विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 24 July 2020

मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात चित्तथरारक प्रवास


मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात चित्तथरारक प्रवास

( लेख अत्यंत रम्य लिहिलेला आहे. आनंद घ्यावा. )
छत्रपती शिवाजी महाराज हे औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन आग्र्यावरून निसटले होते.
हा इतिहास सर्वांना माहित आहे.
पण असाच प्रसंग छत्रपती शिवाजी महाराजांचे धाकटे चिरंजीव छत्रपती राजाराम महाराजांच्यावरही आला होता.
छत्रपती राजाराम महाराज ह्यांनीही औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन रायगडावरून जिंजीला प्रयाण केले होते.
सगळ्यात महत्वाचे: आता इथं दोन मुख्य फरक आहेत.
पहिला फरक म्हणजे
आग्र्यावरून सुटताना छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठी गुप्तता पाळल्यामुळे औरंगजेबाला महाराजांच्या पलायनाचा पत्ता लागायला मोठा उशीर झाला होता.
बर छत्रपती शिवाजी महाराज नेमके कुठे पसार झाले हेच औरंगजेबाला कळेना. म्हणजे महाराज आग्र्यातच लपून राहिले कि, राजस्थानात गेले, कि दिल्लीला गेले कि काशीला गेले कि दक्षिणेत गेले.. काहीही कळायला औरंगजेबाला मार्ग नव्हता.
दुसरा फरक म्हणजे
राजाराम छत्रपतींच्या बाबतीत नेमके उलटे झाले होते.
ह्यावेळी रायगडाला औरंगजेबाच्या मुघली फौजेचा वेढा पडलेला होता.
राजाराम छत्रपती रायगडावरून खाली दक्षिण भारतातील जिंजीकडे पलायन करणार आहेत हे औरंगजेबाला चार महिने अगोदरच माहित होते. त्यामुळे औरंगजेब हा राजाराम छ्त्रपतींना पकडायच्या पूर्ण तयारीतच होता.
**
फेसबुकवरील महाराष्ट्र धर्म समुहाचे इतिहास अभ्यासक सतीश शिवाजीराव कदम ह्यांच्या अभ्यासानुसार;
छत्रपती शिवाजी महाराजांना दोन मुले होती. थोरले संभाजी छत्रपती आणि धाकटे राजाराम छत्रपती.
छत्रपती संभाजी महाराजांची क्रूर हत्या करून औरंगजेब आता छत्रपती संभाजी महाराजांचे धाकटे भाऊ असलेल्या राजाराम छत्रपतींच्या मागे हात धुवून लागला होता.
२५ मार्च १६८९ रोजी औरंगजेबाचा सरदार इतिकदखानाने रायगडाला वेढा घातला.
तारीख ५ एप्रिल १६८९.
रायगडाला मुघलांचा वेढा पडून अकरा दिवस झाले होते. वेढ्याची सुरवातच असल्यामुळे मुघलांचा वेढा ढिला होता.
रायगडाचा विस्तार आणि रचनाच अशी आहे कि संपूर्ण गडाला वेढा घालणे केंव्हाही अश्यक्यच होते. पावसाळ्यात तर रायगडाच्या खोऱ्यात पाऊस आणि वाऱ्याचे असे थैमान असे कि हत्तीसुद्धा उभा राहू शकत नाही तिथे माणसाची काय तऱ्हा.
त्यामुळे ह्याच मुघलांच्या गाफील वेढ्याचा फायदा घेऊन राजाराम छत्रपती (वय वर्ष १९) रायगडाच्या वेढ्यातून निवडक साथीदारांसह गुपचूपणे बाहेर पडले.
राजाराम छत्रपतींच्याबरोबर या वेळी त्यांच्या दोन पत्नी ताराबाईसाहेब आणि राजसबाईसाहेब होत्या.
(काही अभ्यासकांच्या मते ताराबाईसाहेब आणि राजसबाईसाहेब ह्या मुघलांचा वेढा पडण्याअगोदरच रायगडावरून पन्हाळगडावर निघून गेल्या होत्या.)
राजाराम छत्रपतींच्या बरोबर रामचंद्र नीलकंठ, शंकरजी मल्हार, धनाजी जाधव, संताजी घोरपडे, खंडेराव दाभाडे, बाजी कदम, खंडोजी कदम, मानसिंग मोरे असे सरदार आणी निळो मोरेश्वर, बहिरो मोरेश्वर, कृष्णाजी अनंत, प्रल्हाद निराजी, खंडो बल्लाळ असे मुत्सद्दी रायगडावरून निघाले.
रायगडावरून सुटून राजाराम महाराज प्रथम प्रतापगडास पोहचले. तेथे त्यांचा मुक्काम जून महिन्यापर्यंत होता. पण प्रतापगडालाही वेढा घालायला मुघलांचा सरदार इतिकदखानाने फतेहजंगाला रवाना केले.
मुघलांचे सैन्य प्रतापगडाच्या पायथ्याला आले तेंव्हा प्रतापगडावरून राजाराम महाराज परळीच्या मार्गाने पन्हाळगडावर गेले.
पन्हाळगडालाही मुघलांचा सरदार शेख निजाम आणि रुहुल्लाखान वेढा घालायला आले. मुघलांच्या फौजेचा पन्हाळगडाला वेढा पडला.
परिस्थिती दिवसें-दिवस कठीण होऊ लागली. जानेवारीपासून ऑगस्ट पर्यंत मराठ्यांचे बहुतेक किल्ले मुगलांच्या हाती पडले होते.
त्रिंबक, माहुली, मलंगगड, प्रबळगड, माणिकगड, दुगड, कल्याण आणी घाटमाथ्यावर सिंहगड, राजगड, तोरणा, प्रतापगड, रोहिडा, साल्हेर इत्यादी प्रमुख किल्ले मराठयांच्या ताब्यातून गेलेले होते.
घाटावर सुपे, बारामती, म्हसवड, खटाव, पाचगाव, कोल्हापूर, मसूर, शिरूर, चाकण, शिरवळ, वाई, पुणे कऱ्हाड इत्यादी ठिकाणी मुघलांची लष्करी ठाणी वसली होती.
पन्हाळ्याच्या भागात रुहुदुल्लाहखानचे सैन्य, राजगडच्या भागात फिरोजजंगाचे सैन्य, चाकण भागात शहजादा आझमचे सैन्य असे महाराष्ट्रात सगळीकडेच मुघलांचे सैन्य पसरलेले होते.
खुद्द औरंगजेब कोरेगाव तुळापूरला ठाण मांडून बसला होता.
नवरात्र संपल्यावर विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर म्हणजे २६ सप्टेंबर १६८९ रोजी राजाराम महाराजांनी पन्हाळगड सोडला आणी मुघलांना चकवा देऊन दूर दक्षिण भारतात ८८२ किलोमीटर अंतरावर असलेल्या जिंजीच्या किल्याकडे प्रयाण केले. जिंजी हा किल्ला तामिळनाडू राज्यात आहे.
पन्हाळगडावरून कर्नाटकाकडे जाण्याचा बेत राजाराम महाराजांनी अगदीच गुप्त ठेवला होता. परंतु तरीही औरंगजेबाला ह्या बेताची खबर अगोदरच लागलीच होती.
पन्हाळगडावरून राजाराम महाराज कर्नाटकाकडे निघण्यापूर्वीच चौघडे वाजवावेत त्याप्रमाणे राजाराम महाराजांचा हा गुप्त बेत जगजाहीर झाला होता हे विशेष आहे.
हि औरंगजेबाच्या हेरांची चतुराई होती असे म्हणण्यापेक्षा स्वराज्यातील अल्पसंतुष्ट फितुरांचीच करामत होती असे म्हंटले तर जास्त संयुक्तिक होईल.
पन्हाळगड सोडून राजाराम छत्रपती कर्नाटकाकडे रवाना झाल्याची बातमी जेंव्हा औरंगजेबाला समजली तेंव्हा औरंगजेबाने अत्यंत तातडीने विजापूरचा मुघल सुभेदार अब्दुल्लाखान ह्यास राजाराम महाराजांचा पाठलाग करून कैद करण्याची आज्ञा केली.
उपलब्ध माहितीनुसार ह्या वेळी राजाराम महाराजांच्या बरोबर फक्त तीनशे घोडेस्वार होते.
हा अब्दुल्लाखान विजापूर प्रांतातील दोन किल्ले जिंकण्याच्या कामात गुंतलेला होता. पण औरंगजेबाचा आदेश मिळताच हे काम थांबवून अब्दुल्लाखान तातडीने राजाराम छत्रपतींच्या पाठलागावर लागला.
राजाराम छत्रपती जसे बिदनूरच्या राणीच्या मुलखात शिरले तसे अब्दुल्लाखानाने त्याचा मोठा मुलगा हसनअली ह्यास बिदनूरच्या दिशेने पाठविले आणि तो स्वतःही पाठोपाठ दौडत निघाला.
तीन दिवस आणि तीन रात्र अब्दुल्लाखाने न थांबता दौड केली आणि सुभानगड आणि जिरा ह्या किल्यांच्या जवळ बिदनूरच्या हद्दीत तुंगभद्रा नदीच्या काठावर त्याने राजाराम महाराजांना गाठले.
नदीच्या पात्रात एक बेट होते. त्या बेटावर राजाराम महाराज आपल्या सहकाऱ्यांसह थांबलेले होते.
रात्रीच्या अंधारातच अब्दुल्लाखानाने बेटावर हल्ला केला. अंधारातच घनघोर लढाई लागली. मराठ्यांनी मुघलांना थोपवून धरले आणी अंधाराचा फायदा घेऊन राजाराम महाराज पुन्हा निसटले.
ह्या झटापटीत अब्दुल्लाखानाने मराठ्यांची शंभर माणसे कैद केली आणि त्यांना विजापूरच्या किल्ले 'अर्क' मध्ये कैदेत टाकले. पण तरीही ह्या कैदेतून बहिर्जी घोरपडे आणि इतर वीस मराठा मंडळी पळून जाण्यात यशस्वी झाली. हि वीस मराठा मंडळी पुन्हा पुढे जाऊन राजाराम छत्रपतींना सामील झाली.
**
फेसबुकवरील महाराष्ट्र धर्म समुहाचे इतिहास अभ्यासक सतीश शिवाजीराव कदम ह्यांच्या अभ्यासानुसार;
इथं आपण परत थोडस मागे येऊ.
छत्रपती संभाजी महाराजांच्या काळापासूनच पदरी असलेला केशवभट पुरोहित संगमेश्वरकर हा पन्हाळगडापासून राजाराम महाराजांच्या बरोबर ह्या प्रवासात होता. त्याने राजाराम महाराजांच्या ह्या प्रवासाचा वृत्तान्त आपल्या 'राजाराम चरितम' ह्या ग्रंथात दिला आहे.
हा केशवभट पुरोहित संगमेश्वरकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदरी राहून रामायण महाभारत ग्रंथांचे पुराण सांगत असे.
पुढे छत्रपती संभाजी महाराजांनी आणि राजाराम छत्रपतींनी केशवभट पुरोहित संगमेश्वरकरास दानाध्यक्षाचे कामही सांगितले होते. ४-११-१६९० रोजी केशव पुरोहिताने 'राजारामचरितम' हा ग्रंथ पुरा केला असे तो लिहितो.
त्याच्या म्हणण्याप्रमाणे राजाराम महाराजांनी नवरात्र पन्हाळगडावर साजरे केले आणि विजयादशमीनंतर मुघलांनी पन्हाळगडाला वेढा घातलेला पाहून दूर कर्नाटकाकडे असलेल्या जिंजीला निवडक साथीदारांसहित प्रयाण केले.
राजाराम महाराजांच्या बरोबर मानसिंग मोरे, बाजी कदम, खंडोजी कदम इत्यादी सरदार आणी निळो मोरेश्वर, बहिरो मोरेश्वर, कृष्णाजी अनंत, खंडो बल्लाळ असे मुत्सद्दी होते.
ते घोड्यावर बसून प्रवास करत होते. प्रवासाच्या दुसऱ्या दिवशी ते कृष्णा नदीच्या तीरावर आले. तेथे सर्वांनी स्नाने केली आणि पुढील प्रवास चालू केला.
..पण तितक्यात राजाराम छत्रपतींचा सुगावा लागून मुघलांनी त्यांचा पाठलाग सुरु केला आणि वर्धा नदीच्या काठावर राजाराम महाराजांना गाठले. ह्या वेळी बहिर्जी घोरपडे आणि त्यांचा भाऊ मालोजी घोरपडे यांनी मुघलांशी निकराचे युद्ध केले.
पण ते थकले. त्यांचे घोडेही थकले. मराठे थोडे होते. साधारण ३०० घोडेस्वार. आणि मुघलांची फौज प्रचंड होती. त्यामुळे राजाराम महाराजांना मोठी चिंता निर्माण झाली.
तेंव्हा त्या प्रदेशात छत्रपती शिवाजी महाराजांपासून असलेले मराठ्यांचे सरदार रुपसिंग भोसले आणि संताजी जगताप हे राजाराम महाराजांच्या मदतीला धावून आले.
संताजी जगताप यांना राजाराम महाराजांनी मुघलांच्या फौजेच्या तोंडावर ठेवले आणि रुपसिंग भोसल्यांना बरोबर घेऊन राजाराम महाराज वेगवेगळी गावे, गवळीवाडे, गडकोट, आणि नद्यांची मोठं-मोठाली खोरी झपाट्याने पार करत पुढे निघाले.
पण मुघलांच्या फौजांनी तुंगभद्रेच्या तीरावर राजाराम महाराजांना पुन्हा गाठले. "आपण सगळेच इथे थांबलो तर पकडले जाऊ.." असे म्हणून रुपसिंग भोसले ह्यांनी काही निवडक घोडेस्वार स्वतःजवळ ठेऊन बाकीचे घोडेस्वार राजाराम छत्रपतींच्या बरोबर देऊन त्यांस पुढे जाण्यास सांगितले.
स्वतः रुपसिंग भोसले निवडक घोडेस्वारांसहित मुघलांशी युद्ध करण्यास उभे राहिले. दोन्ही हातात दोन धोप तलवारी घेऊन घोड्यावर स्वार होऊन रुपसिंग भोसले मुघलांच्या प्रचंड फौजेशी घनघोर लढाई करू लागले. शत्रू जबरदस्त अंगावर आला. चहू बाजुंनी मुघलांच्या फौजांचा गराडा पडला. ह्या अटीतटीच्या वेळी खुद्द राजाराम छत्रपती मुघलांच्या फौजेत सापडले. क्षणार्धात ह्या धामधुमीत आता बहिर्जी घोरपडे ह्यांनी राजाराम महाराजांना आपल्या खांद्यावर घेऊन शत्रूचा वेढा फोडून शत्रूच्या गर्दीतून राजाराम महाराजांना सहीसलामत सुखरूप बाहेर काढले.
तुंगभद्रा नदीच्या तीरावर ह्या स्वामीभक्त बहिर्जी घोरपड्यांनी दाईचे, मित्राचे, सेवकाचे, नातेवाईकाचे असे सर्व प्रकारचे काम करून राजाराम महाराजांचे श्रम हरण केले आणि प्रवास करत करत राजाराम महाराजांना मराठ्यांच्या ताब्यात असलेल्या 'अंबूर ' (Ambur Pin Code-635802 Tamil Nadu ) नावाच्या गावी नेऊन पोहचविले.
तेथील मराठ्यांचा अंमलदार मोठा महाशूर होता. त्यांचे नाव बाजीराव काकडे. बाजीराव काकडे ह्यांनी राजाराम महाराजांची सर्व व्यवस्था केली आणि अंबूर येथून ५१ किलोमीटर अंतरावर असलेल्या वेल्लूर (Vellore, district of Tamil Nadu) येथे राजाराम महाराजांना सुखरूप पोहचते केले.
वेल्लोर वरून राजाराम छत्रपतींनी आता आपला जिंजीचा प्रवास सुरु केला. वेल्लोर वरून जिंजी किल्ला ९३ किलोमीटर अंतरावर आहे.
हा शेवटचा टप्पा होता. पण हा टप्पा सगळ्यात जास्त धोक्याचा होता.
हा सगळा मुघलांच्या ताब्यातील प्रदेश होता.
जिकडे तिकडे मुघलांच्या फौजा राजाराम छत्रपतींचा दिवसरात्र शोध घेत फिरत होत्या. राजाराम महाराजांच्या बरोबर असलेल्या संताजी घोरपडे, धनाजी जाधव, मानसिंग मोरे, खंडेराव दाभाडे, शिवाजी दाभाडे, बाजी कदम, खंडोजी कदम आणि इतर सरदारांनी ह्याशिवाय रामचंद्र नीलकंठ, निळो मोरेश्वर, प्रल्हाद निराजी, खंडो बल्लाळ अश्या मुत्सद्यांनी वेळोवेळी वेगवेगळी वेषांतरे करत अत्यंत वेगाने आणी गुप्तपणे राजाराम छत्रपतींना सुरक्षितपणे शेवटी जिंजीच्या किल्यात सुखरूप पोहचविले.
२ नोव्हेंबर १६८९ रोजी राजाराम महाराज छत्रपती जिंजीच्या किल्यात पोहचले.
प्रवासाच्या अखेरच्या टप्प्यात राजाराम महाराजांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यात्रेकरूंचे वेष धारण केलेले होते.
तुंगभद्रा नदीच्या काठावर ताटा-तूट झाल्यामुळे मागे राहिलेले राजाराम महाराजांचे इतर निष्ठावंत सरदार आणी मुत्सद्दी कोणी बैराग्याचे, कोणी व्यापाऱ्याचे वेष घेऊन राजाराम महाराजांच्या मागोमाग जिंजीस येऊन पोहचले.
वाटेत राजाराम महाराजांचे हाल होऊ नये म्हणून बरोबरीच्या मंडळींनी प्रचंड हाल सहन केले. रायगडापासून सुरु झालेला आठशे मैलांचा म्हणजे ११२५ किलोमीटरचा हा प्रवास ह्या मंडळींनी कधी पायी, चालत-पळत तर कधी घोड्यावरून केला. मुघलांच्या फौजांनी ओळखू नये म्हणून वेळ प्रसंगी वेषांतर केले.
"अरक्षितं तिष्ठति दैव रक्षितम" ह्याचा अर्थ 'ज्याचे रक्षण करायला कोणी नसते त्याचे रक्षण देव करतो'.
पण दैवाच्या भरवश्यावर न राहता आपल्या महा-पराक्रमाने राजाराम छत्रपतींच्या बरोबरीच्या साथीदारांनी राजाराम छत्रपतींना सुखरूपपणे जिंजीस नेले.
**
'राजाराम चरितम' काव्याचा लेखक केशवभट पुरोहित संगमेश्वरकर ह्याने लिहिलेला एक संस्कृत श्लोकांचा पुरावा आपल्याकडे उपलब्ध आहे.
ह्या संस्कृत श्लोकात राजाराम छत्रपतींच्या बरोबर गेलेल्या विश्वासू मंडळींची नावे आहेत. हि नावे मी बोल्ड केलेली आहेत. त्यांना आकडेही दिलेले आहेत.
छत्रपती राजाराम महाराजांच्या बरोबर कोण कोण होती हि विश्वासू मंडळी?
अग्रे सेनापती: पाश्चान्मानसिंघो (1) रिमर्दन
सत्यप्रतिज्ञ: प्रल्हाद (2) नृपसेवा विशारद I
तद्वस्तकोनंतसुत: कृष्णशर्मा (3) महामती I
तथा प्रधान: सुमतिर्निलकंठश्च सानुज: I
कृष्णात्मजो नीलकंठ: (4) महिपालहिते रत: I
खंडोबल्लाळमुख्यासच कायस्थासिश्चचित्रगुप्तजा (5) I
बाजी कदमनाथ (6) खंडोजी कदमस्तथा (7) I
एते चान्ये च त भूपमजगमु पुरंदर I
सर्वे तुरंगमारुढा: प्रलपंत परस्पर: I
तत्: श्री रामसेवाये भैरजिक: (8) समादगमत I
युतो मल्लीजीता भ्रात्रा वरघोरपडांन्व्य (9) I
भवशालो रुपसिंह (10) स्व सैन्येंन समन्वित I
जगतस्थापक (11) संताजी (12) ध्रीरो वीरबलाधिक I
केचित्कार्पटीका वेषा दिनवेष धरा: परे I
मुनिवेशधरास्चान्ये वैष्यवेष धरास्तथा I
म्लेंच्छकासीमसेनाया स्वसीमामत्यजनृप I
अंबूर नगरस्याय देवालय मृपाययो I
नारायणसुते श्रीमंछकरे लोकशंकरे (13) I
राज्येकदेश निदधे कारि दुर्गसमाश्रय I
रामचंद्रे (14) तू सकल राज्य विन्यस्य गुढधी I
तस्य हस्ते धनाजीक (15) संताजिक शंकर I
अश्वसेनाधिपान्सर्वान तथा पत्ती गणाधिपात II
ह्या संस्कृत काव्यात 15 लोकांची नावे आहेत. ती अशी.
(1) मानसिंग मोरे
(2) प्रल्हाद निराजी
(3) कृष्णाजी अनंत
(4) नीलकंठ कृष्ण
(5) चित्रे
(6) बाजी कदम
(7) खंडोजी कदम
(8) बहिर्जी घोरपडे
(9) मालोजी घोरपडे
(10) रुपसिंह भोसले
(11) संताजी जगताप
(12) संताजी घोरपडे
(13) शंकराजी नारायण
(14) रामचंद्रपंत अमात्य
(15) धनाजी जाधव
आता ह्या संस्कृत श्लोकातील नावांचा आणी उपलब्ध यादीतील काही नावांचा मेळ जरी बसत नसला तरीही लेखात जेव्हढी म्हणून नावे आहेत ती सर्व मंडळी राजाराम छत्रपतींना अत्यंत सुरक्षितपणे जिंजीस घेऊन गेली.
एकाच श्लोकात सगळीच नावे आली पाहिजेत असे काही नाही.
२६ सप्टेंबर १६८९ रोजी राजाराम महाराजांनी पन्हाळगड किल्ला सोडला होता. आणी २ नोव्हेंबर १६८९ रोजी राजाराम महाराज जिंजीस पोहचले.
पन्हाळगड ते जिंजीचा किल्ला हे अंतर ८८२ किलोमीटर आहे. म्हणजे राजाराम महाराजांना आणी त्यांच्या सहकाऱ्यांना जायला ३७ दिवस लागले.
मराठ्यांच्या इतिहासात जे काही प्रसंग आहेत त्यात राजाराम महाराजांच्या ह्या जिंजीच्या प्रवासाची घटना हि अत्यंत रोमांचित करणारी आहे.
अत्यंत महत्वाचे:
  • रायगडावरून जिंजीस प्रवास करताना राजाराम महाराज सुकुमार होते. प्रवासाचे कष्ट महाराजांनी ह्या अगोदर कधी सोसलेले नव्हते.
  • राजाराम महाराज कर्नाटकात जाणार हि वार्ता औरंगजेबास चार महिने अगोदरच समजलेली होती. त्यामुळे वाटेत जिकडे-तिकडे मुगलांच्या फौजा महाराजांना पकडण्यासाठी आडव्या येऊन लढाया करत होत्या.
  • गुप्तपणे शत्रूस सुगावा न लागता जिंजीस जाता यावे म्हणून राजाराम छत्रपतींना अगदीच निवडक लोक बरोबर घेऊन जावे लागले होते.
  • साधारण तीनशेच्या आसपास घोडेस्वार राजाराम महाराजांच्या बरोबर होते. त्यातही मधे-मधे मुघलांबरोबर लढायला लागल्यामुळे शेवटी शेवटी तर अगदीच बोटावर मोजता येतील इतकेच लोक जवळ शिल्लक राहिले होते.
मोठा रोमांचित करणारा आणी अभिमानाने छाती तट-तटून फुगावी असा हा प्रवास आहे. ह्या प्रवास प्रसंगी वरील ज्या मंडळींनी धैर्य आणी शौर्य दाखविले त्यांचे मोल हा मराठ्यांचा इतिहास कधीही विसरणार नाही.
फेसबुकवरील महाराष्ट्र धर्म समुहाचे इतिहास अभ्यासक सतीश शिवाजीराव कदम ह्यांच्या अभ्यासानुसार;
राजाराम महाराजांना जीवाला जीव देणारे सहकारी भेटले.
वर्धा नदीच्या तीरावर बहिर्जी घोरपडे ह्यांनी तळहातावर शीर घेऊन मुघलांशी संग्राम केला.
खंडेराव दाभाड्यांचे धाकटे भाऊ शिवाजी ह्यांनी राजाराम छत्रपतींना पाठीवर घेऊन दौड मारली असता त्यांची छाती फुटून आणी रक्ताच्या गुळण्या होऊन ते स्वामीकार्यार्थ मृत्युमुखी पडले.
संताजी जगताप यांनी मुघलांना अडवून धरले आणी राजाराम महाराजांना निसटण्यास वाव मिळाला.
तुंगभद्रेच्या तीरावर रुपसिंग भोसल्यांनी प्राणांतिक लढाई करून मुघलांच्या फौजा अडवून धरल्या.
बहिर्जी घोरपडे ह्यांनी खांद्यावर घेऊन राजाराम महाराजांना शत्रूच्या फौजेच्या गराड्यातून बाहेर काढले.
धनाजी जाधव आणी संताजी घोरपडे ह्यांनी महा-पराक्रम करून पाठलागावरील मुघलांच्या फौजांचे वार अंगावर झेलले.
बाजी कदम आणी खंडोजी कदम ह्यांनी प्राणांतिक जीवाची बाजी लावून राजाराम छत्रपतींच्या अंगावर ओरखडा सुद्धा उठणार नाही ह्याची काळजी घेतली.
बाजीराव काकडे ह्यांनी राजाराम छत्रपतींना ऐनवेळी मोठी मदत करून सुखरूपपणे वेल्लोरला पोहचते केले.
रामचंद्र नीलकंठ, खंडो बल्लाळ, निळो मोरेश्वर, प्रल्हाद निराजीने राजाराम छत्रपतींचा दिवसरात्र सांभाळ केला.
केवळ निष्ठावंत होते म्हणून राजाराम महाराजांचा निभाव लागला.
राजाराम छत्रपतींना वाचविण्यासाठी तुंगभद्रा नदीच्या काठावर, वर्धा नदीच्या किनाऱ्यावर पावलोपावली मुघलांशी लढताना असंख्य मराठा शूर वीर धारातीर्थ पतन पावले.
विजापूरच्या अर्क किल्यात जे मराठे कैदेत पडले त्या ८० जणांचा पुढे औरंगजेबाने शिरच्छेद केला. अश्या अज्ञात स्वामीभक्तांची नावे दुर्दैवाने आज इतिहासाला माहिती नाहीत.
राजाराम छत्रपतींच्या रक्षणार्थ ह्या अश्या ज्ञात-अज्ञात मराठ्यांनी सांडलेले रक्त व्यर्थ जाणार नाही.
ह्या सर्वांनी आपल्या प्राणांची बाजी लावून घोंगावणाऱ्या वादळात हातांच्या ओंजळीत पणतीची ज्योत सांभाळावी त्या प्रमाणे छत्रपती राजाराम महाराजांना सांभाळून नेले.
राजाराम महाराजांना जिंजीस पोहचते केले.
औरंगजेबाचा पराजय होवून मराठ्यांचा जय झाला.
छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून सुटून जितके दुःख औरंगजेबाला झाले नसेल त्या पेक्षा कैक पटींनी दुःख राजाराम छत्रपती तावडीतून सुटून जिंजीस पोचल्याने औरंगजेबास झाले.
पुढे २२ वर्ष राजाराम छत्रपतींनी आणि त्यांच्या अर्धांगिनी असलेल्या ताराराणी छत्रपती साहेब ह्यांनी औरंगजेबाला आणी त्याच्या फौजेला मराठ्यांचा धाक घालत दिवसरात्र घोड्यावर बसवून ठेवले.
मुघलांच्या फौजेस मराठ्यांनी इतके इतके म्हणून छळले कि नंतर नंतर तर मुघलांचे सेनापति, असंख्य सरदार लढाई न करताच रणांगण सोडून पळून जाऊ लागले.
'केवळ आणी केवळ ह्या म्हाताऱ्या औरंगजेबाच्या हट्टामुळे रोज आपल्याला ह्या मराठ्यांचा मार खावा लागत आहे..' अशी भावना सगळ्या मुघली फौजेत पसरली होती.
जिकडे तिकडे मुघलांचा दारुण पराभव होत होता. मराठ्यांचे विजयी वीर छत्रपतींचा जयजयकार करत चहू दिशांस विजयी घोडदौड करत होते.
हा मराठ्यांचा ज्वाजल्य इतिहास आहे. हा शूरांचा-वीरांचा आणी प्राणांची आहुती देणाऱ्या स्वामीभक्तांचा इतिहास आहे. हा जपावा; हा वाढवावा; ह्याचा जागर करावा. हाच आपला महाराष्ट्रधर्म.
लेख समाप्त.
लेखाविषयी तुमची प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये कळवा आणी आपल्या महाराष्ट्र धर्मवर मित्रमंडळींना 'Invite' (आमंत्रित) करा.
श्री भवानी शंकर चरणी तत्पर
सतीश शिवाजीराव कदम
निरंतर.

No comments:

Post a Comment

मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी!

  मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी! कात्रड भुईकोट किल्ला /कात्रड गढी कात्रड राहुरी अहमदनगर. Katrad ...