त्रिंबकजी डेंगळे—
हा आरंभीं दुसर्या बाजीरावाच्या पदरीं जासूद किंवा हेर म्हणून एक नोकर होता. इ.स. १८०२ मध्यें बाजीराव जेव्हां होळकराच्या तडाक्यांतून सुटण्याकरितां पुण्याहून महाडास पळून गेला तेव्हां त्रिंबकजीनें अगदीं थोड्या वेळांत बाजीरावाचें पुण्यास एक पत्र पोहोंचवून त्याचें ताबडतोब उत्तर आणू दिल्यामुळें पेशव्याची मर्जी प्रसन्न होऊन त्याला खास तैनातींतील जागा मिळाली. तेथें त्रिंबकजीची हुषारी, तडफ, तरतरीतपणा, व कामांतील दक्षता विशेष दिसून तो बाजीरावाचा विश्वासु बनला. पुढें पेशव्यानें तोफखान्यावरील सरदार गणपतराव पानशे याची जहागीर जप्त करुन त्रिंबकजीची त्याच्या जागेवर नेमणूक केली. त्रिंबकजी प्रथम माणकेश्वर व खुश्रूजी यांची मर्जी संपादन करण्याची खटपट करीत होता. परंतु त्यांचा अर्धवट कल इंग्रजांकडे दिसूं लागल्यामुळें ही गोष्ट त्यानें लागलीच बाजीरावाच्या कानावर घातली. पुढें माणकेश्वराच्या जागीं तो स्वतःच बाजीरावाचा मंत्री झाला.
इ.स. १८१२ मध्यें चतरसिंगानें पेशव्यांविरुद्ध दंगा माजवून बागलाणांतून स्वदेशीं जात असतां यानें त्यास कैद केलें व बेड्या घालून कांगोरीच्या किल्ल्यांत कैदेंत ठेविलें. चतरसिंगास सोडविण्याचे अनेक प्रयत्न झाले व एका तोतयानें तर त्याच्या नांवावर बंड आरंभून लुटालूट सुरु केली. तत्पक्षीय लोक संधि सांपडतांच त्रिंबकजीचा जीव घेण्यास टपून बसले होते. पुढें १७१३ सालीं खुस्त्रूजीनें कर्नाटकच्या सरसुभेदारीच्या जागेचा राजीनामा दिला तेव्हां बाजीरावानें त्या जागीं त्रिंबकजीची नेमणूक केली.
वसईच्या तहानें आपलें स्वातंत्र्य नष्ट झाल्याची जाणीव रावबाजीस मधून मधून होई व तें पुन्हां मिळविण्याची त्याची इच्छाहि होती. पण स्वतः कर्तबगार व धाडशी नसल्यानें कोणाची तरी त्याला मदत लागे. असे विश्वासु मदतनीस त्याच्याजवळ यावेळीं फारसे कोणी शिल्लक राहिले नव्हते. बहुतेकांनीं इंग्रजांशीं स्वतंत्र तह करुन आपापला स्वार्थ सांभाळला होता. त्यामुळें व त्रिंबकजी धाडशी असल्यानें पेशव्यानें त्यालाच हाताशीं धरिलें. त्रिंबकजी हा इंग्रजांचा द्वेष्टा होता. इंग्रजांचा कावा ओळखून त्याला तोड देणारा व मराठी साम्राज्य टिकविण्यासाठीं धडपडणारा त्रिंबकजी हा बापू गोखल्याप्रमाणें पेशवाईंतील शेवटचा पुरुष. त्यानें फौज जमविण्यात प्रारंभ केला व तिच्या जोरावर पुन्हां इंग्रजांशीं दोन हात करुन पहाण्याचा उद्योग चालविला या कामीं इतर सरदारांनीं मदत करावी म्हणूनहि त्यानें खटपट चालविली. सारांश हीं सर्व कृत्यें इंग्रजांच्या हेतूच्या (पेशवाई घेण्याच्या) आड येत म्हणून त्यांनीं त्रिंबकजीचा कांटा दूर करण्याचें ठरविलें. नाना फडणिसानंतर इंग्रजांनां त्रिंबकजीचा धाक होता.
त्रिंबकजीनें महत्त्वाचीं ठाणीं आपल्या विश्वासू माणसांच्या ताब्यांत देण्याचा उपक्रम केला. दक्षिणेंस धारवाडचा किल्ला मजबूत असल्यानें तो कबजांत घेण्याची त्यानें खटपट केली, परंतु तेथील किल्लेदार किल्ला त्याच्या हवालीं करीना, तेव्हां बापू गोखले यानें मध्यस्थी करुन किल्ला त्रिंबकजीस देवविला (१८१४) या वर्षी त्रिंबकजीनें पेशव्यास सल्ला देऊन त्याच्याकडून होळकर, शिंदे, बोंसले व पेंढारी यांच्या दरबारी इंग्रजांविरुद्ध दोस्ती करण्यासाठीं आपले वकील रवाना केले. पुढल्या वर्षी त्रिंबकजीची ब्रिटिश वकीलातीकडे नेमणूक झाली. अलीकडे पेशवे त्याच्या मुठींत आले होते. यावेळीं त्यानें राज्यांतील अव्यवस्था मोडण्यास प्रारंभ केला. तो कडक शिस्तीचा होता. त्याच्या शिक्षा सौम्य तर कधीं अत्यंत कडकहि असत. ठरल्याप्रमाणें इनामदार लोकांनीं चुकारपणा करुन वसूल भरणा केला नाहीं तर तो त्यांनां शिक्षा करी.
१८१४ सालीं त्रिंबकजीनें गुजराथेंत सरकारी फौज पाठवून गायकवाडाकडे इजार्यानें असलेले प्रांत ताब्यांत घेतले. कारण यावेळीं गायकवाडाचा गुजराथ इजार्यांचा करार संपला होता व नवीन करार करवायाची गायकवाडाची इच्छा होती.त्यासाठीं त्यांचा दिवाण गंगाधरशास्त्री पटवर्धन हा पुण्यास पेशव्यांकडे आला. शास्त्री फार हट्टी, हेकट व इंग्रजांच्या बळावर सर्वांस तुच्छ लेखणारा होता. गायकवाडाकडे सरकारची बाकी १ कोटी निघाली. ती देऊन मग वाटल्यास पु्न्हां इजारा देण्यांत येईल असें दरबारांत ठरलें; परंतु गायकवाडानें (शास्त्र्यानें) तें नाकारिलें व हें प्रकरण चिघळत चाललें. इतक्यांत पंढरपुरास शास्त्र्याचा खून झाला. या खुनाचा आरोप इंग्रजांनीं त्रिंबकजीवर केला; परंतु यास स्पष्ट आधार त्यांनीं दिले नाहींत. अलीकडील ऐतिहासिक शोधांवरून हा खून त्रिंबकजीनें केला नाहीं उलट गायकवाडींतील शास्त्रायाच्या विरुद्ध पक्षांतील लोकांनींच केला असें ठरत आहे. त्यावेळीं सिताराम नांवाच्या एकप्रभु माणसाची खटपट शास्त्रयाऐवजीं आपल्याला गायकवाडाची दिवाणगिरी मिळावी अशी होती. त्यासाठीं त्यानें फौज जमविली होती व याच सुमारास इंग्रजांनीं त्याला कैदेतहि ठेविलें होतें; यावरुन त्याच्या पक्षाकडून हा खून झाला असावा. इंग्रज त्याला दिवाणगिरी देत नव्हते. शिवाय शास्त्र्यांचा खून करण्यांत पेशव्यांचा (अर्थांत् त्रिंबकजीचा) मुळीच फायदा नव्हता, कारण त्यामुळें गुजरात हातची जात होती, उलट जिवंत राखण्यांतच फायदा होता असें क.वॉलेस म्हणत. अर्थात् आपल्या मार्गांतील कांटा काढण्यासाठीं इंग्रजांनीं खुनाचा आरोप त्रिंबकजीवर केला.
त्रिंबकजीनें आपला खुनाशीं कांही संबंध नाहीं किंवा आपणांस त्यासंबंधीं कांहीं माहितीहि नाहीं असे चक्क सांगितले. तथापि इंग्रज रेसिडेंटानें आपल्या फौजेच्या बळावर त्रिंबकजीस आपल्या स्वाधीन करण्याविषयीं बाजीरावाच्या मागें लकडा लावला. पण बाजीराव त्यास इंग्रजांच्या हवालीं करण्यास कांकूं करूं लागला. शेवटीं नाइलाजानें बाजीरांवानें त्रिंबकजीस वसंतगड नामक किल्ल्यांत अटकेंत ठेविलें; तरीहि इंग्रजांचें समाधान न होतां त्यांनीं त्रिंबकजीस आपल्याच हवालीं करण्याचा तगादा लाविला तेव्हां गांगरून (आणि अंगीं धैर्य नसल्यानें) बाजीरावानें त्यास इंग्रजांच्या स्वाधीन केलें (२५ सप्टेंबर १८१५).
इंग्रजांनीं त्रिंबकजीस ठाण्याच्या किल्ल्यांत अटकेंत ठेवले. याच्यावर जे पहारेकरी ठेविले होते त्यांत बहुधा, खबरदारी घेण्याचा उद्देशानेंच, एकहि हिंदी माणूस ठेवला नव्हता. ह्याचा फायदा घेऊन त्रिंबकजीनें सप्टेंबरच्या १२ दरम्यान तटावरुन उडी मारुन आपली सुटका करुन घेतली. त्रिंबकजी निसटून जाण्याच्या कांहीं दिवस अगोदर त्याची मित्रमंडळी व नोकरचाकर आसमंतांत येऊन त्याची वाट पहात होते. त्रिंबकजीस त्यांचा निरोप कळविण्याचें काम किल्ल्यांतील एका अधिकार्याच्या मोतद्दरानें केलें. त्रिंबकजीस ज्या खोलींत ठेविलें होतें तिच्या खिडकीखालीं आपल्या घोड्याची चाकरी करीत असतां हा मोतद्दार त्रिंबकजीस कळवावयाची माहिती अगदीं बेफिकीरपणानें गात असे. पहारेकर्यांस मराठी येत नसल्यामुळें त्यांनां ही लबाडी ओळखतां आली नाहीं. त्रिंबकजीनें ज्या अडचणींतून आपली सुटका करुन घेतली ती हकीकत ऐकून लोकांत त्याच्याबद्दल कौतुक व आदर वाढला. यानंतर त्रिंबकजीनें पुन्हां फौज जमवून कधीं नाशिक व संगमनेर यांच्या आसमंतांतील डोंगरांत, कधीं खानदेश बागलाणांत तर कधीं सातार्याकडील महादेव पर्वतांत फिरून इंग्रजांच्या विरुद्ध त्यानें दंगा उसळून दिला. त्याला पकडण्यासाठीं इंग्रजांनीं फार खटपट केली, परंतु पुष्कळ दिवस ती सिद्धीस गेली नाहीं. त्याचा खरा पत्ताच लागेना. तो आपल्या सासुरवाडीस (नाशिक जिल्हा, निफाड तालुका, निफाडहून वायव्येस ५ कोसांवर) अहिरगांवीं गुप्तपणें राहिला होता.
यावेळीं कोरेगांवची लढाई होऊन एलफिन्स्टननें आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला होता; त्याप्रमाणें पेशवाईंतील सर्व मराठे सरदार, इनामदार इंग्रजांनां मिळाले होते व रावबाजी एकटे पडले. इंग्रजांनीं तशाहि स्थितींत त्रिंबकजी हा पेशव्यांच्या तर्फे धुमाकूळ घालीत असल्यानें त्याला पकडण्यासाठीं मोठमोठीं बक्षिसें लाविलीं. तेव्हां एका स्त्रीनें व त्रिंबकजीचा नोकर नाना यानें फितूर होऊन, ब्रिग्ज यांस त्रिंबकजीच्या ठिकाणाची माहिती दिली. कॅ. स्वान्स्टन हा एक हजार घोडदळाची पलटण घेऊन अहिरगांवीं आला. यावेळीं त्रिंबकजी तेथें एकटाच होता; फौजपांटा मुळींच नव्हता. गांवची नाकेबंदी करुन इंग्रजांनीं पहाटें त्रिंबकजीच्या वाड्यास गराडा दिला. वाडा दोनदां तळघरें बळदासंकट शोधला, परंतु त्रिंबकजी सांपडेना. शेवटीं तिसर्यानें पुन्हां शोधला तेव्हां मात्र त्रिंबकजी सांपडला. एका बळदांत एका लोखंडी चोरदाराच्या पलीकडे बुरूजावर जाण्याचा एक जिना होता. तेथली भिंत त्रिंबकजी फोडीत होता. त्याला धरण्यास जात असतां जिन्यावरील एका मराठ्यानें त्यांनां अडथळा केला. जीं जीं माणसें धरण्यास गेलीं तीं या मराठ्यानें आपल्या भाल्यानें ठार केलीं. त्यांची संख्या तीस भरली. शेवटीं स्वान्स्टननें भालाइतावर गोळ्या झाडण्यास हुकूम केला व त्यामुळें मात्र तो मराठा पडला. असा तो शूर भालाईत पुरुष नसून (त्रिंबकजीची) स्त्री आहे हें समजल्यावर स्वान्स्टन यास फार आश्चर्य वाटलें. त्रिंबकजी भिंत फोडीत असतां, त्याच्या अंगावर जाण्याची हिंमत कोणाचीच होईना तेव्हां निराशेनें त्रिंबकजी आपणच होऊन इंग्रजांच्या स्वाधीन झाला. त्यास नंतर बंगालमध्यें एका किल्ल्यांत (चुनार) अखेरपर्यंत कैदेंत ठेविलें. त्याची ९० हजार रुपयांची मालमत्ता इंग्रजांनीं जप्त करुन ती स्वान्स्टन यास बक्षीस दिली (जून १८१८). (डफ; नाशिक ग्याझेटियर; राजवाडे खंड ४).
No comments:
Post a Comment