विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 24 July 2020

मराठेशाहीतील तीन 'फाकडे'

मराठेशाहीतील तीन 'फाकडे'

भन्नाट लेख आहे. वाचून आनंद घ्यावा.

'फाकडा' हा शब्द आज वाचायला जरा विचित्र जरी वाटत असला तरी इतिहासात ह्या शब्दाचे महत्व हे फार फार मोठे होते.

सगळ्यात पहिले आपण पाहू कि 'फाकडा' हा काय प्रकार आहे.
बऱ्याच लोकांनां वाटते कि 'फाकडा' हा पर्शियन शब्द असावा. पण नाही. हा पर्शियन शब्द नाही. कुठल्याही शब्दावलीत ( डिक्शनरीत) हा शब्द तुम्हाला शोधूनही सापडणार नाही.

फाकडा म्हणजे हुशारी, तडफ, अलौकिक शौर्य आणि हरजबाबीपणा दाखविणारा व्यक्ती.

फाकडा हा शब्द खरं तर एखाद्याला आपण जसे काही टोपण नाव ठेवतो त्या प्रकारचा एक शब्द आहे.

समाज हा एखाद्या व्यक्तीच्या भन्नाट स्वभावामुळे आणि कर्तृत्वामुळे त्या व्यक्तीच्या प्रभावाखाली येतो. अशी भन्नाट माणसे आजही आपल्या अवति-भवती वावरत असतात.

अशीच तीन भन्नाट माणसे हि पहिल्या शाहू छत्रपतींच्या काळी वावरताना आपल्याला दिसतात.

ह्यातील पहिल्या फाकड्याचे नाव कोन्हेरराव त्रिंबक एकबोटे

दुसऱ्या फाकड्याचे नाव मानाजीराव शिंदे

आणि तिसऱ्या फाकड्याचे नाव जेम्स स्टुअर्ट.
( हा इंग्रज होता. )

चला तर ह्या तीनही 'फाकड्यांची' आपण माहिती घेऊ.

पहिला फाकडा
कोन्हेरराव त्रिंबक एकबोटे.
हा मूळचा पुरंदरचा राहणारा. बाळाजी बाजीराव पेशव्यांच्या काळात हा शिलेदार होता. ह्याने अनेक युद्धांमध्ये शत्रूच्या फौजेवर चढाई करून फार मर्दुमकीची कामे केली होती.

त्यामुळे त्याचे शौर्य बाळाजी बाजीरावाच्या नजरेस येऊन बाळाजीने कोन्हेररावास शिलेदारीचे स्वतंत्र पथक दिले.

इ. स. १७५१-५२ मध्ये मुघलांचे व मराठ्यांचे जे तुंबळ युद्ध झाले त्यामध्ये कोन्हेर त्रिंबक याने आपल्या शौर्याचे असें कही चमत्कार दाखविले की, त्या योगाने त्याची रणांगणावरील कीर्ती अजरामर झाली.

ह्या वेळी मराठ्यांचा शत्रू सलाबतजंग हा असून प्रसिद्ध फ्रेंच सरदार 'बुसी' हा आपल्या कवायती सैन्यासह सलाबतजंगास येऊन मिळाला होता.

ह्यावेळी मुघलांचा विचार पुण्यावर चढाई करण्याचा होता. त्याप्रमाणे मुघल हे रांजणगाव व ढमढेऱ्यांचे तळेगाव येथपर्यंत चढाई करून आले.

तारीख २१ नोव्हेंबर रोजी मुघलांचा फ्रेंच सरदार बुसीने ग्रहणाच्या दिवशी हिंदू लोक धर्मकृत्यांत गुंतलेले असताना त्यांच्यावर छापा घालून त्यांना सैरावैरा पळावयास लावले व त्यांच्या लष्करांतून त्याने बरीचशी लूट नेली. त्यामध्ये पेशव्यांचे देव व पूजेची उपकरणेही लुटून नेले.
हिलाच 'कुकडीची लढाई' असेही म्हणतात.

ह्या लढाईमुळे मुघलांचा फ्रेंच सरदार 'बुसी' यास मोठा विजयानंद वाटून तो अधिकच जोराने पुढे चाल करून आला.

ह्या बिकट प्रसंगी मराठ्यांचे सरदार बिलकुल न डगमगता ते मोठ्या आवेशाने शत्रूशी युद्ध करण्यास सिद्ध झाले. ह्यावेळी मराठा सैन्याचे मुख्य सेनापती महादजीपंत पुरंदरे हे असून त्यांच्या हाताखाली दत्ताजी शिंदे व महादजी शिंदे हे दोन नवीन जोमाचे तरुण सरदार आणि कोन्हेरराव त्रिंबक एकबोटे हा होतकरू शिलेदार हजर होता.

२७ नोव्हेंबर रोजी मराठ्यांचे व मोगलांचे ह्या समयी मोठे हातघाईचे युद्ध झाले.
या युद्धांमध्ये कोन्हेरराव त्रिंबक एकबोटे याने आपल्या शौर्याची अगदी सीमा करून दाखविली. त्याने मुघलांकडील फ्रेंचांच्या तोफांचा एकसारखा भडिमार होत असताना मुघलांवर निकराचे हल्ले करून त्यांना सळो कि पळो करून सोडले.

महादजीपंत, दत्ताजी व महादजी शिंदे बारगीर व कोन्हेर त्रिंबक एकबोटे वगैरे अकरा असामींनी मुघलांची डोलाची अंबारी पकडली आणि ती अंबारी लुटली. 'मोगल शिकस्त जाहला... सारा मुघल लुटला.'

त्यानंतर ९ डिसेंबर रोजी मांडवगण येथे लढाई झाली. ह्यावेळी कोन्हेर त्रिंबक याने दाखविलेल्या युद्धकौशल्याची फार तारीफ होऊन त्यास 'फाकडे' अशी शौर्यपदक पदवी पेशव्याने दिली.

तेव्हापासून त्याची कोन्हेर त्रिंबक फाकडे ह्या नांवाने प्रसिद्धी झाली व त्यास शाहू छत्रपतींच्यातर्फे पेशव्याकडून बहुमान म्हणून पालखीची वस्त्रे व नेमणूक व इनाम मिळाले आणि त्याच्या बहादुरीबद्दल त्याच्या घोड्याच्या पायांत चांदीचा वाळा घालण्याचा मान त्यास मिळाला (१७५४).

महाराष्ट्र धर्मचे लेखक सतीश शिवाजीराव कदम यांच्या अभ्यासानुसार;
हा बहुमान त्या वेळी फारच थोड्या सरदारांस मिळत असें. या मानाचा अर्थ असा होता कि, हा घोडेस्वार एक तर समरांगणात जय मिळवील किंवा आपला देह धारातीर्थी अर्पण करील, पण शत्रूस पाठ दाखवून रणातून जिवंत परत येणार नाही.

कोन्हेर त्रिंबक फाकडे हा हुलयाल हुन्नुरच्या (Hulyal hunnur हे गाव जमखंडी जवळ आहे ) लढाईमध्येही हजर होता. तेथें त्याने शत्रूवर जवानमर्दीने चालून जाऊन आपले रणशौर्य चांगले दाखवून दिले.
होळीहुन्नुरच्या लढाईमध्ये तो मोठ्या पराकाष्टेने बचावलेला होता.

पुढे कोन्हेर त्रिंबक फाकडे हा सदाशिवराव पेशवे ह्यांच्याबरोबर इ.स. १७५६ मे मध्ये सावनूरच्या स्वारीवर गेला.

तेथें भाऊसाहेब व फाकडे हे बुसीच्या तोफखान्याच्या माऱ्यात उभे असता कोन्हेर त्रिंबक फाकडे याच्या डोक्यावर बुसीच्या तोफखान्यातील तोफेचा एक गोळा पडून कोन्हेर त्रिंबक फाकडे याचा रणभूमीवरच अंत झाला.

पहिल्या शाहू छत्रपतींच्या काळी कोन्हेरराव फाकडे याची कीर्ती फार झाली होती आणि त्याच्या शौर्यकथा त्या वेळेसच्या तरुण वीरांना फार प्रोत्साहन देत असत.

दुसरा फाकडा
मानाजी शिंदे.
हा कन्हेरखेडच्या शिंद्यांपैकी एक असून राघोबादादा पेशव्याची बाजू उचलून धरणारा होता.

महादजी शिंद्याला सरदारी न देतां ती ह्या मानाजीला द्यावी अशी राघोबादादाची खटपट होती. महीनदीच्या काठी राघोबादादाचा पराभव झाला त्यावेळीं हा मानाजी लढाई करताना जखमी झाला होता. हा मानाजी फार शूर व धाडसी होता.
हा कधीहि कोणास न दबणाऱ्या स्वभावाचा होता.

पुढें पुरंदरच्या तहामुळें हा पुणें दरबारच्या सैन्यास येऊन मिळाला. हरिपंत फडक्याच्या हैदर अल्लीवरील स्वारींत (१७७७) हा मानाजी हरिपंत फडक्याच्या सैन्यांत होता. परंतु कर्नाटकांत आल्यावर बाजीपंत बर्वे म्हणून जो राघोबादादाचा सरदार हैदरकडून लढत होता त्यानें त्यास हैदरअल्लीच्या बाजूस वळवून घेतलें.

महाराष्ट्र धर्मचे लेखक सतीश शिवाजीराव कदम यांच्या अभ्यासानुसार;
ह्याच मानाजी फाकड्याने घाशीराम कोतवालाचा अन्याय उघडकीस आणला होता.
(ह्यावर भविष्यात मी एक लेख लिहील. )

रावबाजी सन १७९६ मध्यें दौलतराव शिंद्यांच्या गोटांत अटकेत असता हा मानाजी त्याच्याबरोबर होता. नाना फडणविसाने पुरविलेल्या पैशावर याने शिंद्यांच्या गोटातच सैन्य जमविण्याचें काम चालू केलें.

बाळोबा तात्यास हे कळताच त्याने शिंद्यांच्या गोटांतील रावबाजीच्या छावणीस घेरा घालून पाणी बंद केलें. तेव्हां मानाजीनें तेथून निघून नानाच्या तर्फेने फलटणजवळील साल्पेघाट ताब्यात घेतला.
पुढे मानाजी फाकडयाच्या मुलाने आणि आनंदराव नावाच्या एका सरदाराने 27 जुलै 1809 मध्ये सर्जेराव घाटग्यास ठार करून दौलतराव शिंद्यास त्याच्या जाचांतून मुक्त केले होते.

तिसरा फाकडा
जेम्स स्टुअर्ट.
कॅप्टन जेम्स स्टुअर्टला मराठा लोक त्याच्या शौर्यामुळे मोठया कौतुकाने 'इष्टुर फाकडा' असे म्हणत.

रघुनाथराव पेशवे हा पेशवाईची गादी मिळविण्याच्या हव्यासापायी मुंबईच्या इंग्रजांस जाऊन मिळाला व इंग्रजांचे सैन्य मदतीस घेऊन मराठ्यांच्या सैन्याशी लढण्याकरितां इ.स. १७७८ मध्ये बोरघांटामध्ये आला.
या युद्ध प्रसंगामध्ये इंग्रजांच्या वतीने जे रणशूर योध्दे प्रसिध्दीस आले, त्यांपैकी 'कॅप्टन जेम्स स्टुअर्ट' हा एक होय.

हयावेळी सर्व इंग्रज सैन्याचे अधिपत्य कर्नल 'इगर्टन' हयाच्याकडे होते.

'इगर्टन' याने आपल्या सैन्याच्या मुख्य दोन तुकडया केल्या होत्या व त्या तुकड्यांचे अधिपत्य लेप्टनंट-कर्नल 'कॉकबर्न' व लेप्टनंट-कर्नल 'के' हया दोन नामांकित सेनापतींस दिले.

हयाशिवाय इगर्टन याने पुढे चाल करुन जाणारी बिनीच्या सैन्याची एक वेगळी तुकडी केली होती. तिचे अधिपत्य ह्या कॅप्टन जेम्स स्टुअर्ट कडे होते.

ह्यावेळी मराठ्यांच्या सैन्याच्या वेगवेगळया तुकडया असून त्यांचे सेनाधिपत्य महादजी शिंदे, तुकोजी होळकर, हरिपंत फडके, रामचंद्र गणेश, बाजीपंत बर्वे वगैरे नामांकित योध्दयांकडे होते.

हे सर्व सरदार इंग्रजांच्या विरुद्ध आपापल्या सैन्यानिशी तळेगांवापासून बोरघाटापर्यंत माऱ्याच्या जागा रोखून युध्दास सिध्द होते.

इंग्रजांकडील कॅप्टन जेम्स स्टुअर्ट हा योध्दा फार पटाईत असून, त्यास सर्व रस्त्यांची व घाटनाक्यांची पूर्ण माहिती होती.

तो आपल्याबरोबर ग्रेनेडियर शिपायांची एक पलटण व थोडासा तोफखाना घेऊन ता. २२ नोव्हेंबर रोजी मुंबईहून निघाला व आपटे नदीपर्यंत येऊन तेथून दुसरा मार्ग घेऊन बोरघाट चढून वर येऊन पोहोचला.
ता.२५ नोव्हेंबर रोजी त्याने खंडाळयाच्या उंच टेकडीवर आपले निशाण लावले.

कॅप्टन जेम्स स्टुअर्ट हयाने आता खंडाळयास मुक्काम केला.

इंग्रजांचे मुंबईचे दुसरे सैन्य व तोफखाना ता. २३ डिसेंबर इ.स. १७७८ रोजी पनवेलच्या मार्गाने घाट चढून खंडाळयास येऊन स्टुअर्टच्या सैन्यास येऊन मिळाले.

इकडे मराठयांचे सैन्य व तोफखाना शत्रूंशी तोड देण्याकरिता खंडाळयाच्या आजूबाजूस येऊन माऱ्याच्या जागा रोखून युध्दास सिध्द झाला. मराठयांच्या तोफखान्याचे मुख्य सेनापति भिवराव पानसे यांनी तोफा व बाण हयांचा इंग्रजांच्या फौजेवर दररोज बर्षाव चालविला.

महाराष्ट्र धर्मचे लेखक सतीश शिवाजीराव कदम यांच्या अभ्यासानुसार;
मराठयांच्या सैन्यामध्ये 'नरोन्हा' नांवाचा एक 'फिरंगी' गोलदाज होता. तो तोफा डागण्यामध्ये अतिशय कुशल होता. त्याने शत्रूंवर तोफांचा व बाणांचा असा मारा केला की, प्रत्येक खेपेस शत्रूंचा नामांकित शिपाई नेमका गोळयाखाली सापडत असे.

अशा प्रकारची निकराची लढाई चालू असता, कॅप्टन जेम्स स्टुअर्ट हयाने आपल्या पराक्रमाची शर्थ करुन व मराठ्यांच्या तोफांचा भडिमार सहन करुन, कारल्यापर्यंत आपली फौज नेऊन पोहोचविली.

मराठा सेनापतींस कॅप्टन जेम्स स्टुअर्टच्या शौर्याचा प्रभाव फार अलौकिक वाटून त्यांनी स्टुअर्ट याची फार वाहवा केली व त्यास कोतुकाने “इष्टुर फाकडा” असे अभिधान दिले.

मराठयांच्या सैन्यामध्ये इंग्रजी फौजतील ज्या गुप्त बातम्या येत असत त्यामध्ये इष्टुर फाकडयाच्या शौर्याबद्दल, धैर्याबद्दल आणि युध्दचातुर्याबद्दल फार प्रशंसनीय उल्लेख असत. त्यामुळे मराठयांच्या सेनापतींसही इष्टुर फाकडयाशी शर्थीचे युध्द करुन त्यास आपले रणशौर्य दाखविण्याचे विशेष स्फुरण चढले.

इंग्रज आणि मराठ्यांच्या हया निकराच्या लढाईमध्ये ता. ४ जानेवारी इ.स.१७७९ रोजी इष्टुर फाकडयास मराठ्यांच्या तोफेचा गोळा लागला आणि त्यात तो ठार झाला.

हया प्रसंगी मराठा सैन्याने “इष्टुर फाकडया शाब्बास..” अशी आनंदचित्ताने शाबासकी दिली.

इष्टुर फाकडयाच्या मृत्यूचे वर्तमान तत्कालीन अस्सल मराठी पत्रांत आढळून येते.

त्यामध्ये इष्टुर फाकडयाच्या नावापुढे 'लढाव म्हणजे 'लढवय्या असे विशेषण मराठयांनी लावलेले दिसून येते.

परशुरामभाऊ पटवर्धनांचा कारकून शिवाजी बाबाजी हयाने ता. २२ जानेवारी इ.स. १७७९ च्या पत्रामध्ये पुढील उद्गार काढले आहेत.
“मुख्यत्वे श्रीमंतांचे पुण्य विचित्र? अवतारी पुरुषा त्यासारखे योग घडले. ज्या मॉष्टीनाने मसलत केली, तो घाटावर येताच, समाधान नाही म्हणोन मुंबईस गेला; तेव्हा मृत्यु पावला. इष्टुर फांकडा लढाव, इकडील फौजेचा, कारल्याच्या मुक्कामी गोळा लागून ठार जाहला. कर्णेल 'के' म्हणोन होता, त्यास बाण लागून जेर जाहला. आकारिक (कर्ते) होते त्यांची अशी अवस्था जाहली.."

मराठ्यांनी इष्टुर फाकडा उर्फ जेम्स स्टुअर्ट हा शत्रूकडील इंग्रजांचा कॅप्टन जरी असला तरी त्याचे शौर्य पाहून त्यास ही उपाधी दिली.

हे सगळे लोक फार दिलदार आणि कर्तृत्वाची कदर करणारे असेच होते हे ह्यावरून व्यतीत होते.

तर असे हे मराठेशाहीतील तीन फाकडे.

लेख आवडल्यास हवा तितका शेअर करा
आणि मित्र मंडळींस महाराष्ट्र धर्म जॉईन करायला सांगा.
कारण आपला इतिहास आपणच जिवंत ठेवायचा आहे.
लेख समाप्त.

श्री भवानी शंकर चरणी तत्पर
सतीश शिवाजीराव कदम
निरंतर

No comments:

Post a Comment

मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी!

  मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी! कात्रड भुईकोट किल्ला /कात्रड गढी कात्रड राहुरी अहमदनगर. Katrad ...