विनोद जाधव एक संग्राहक

Sunday 28 February 2021

इराणचा राजा शहा अब्बास दुसरा याने छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदुस्थानात जो पराक्रम गाजवला त्याचा संदर्भ देऊन औरंगजेबाला पाठवलेलं पत्र.....

 




इराणचा राजा शहा अब्बास दुसरा याने छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदुस्थानात जो पराक्रम गाजवला त्याचा
संदर्भ देऊन औरंगजेबाला पाठवलेलं पत्र.....
लेखन Indrajeet Khore
दिल्लीच्या सिंहासनाचा औरंगजेब निर्विवादपणे मालक बनल्यानंतर इराणचा शहा अब्बास दुसरा याने,
औरंगजेबाचे अभिनंदन करण्याकरिता,त्याच्या बंदूकधारी
पथकाचा प्रमुख बुदाक बेग ह्याच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळाच पाठवले होते ( १६६१ ) .
इराणी लोकांना " आशियातील फ्रेंच " असे जे म्हणण्यात
येई, ते योग्यच होते असे म्हटले पाहिजे.संपूर्ण मुस्लिम जगतात जो काही नवीन विचार , सांस्कृति किंवा फॅशन
निर्माण होई , तिचा मूळ स्रोत इराणमध्ये सापडत असे
त्याकाळी . संपूर्ण मुस्लिम जगतातील काव्याला इराणनेच
वळण लावले होते. कार्डोव्हा पासून काँस्टॉन्टिनोपल पर्यंतच्या आणि दिल्लीपासून श्रीरंगपट्टणच्या सर्व मुस्लिम
दरबारात इराणी रीतीरिवाजांचे आणि आवडीनिवडींचे
प्रयत्नपूर्वक अनुकरण केले जात होते.
ह्या सर्व मुस्लिम राजांना शत्रूच्या तलवारींची भीती वाटण्याऐवजी पुष्कळवेळा फारसी विनोदी लेखकांच्या
उपहासात्मक धारदार शैलीचीच विशेष भीती वाटावयाची
अशा परिस्थितीत ज्यावेळी इराणच्या बादशहाकडून एक
शिष्टमंडळाच भेट देण्यासाठी येत आहे ही वार्ता पोहोचली
त्यावेळी मोगल दरबारात मोठीच खळबळ उडाली ! आपली आणि आपल्या देशाची जणू ही कसोटीची वेळ आहे असेच अगदी बादशहापासून तो सर्वांत खालच्या
शिपायापर्यंत सर्वांना वाटू लागले !
दिल्ली च्या मोगल दरबारातील रीतीरिवाज आणि एकूण वागणूक यांचा निर्णय आशियातल्या सामाजिक रीतीरिवाजात सगळ्या दृष्टीने सर्वात पारंगत असणाऱ्या
इराणी विशेषज्ञांकडून होणार आणि ह्या आवडीनिवडींच्या अचुकपणात किंवा रीतीरिवाजात जर
आपण थोडेही कमी पडलो तर साऱ्या मुस्लिम जगतात
औरंगजेब बादशहा उपहासाचा आणि विनोदाचा विषय बनविण्यात आला असता.
इराणच्या बादशहाकडून ज्या देणग्या आल्या , त्यांची
किंमत ४ , २२ , ००० रुपये होती . २७ जुलै १६६१ रोजी
इराणच्या वकिलाला इराणला परत जाण्याकरिता निरोप
देण्यात आला . औरंगजेब बादशहाने बुदाक बेग आणि
त्याच्याबरोबर आलेल्यांना देणग्या दिल्या , त्याची किंमत
५ , ३५ , ००० रुपये भरली.इराणचा शाह अब्बासने जे
पत्र औरंगजेबसाठी पाठवले होते , त्याचे उत्तर घेऊन
मुलतानचा सुभेदार तरबियत खान ह्याच्या नेतृत्वाखाली
२ नोव्हेंबर १६६३ रोजी औरंगजेबाने प्रत्युत्तरा दाखल
आपले शिष्टमंडळ पाठवले.ह्या आपल्या वकीलाबरोब
औरंगजेबाने ७ लाखांपेक्षा जास्त किमतीचे नजराणे पाठवले होते . वकीलाबरोब जे पत्र दिले होते , त्यात औरंगजेबाने शहा अब्बासने आपल्या पत्रात ज्या मित्रत्वाच्या भावना व्यक्त केल्या होत्या , त्याबद्दल आभार
मानले.
परंतु आपण सर्वस्वी अल्लाच्याच कृपेवर अवलंबून असल्याने आपल्याला कोणत्याही माणसाच्या मदतीची
आवश्यकता नाही असाही मोठेपणाचा विचार त्याने त्यात
व्यक्त केला.व आपल्याला आत्तापर्यंत जे आश्चर्यकारक
विजय मिळत गेले त्यावरून आपल्यावर परमेश्वरांची
भरपूर कृपा आहे याचा पुरावा मिळतो , असा निर्देश त्याने
केला . आपल्या भावांविरुद्ध आपण कसे नेत्रदीपक विजय मिळविले याचे मोठे सुरस आणि लांबलचक वर्णनही केले . औरंगजेबाला वाटलं शहा आपलं पत्र
वाचून खुश होईल पण झाल उलटंच शहा जाम भडकला
त्याला औरंगजेबाच्या बढाईखोरपणाचा फार राग आला होता.
मोगल शिष्टमंडळ व वकिल हे शहाला जाऊन भेटले पण
शहाने या सर्वांची चांगली खरडपट्टी केली , भरदरबारात
त्यांचा अपमान केला आणि आपण हिंदुस्थानवर स्वारी
करणार आहोत अशी थेट धमकीच दिली.आपला
लेखनिस ताहीर वाहादकडून एक लांबलचक खोचक पत्र त्याने लिहून घेतले आणि ते औरंगजेबाच्या वकीला कडे
दिलं आणि त्यांना निरोप दिला.
त्या पत्रात शहा अब्बास म्हणतो :-
" मला असे कळते की,हिंदुस्थानातील बादशहा हा दुर्बल
अकार्यक्षम आणि निष्कांचन झाल्यामुळे हिंदुस्थानातील
बहुतांशी जमीनदारांनी त्याच्याविरुद्ध बंड पुकारले आहे
यातील एक प्रमुख जमीनदार म्हणजे शिवाजी भोसला
तो आतापर्यंत इतका गुप्तपणे राहत होता की , आत्ता-
पर्यंत त्याचे नावही कुणाला माहित नव्हते.परंतु आता
तुमच्याजवळ लढण्याकरीता पुरेशी साधने नाहीत हे
त्याला माहीत झाल्याने त्याचा फायदा घेऊन आणि
तुमचे सैन्य माघार घेत आहेत हे पाहून एखाद्या
पर्वताच्या शिखराप्रमाणे तो आता सर्वांना दृगोचर होत
आहे,तुमचे अनेक किल्ले जिंकले आहेत ,तुमच्या अनेक
सरदारांना व सैनिकांना त्याने ठार मारले आहे किंवा
कैदी बनविले आहे , तुमचा बराचसा प्रदेश त्याने
गिळंकृत केलेला आहे , तुमच्या प्रदेशातील बरीचशी
बंदरे , शहरे आणि खेडी त्याने लुटली आहेत किंवा
त्याची बरीच नुकसानी केली आहे आणि आता त्याला
तुमच्याविरुद्ध शेवटीच टक्कर घ्यावयाची आहे असे
आम्ही ऐकतो.तुम्ही स्वतःला जगज्जेता किंवा आलम-
गीर म्हणावीत परंतु खरी परिस्थिती अशी आहे की
तुम्ही तुमच्या वडिलांना फक्त जिंकले आहे व आपल्या
भावांचा वध करून आता तुम्हाला मन:शांती लाभली
आहे.बंडखोर शिवाचा बंदोबस्त करण्याची शक्ती आता
तुमच्यात उरली नाही.म्हणून प्रचंड सैन्यानिशी स्वतः
हिंदुस्तानात यावे तुम्हाला स्वतः भेटावे आणि आवश्यक
असेल ती मदत तुम्हाला करावी "......
पत्र वाचून औरंगजेबाचा मोठा तळतळाट झाला आणि त्याने आपला राग पत्र घेऊन येणाऱ्या आपल्या वकीलावर काढला.
ह्या शहाचा ऑगस्ट १६६७ मध्ये मृत्यू झाला आणि हिंदुस्थानावर आपण आक्रमण करू अशी जी त्याने धमकी दिली होती ती ही अशा रीतीने नाहीशी झाली
औरंगजेबाने मात्र शेवटपर्यंत इराणी सीमांवर सक्त नजर
ठेवली होती....
जय शिवराय....

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...