विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 23 May 2021

भगवा आणि जरीपटका ह्यात फरक काय?

 भगवा आणि जरीपटका ह्यात फरक काय?

भगवा ध्वज' व 'जरीपटका' ही दोन निशाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रचलित केलि होती. त्यातील 'जरीपटका' हे निशाण छत्रपतीनी अष्टप्रधान मंडळातील पेशवे, प्रतिनिधि व सेनापती यांना दिले होते. पुढे छत्रपती शाहू महाराजांनी 'लष्करी व मुलकी' अधिकाराचे द्योतक म्हणून जरीपटका बाळगण्यास फक्त पेशव्यांना परवानगी दिल्याने जरीपटका हे निशाण पेशव्यांचे म्हणून प्रसिद्ध झाले.
जरीपटका' या निशाणाची संकल्पना वैदिक काळापासूनची होती. 'जर्झर' (इंद्राचा ध्वज) आणि 'कपटक' (कापडाचा तुकडा) हे २ शब्द मिळून 'जर्झरीपटका' हा जोडशब्द तयार झाला व त्याचा अपभ्रंश 'जरीपटका' होऊन तो शब्द प्रचारात आला. पेशवे जरीपटक्याला आपल्या जिवापेक्षा जास्त जपत असत. पेशव्यांनी १०४ वर्षे आपल्या फौजेत जरीपटका फडकत ठेवला होता.
शिवाजी महाराजांच्या झेंड्याचे जे एकमेव प्रत्यक्षदर्शी वर्णन उपलब्ध आहे ते महाराजांच्या आग्रा भेटीच्या वेळचे आहे. शिवाजी महाराज आग्र्याला असताना, मिर्झा राजा जयसिंहाचा आग्रा येथील अधिकारी परकालदास याने जयसिंहाचा अंबर येथील दिवाण कल्याणदास याला लिहिलेल्या पत्रात हे वर्णन आले आहे. पत्राची तारीख ज्येष्ठ शुद्ध ६ [संवत १७२३] म्हणजे २९ मे १६६६ अशी आहे. पत्रात आलेले झेंड्याचे वर्णन पुढीलप्रमाणे
" सेवाजीकौ नारंजीसी दरीयाई का नीसान सोनहरी छापा चालौ छे जी "
याचा मराठी अर्थ ,
"शिवाजी महाराजांचे नारिंगीशा रेशमी कापडाचे निशाण , सोनेरी छापांचे छापलेले , चालते )
नारंज म्हणजे संत्रे आणि नारंजी म्हणजे संत्र्याच्या रंगाचे , नारिंगी. हे फार्सी शब्द आहेत. फार्सीत एका विशिष्ट प्रकारच्या रेशमी कापडाला दाराई म्हणतात. हिंदी मध्ये त्याच कापडाला दरियाई असे म्हणतात.
या वर्णनावरून नारिंगी रंगाच्या रेशमी कापडावर सोनेरी नक्षीचे छाप असलेले शिवाजी महाराजांचे निशाण असावे असे दिसते . पत्र लिहिणारा परकालदास हा त्यावेळी आग्रा येथे स्वतः हजर होता त्यामुळे त्याने प्रत्यक्ष डोळ्याने शिवाजी महाराजांना आणि त्यांच्या निशाणाला पाहिले होते, त्यामुळे त्याने केलेल्या वर्णनांविषयी शंका असण्याचे काही कारण नाही.
जरीपटका
पुढील काळात मराठयांचे जरीपटका हे निशाण प्रसिद्ध झाले. परंतु ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री य.न.केळकर यांच्या म्हणण्यानुसार, जरीपटका हे निशाण भोसल्यांच्या कुळात पूर्वीपासून होते. आपल्या 'भगवा झेंडा व जरीपटका' या लेखात ते लिहितात:-
"इतिहाससंग्रहात 'भोसल्यांचे कुलाचार' या प्रकरणात पोशाखखाना पोट कलम नं १ वर पुढील आज्ञा आहे. "दसऱ्याबद्दल वगैरे दागिने जरीपटका व भगवे निशाण व अब्दागिरे व बाण बैरागा व लगी व कावडी हे नवे जाल्यास (नवे केल्यास) जुने दागिने गवसणी अस्तरसुद्धा परत जामदारखान्याकडे यावे म्हणून कलाम लिहिले आहे त्याप्रमाणे येत जातील "
त्याच प्रकरणात पुढे जाबता जिराईतखाना पोट कलम नं. १ वर पुढील आज्ञा आहे.
"निशाण भगवे व जरीपटक्यास नैवेद्य येतो , त्यापैकी केसरकर यांस मुंडी व फरा एक, बाकी निम्मे राहील ते भोसले निम्मे व आम्ही निम्मे म्हणोन कलम लिहिले आहे . त्यास शिरस्ता चालत आल्याप्रमाणे करणे."
मेजर टोन याने केलेले जरीपटक्याचे वर्णन
मेजर हेन्री टोन हा पेशव्यांच्या पायदळाच्या एका तुकडीचे नेतृत्व करत असे (दुसऱ्या बाजीरावाच्या काळात ) त्याने मद्रास येथील एका इंग्रज अधिकाऱ्याला लिहिलेल्या पत्रात मराठयांसंबधी आणि पेशवे दरबार संबधी काही निरीक्षणे लिहून ठेवली आहेत, ती मुळातूनच वाचण्यासारखी आहेत. त्याचे हे पत्र The Asiatic Annual Register, Or, a View of the History of Hindustan and of the Politics, Commerce and Literature या पुस्तकात , "Illustrations of some institutions of the Mahratta People" या शीर्षकाखाली छापलेले आहे. त्यामध्ये जरीपटक्याचे वर्णन करताना तो म्हणतो ,
" In the great durbar of Poonah all the higher offices are hereditary. The dewan, the furnavese, chitnavese, and even the commander in chief , or the holder of the jerry-put
यातील jerry-put म्हणजे जरीपटका या शब्दाला त्याने पुढील तळटीप दिली आहे:-
"The jerry-put is a small standard, made of cloth of gold, or, as it is called jarre : it is cut swallow-tailed, and it does not exceed the size of a common handkerchief. This is the ensign of the empire, and is never displayed, but when the peshwa takes the field in person"
याचा मराठी अर्थ असा :-
"जरी पटका हे एक लहान आकाराचे निशाण आहे. ते जरीच्या कापडाचे असते. ते स्वालो पक्षाच्या शेपटी सारखे मधून मधोमध कापलेले असते. त्याचा आकार सर्वसाधारण हातरुमाला पेक्षा मोठा नसतो. हे मराठा साम्राज्याचे राजचिन्ह आहे व ते पेशवा स्वतः रणांगणा वर उतरला असेल तरच लावले जाते. "
मोडी लिपी तज्ज्ञ श्री माधवराव ओंकार यांच्याकडून प्राप्त झालेली माहिती
दिवंगत श्री माधवराव ओंकार (मा. मो. ओंकार) हे मोडी भाषा तज्ज्ञ होते आणि जुनी मोडी कागदपत्रे वाचण्यात त्यांचा हातखंडा होता व त्यांनी शिवकालीन आणि पेशवेकालीन हजारो कागदपत्रे त्यांच्या हयातीत वाचली होती . श्री ओंकार यांनी ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री. गजानन भास्कर मेहेंदळे यांना जरीपटक्या संबंधी पुरवलेली माहिती, मला श्री मेहेंदळे यांच्याकडून प्राप्त झाली, ती अशी:-
"ज्या प्रमाणे डोक्यावर बांधल्या जाणाऱ्या पटक्याचे किंवा फेट्याचे एक टोक मागे गोंड्यासारखे किंवा झिरमिळ्यांसारखे सोडले जाते, त्याचप्रमाणे मराठ्यांच्या जरीपटक्याला मागे एक टोक गोंड्या सारखे सोडलेले असे, त्यावरूनच या निशाणाला जरी 'पटका' असे म्हणण्याची पद्धत पडली
लेखन सीमा
संदर्भ :-
१) श्री राजा शिवछत्रपती - श्री. ग .भा. मेहेंदळे
२) 'भगवा झेंडा व जरीपटका' - श्री. य. न. केळकर (इतिहासातील सहली या पुस्तकातून)
३) The Asiatic Annual Register, Or, a View of the History of Hindustan and of the Politics, Commerce and Literature, 1799, पृ. १२८


2 comments:

  1. Many thanks
    Prasad Jaripatke

    ReplyDelete
  2. धन्यवाद
    छान माहिती सांगितली

    ReplyDelete

! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!

  ! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...