विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 24 July 2020

राज्याभिषेक आणि परिणाम..

राज्याभिषेक आणि परिणाम......
"श्रीशिवराज्याभिषेक" शिवचरित्रातील सर्वात क्रांतिकारक घटना.शिवचरित्रातल्या चमत्कृतिपूर्ण घटना त्याच्या अभ्यासकांना कायमच मोहवत आल्या आहेत.पण शिवछत्रपतींनी स्वतःला जो राज्याभिषेक करून घेतला तिथे भरतखंडाच्या इतिहासाला कलाटणी मिळाली... शिवछत्रपतींच्या छत्रपतीपदाच्या निर्मिती मुळेच स्वराज्याच्या संकल्पनेला मूर्त स्वरूप मिळाले.मला राजा म्हणून संबोधले जावे हि कोती मानसिकता शिवछत्रपतींची नव्हती.त्यांच्या आजोबांना "राजा" हा किताब निजामशाहीतून भेटला होता.दस्तुरखुद्द शिवछत्रपतींना औरंगजेबाने "राजा" हा किताब दिला होता.मग छत्रपती पदाचा खटाटोप नक्की कशासाठी हा प्रश्न उभा राहतो ? त्याचं उत्तर अखिल भारतातल्या हिंदूंच्या शतकानुशतके बाळगलेल्या पराभूत मानसिकतेत आहे .'नंदांत क्षत्रियकुलम' आणि ' कलौ आद्यन्तो स्थितिः ' असल्या बुळचट विचारसरणी ने हिंदूचं केंद्रसत्तेत राहणारं राजकारण कापून काढलं होतं.क्षत्रिय म्हणवणारे अनेक राजपूत आपल्या कन्या मुगलांच्या जनानखान्यात भरती करत होते.दक्षिणेकडचे विजयनगरचे 'महामंडलेश्वर' ,परमप्रतापी सम्राट आदिलशाहिची शागिर्दगिरी करत होते. उभ्या भारतात मराठ्यांचं क्षत्रियत्व यज्ञवेदीवर घासून सिद्ध झाले नसून तलवारीच्या पातीवर घासून सिद्ध झाले होते.त्या क्षत्रियत्वाचा छत्रपतीपदाचा दर्जा हा राज्याभिषेकाने सिद्ध केला.हा अनेक शतकांच्या सांस्कृतिक पराभवावर मिळवलेला नैतिक विजय होता.फारसी आणि अरबी भाषेला पर्याय म्हणून राज्यव्यवहारकोशाची निर्मिती.अरबी समुद्र म्हणून परकिय सत्तेने धन्य झालेल्या दर्याच्या छाताडावर "सिंधुदुर्ग" उभा करणे हे प्रचंड मोठे सांस्कृतिक परिवर्तन होते.मोगल बादशाह औरंगजेब आदिलशहा व कुतुबशहा ह्यांचे सार्वभौमत्व डिवचण्या साठी त्यांना आदिलखान व कुतुबखान म्हणायचा.आदिलशाहित आणि कुतुबशाहीत खुत्बा औरंगजेबाच्या नावाने वाचण्यात यायचा.मोगलांची ही सार्वभौमत्वाची कल्पना कायमची गाडून टाकण्यासाठी महाराजांनी छत्रपती पदाची स्थापना केली .माझं स्वराज्य तळहाताएवढं असलं तरी त्याचा ताबेदार मुसलमान पातशहा असू शकत नाही हि भूमिका महाराजांनी कायम जपली अगदी पुरंदरच्या तहावेळी सुद्धा शिवछत्रपतींनी बाल शंभूराजांना पुढे करून स्वतःची मोगली मन्सबदारीतून सुटका केली.महाराजांच्या सार्वभौमत्वाला सिद्ध करण्यासाठी मोगली सनदेची गरज नव्हती हा सनदेचा खुळचटपणाचा नंतरच्या राज्यकर्त्यांनी उभा केला. हा राज्याभिषेक झाला नसता तर नंतरच्या महाराजांच्या वारसदारांना पुंड पाळेगारांचा दर्जा भेटला असता.पंचवीस वर्ष बादशाही दख्खनच्या पठारावर गाडून घेत होती ह्याचं कारण हे मराठ्यांचं अभिषिक्त सार्वभौमत्व होतं.शेजवलकर म्हणतात " राजकीय पुढारी,स्वराज्यस्थापनेचे कंकण बांधलेला वीर शिवाजी होता व त्याने आपणास महाराष्ट्राचा' छत्रपती 'म्हणवले ,एवढी कामगिरी त्यांस इतिहासात 'उत्तम पुरूष' ठरविण्यासाठी पुरेशी आहे".मोगल सत्तेला गाडणारी जाटांची,राजपूतांची,शिखांची,बुंदेल्यांची बंडे हि महाराष्ट्रात झालेल्या क्रांतिकडे पाहूनच झाली होती... जाता एवढंच सांगतो आमच्या मावळात आजही कुणी दांडगाई केली कि त्याला उत्तर देण्यासाठी "काय, मोगलाई लागून गेली का ? " म्हणून म्हण वापरली जाते...ह्या बेधडक अन्यायाला भिडण्याच्या वृत्तीला कारण "श्रीशिवराज्याभिषेक" ....... ..... ©सचिन शिवाजीराव खोपडे देशमुख . #बारा_मावळ

No comments:

Post a Comment

मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी!

  मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी! कात्रड भुईकोट किल्ला /कात्रड गढी कात्रड राहुरी अहमदनगर. Katrad ...