विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 8 June 2021

चाळुक्य उर्फ साळुंखे राजांनी बांधलेले जेजुरी येथील खंडेराय मंदिर..

 


चाळुक्य उर्फ साळुंखे राजांनी बांधलेले जेजुरी येथील खंडेराय मंदिर..

------------------
येळकोट येळकोट जय मल्हार ।।
------
@
जेजुरी येथील खंडेराय-म्हाळसाईचे मंदिर हे स्टारफिश आकार आणि त्रिकुटपंथीे स्वरूपातील बांधकामाचा सुंदर समन्वयी आविष्कार असून, हे मंदिर बावीस दगडी खांबावर टेकलेले हेमाडपंती स्वरूपातील मंदिर आहे. या मंदिराचे निर्माण सातव्या शतकातील चाळुक्यीय स्थापत्य शैलीचा एक उत्कृष्ट नमुना मानला जात असून, सदरील मंदिराचे निर्माण हे चाळुक्य उर्फ साळुंखे नरेश, राजा पुलकेशी चाळुक्य दुसरा यांनी सातव्या शतकात केलेले आहे. हे मंदिर निर्माण म्हणजे चाळुक्यांच्या स्थापत्य शैलीतून साकारलेली एक सुंदर अशी अद्भूत कलाकृती आहे.
चाळुक्यीय स्थापत्य शैलीतून सातव्या शतकात निर्माण झालेले हे खंडेराय-म्हाळसाईचे मंदिर बावीस दगडी खांबावर टेकलेले आणि लहानमोठ्या एकूण तेरा घुमटांनी बनवलेलेे मंदिर आहे. हे मंदिर स्टारफिश आणि त्रिकुटपंथी अशा दोहोंच्या सुंदर समन्वयातून साकारलेले हेमाडपंती मंदिर असून, ते चाळुक्यीय स्थापत्य शैलीतून साकारलेल्या उत्कृष्ट कलेचा एक सुंदर नमुना आहे. या मंदिराचे निर्माण राजा पुलकेशी चाळुक्य यांनी इ.सनाच्या सातव्या शतकात केलेले असून, त्यानंतरच्या काळात अनेक स्थित्यंतरे झेलत देखील हे मंदिर दिमाखात उभे आहे. या मंदिराची निर्माण स्थापत्य शैली ही स्पष्टपणे चाळुक्यांची दिसत असूनही, हे मंदिर चाळुक्यांनी बांधलेले आहे असे कोठेही वाचायला न मिळावे हे मात्र खरोखरच दुर्दैव म्हणावे लागेल.
खंडेराय हे शिव, सूर्य आणि भैरवाचे एकत्रित अधिष्ठान मानले जाते. शिवाय या ठिकाणी शिव आणि शक्तीचे सुद्धा एकत्रित अधिष्ठान आहे. पांडवांनी सह्याद्री पर्वतरांगेत परिक्रमा करून, ज्या ठिकाणी वाळूचे शिवलिंग बनूवून भगवान शिवाचि पूजा केली. अशा ठिकानांना पुढे तीर्थाचे स्वरूप आले. अशा या सर्व ठिकानांना शोधून चाळुक्य राजा पुलकेशी (दुसरा) यांनी इ.सनाच्या सातव्या शतकात महादेवाची अनेक हेमाडपंती मंदिरे बांधली. या मंदिर बांधकामाच्या काळातच राजा पुलकेशी चाळुक्य यांनी जेजुरी भागातील भगवान शिव, पार्वती (म्हाळसा), भगवान विष्णू, लक्ष्मी, बानाई आदींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जेजुरीगडावर आपल्या चालुक्यीय स्थापत्य शैलिनुसार भगवान खंडेरायांचे भव्य हेमाडपंती मंदिर बांधून पूर्ण केले.
खंडेराय-म्हाळसाई मंदिराच्या म्हणजे जेजुरीगडाच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे पायऱ्या चढून वर येताना दोन कमानी (दरवाजे) चढून वर आल्यावर बानूबाईचे मंदिर लागते. तिथेच शेजारी क्रांतिवीर उमाजी नाईक यांचा पुतळा आहे. अजून एक दरवाजा ओलांडून काटकोनातून वर आले, की छोट्या छोट्या आकारातील अकरा दीपमाळी आणि अष्टकोनी टेहेळणी बुरूज नजरेस पडतात. या दीपमाळी आणि अष्टकोनी टेहेळणी बुरूज आपल्या (भक्तांच्या) स्वागतालाच उभ्या आहेत, की काय असा भास होतो. या टेहेळणी बुरुजाकडे बारकाईने पाहिल्यास त्यावर वराह शिल्पे कोरलेेली दिसतात. ही शिल्पे पाहिल्यावर हे मंदिर चाळुक्यांनी बांधले असावे, असे सर्वात पहिल्यांदा लक्षात येते.
या ठिकाणावरून मंदिराचा मुख्य दरवाजा एकदम समीप आल्याचे वाटते; मात्र या दरवाजाकडे जातांना पायऱ्याची चढण (ठेवण) उंच आणि मोठी झालेली दिसते. मुख्य दगडी दरवाजाच्या उंबऱ्यावर चाळुक्यांनी त्यांच्या स्थापत्य शैलिनुसार कीर्तीमुख कोरलेले दिसते. मुख्य दरवाजा आणि त्याच्या इतर तीन कमानी चढून वर गेल्यावर आपला मंदिराच्या तटबंदी आतील आवारात प्रवेश होतो. यासाठी आपल्याला जेजूरगडाच्या तब्बल तीनशे पंच्याऎंशी पायऱ्या चढून वरती जावे लागते. मुख्य दरवाजातून आतील मंदिर आवारात गेल्यावर पाठीमागे दरवाजाकडे ओळून पाहिले, की दरवाजाच्या दोन्ही बाजूंनी चाळुक्यांनी त्यांचे राजचीन्ह असलेले वराह शिल्प कोरलेले दिसून येते. यावरून हे मंदिर निर्माण चाळुक्यांच्या स्थापत्य शैलिचा नमुना असल्याचिच प्रचिती येतेे.
मंदिराच्या तटबंदी आतील आवारात जाताच खंडेराय-म्हाळसाईच्या मंदिरासमोरील भव्य दीपमाळा आपले चटकन लक्ष वेधून घेतील अशाच आहेत. या रेखीव आणि सुंदर दगडी दीपमाळा चाळुक्यांनी त्यांच्या स्थापत्य शैलिनुसार बांधलेल्या आहेत. या दीपमाळा चाळुक्यांनी पाषाण दगडाने सुंदर आणि रेखीव अशा बनविल्याने, त्या लक्ष वेधून घेतील अशाच आहेत. या दीपमाळावर देखील इतर चिन्हांप्रमाणे चाळुक्यांनी आपले राजचिन्ह असलेले वराह चिन्ह (शिल्पे) कोरलेली आहेत. मंदिरासमोर लहानमोठ्या मिळून दहा दीपमाळा आणि एक अष्टकोनी टेहेळणी बुरूज असून, या बुरुजावर सुद्धा चाळुक्यांनी आपले राजचिन्ह वराह शिल्पे कोरलेली असल्याचे दृष्टीस पडतात. टेहेळणी बुरूजाच्या आतून सुंदर घडीव दगडी पायऱ्या असून, या पायऱ्यावरून टेहेळणी बुरूजावर जाता येते.
देशात आणि महाराष्ट्रात ज्या ज्या राजकुळांनी धर्मराज्य करून, आपल्या राजकर्तव्याचे माप देशाच्या आणि महाराष्ट्राच्या पदरात पुरेपूर ओतण्याचे काम केलेले आहे. अशा सर्व राज कुळांचा अभ्यास केला, तर या राजकुळांच्या यादीत चाळुक्यांचे नाव खूपच वरच्या क्रमांकावर येते. चाळुक्य घराणे हे मल्लवंशीय घराणे असून, या घराण्यातील प्रत्येक राजा आपल्या नावासमोर मल्ल ही बिरुदावली अभिमानाने लावत होते. त्यावरून पुराणात उल्लेख होणारा मल्ल दैत्य हा दुसरा तिसरा कोणी नसून, तो चाळुक्यवंशीय क्षत्रिय राजा असावा, अशा शक्यतेलाच पुष्ठीच मिळते. शिवाय चाळुक्य उर्फ साळुंखे हे राजे शिवाचे उपासक घराणे असल्याने, म्हणूनच चाळुक्य नरेश पुलकेशी दुसरा याने खंडेरायांच्या मंदिरासमोर तटबंदिला चिकटून मल्ल (दैत्य) राजाची प्रतिकृती उभी केलेली आहे.
खंडेराय-म्हाळसाईच्या मंदिरासमोरच्या आवारातील दीपमाळांना वळसे घालतच, आपण देवाच्या गाडी बगाड आणि नंदी घरासमोर येवून पोहोचतो. या दोन्ही ठिकाणी नतमस्तक होत होतच तिथून आपला जेजुरी येथील खंडेराय-म्हाळसाई देवाच्या मंदिरात प्रवेश होतो. तत्पूर्वी मंदिरात प्रवेश करताना भले मोठे पहुडलेले कच्छप (कासव) आणि मंदिराच्या सदरेला ओलांडूनच आपल्याला मंदिर प्रवेश करावा लागतो. मंदिरातील प्रवेश सर्वप्रथम छोटेखानी सभागृहात होतो. हे सभागृह आठ दगडी खांबावर टेकलेले असून, ते तीन छोट्या घुमटाचे बनलेले आहे. या सभागृहातील प्रवेशद्वारावर वरच्या बाजूला चाळुक्यांनी गणेशपट्टी कोरलेली असून, गणेशपट्टीच्या दोन्ही बाजूला आपले राजचिन्ह वराह शिल्प कोरलेले आहे.
तीन घुमटाच्या छोटेखानी सभामंडपातून आपला प्रवेश मंदिराच्या मुख्य सभागृहात होतो. मंदिराचा मुख्य सभामंडप हा सोळा दगडी खांबावर टेकलेला असून, हा सभामंडप छोट्या छोट्या आकारातील नऊ घुमटांचा बनलेला आहे. सभामंडपात धातूचा तसेच दगडावरील देवाचा आश्वारुढ पुतळा नजरेस पडतो. तिथूनच समोर असलेले देवाचे गर्भगृह आपल्या दृष्टीस पड़ते. गर्भगृहाच्या दरवाजाच्या वरील उंबऱ्यावर चाळुक्यांनी त्यांच्या स्थापत्य शैलिनुसार गणेशपट्टी कोरलेली असून, गणेशपट्टीच्या दोन्ही बाजूला आपले राजचिन्ह असलेले वराह शिल्प कोरलेले आहे. तसेच दरवाजाच्या डाव्या बाजूच्या खाम्बावर गणेश मूर्ती कोरलेली असून, उजव्या खाम्बावर संगमरवराची यक्षमूर्ती बसवलेली आहे.
देवालयाच्या प्रशस्त सभामंडपातून गर्भगृहाच्या दगडी दरवाजातून आपला खंडेराय-म्हाळसाई मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश होतो. देवाचे गर्भगृह प्रशस्त असेच असून, ते चार दगडी खाम्बावर टेकलेले आहे. देवाच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांना मात्र देवाच्या गर्भगृहात प्रवेश दिला जात नाही. मंदिराच्या गर्भगृहात देवाचा भला मोठा असा देव्हारा असून, त्यात खंडेराय, म्हाळसाई, बानाई, इत्यादि असे मुखवटे ठेवलेले आहेत. त्याखाली खंडेराय-म्हाळसाई, बानाई यांचे लिंग असून, सदरील लिंग हे उत्तराभिमुख असेच आहे. देवाच्या अभिषेकाचे तीर्थ बाहेर जाण्यासाठी चाळुक्यांनी मंदिराच्या बाहेरून उत्तर बाजुला गोमूखतीर्थ बसवलेले आहे. गर्भगृहात भिंतितिल मोठ्या देवळीच्या कोनाडयामध्ये सोनारी, ता. परान्डा येथील श्री.सिद्धनाथ काळ भैरवनाथांची बैठी मूर्ती ठेवलेली आहे.
मंदिराच्या मागच्या भिंतीला एका सुंदर दगडी डिझाइन केलेल्या देवळीमध्ये एक बैठी पाषाण मूर्ती बसवलेली आहे. या मूर्तिवर भंडाऱ्याचे लोट तयार झाल्याने, ही मूर्ती काळ भैरवाची की कार्तीकाची! हे समजने मुश्किल आहे. मंदिराच्या लगोलग मागे तुळजाभवानी देवीचे मंदिर असून, देवी मंदिराच्या मागे आणि पुढे दोन्ही बाजुला प्रत्येकी दोन दीपमाळा आहेत. देवी मंदिराच्या शेजारी भूलेश्वराचे (महादेव) मंदिर आहे. भूलेश्वराच्या अगदी मंदिरा शेजारीच उत्तरेकडून पंचलिंग महादेव मंदिर असून, या मंदिरातील भगवान शिवाच्या एका साळुंखीमधे मल्हार, काशी, मातापूर, निलाद्रि आणि हरिद्वार असे पाच लिंग असल्याचे सांगितले जाते. महादेवाच्या एका साळुंखीमधे पाच शिवलिंग असण्यामागे सुद्धा काहीतरी ऋषी आख्यायिका सांगण्यात येते.
पंचलिंग महादेव मंदिराचे उत्तरेकडून शेजारीच देवाचे ओवऱ्या स्टाईलचे कमानीचे भांडारगृह आहे. या भांडारगृहाची स्थापत्य शैली देखील चाळुक्यीय स्टाईलप्रमाणेच असून, हे भांडारगृह देवाच्या मुख्य मंदिर सभामंडपा प्रमाणेच सोळा खाम्बावर टेकलेले आहे. हे भांडारगृह देखील देवाच्या मंदिराप्रमानेच नऊ घुमटांचे बनलेले असून, या भांडारगृहामध्ये देवाचे शेजघर आहे. शेजघरा शेजारी देवाचे भांडारगृह असून, त्या शेजारी काशी विश्वेश्वराचे मंदिर आहे. हे भांडारगृह देखील सातव्या शतकातील चाळुक्यीय स्थापत्य शैलीचा एक दर्जेदार नमुना आहे. सोमवती अमावस्या आणि दसऱ्याच्या दिवशी देवाची यात्रा असते, या यात्रेनिमित्ताने इथूनच देवाची पालखी निघते. तिची उत्सवमूर्ती याच भांडारगृहात ठेवली जाते.
मंदिर आवारात तटबंदिच्या आत उजव्या बाजुला बावीस ओवऱ्या असून, मंदिराच्या डाव्या बाजुला दरवाजा सोडून सत्तावीस ओवऱ्या आहेत. मंदिराच्या पाठीमागील बाजूस प्रवेशद्वार धरून चार ओवऱ्या आहेत. तर मंदिराच्या समोर प्रवेशद्वार धरून अकरा ओवऱ्या आहेत. मंदिराच्या चारही बाजूंनी मिळून अशा एकूण मंदिरात 65 ओवऱ्या असल्याचे दिसून येते. शिवाय या ओवऱ्याच्या वरती चाळुक्यांनी मंदिरात चौफेर दगडी भोवऱ्या बसवलेल्या आहेत. मंदिरातील ओवऱ्यावरील बसवलेल्या भोवऱ्यांची संख्या साडेतीनशे पेक्षा जास्त आहे. दक्षिणेकडील काही ओवऱ्यामधे देवस्थानने पर्यायी खोल्यांची (रहिवास) व्यवस्था केलेली असून, यातून मंदिराचे व्यवहार चालत असल्याची माहिती मिळते.
जेजुरी मंदिराच्या सबंध तटबंदिला उत्तर, पूर्व आणि पश्चिम अशा तीन बाजूंनी दरवाजे आहेत. मात्र मंदिराच्या उत्तरेकडील पायऱ्यांवरूनच भक्तांचा जास्तीचा रातबा आहे. पूर्व आणि पश्चिम दरवाज्या बाहेरील पायऱ्या अपूर्णावस्थेत असल्याने या दोन्ही मार्गावरील भक्तांची संख्या रोडावलेली दिसते. मंदिराच्या तटबंदीचा जिर्णोद्धार झालेला असून, तो पुण्यश्लोक अहील्यादेवी होळकरांनी केलेला आहे. मात्र मंदिरातील ओवऱ्या आणि त्यावरील संख्येने साडेतीनशे पेक्षा जास्त असलेल्या भोवऱ्यांची स्थापत्य शैली ही चाळुक्यांच्या स्टाईलचीच आठवण करून देणारी आहे. मूळ मंदिर आणि सभोवताली असणाऱ्या ओवऱ्यांचे बांधकाम सोबतचेच वाटते.
जेजुरी आणि आसपासच्या परिसरात चाळुक्य उर्फ साळुंखे नरेश, राजा पुलकेशी चाळुक्य दुसरा यांनी सातव्या शतकात महादेव आणि इतर देवतांची अनेक मंदिरे बांधली आहेत. यामध्ये प्रामुख्याने साकुर्डे येथील शंकरेश्वर महादेव मंदिर, पुरंदर किल्ल्याच्या पायथ्यावरील नारायणपूर येथील नारायणेश्वर महादेव मंदिर, कर्हा नदी काठावरील पांडेश्वर महादेव मंदिर, जेजुरी जवळील माळशिरस डोन्गरावरचे भूलेश्वर महादेव मंदिर, सासवड येथील चान्गावटेश्वर महादेव मंदिर, संगमेश्वर महादेव मंदिर, पुरंदरेश्वर महादेव मंदिर, खडकेश्वर महादेव मंदिर, कर्हादेवी मंदिर, निरा गावाजवळील सोमेश्वर महादेव मंदिर, वीर येथील विरेश्व्वर महादेव मंदिर, बारामती तालुक्यातील सुपे येथील आणि परगण्यातील मंदिरे अशा कित्येक मंदिरांचा यात समावेश आहे.
पुरंदर किल्ह्याच्या अनेक रोचक आणि पराक्रमी कथा आपण ऐकलेल्या, वाचलेल्या आहेत. मात्र हा किल्ला नेमका कोणी आणि कधी बांधला याचे समाधानकारक उत्तर मात्र सापडत नाही!किंवा ते शोधण्याच्याही फंदात सहसा कोणी पडत नाही! याचे उत्तर म्हणजे, हा किल्ला राजा पुलकेशी चाळुक्य (दुसरा) यांनी सातव्या शतकात बांधलेला आहे. राजा पुलकेशी चाळुक्य दुसरा यांचे सातव्या शतकात नर्मदा नदी पासून सम्पूर्ण दक्षिण भारतभर (काही अपवाद सोडून) राज्य पसरलेले होते. दक्षिणेतील सम्राट चक्रवर्ती राजा, अशी राजा पुलकेशी चाळुक्य (दुसरा) यांची ओळख होती. त्या काळात या राजाने सातारा किल्ला (अजिंक्य तारा), परळीचा किल्ला (सज्जनगड), पुरंदर, नळदुर्ग, परान्डा, किल्लेधारूर या सारख्या महाराष्ट्रातील अनेक डोंगरी आणि भुईकोट किल्ल्यांचे निर्माण चाळुक्य राजांनी केलेले आहे.
या भागातील सर्वात पहिला गैरसमज म्हणजे, हे अमूक मंदिर राक्षसाने बांधले, अन् ते एका रात्रीतच बांधले, असा हा गैरसमज आहे. तर या भागातील अजून दुसरी एक गैरसमजूत ही आहे, की हे अमुक अमुक मंदिर पांडवांनी बांधलेले आहे. अशा या दोन गैरसमजूतींमुळे ज्या चाळुक्य राजांनी ही मंदिरे निर्माण केली, त्या मूळ व्यक्तीला (चाळुक्य राजांना) याचे श्रेय मिळण्याऐवजी, हे श्रेय भलतेच लोक लाटण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत ! लोकांमधील पसरलेले दोन्हीही गैरसमज धादांत खोटे आहेत. महाराष्ट्रातील ही पुरातन मंदिरे निर्माण व्हायला दोन गोष्टी कारणीभूत आहेत. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे, सह्याद्री पर्वतरान्जीतील पांडवांनी केलेली अज्ञातवासातील परिक्रमा.. तर दुसरी गोष्ट म्हणजे, दंडकारण्याचा भाग असलेल्या गोदावरीच्या पट्ट्यातील वनवासात असतानाची श्री. प्रभु रामचंद्रानी केलेली परिक्रमा, अशा या त्या दोन गोष्टी आहेत.
यातली पहिली गोष्ट म्हणजे, सह्याद्री पर्वतरान्जीतील पांडवांनी केलेली अज्ञातवासातील परिक्रमा आहे. पांडवांनी सह्याद्रीच्या पर्वतरान्जीत फिरताना जिथे जिथे मुक्काम केला आणि पहाटे उठून वाळुचे शिवलिंग करून त्याची पूजा केली, त्या त्या सर्व ठिकाणांना पुढे तीर्थाचे स्वरूप आले. अशा सर्व ठिकाणांना शोधून राजा पुलकेशी चाळुक्य उर्फ साळुंखे (दुसरा) यांनी इ.सनाच्या सातव्या शतकात भगवान शिवाची आणि इतर देवतांची चालुक्यीय स्थापत्य शैलीनुसार शेकडो हेमाडपंती मंदिरे बांधली. पुलकेशी चाळुक्य यांनी चालुक्यांची ही हेमाडपंती स्थापत्य शैली विकसीत केली. दगडांच्या कट केलेल्या मोठाल्या शिळा एकावर एक मांडून आणि मजबुतीसाठी दोन दगडांच्या मध्ये चुना वापरून ही हेमाडपंती मंदिरे बांधण्यात येत होती. पुलकेशी चाळुक्य यांनी बांधलेली अशी मंदिरे महाराष्ट्रातील पश्चिमी भागांत जास्त संख्येने पाहायला मिळतात.
पुलकेशी चाळुक्य यांच्या याच पद्धतीचा अवलंब पुढे चक्रवर्ती राजा विक्रमादित्य चाळुक्य उर्फ साळुंखे (सहावा) यांनी इ.सनाच्या अकराव्या शतकात केल्याचे दिसून येते. त्यांनी गोदावरीच्या पट्ट्यात नाशिक पासून थेट दक्षिण भारतभर महादेव आणि इतर देवतांची अगणित मंदिरे बांधून काढली. वनवासात असतांना प्रभू श्रीरामचंद्रानी दंडकारण्याचा भाग असलेल्या गोदावरी नदीच्या पट्ट्यातून परिक्रमा केली होती. या परिक्रमेत प्रभू श्रीरामचंद्रानी ज्या ज्या ठिकाणी मुक्काम करून वालुकामय शिवलिंग केले आणि भगवान शिवाची पूजा केली, आराधना केली; अशा सर्व ठिकाणांना (गोदावरी नदीच्या पट्ट्यातील) पुढे तीर्थाचे स्वरूप आले. या सर्व तीर्थाच्या ठिकाणांना शोधून राजा विक्रमादित्य चाळुक्य यांनी अकराव्या आणि बाराव्या शतकात भगवान शिव आणि इतर देवतांची शेकडो हेमाडपंती मंदिरे बांधून ती पूर्ण केली.
राजा विक्रमादित्य चाळुक्य यांचे नर्मदा नदीपासून ते सम्पूर्ण दक्षिण भारतभर राज्य पसरलेले होते. एवढ्या विशाल साम्राज्याचा हा राजा अनभिषिक्त सम्राट होता. तब्बल साठ वर्षे स्थिर शासन केलेला तो दक्षिणेतील सम्राट चक्रवर्ती राजा होता. या काळात उत्तर भारतात मुस्लिमांच्या अनेक स्वाऱ्या झाल्या मात्र या शासकांची दक्षिणेकडे वाईट नजरेने पाहण्याची हिम्मत न व्हावी, एवढी जरब राजा विक्रमादित्य चाळुक्य यांची होती. अशी ओळख असलेल्या राजा विक्रमादित्य चाळुक्य (सहावा) यांनी इ.सनाच्या अकराव्या आणि बाराव्या शतकात महाराष्ट्रात शेकडो मंदिरांचे निर्माण केलेले आहे. गोदावरीच्या पट्ट्यातील आणि इतर भागातील या हेमाडपंती मंदिरांचे निर्माण करताना राजा विक्रमादित्य चाळुक्य (सहावा) यांनी मोठमोठ्या दगडांच्या कट केलेल्या दोन शिळांच्या फटीत फट अडकवून अथवा त्यात चुना न टाकता हेमाडपंती बांधकाम करण्याचे आणि सम्पूर्ण मंदिरभर तर्हेतर्हेची शिल्पे कोरण्याचे नवे तंत्र विकसीत केले होते.
@
सतीशकुमार सोळंके-देशमुख,
मुख्य आयुर्विमा सल्लागार LIC,
गेवराई, जि. बीड.
ह.मु. औरंगाबाद.
9422241339,
9922241339.

No comments:

Post a Comment

! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!

  ! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...