विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 14 June 2021

सेनापती खंडेराव दाभाडे गढी - पारनेर

 























सेनापती खंडेराव दाभाडे गढी - पारनेर
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर या तालुक्याच्या गावी सेनापती खंडेराव दाभाडे यांची गढी आहे. पारनेर हे गाव पुणे - नगर महामार्गावरील सुपे या गावापासून १५ कि.मी अंतरावर आहे. पारनेर ही प्राचीन नगरी आहे ही ऋषी पराशर यांच्या वास्तव्याने पावन झालेली आहे. पारनेर गावाच्या सुरवातीला दोन बुरूज आहेत आणि प्रवेशद्वार आहे. बुरूजावर चार शिलालेख आहेत. ते शिलालेख दगडाच्याजागी बसवले आहेत असं जाणवते. जवळच शिवमंदिर आहे आणि बाजूला वीरगळ ठेवलेली आहे. आतमध्ये पुरातन मंदिरे, वाडे आहेत. सेनापती खंडेराव दाभाडेंच्या गढीचे प्रवेशद्वार भव्य आहे. प्रवेशद्वारावर शरभशिल्प, कमळशिल्प, खूप रेखीव असे अश्वशिल्प आहे. आतमध्ये वाड्याच्या लाकडी कामाचे अवशेष आहेत. वाड्याची पडझड झालेली आहे. पारनेरपासून जवळच असलेले हंगा गाव हे स्वराज्याचे हेर शूर बहिर्जी नाईक यांचे जन्मगाव आहे.
छत्रपती शाहू महाराजांनी सेनापती खंडेराव दाभाडे यांना पारनेर परगण्यातील १०४ गावांची सरदेशमुखी दिली. याबद्दलचा उल्लेख इतिहास साधनात पुढीलप्रमाणे आहे "बाळाजी विश्वनाथ यांस पेशवाईची वस्त्रे दिली त्यानंतर खंडेराव दाभाडे यांजवर कृपाळू होवून सेनापतीपदाची वस्त्रे दिली. तो चाकण ६३ देहे व परगणे पारनेर देहे १०४ यांची सरदेशमुखी दर सद्दे देहोत्रा फडफर्मास याची सनद राजशक ५३ पराभवनाम संवत्सरे श्रावण बहूल सप्तमी, पुत्रपौत्रादी वंशपरंपरेने करून दिली याची आलाहिदा असे." पारनेरमधील औटी आणि कावरे यांची भांडणे मिटवण्यासाठी सेनापती पारनेर आले तेव्हा वाड्याचे बांधकाम सुरू केले असे सांगितले जाते. सेनापती दाभाडे यांची जहागिरी मावळातील तळेगाव, इंदुरी या गावी पण आहे.
टीम - पुढची मोहीम

1 comment:

राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला 🚩 भाग 9

  राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला भाग 9 लखुजीराजे जाधवरावांची हत्या भातवडीच्या युद्धानंतर मलिक ...