विनोद जाधव एक संग्राहक

Thursday 26 November 2020

अखेर मातुःश्रींची भेट झाली !

 


अखेर मातुःश्रींची भेट झाली !
पोस्टसांभार :तुषार माने
३ फेब्रुवारी १६८९ रोजी संगमेश्वरास संभाजी राजांना कैद करण्यात आले.त्यानंतर राजारामाला मराठ्यांचा राजा म्हणून जाहीर करण्यात आले. येसूबाईनी या गोष्टीस संमती दिली. येसूबाईंना राजारामाविषयी आस्था होती, तसेच राजारामास शाहूबद्दल प्रेम होते. संभाजीराजे पकडले जाण्यापूर्वी रायगडाभोवती मोगली सैन्य जमा झाले होते. औरंगजेबाने एतिकादखान(झुल्फिकारखान) याला रायगडाच्या वेढ्याच्या कामास पाठविले होते. २५ मार्च १६८९ रोजी त्याने रायगडास वेढा घातला. ११ मार्च १६८९ रोजी संभाजी राजांचे समर्पण झाले. पतीनिधनाचे दुखः कोसळले असताना येसूबाईंनी जी धीरोदात्तता दाखविली, त्यास मराठ्यांच्या इतिहासात तोड नाही. मुघलांचा वेढा कडक होत असताना सर्व परिवार हाती लागू नये म्हणून,येसूबाईंनी सल्ला दिला. 'मुलाचे(शाहू) वय लहान,राज्य तरी गेलेचं,त्या अर्थी तुम्ही सर्वही पराक्रमी मनसबदार शूर याणी एक विचारे होऊन, राजारामसाहेब यास घेऊन बाहेर पडावे. मुलास बाहेर जाऊन राहणे यास जवळ जागा रायगडाहून बांकी ऐशी दुसरी नाहीच. अर्थी मुलास व आम्हांस येथील बंदोबस्त करून येथे ठेवावे. तुम्ही सर्वांनी राजारामसाहेबांसहवर्तमान बाहेर पडून, फौजा जमा करून, प्रांताचा बंदोबस्त राखिला असता सर्व मसलत, वोढ तिकडे आधी पडेल. येथे काही गिल्ला पडणार नाही. तत्रापि थोडी बहूत मसलत पडली असताही किल्ला बेलाग, मजबूद, वर्ष सहा महिने टिकाव पडेल. तो तुमचा सर्वांचा एखादे ठायी जमाव पोक्त जाला म्हणजे आम्हांस काढून न्यावे.' स्वराज्य राखण्याच्या दृष्टीने येसूबाईंचा हा निर्णय अतिशय योग्य होता व औरंगजेबाच्या राजनीतीस छेद देणारा ठरला. त्याप्रमाणे राजाराम महाराजांनी आपला कबिला आणि काही मुत्सद्दी व सेनापती यांसह ५ एप्रिल १६८९ रोजी रायगड सोडला. पुढे पन्हाळा व त्यानंतर राजाराम महाराज जिंजीस गेले.
अखेर येसूबाईंना रायगड सोडवा लागला. येसूबाई, शाहूराजे, संभाजी महाराजांचे दासीपुत्र मदनसिंग, माधवसिंग, राजाराम महाराजांच्या एक पत्नी जानकीबाई, प्रतापराव गुजर यांची मुले जगजीवन, खंडेराव तसेच शिवाजी राजेंच्या एक पत्नी सकवारबाई यासह सर्वजण कैद झाले. रायगड किल्ला मोगलांना दिल्याची नोंद आढळते. 'कार्तिक मासी रायगड सल्ला करून मार्गशीर्ष सुध २ रविवारी मोगलास दिला.' त्यानंतर सर्व कैद झालेल्यांना तुळापुरास नेण्यात आले. James Grant Duff लिहितो, 'The widwo of Sambhajee & her son Shivaji(Shahu) fell into the hands of Yetikad Khan. They were conveyed to camp where khan was received with particular designation and honoured with the title of Zoolfikar khan, Yesoo Bye and her son found a friend in Begam sahib, the daughter of Aurangjeb and the Emperor himself became partial to the boy, whom he named Sahoo, an appellalion which,pronouncing it Saho, he ever after choose to retain.'
कैद झालेल्यांना सन्मानाने वागवण्यात आले. बादशहाच्या गुलालबार(बादशहाचे निवासस्थान)च्या आवारात त्यांचे तंबू देण्यात आले.

त्यानंतर मराठे व मोगल यांच्यातले युद्ध चालूच राहिले. आधी राजाराम महाराज व त्यांच्या मृत्यूनंतर रणरागिणी ताराराणी यांच्या सल्ल्याने मराठे मोगलांशी लढत राहिले. सुरुवातीला मोगलांनी काबीज केलेले किल्ले मराठ्यांनी पुनः जिंकण्यास सुरुवात केली. सरतेशेवटी औरंगेब स्वतः बाहेर पडून हे किल्ले घेण्याच्या कामाला लागला.(बादशहा-ए-हिंदुस्ता वर काय ही वेळ ओढवली.)
बादशहाची छावणी जिथे-जिथे जाई तिथे-तिथे येसूबाई व शाहूराजे यांना जावे लागत. पुढे १७०३ साली औरंगजेबाने शाहू राजांना मुसलमान करण्याचा घाट घातला होता. परंतु ते शाहूने मान्य केले नाही. शाहूराजांचे धर्मांतर होऊ नये ही गोष्ट येसूबाईंच्या सल्ल्याशिवाय झाली नसावी. १७०५ साली दुष्काळी परीस्थिती निर्माण झाल्याने त्याची झळ येसूबाईंना बसली होती. कर्ज रूपाने आपल्याला काही मदत व्हावी यासाठी त्यांनी चिंचवडकर देवांना पत्र लिहिले होते.

औरंगजेबाला जराजर्जर अवस्था प्राप्त झाली आणि तो वैफल्याच्या वाटेने जाऊ लागला. मराठ्यांच्या समशेरींनी त्याची झोप उडविली. तब्बल २६ वर्षानंतर, २० फेब्रुवारी १७०७ रोजी औरंगजेब अहमदनगर जवळ भिंगार येथे मृत्यू पावला आणि स्वराज्यावरचा मुघली फास सुटला. आता औरंगजेबाच्या मुलांत यादवी युद्ध होणे अटळ होते. शहजादा आझम याने ५ मार्च १७०७ रोजी स्वतःला बादशहा म्हणून घोषित केले. येसूबाई, शाहू राजे व इतर कबिला बरोबर घेऊन तो दिल्लीला जाण्यास सिद्ध झाला. नर्मदा पार केल्यावर सिरोंचे येथे छावणीचा तळ पडला, झीनत बेगमेच्या मध्यस्थीने अखेर आझम शाहूस सशर्त सोडण्यास तयार झाला. ८ मे १७०७ रोजी दरोहा येथे शाहूराजे कैदमुक्त झाले. आझमने भावी राज्यव्यवस्था, कर्तव्ये, अधिकार याबद्दल शाहूशी लेखी करार केला. त्याचा तपशील असा, तुम्ही दिल्लीच्या बादशहाचे अंकित म्हणून राज्य करावे.तुमची आई,भाऊ मदनसिंग व बायका यास आम्हापाशी ठेवावे;तसेच तुम्ही आपल्या राज्यात जाऊन बंदोबस्त करावा,बखेडा करणाऱ्या लोकांचे पारिपत्य करावे आणि बादशाही लक्षात वागून इकडील मुलखास उपद्रव देऊ नये. तुम्ही याप्रमाणे वागता अशी हुजूर खातरजमा झाली म्हणजे आम्ही दिल्लीस गेल्यावर व तेथे सिंहासनारूढ झाल्यावर तुमची माणसे तुम्हाकडे लावून देऊ आणि तुम्हास सरदेशमुखीचे उत्पन्न ६ सुभ्यात चालते याची सनद त्याप्रमाणे ६ सुभ्यांच्या चौथाईची सनद देऊ. नेहमी बादशहाचे हुकुमात वागून प्रसंग पडेल तेव्हा आपल्या फौजेनिशी आम्हांस मदत करावी.

पुढे आग्र्याजवळ जाजाऊ येथे ३१ मे रोजी शहजादा आझम व शहजादा मुअज्जम यात युद्ध झाले व आझम त्यात मारला गेला. ८ जून १७०७ रोजी शहजादा मुअज्जम 'बहादुरशहा' असा किताब धारण करून बादशहा झाला. पुढे बहादुरशहा सन १७१२ मध्ये लाहोरला विश्रांतीसाठी गेला असताना फेब्रुवारी महिन्यात निधन पावला. तो पर्यंत दिल्ली दरबारात सय्यद बंधू म्हणजे सय्यद हुसेनअली व सय्यद हसनअली यांचा दबदबा वाढला होता. बहादुरशहाच्या मृत्युनंतर त्याचा मुलगा जहंदारशहा हा गादीवर आला. तो अतिशय क्रूर होता. त्याच्यात व फर्रूकसियर यांच्यात २८ डिसेंबर १७१२ ला लढाई होऊन, जहंदारशहा याचा पराभव झाला. फर्रूकसियरच्या आईने सय्यद बंधूंना विश्वासात घेऊन आपल्या मुलाला बादशहा करवले. सय्यद बंधूंची दरबारातील वाढती प्रसिद्धी व हुकुमत याचा आपल्याला त्रास होणार हे फर्रूकसियरने ओळखले होते. तसेच ते आपल्याला गादीवरून कधीही खाली खेचू शकतात याची बादशहाला जाण होती, यासाठी दक्खनच्या सुभेदारीच्या निमित्ताने सय्यद हुसेनअलीला रवाना केले. बादशहाचे हे राजकारण न समजण्याइतका सय्यद अजाण नव्हता.
बादशहाने मराठे व निजाम-उल-मुल्काला निरोप पाठवला की, हुसेन अलीला परस्पर मारून टाका. दिल्ली दरबाराची वझिरी मिळवून दरबाराची सूत्रे आपल्या तंत्राने चालविण्याची निजाम-उल-मुल्काची महत्त्वाकांक्षा होती. या सत्तास्पर्धेत तो सय्यद बंधूंचा कट्टर शत्रू बनला होता.शंकराजी मल्हार हे हुसेन अलीचे कारभारी होते. सय्यद हुसेनअली दिल्ली दरबारातील मराठ्यांची कामे करून देतील अशी ग्वाही शंकराजी मल्हाराने शाहू राजास दिली. यावरून दोन्ही पक्षात मध्यस्थीची बोलणी करण्याची जबाबदारी शंकराजी मल्हारावर सोपवण्यात आली. मराठ्यांचे अनेक जण मुघलांच्या कैदेत होते. त्यात शाहू महाराजांच्या मातुःश्री येसूबाई, मदनसिंग इ. होते. बरेच दिवस खल होऊन १७१८ सालच्या जून महिन्यात हुसेनअलीच्या मार्फत शाहू व बादशहा यांच्यात तह झाला तो पुढीलप्रमाणे:-
  1. शिवाजीराजांचे स्वराज्य तमाम गडकोटसुद्धा शाहूराजांच्या हवाली करावेत.
  2. अलीकडे मराठ्यांनी जिंकलेला प्रदेश म्हणजे खानदेश, गोंडवन, वऱ्हाड, हैद्राबाद, कर्नाटक या भागातले, यादीत नमूद केल्याप्रमाणे मोगलांनी सोडून देऊन ते मराठ्यांच्या स्वराज्यात दाखल करावे.
  3. मुघलांच्या दक्षिणेतील मुलखावर चौथाई आणि सरदेशमुखीचे हक्क मराठ्यांनी स्वतः वसूल करावेत. या चौथाईच्या बदल्यात आपली पंधरा हजाराची फौज मराठ्यांनी बादशहाचे मदतीस ठेवावी आणि सरदेशमुखीचे बदल्यात मुघलांच्या मुलखातील चोरांचा बंदोबस्त करावा.
  4. कोल्हापूरच्या संभाजीराजांना शाहू राजांनी उपद्रव देऊ नये.
  5. मराठ्यांनी दरसाल बादशहास दहा लाख रुपये खंडणी द्यावी.
  6. शाहूची मातुश्री, कुटुंब वगैरे दिल्लीस बादशहाचे कबजात आहेत त्यांना सोडून स्वदेशी पावते करावे.
तहाचा मसुदा हुसेनअलीकडे पाठवण्यात आला. हुसेनअलीने फर्मानासाठी तो दिल्लीला पाठवला. पण बादशहा फर्रूकसियरने मराठ्यांना फर्मान देण्यास नकार दिला. यावरून बादशहा व हुसेनअली यांमधील वैर वाढत चालले. बादशहाने आपल्या निष्ठावंत सरदारांना सैन्यासह दिल्लीत बोलावले. हे पाहून वजीर सय्यद हसनअली याने आपली फौज वाढवली व आपला भाऊ सय्यद हुसेनअलीला दिल्लीला बोलावले. हुसेनअली दिल्लीकडे जाण्यास निघाला. त्याच्या सहाय्यासाठी मराठी फौजेनेही दिल्लीला जावे.
  1. शाहू महाराजांनी सय्यद हुसेनअलीच्या सहाय्यासाठी ५० हजार फौज पाठवावी.
  2. या फौजेच्या दैनंदिन खर्चासाठी दररोज ५० हजार रु. याप्रमाणे जितके महिने फौज शाही कामासाठी मुलखाबाहेर राहील, तितके महिने दरमहा १५ लाख रु. सय्यद हुसेन अलीने रोख द्यावेत असे ठरले.
खंडेराव दाभाडेंच्या अधिपत्याखाली मराठी फौज औरंगाबादला आली. यावेळी अनेक मुत्सद्दी दिल्ली प्रकरणाची चर्चा करण्यास जमले होते. पेशवे बाळाजी विश्वनाथ, शंकराजी मल्हार, सय्यद हुसेनअली यांनी एकत्र येऊन एक शक्कल लढविली. औरंगजेबाच्या नातवाचा एक तोतया उभा केला. औरंगजेबाचा मुलगा शहजादा अकबर याचा मुलगा मुइनुद्दिन हुसैन हा मराठ्यांच्या ताब्यात आहे, असा बनाव रचण्यात आला. मुघलांच्या कैदेतील मराठ्यांची माणसे सोडल्यास या मुइनुद्दिनला बादशहाच्या हवाली करण्यात येईल, असे शाहू राजांशी बोलणे झाल्याचे हुसेनअलीने बादशहास कळविले.
हुसेनअली आणि मराठ्यांची फौज औरंगजेबाच्या तोतया नातवाला घेऊन दिल्लीला निघाली. एक हत्ती सजवण्यात आला होता. त्यावर एक उत्तम अंबारी कसण्यात आली होती. सकाळपासूनच लोक त्या तोतयाला कुर्निश करत असत. असा सगळा लवाजमा दिल्लीला पोहोचला. दिल्लीतले लोक या औरंगजेबाच्या नातवाच्या पाया पडले. दिल्लीला गेलेल्या फौजेत बरीच नामांकित मंडळी होती. सेनापती मानसिंग मोरे, महादेवभट हिंगणे, संताजी भोसले, खंडेराव दाभाडे, पिलाजी जाधव, उदाजी पवार, बाळाजी महादेव भानू, पेशवे बाळाजी विश्वनाथ, थोरले बाजीराव, नेमाजी शिंदे, अंबाजीपंत पुरंदरे, चिमणाजी दामोदर मोघे, आवजी निळकंठ चिटणीस, बाजी कदम, नारो शंकर सचिव, सटवोजी जाधव इ. लोक होते.
त्या तोतया नातवाला घेऊन हुसेनअली व मराठे जेव्हा दिल्लीला पोहोचले तेव्हा बादशहाचे धाबे दणाणले. फर्रूकसियरला पदच्युत करून नवीन बादशहा नेमण्याची तयारी सय्यदबंधूनी चालविली. २३ फेब्रुवारी १७१९ रोजी सरकारवाड्यात सय्यदांची व बादशहाची भेट झाली. हुसेनअली बादशहाच्या कदमबोसीसाठी वाकला असता बादशहाने स्वहस्ते त्याला खांदे धरून वर उठवले आणि त्याला आलिंगन दिले. इतर बोलणे झाल्यावर बादशहाने विचारले, "मुइनुद्दिनखानास तुम्ही कैद करून आणले आहे म्हणून कळविले तो कुठे आहे?" हुसेनअलीने उत्तर दिले, "शाहूची मंडळी सोडून द्या म्हणजे त्यास आणतो." दुसऱ्या दिवशी मुइनुद्दिनला आणयचे असे ठरले. शिकारीच्या निमित्ताने बाहेर पडून हुसेनअलीचा खून करावा असा बादशहाचा बेत होता. पण त्याचा सुगावा सय्यद हुसेनअलीला लागला होता. पुढचे ३-४ दिवस असेच गेले. २८ फेब्रुवारीला अमीनखानाचे लोक वाड्याच्या दिशेने जात असताना रस्त्यात मराठ्यांची गर्दी होती. तेव्हा त्यांची व मराठ्यांची माणिक चौकात मारामारी सुरु झाली. यात दीड हजार मराठे मारले गेले.
सय्यद बंधूंची पथके फर्रूकसियरचा लाल किल्ल्यात शोध घेण्यास हिंडत होती. अखेरिस फर्रूकसियर हाती लागला. त्याला कैद करण्यात आले.त्याची रवानगी शाही तुरुंगात करण्यात आली. सय्यद बंधूंनी फर्रूकसियरचा चुलत भाऊ रफिउद्दौरजत याला मार्च १७१९ मध्ये तख्तावर बसविले. ३ मार्च व १५ मार्चला दोन स्वतंत्र शाही दरबार भरून नूतन बादशहा करवी चौथाई, सरदेशमुखी आणि स्वराज्याच्या शाही सनदा छत्रपतींच्या नावे करण्यात आल्या. मराठ्यांच्या सर्व लोकांना सोडण्यात आले. २० मार्च १७१९ रोजी मराठी फौजा स्वराज्याच्या दिशेने दौडू लागल्या. सुरज, नानकपूर, भेलसा, सिहूर. हंडिया, रतनपूर, खारकोट, अंबाराई(बऱ्हाणपूर), तिसगाव, सोनई, पारगाव, माळशिरस, जेजुरी, सासवड, शिरवळ असा प्रवास करून ४ जुलै १७१९ रोजी साताऱ्यास पोहोचल्या. 'महाराजांच्या मातुःश्री दिल्लीहून देसी आल्या.' शाहू राजांची व येसूबाईंची भेट तब्बल १२ वर्षानंतर झाली. ते दृष्य कसे असेल हे शब्दात सांगणे कठीणच !
ह्या मोहिमेत कामी आलेल्यांना यथायोग्य भरपाई देण्यात आली. परसोजी भोसलेंचा दासीपुत्र संताजी पडला, त्याचा भाऊ राणोजी यास 'सवाई संताजी' असा किताब बादशहाने दिला. शाहू राजांनी बाळाजीपंत वगैरे मंडळींचा योग्य सन्मान केला.पाच महालांचे सरदेशमुखी वतन प्रधानपंतास महाराजांनी करून दिले. बाळाजी महादेव भानू लाल किल्ल्यात झालेल्या चकमकीत मारले गेले, याची खंत म्हणून भानू परिवाराला वाकसई गाव इनाम दिला.
बाळाजी विश्वनाथांच्या ह्या स्वारीमुळे मराठ्यांना दिल्लीची झालेली अवस्था(निर्माल्य) लक्षात आली. बाळाजीपंतांनी दिल्लीहून मिळवलेल्या सनदांचे मोल खूप मोठे आहे. त्याही पेक्षा मोठी गोष्ट म्हणजे येसूबाई साहेब तब्बल ३० वर्षानंतर स्वदेशी परत आल्या. महाराजांच्या भेटी झाल्या. मुले-माणसे भेटविली. मातुःश्रींची भेट झाली यावरून बहुत संतोषी होऊन कृतार्थ झाले.
येसूबाई मातोश्रींची सुटका व्हावी यासाठी शाहू राजे खटपट करीतच होते. त्यासंदर्भात त्यांचा पत्रव्यवहार चालू होता. फाल्गुन शु. ५ शके १६३९ रोजी त्यांनी यादवराव मुनशी यास लिहिलेलं पत्र खाली देत आहे.

संदर्भ: मराठी रियासत
चिटणीस बखर (छत्रपती संभाजी महाराज आणि थोरले राजाराम महाराज चरित्र)
मराठ्यांची बखर
पेशव्यांची बखर
पुरंदरे दफ्तर
महाराष्ट्र इतिहास मंजिरी
काव्येतिहास संग्रह
ज्वलज्वलनतेजस संभाजीराज
असे होते मोगल
मराठ्यांच्या स्वाऱ्यांचे मुक्काम
शाहू महाराजांची बखर
मराठ्यांचा इतिहास
औरंगजेब
औरंगजेबाचे संक्षिप्त चरित्र
पेशवे घराण्याचा इतिहास
महाराज्ञी येसूबाई
छत्रपती राजाराम ताराराणी
बाळाजी विश्वनाथ पेशवे
झंझावात
ऐतिहासिक गोष्टी
ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर चरित्र
ऐतिहासिक शकावल्या
सनदा पत्रे
पेशवाई
पुण्याचे पेशवे
Ⓒ तुषार माने

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...