितली."सुरत मारियेल्याने अगणीत द्रव्य हातास लागेल." असे त्याने महाराजांस सांगितले.
आणि सुरतेच्या छाप्याची गुप्त तयारी सुरु झाली.
राजियानी विचार केला कि, "लष्कर पाठविल्याने चाकरी-नफरी काम मनासारखे होणार नाही. जावे तरी आपण खासा लष्कर घेऊन जावे." ऐसा विचार केला. दहा हजार पागा (घोडदळ ) आणि दहा हजार शिलेदार घेऊन कोळवनांतून ( जव्हार कोळ्यांच्या इलाख्यातून) नीट सुरतेत पाच गावे - सात गावे, मजल करीत एकाएकी सुरतेत पावले.
५ जानेवारी १६६४ मंगळवार-
गणदेवीला कोणी एक मोठा सेनापती आल्याची खबर सुरतेचा सुभेदार इनायतखानाकडे गेली. 'आपण बादशाही सरदार असून अहमदाबादेकडे जात आहोत' असे त्याने सांगितले. घोडदळ आणि पायदळ मिळून त्याच्याकडे आठ ते दहा हजार सैन्य असावे. 'तो शिवाजी असावा' अशी हकीकत कानावर आली.
६ जानेवारी बुधवार-
सुरतेपासून शिवाजी साडेचार मैलावरील उधना गावी आल्याचे कळले. 'आपण बादशाही सरदार असून महाबतखानाचे बंड मोडण्यासाठी जात असून, वाटेत आपल्याला उशीर झाला..' अशी बतावणी तो करतो आहे. सुरतेचा सुभेदार इनायतखानाने एक हस्तक शिवाजी महाराजांकडे पाठवून "येथील लोक भीतीने पळून जाऊ लागले आहेत तरी तुम्ही जास्त जवळ न येणे म्हणून निरोप देऊन पाठविले". या निरोपाने चिडून शिवाजीमहाराजांनी त्या हस्तकालाच अटक केली.
डच व्यापाऱ्यांनी दोन हेर 'खरे काय ते' पाहण्यास पाठविले. पण त्यांना शिवाजी महाराजांच्या स्वारांनी पकडले. त्यांना कैद केले. पण ह्या दोघांनाही शिवाजी महाराजांनी संध्याकाळी सोडून दिले. ह्यातील एकाने राजापूरला असताना शिवाजी महाराजांना पाहिलेले होते. त्याने बरोबर ओळखले कि 'हे शिवाजी महाराजच' आहेत.
पण सुभेदार इनायतखान काही 'हे शिवाजी महाराज आहेत' ह्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हता.
महाराजांनी आपला एक वकील पाठवून सुरतेच्या सुभेदाराकडे खंडणीची मागणी केली. पण ती त्याने साफ धुडकावून लाविली. आता मराठ्यांची फौज सुरतेत घुसली. आता सुरतेत एकच पळापळ सुरु झाली. सुरतेच्या बाजापेठेत हाहाकार उडाला. डचांनी आणि इंग्रजांनी आपापल्या वखारी बंद करून घेतल्या. सुरतेची व्यापारी जस जमेल तसे आपले धन लपवू लागले.
मराठ्यांनी टोळ्या ( Group) करून हातात पेटत्या मशाली घेऊन एक एक घर, वाड्यांतील धन शोधून काढायला सुरवात केली.
सुरतेच्या वेशीबाहेर एका बागेत महाराजांनी शामियाना उभारला होता. पण ह्या शामियान्याला कणातीही नव्हत्या. केवळ चार भाले जमिनीत खोचून त्यावर चार कोनांत ऊन लागू नये म्हणून कापड अडकविलेले होते. ह्याच्या खालीच महाराज एका आसनावर (बहुतेक हि पेटी असावी) बसलेले होते.
महाराजांनी तिथं आपला मुक्काम केला; आणि इथेच महाराजांपुढे सुरतेच्या धनाची पोतीच्या पोती, सोन्याची पिंपे, थैल्या येऊन पडू लागल्या. महाराज ते धन पाहून काही ठेऊन घेऊन बाकीचे लगेच फौजेत वाटत होते. या तळावर खंडणी न दिलेले बरेच कैदी पकडून आणले होते.
ह्या स्वारीच्या वेळेस मराठ्यांच्या तावडीत एक इंग्रज सापडला. त्याच नाव अँथनी स्मिथ. ह्याला पकडून महाराजांकडे नेण्यात आले. मराठ्यांनी सरायांवरही धाडी घातल्या. इथे त्यांनी ऍबेसेनियाचा वकील पकडला.
सुरतेची जकातघर लुटले. अँथनी स्मिथला सांगून महाराजांनी इंग्रजांकडे ३ लाख खंडणी मागितली. पण इंग्रजांनी ती दिली नाही. संपूर्ण सुरत शहर; बंदरासहित मराठ्यांनी सगळे धन जमा केले . बंदरावरील जहाजात महाराजांना ३० पिंपे सोन सापडलं. बहर्जी बोहराजवळ ८० लाख संपत्ती सापडली. त्यात २८ शेर तर मोतीच होते.
७ जानेवारी गुरुवार-
महाराजांच्या तळावर खूप गर्दी होती. खुप लोक कैद केले होते. ज्यांनी खंडणी दिली नाही त्यांना वेगवेगळ्या शिक्षा तिथंच लगेच देण्यात येत होत्या. मराठावीर खंडणी आणीतच होते. थैल्या भर-भरून धन महाराजांसमोर पडत होते.
आजच्या दिवशी मात्र आता सुरतेचा सुभेदार इनायत खानाने आपला वकील शिवाजी महाराजांकडे पाठविला. हा वकील शिवाजी महाराजांच्या तळावर आला. त्याला पकडले गेले. त्याने आपण "इनायत खानाचे वकील असून महाराजांना खानाचा निरोप द्यायला आलोय" असे सांगितले. म्हणून ह्या वकिलाला महाराजांसमोर नेण्यात आले.
महाराजांसमोर उभे राहून "इनायतखान ह्याने नवीन अटी सांगून पाठविले आहे" असे हा वकील शिवाजी महाराजांना म्हणाला. आणि हे सांगत असताना अचानक एकदम त्याने महाराजांवर झडप खालून महाराजांवर लपून आणलेली कट्यार चालविली.
कट्यार महाराजांच्या काळजाचा वेध घेणार.... इतक्यात विजेच्या वेगाने महाराजांजवळ उभ्या असलेल्या एका शूर मराठ्याने आपल्या तलवारीचा खाडकन घाव त्या वकिलाच्या हातावर घालून तो कट्यारीचा हात वरचे वरच छाटून उडविला. वेगाने महाराजांच्या अंगावर आलेला तो वकील झोकांडून महाराजांच्या अंगावरच पडला.
वकिलाच्या वेगाने अंगावर पडण्याने महाराज ही कलंडून बाजूस खाली पडले. त्या वकिलाच्या तोडलेल्या हाताचे सगळे रक्त महाराजांच्या अंगावर उडून महाराज रक्तचिंब लालेलाल झाले...
मुंडक कापून वकिलाच्या चिरफाळ्या उडविल्या. रक्ताच्या तप्त चिळकांड्या उडाल्या. एकाच क्षणात शामियान्यात भयंकर गडबड उडाली.. मराठ्यांचा भयंकर क्रोध उसळला.
तेथे कैद करून आणलेल्या कैद्यांची आता मराठ्यांनी मुंडकीच उडवायला सुरवात केली. अनेकांचे हातच तोडण्यात आले. एकच गोंधळ आणि आर्त ओरडणे सुरु झाले..
महाराजांनी सावध होऊन स्वतःला सावरून 'मी ठीक आहे' असे सर्वांस सांगितले.
ह्या अँथनी स्मिथचेही डोके मारण्यात येणार; पण तेवढ्यात महाराजांनी त्याला मारू नये म्हणून सांगितले; आणि ह्या अँथनी स्मिथचा जीव वाचला. (ह्या अँथनी स्मिथने स्वतःच्या डोळ्यासमोर पाहिलेले हे सगळे लिहून ठेवलेले आहे. )
मात्र ह्या नंतर मराठ्यांनी सगळ्या सुरत शहरालाच "मराठ्यांचा मार काय असतो" ते दाखवून दिले. मराठ्यांच्या क्रोधाग्नीने सगळे सुरत शहर आता आगीच्या भक्षस्थानी पडले.
सुरतेच्या ह्या स्वारीत तीन हजार घरांना आगी लावण्यात आल्या. २६ हात तोडले आणि काही मुंडकी उडविली.
पुढे कित्येक दिवस "मराठे सुरतेवर चालून येत आहेत " अश्या हुली उठून लोकांची धावपळ - पळापळ - पडापडा, होत होती.
अंदाजानुसार ३ करोड संपत्ती महाराजांनी सुरतेतून खंडणी रूपात मिळाली . (ह्याचे वेग वेगळे आकडे आहेत. )
ह्या स्वारीच्या वेळी औरंगजेब हा लाहोरला होता. तिथं त्याला ह्या स्वारीची बातमी कळली. शिवाजी महाराजांनी सुरतेत खंडणी गोळा केली हे कळून काय अवस्था झाली असेल बरे त्या औरंगजेबाची???
महाराज कायम म्हणायचे "सदैव चित्ती सावध असावे."
महाराजांच्या हयाच 'सदैव चित्ती सावधते' मुळे महाराज वरील दोनही प्राणघातक हल्यांपासून' निभावून गेले...
लेख समाप्त. (टीप: हा लेख लिहिताना कमी शब्दात लिहिण्यासाठी स्वतःवर खूपच आवर घालावा लागला. जितकं थोडक्यात लिहिता येईल तितकं लिहिलं.; त्याबाद्दल खेद व्यक्त करतो. )
साभार सतीश शिवाजीराव कदम

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...