विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 8 June 2021

राजा विक्रमादित्य चाळुक्य उर्फ साळुंखे

 निम्म्याधिक भारतावर साठ वर्षे स्थिर शासन केलेला मराठा चक्रवर्ती राजा :



राजा विक्रमादित्य चाळुक्य उर्फ साळुंखे
--------_/\_-------
@
राजा विक्रमादित्य चाळुक्य उर्फ साळुंखे (सहावा) या राजाने पन्नास वर्षाहून अधिक काळ स्थिर शासन करताना अनेक इतिहास रचले. या कार्यकाळात त्यांनी मरू (राजस्थान), माळवा, चेर (केरळ), चोळ, कलिंग आणि बंग आदी कित्येक राजांचा परभव केला. राजा विक्रमादित्य चाळुक्य यांच्या शासन काळात चाळुक्य साम्राज्याच्या सीमा दक्षिणेत कन्याकुमारी पासून उत्तरेत बंगालपर्यंत विस्तारलेल्या होत्या.
राजा विक्रमादित्य चाळुक्य उर्फ साळुंखे (सहावा) यांनी चोळांचा पराक्रमी राजा, राजेन्द्र चोळ तसेच कदम्ब शासकांच्या मदतीने चाळुक्य राज्याच्या सीमा सम्पूर्ण दक्षिणी भागात वाढविल्या. आपल्या विस्तीर्ण पसरलेल्या साम्राज्यासाठी विक्रमादित्य चाळुक्य यांनी 'चाळुक्य विक्रम संवत' हे नवीन विक्रम संवत सुरू केले होते. कल्याणीच्या चाळुक्य शाखेतील हा सर्वात मोठा महान पराक्रमी राजा होऊन गेला. वडील सोमेश्वर चाळुक्य प्रथम यांच्या शासन काळात विक्रमादित्य चाळुक्य हा त्यांचा सहयोगी म्हणून काम पहात होता.
वडिल सोमेश्वर चाळुक्य प्रथम यांच्या सोबतच्या अनेक विजययात्रेत विक्रमादित्य चाळुक्य उर्फ साळुंखे (सहावा) यांनी अनेकदा पराक्रमाचे अद्भुत प्रदर्शन घडवले. विक्रमादित्य याने त्यांच्या पन्नास वर्षाच्या प्रदीर्घ कार्यकाळात, वडील सोमेश्वर प्रथम यांच्या सारख्याच दूर दूर पर्यंत विजय यात्रा केल्या. राजा बनल्यावर विक्रमादित्य याने तब्बल पन्नास वर्षे (1076-1126) स्थिर शासन केले. विस्ताराने एवढ्या मोठ्या साम्राज्यावर एवढे प्रदीर्घ वर्षे स्थिर राज्य केलेला राजा मराठ्यांच्या इतिहासात दुसरा क्वचितच असावा !
राजा विक्रमादित्य चाळुक्य उर्फ साळुंखे (सहावा) एक पराक्रमी वीर विजेता राजा असला, तरी त्यांनी त्यांच्या दरबारात अनेक विद्वानांना सुद्धा राजाश्रय दिलेला होता. 'निरुगंद' येथील ताम्रलेखातून असे समजते, की चाळुक्य राज्यातील विद्या वाढीसाठी त्यांनी 500 तामिळी विद्वानांना राज्यात बसवले होते. विक्रमादित्य षष्ठ यांच्या दरबारात राजाश्रयाला असलेले कश्मीरी राजकवी विल्हण यांनी
'विक्रमांकदेवचरित' हा ग्रंथ लिहून या प्रतापी राजाच्या नावाला अजरामर केले.
विक्रमादित्य चाळुक्य यांना कला व साहित्याचे संरक्षक आणि संवर्धक मानले जाते. त्यांच्या दरबारात कन्नड आणि संस्कृतचे अनेक कवी राजाश्रयाला होते. विक्रमादित्य चाळुक्य यांचा लहान भाऊ कीर्तिवर्मा चाळुक्य याने 'गोवैद्य' नावाचा पशुचिकित्सा ग्रन्थ लिहिलेला आहे. विक्रमादित्य यांची चन्दलादेवी नावाची एक राणी होती, जिला राज्यातील लोकांमध्ये कलेची अभिनव सरस्वती म्हणून मान होता. ती एक चांगली उत्कृष्ठ नृत्यांगना सुद्धा होती.
विक्रमादित्य चाळुक्य यांच्या दरबारात अनेक विद्वान लोक होते, त्यातील 'विज्ञानेश्वर' यांनी 'याज्ञवल्क्य स्मृति' यावर 'मीताक्षरा' नावाचा टीकात्मक ग्रंथ लिहिला. 'मिताक्षरा' हा वर्तमान काळातल्या प्रचलित हिन्दू कायद्याचा मुख्य आधार आहे. विक्रमादित्य यांनी ब्रह्मशिव यांचेकडून 'समयपरीक्षे' नावाचा ग्रन्थ लिहून घेतला आणि त्यांना 'कविचक्रवर्ती' ही उपाधि बहाल केली. बाराव्या शतकाच्या आगोदर कोणीही इतके शिलालेख लिहिले नसतील, तितके शिलालेख विक्रमादित्य चाळुक्य षष्ठ यांनी लिहून घेतले.
विक्रमादित्य चाळुक्य षष्ठ यांनी गोदावरीच्या पट्ट्यात नाशिक पासून थेट दक्षिण भारतभर महादेव आणि इतर देवतांची अगणित मंदिरे बांधून काढली. वनवासात असतांना प्रभू श्रीरामचंद्रानी दंडकारण्याचा भाग असलेल्या गोदावरी नदीच्या पट्ट्यातून परिक्रमा केली होती. या परिक्रमेत प्रभू श्रीरामचंद्रानी ज्या ज्या ठिकाणी मुक्काम करून वालुकामय शिवलिंग केले आणि भगवान शिवाची पूजा केली, आराधना केली; अशा सर्व ठिकाणांना (गोदावरी नदीच्या पट्ट्यातील) पुढे तीर्थाचे स्वरूप आले. या सर्व तीर्थाच्या ठिकाणांना शोधून राजा विक्रमादित्य चाळुक्य यांनी अकराव्या आणि बाराव्या शतकात भगवान शिव आणि इतर देवतांची शेकडो हेमाडपंती मंदिरे बांधून ती पूर्ण केली.
अशा या महान प्रतापी विक्रमादित्य चाळुक्य यांचे राज्य नर्मदा नदीपासून पूर्ण दक्षिण भारतभर पसरलेले होते. ज्यांच्या साम्राज्यात महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, बंगाल, कर्नाटक, तामिळनाडू, ओरिसा, आंध्रप्रदेश, केरळ अशा विस्तीर्ण भूभागाचा समावेश होता. या काळात उत्तर भारतात मुस्लिमांच्या अनेक स्वाऱ्या झाल्या मात्र या शासकांची दक्षिणेकडे वाईट नजरेने पाहण्याची हिम्मत न व्हावी, एवढी जरब राजा विक्रमादित्य चाळुक्य यांची होती. पन्नास वर्षाहून अधिक काळ चक्रवर्ती राजा म्हणून स्थिर शासन केलेल्या या राजाने आपल्या नावासमोर 'परमादिदेव' आणि त्रिभुवनमल्ल' अशी बिरुदावली (उपाधि) धारण केलेल्या होत्या.
@
सतीशकुमार सोळंके-देशमुख,
मुख्य आयुर्विमा सल्लागार LIC,
गेवराई, जि. बीड.
ह.मु. औरंगाबाद.
9422241339,
9922241339.

No comments:

Post a Comment

! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!

  ! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...