भाग २
पोस्टसांभार : https://www.misalpav.com/diwali2012/shilahar_tramrapt
उत्तर कोकणचे शिलाहार :
हे सुरुवातीला राष्ट्रकूटांचे मांडलिक होते. राष्ट्रकूट राजा दंतिदुर्ग याने उत्तर कोकण काबीज केल्यावर (साधारण इस. ७५०च्या आसपास) अनिरुद्ध नावाचा सरदाराला उत्तर कोकणाचा प्रांताधिपती केले. त्यानंतर साधारण इस. ७९०च्या आसपास कपर्दिन (पहिला) हा उत्तर कोकणच्या सत्तेवर आला. याच्यापासून उत्तर कोकण शिलाहार घराण्याची सुरुवात झाली. हा राष्ट्रकूट राजा गोविंद (तिसरा) याच्या समकालीन होता. कपर्दिनाने उत्तर कोकणात राष्ट्रकूट साम्राज्य वाढवायला भरपूर मदत केली आणि याची परिणती म्हणून याला उत्तर कोकणचे स्वामित्व मिळाले.
उत्तर कोकणाच्या शिलाहारांची राजधानी स्थानक अर्थात सध्याचे ठाणे ही होती. त्यांच्या पहिल्या राजधानीचे नाव 'पुरी' हे होते असे काही ताम्रपटांवरून आणि शिलालेखांवरून दिसते. काही संशोधक मुंबईजवळील घारापुरी बेट किंवा जंजिर्या जवळील राजापुरी हिलाच हे राजधानीचे ठिकाण मानतात. पण ठाणे जिल्ह्यातच कुठेतरी हे ठिकाण वसलेले असावे, असेही मानले जाते. यांच्या राज्यात प्रामुख्याने हल्लीच्या ठाणे आणि रायगड जिल्ह्यांच्या भूभागाचा समावेश होता. जवळपास १४०० गावे ह्यांच्या अमलाखाली होती.
या घराण्यात असंख्य राजे राज्य करून गेले. त्यापैकी कपर्दिन (पहिला व दुसरा), पुलशक्ती, झंझ, वज्जड, चित्तराजा, मुन्मुणी, अनंतदेव (पहिला व दुसरा), अपरादित्य (पहिला व दुसरा), केशीदेव (पहिला व दुसरा) व शेवटचा सोमेश्वर हे राजे प्रमुख होत.
ह्या शिलाहारांनी असंख्य मंदिरे बांधली. अंबरनाथचे कोरीव शिवमंदिर, ठाण्याचे कौपिनेश्वर मुन्मुणी राजाच्या कारकिर्दीत बांधले गेले, तर झंझ राजाने पूरचे कुकडेश्वर, हरिश्चंद्रगडावरचे हरिश्चंद्रेश्वर, खिरेश्वरचे नागेश्वर, रतनवाडीचे अमृतेश्वर अशी बारा शिवालये बांधली.
राष्ट्रकूट घराणे कमजोर झाल्यावर शिलाहारांनी जवळजवळ एकछत्री अंमल केला. पण नंतर ह्यांना गोव्याच्या कदंबांचे आणि त्यानंतर बदामीच्या चालुक्यांचे मांडलिकत्व पत्करावे लागले.
उत्तर कोकणातला शेवटचा शिलाहार राजा सोमेश्वर. देवगिरीच्या यादवसत्तेचा प्रभाव वाढू लागल्यावर यादवसम्राट कृष्ण याने आपला मल्ल नावाचा सरदार उत्तर कोकणच्या मोहिमेवर पाठवला. मल्लाने जरी सोमेश्वरचा पराभव केला, तरी त्याला उत्तर कोकणाचा कुठलाही प्रदेश ताब्यात मिळाला नाही. पण कृष्णाचा भावाने आणि यादवांचा उत्तराधिकारी महादेव यादवाने ही मोहीम अशीच चालू ठेवली. हत्तींचे प्रचंड सैन्यदळ घेऊन त्याने सोमेश्वरावर स्वारी केली. जमिनीवरच्या या युद्धात सोमेश्वर पराजित झाल्यामुळे त्याने पळून जाऊन समुद्रात आश्रय घेतला (बहुधा घारापुरी येथे). महादेव यादवाने उत्तर किनार्यावरच्या अरब मांडलिकांची मदत घेऊन भर समुद्रातही सोमेश्वराचा पाठलाग करून आरमारी युद्धात त्याचा संपूर्ण पराभव केला आणि उत्तर कोकणच्या शिलाहारांचे राज्य खर्या अर्थाने समुद्रात बुडाले. (इ.स. १२६५).
बोरिवलीच्या एकसर गावात असणार्या एका वीरगळात जमिनीवरचे हत्तींच्या साहाय्याने केलेले युद्ध आणि समुद्रावरचे नावांच्या साहाय्याने केलेले युद्ध कोरण्यात आलेले आहे.
उत्तर कोकणचे शिलाहार
उतर कोकणचे शिलाहार हे सध्याच्या ठाणे, मुंबई,रायगड या जिल्ह्यांवर राज्य करत होते. त्यांची राजधानी 'पुरी' म्हणजेच आताचे रायगड जिल्ह्यातील दंडराजपुरी होय. कपर्दी हा या घराण्याचा मूळ पुरुष होय.
उत्तर कोकणचे शिलाहार शासक
शासक कालखंड (इ.स.)
कपर्दी प्रथम ८००-८२५
पुल्लशक्ती ८२५-८५०
कपर्दी द्वितीय ८५०-८८०
वप्पूवन्न ८८०-९१०
झंझ ९१०-९३०
गोग्गीराज ९३०-९४५
वज्जड प्रथम ९४५-९६५
छद्वीदेव ९६५-९७५
अपराजित ९७५-१०१०
वज्जड द्वितीय १०१०-१०१५
अरीकेसरी १०१५-१०२२
छित्तराज १०२२-१०३५
नागार्जुन १०३५-१०४५
मुम्मिनीराज १०४५-१०७०
अनंतदेव प्रथम १०७०-११२७
अपरादित्य प्रथम ११२७-११४८
हरीपालदेव ११४८-११५५
मल्लिकार्जुन ११५५-११७०
अपरादित्य द्वितीय ११७०-११९७
अनंतदेव द्वितीय ११९७-१२००
केशीदेव द्वितीय १२००-१२४५
अनंतदेव तृतीय १२४५-१२५५
सोमेश्वर १२५५-१२६५
No comments:
Post a Comment