विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 2 April 2021

शिलाहार राजवंश भाग १

 






शिलाहार राजवंश
भाग १
पोस्टसांभार : https://www.misalpav.com/diwali2012/shilahar_tramrapt
महाराष्ट्रातील आद्य राजवट सातवाहनांनंतर इये देशी गुप्त, अभीर, कलचुरी, राष्ट्रकूट, चालुक्य, कदंब इत्यादींनी वेगवेगळ्या भूभागावर राज्य केले. साधारण इ. ८व्या शतकात इथे शिलाहारांची राजवट उभी राहिली ती मुख्यतः पश्चिम महाराष्ट्रात आणि कोकण प्रांतात. शिलाहार राजांनी जरी प्रामुख्याने राष्ट्रकूट आणि चालुक्यांचे मांडलिक म्हणून काम पाहिले तरी त्यांची राजवट अत्यंत प्रबळ असून त्यांचे मांडलिकत्व केवळ नामधारी होते. हे राजे स्वतःला महामंडलेश्वर, कोकणाधिप, कोकणचक्रवर्ती, राजाधिराज अशी बिरुदे लावत. संपूर्ण कोकणात आणि दक्षिण महाराष्ट्रात राज्य करणारे हे राजे स्वतःला विद्याधर राजपुत्र जीमूतवाहनाचा वंशज मानत. प्राचीन दंतकथेप्रमाणे जीमूतवाहनाने शंखचूड नावाच्या नागाला गरुडाच्या पंजातून सोडवण्यासाठी स्वतःच्या प्राणांचे बलिदान दिले होते. ह्या प्रसंगापासूनच त्यांच्या कुलाला शिलाहार (शिला-आहार) असे नाव पडले, असे मानले जाते. तर प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालयातील शिलाहार राजा छद्वैदेवाच्या ताम्रपटात सिलार नावाच्या पराक्रमी वीराने परशुरामाच्या बाणापासून संत्रस्त झालेल्या समुद्राचे रक्षण केले, असा उल्लेख आहे. याच सिलाराच्या कुळाला पुढे सिलारा-सिलाहारा-शैलाहार-शिलाहार असे नाव मिळाले, असेही समजले जाते.
शिलाहारांच्या जवळपास दहा वेगवेगळ्या शाखांनी महाराष्ट्रात आणि कर्नाटकात कारभार केला. पैकी महाराष्ट्रातील उत्तर कोकण, दक्षिण कोकण आणि कोल्हापूरचे शिलाहार ही तीन घराणी सर्वाधिक प्रबळ होत. उत्तर कोकणचे आणि कोल्हापूरचे शिलाहार स्वतःला तगरपुराधीश्वर असे गौरवाने म्हणवून घेत त्यामुळे उस्मानाबादजवळील तेर-तगर हे त्यांचे मूळ ठिकाण असावे, पण नंतर हे कोकणात स्थायिक झाले असावेत.
तत्कालिन राजांच्या शिलालेखांत, ताम्रशासनांत शिलाहारांच्या राजवटीविषयी, वंशावळीविषयी माहिती उपलब्ध आहे. प्रस्तुत लेखात मी जरी कोल्हापूर शिलाहार घराण्यातील गंडरादित्याच्या ताम्रपटाविषयी लिहिणार असलो, तरी तत्पूर्वी महाराष्ट्रातील शिलाहार घराण्यांतील तीन प्रमुख शाखांची थोडक्यात माहिती करून घेणे उचित ठरावे.

No comments:

Post a Comment

! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!

  ! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...