१० जानेवारी १७६१ संपूर्ण
महाराष्ट्रात संक्रातीचा सण साजरा होत असताना येथे रक्ताळलेल्या यमुनेच्या
काठी दत्ताजीरावांचा शीर नसलेला देह सरणावर धगधगत होता.
रोहिल्यांच्या बंदुकीतून सुटलेली गोळी दोन्ही हातात समशेर घेऊन शौर्याची परिसीमा गाठलेल्या दत्ताजीरावांची छाती चिरत गेली. दोंन्ही मुठी घट्ट आवळल्या गेल्या , रणमार्तंडा प्रमाणे लढणारा दत्ताजीरावांचा देह खाली कोसळला होता. हाताच्या समशेरी काही अजून सुटल्या नव्हत्या. शरीर कोसळले असले तरी लढण्याची इच्छाशक्ती तसूभरही मेली नव्हती. दत्ताजीराव खाली कोसळले होते. जवळ आलेला कुतुब दत्ताजी शिंदे याना विचारू लागला
'' क्यो पाटील और लंढोगे ''
त्यावर दत्ताजीराव त्याच आवेशात गरजले '' क्यू नाही , बचेंगे तो और भी लढेंगे ''
या वाक्यावर बाजूला उभा असलेला नजीब अधिक लालबुंद झाला, धिप्पाड देहयष्टी असलेल्या दत्ताजींच्या छाताडावर बसून त्याने दत्ताजीरावांचे शीर कापले , भाल्याच्या टोकावर शीर ठेवून सैतानाप्रमाणे छावणीभर नाचू लागला. पण केवळ या एका मराठ्याची जिद्द पाहून पुढे उभ्या ठाकलेल्या संकटाची चिंता अब्दालीला नक्कीच भासली असणार.
किती हि राष्ट्रनिष्ठा आणि केवढे उत्तुंग असे हे शौर्य... अनेक जातींचे आणि प्रांताचे सैन्य राष्ट्ररक्षणासाठी मराठा होऊन लढले ... पानिपत हि मराठ्यांची दुखरी नस नव्हे तर राष्ट्ररक्षणासाठी गाजवलेल्या इतिहासाचे सुवर्णपान आहे.
© शब्दांकन - हर्षद प्रमोद चिंचवळकर
No comments:
Post a Comment