जरीपटका -
मराठ्यांचा भगवा झेंडा म्हणून राष्ट्रीय निशाण प्रसिद्धच आहे. त्याशिवाय जरीपटका म्हणून दुसरें एक मराठ्यांचे निशाण असे. तें राजारामाच्या कारकीर्दीत प्रचारांत आलें असावें. राजाराम हा जिंजीस गेल्यावर तेथें त्यानें जें प्रधानमंडळ नेमिलें त्यांत संताजी घोरपड्यास सेनापतीचें पद दिलें होतें. त्यावेळीं त्या पदाचीं वस्त्रें व इतर मानमरातब देतांनाच हें जरीपटका निशाण त्याला दिलें. जरीपटक्याबरोबरच नौबत असे. तिला साहेबी नौबत म्हणत. पुढें सेनापति (दाभाडे) दुर्बल झाल्यावर व पेशव्यांच्या हातीं सर्व राज्यकारभार आल्यावर, त्यांच्या खास हुजरातींत जरीपटका व साहेबीनौबत आली. ज्या ज्या वेळीं मोहिमेवर जाण्याचा प्रसंग येई त्यावेळीं लढाईंत हा जरीपटक्याचा हत्ती मराठ्यांच्या सैन्याच्या अघाडीस असे. त्याचें रक्षण करण्याच्या कामीं अत्यंत शूर सरदाराची नेमणूक होत असे. खुद्द पेशवे ज्या मोहिमेंत हजर नसत त्यावेळीं जो सरदार मोहिमेवर नेमला जाई त्याच्या हवालीं जरीपटका व नौबत करीत, शत्रूनें तो हस्तगत केल्यास तो परत मिळविण्यासाठीं मराठा सेनापती समईं प्राणहि देई. परशुरामभाई, त्र्यंबकराव मामा पेठे, हरिपंततात्या फडके वगैरे सरदारांच्या हवाली जरीपटका नेहमीं करण्यांत येई. प्रस्तुत हा जरीपटका नेपाळांत राणीपुर येथे (पेशव्यांची गादी जेथें नानासाहेब-धोंडोपंत-पेशव्यांच्या कुटुंबानें स्थापन केली आहे, तेथेंच) आहे असें म्हणतात.
No comments:
Post a Comment