विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 16 July 2020

जेष्ठ इतिहास संशोधक, इतिहासकार, इतिहासाचे भीष्माचार्य वासुदेव सीताराम बेंद्रे

जेष्ठ इतिहास संशोधक, इतिहासकार, इतिहासाचे भीष्माचार्य वासुदेव सीताराम बेंद्रे

इतिहासकार वा.सी.बेंद्रे यांचा जन्म १३ फेब्रुवारी १८९४ रोजी झाला, मॅट्रिकचे शिक्षण घेतल्यानंतर बेंद्रे यांनी टंकलेखन आणि लघुलेखनाचे प्रशिक्षण घेतले आणि त्यानंतर ते खाजगी नोकरी करू लागले. १९१८ साली वा सी बेंद्रे हे भारत इतिहास संशोधक मंडळात काम करू लागले. साधन संग्राहक, साधन संपादक, साधन चिकित्सक, संशोधक व इतिहासकार या विविध भूमिका यशस्वीरीत्या समर्थपणे पार पाडल्या. १९२८ साली वा सी बेंद्रे यांचा शिवशाहीच्या इतिहासाचा प्रास्ताविक खंड साधन चिकित्सा हा पहिला ग्रंथ प्रकाशित झाला, हा ग्रंथ आजही इतिहास अभ्यासक आणि संशोधकांना अतिशय मोलाचा असा मार्गदर्शन करत आहे.

वा सी बेंद्रे यांनी आपल्या आयुष्याची तब्बल ४० वर्षे अत्यंत कष्ट करून छत्रपती संभाजी महाराज यांचा सत्य इतिहास लोकांसमोर आणला, यासाठी बेंद्रे यांनी अनेक परदेशवाऱ्या केल्या तसेच हजारो कागदपत्रे आणि साधने त्यांनी एकत्रित केली. छत्रपती संभाजी महाराजांची बदफैली, व्यसनाधिन, क्रूर अशी प्रतिमा खोडून काढत बेंद्रे यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा पराक्रम, विविध धोरणे, राजकीय मुस्तद्दीपणा समोर आणला, बेंद्रे यांचा छत्रपती संभाजी महाराज हा ग्रंथ १९६० साली प्रकाशित झाला. आपल्या संशोधनाच्या सहाय्याने बेंद्रे यांनी वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांचे वृंदावन देखील शोधून काढले..

१९६३ मध्ये मुंबई-मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या इतिहास संशोधन मंडळाचे डायरेक्टर म्हणून बेंद्रे यांची नियुक्ती झाली. छत्रपती शिवाजी महाराजांचे एक महत्वपूर्ण असे अस्सल चित्र शोधून काढण्याचे श्रेय देखील वा.सी. बेंद्रे यांचेच, १९७२ साली बेंद्रे लिखित शिवचरित्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पूर्वार्ध आणि उत्तरार्ध हे दोन खंड प्रकाशित झाले. छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यतिरिक्त वा सी बेंद्रे यांनी अनेक विषयांवर संशोधन केले, बेंद्रे यांनी मालोजीराजे भोसले व शहाजीराजे भोसले, शिवाजी महाराजांचे थोरले बंधू जेष्ठ संभाजी महाराज, संत तुकाराम महाराज यांच्यावर देखील इतिहासलेखन केले. वयाच्या ८० व्या वर्षी वा सी बेंद्रे यांनी छत्रपती राजाराम महाराज यांचे चरित्र लिहून पूर्ण केले. वा. सी. बेंद्रे यांनी अनेक ऐतिहासिक कागदपत्रांची विषयवार विभागणी केली तसेच संकलन देखील केलेले आहे..

इतिहास संशोधनासाठी अखंड परिश्रम घेत तहयात खर्ची घालणाऱ्या या इतिहासाच्या भीष्माचार्याचे इतिहास अभ्यासक आणि संशोधकांवर अमूल्य असे अनंत उपकार आहेत, वा. सी. बेंद्रे यांचे हे उपकार इतिहासप्रेमी कधीही विसरणार नाहीत..

- राज जाधव

No comments:

Post a Comment

राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला 🚩 भाग 9

  राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला भाग 9 लखुजीराजे जाधवरावांची हत्या भातवडीच्या युद्धानंतर मलिक ...