मराठा चक्रवर्ती सम्राट साळुंखे (चाळुक्य) राजांची अद्भुत कलाकृती



उमरगा येथील ब्रह्मा-हरि-हरेश्वराचे हेमाडपंथी मंदिर...
------------------------
@
मराठा चक्रवर्ती सम्राट, राजा विक्रमादित्य साळुंखे (चाळुक्य) या राजाने मराठवाड्यातील उमरगा या शहरात ब्रह्मा, हरि आणि हरेश्वर या तिन्ही देवतांच्या एकत्रित मांडणीतल्या भव्य हेमाडपंथी मंदिराचे निर्माण केलेले आहे. चाळुक्य राजांच्या स्थापत्य शैलीत निर्माण झालेल्या उमरगा, जि. उस्मानाबाद येथील या हेमाडपंथी मंदिराचे निर्माण विक्रमादित्य (सहावा) राजाच्या अफलातून कलाविष्काराचे एक अद्भुत असेच प्रदर्शन आहे. हे मंदिर म्हणजे चाळुक्यीय स्थापत्यात तयार झालेला एक उत्कृष्ट नमुनाच म्हणावा लागेल. एकून तीस दगडी स्तंभावरील मांडणीतल्या या मंदिराचे निर्माण चाळुक्य राजांनी त्रिदलिय पद्धतीत निर्मिले आहे.
उमरगा येथील पूर्वाभिमुख रचनेतील ब्रह्मा-हरि-हरेश्वर या तिन्ही देवतांच्या एकत्रित मांडणीतले अधिष्ठान असलेल्या मंदिराचे प्रवेशमंडप, सभामंडप (नवरंगमंडप), नवरंगमंडपातील उजवे आणि डावे गर्भगृह, या दोन्ही गर्भगृहांचे अंतरंगमंडप तसेच देवालयातील मुख्य गर्भगृह आणि त्याचा अंतरंगमंडप (दर्शनमंडप) अशा भागात साळुंखे (चाळुक्य) राजांनी या मंदिराचे विभाजन केले आहे. मंदिरातील नवरंग मंडपाच्या डाव्या म्हणजे दक्षिण बाजूस असलेल्या गर्भगृहात महादेवाची प्रतिष्ठापना असून उजव्या बाजूच्या गर्भगृहात ब्रह्मदेवाचे अधिष्ठान आहे. तर मंदिराच्या मुख्य गर्भगृहात भगवान विष्णूंची मूर्ती विराजमान असून त्या समोर भगवान शिवाचे लिंग आहे.
मंदिर ज्योत्याच्या साडेपाच पायऱ्या चढून वरती गेल्यावर आपला प्रवेश मंदिराच्या मुख्य दर्शन मंडपात होतो. येथे साळुंखे (चाळुक्य) राजांनी कैलास पट्टी कोरलेली असून भगवान शिव आणि पार्वती त्यावर विराजमान आहेत. कैलाश पट्टीच्या उजवीकडे विष्णू तर डावीकडून ब्रह्माचे शिल्प कोरलेले आहे. या शिल्पामध्ये वाद्य वादकांच्या गजरांचा ताफा कोरण्यासही चाळुक्यराजे विसरलेले नाहीत हे विशेष आहे. मंदिराच्या नवरंग मंडपात साळुंखे राजांनी त्यांचे टोटेम (आराध्यदेव) असलेली अनेक शिल्पे कोरली आहेत. यात प्रामुख्याने कार्तिकेय, गणपती, नृसिंह, वीरभद्र, भैरव, हरणांवर स्वार चंद्रदेव, मेंढ्यावरील स्वार देवता, हत्तीवरील स्वार देवता, कैलासावर तांडव करणारे शिव, उडते भैरव आणि विशेष म्हणजे या ठिकाणी सप्तमातृका देवतेंच्या चार वेगवेगळ्या पट्ट्या कोरलेल्या आहेत.
मंदिरातील नवरंग मंडपाच्या डाव्या म्हणजे दक्षिण बाजूस असलेल्या गर्भगृहाच्या समोर देखील साळुंखे राजांनी दर्शनमंडपाची निर्मिती केली असून दर्शनमंडपाच्या द्वारावर चाळुक्यांनी कैलासाचे शिल्प रेखाटले आहे. यामध्ये संगीतकार तान्डुच्या वाद्य गजरात भगवान शिवाचे तांडव नृत्य सुरू असल्याचे दाखवले आहे. शिल्पात पुष्पवृष्टी करणारे शिवगण दाखविले असून यात शिंगी, शैली, नंदी आदींची शिल्पे कोरलेली आहेत. कैलासाच्या डाव्या बाजूला ब्रह्मा तर उजव्या बाजूला विष्णू कोरलेला आहे. दर्शन मन्डपाला असलेल्या उंबऱ्यावर दोन्ही बाजूला चाळुक्यांनी त्यांच्या खास शैलीतील कीर्तीमुखे कोरली आहेत. दोन कीर्तिमुखांच्या मध्ये साळुंखे राजांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत एका फुलाचे डिझाइन कोरले आहे.
साळुंखे (चाळुक्य) राजांनी मंदिरातील (नवरंग मन्डप) डाव्या गर्भगृहात भगवान शिवाची प्रतिष्ठापना केलेली आहे. त्याच्या गर्भगृह द्वाराच्या वरच्या चौकटीला त्यांनी गणेशपट्टी कोरलेली असून खाली उंबऱ्यावर दोन कीर्तीमुखे कोरली आहेत. दरवाजाच्या दोन्ही बाजूने द्वाररक्षक पट्टिका कोरलेली असून या पट्टिकेवर विष्णू, कलशधारी स्त्री, कुंकू करन्डाला हाती घेवून उभी स्त्री, मध्ये विष्णू, त्याबाजूला स्त्री आणि त्या शेजारी जय -विजय कोरलेले आहेत. त्याखाली हत्ती आणि शरभ हे प्राणी कोरलेले असून वरच्या चौकटीला गणेश पट्टीच्या वरती विष्णू, लक्ष्मी, ब्रह्मा, महादेव, गणपती अशी शिल्पे क्रमाने कोरलेली आहेत.
मंदिरातील नवरंग मंडपाच्या उजव्या म्हणजे उत्तरी बाजूला असलेल्या गर्भगृहाच्या समोरील दर्शन मन्डपाच्या असलेल्या दगडी दरवाजावर साळुंखे राजांनी वैकुंठपट्टी कोरलेली दिसत आहे. त्यावर विष्णू, लक्ष्मी, गरूड आणि त्यांचेवर वैकुंठातून पुष्पवृष्टी करणारे देव दाखविले आहेत. गर्भगृहाच्या उंबऱ्यावर गरूड आणि त्याच्या दोन्ही बाजुंनी कीर्तीमुखे कोरलेली आहेत. गर्भगृहात त्रिमुखी ब्रह्माची सुंदर मूर्ती असून ती मनाला मोहहून टाकेल अशीच आहे. गर्भगृह चौकटीच्या वरती साळुंखे राजांनी लक्ष्मीपट्टी कोरलेली असून चौकटीच्या दोन्ही बाजूंना द्वाररक्षक पट्टिका कोरलेली आहे. द्वाररक्षक पट्टिकेत श्री.विष्णू आणि नर्तिकांची आकर्षक शिल्पे कोरलेली आहेत.
मंदिराचे मुख्य गर्भगृह हरी-हरेश्वर या दोनही देवतांना समर्पित असून गर्भगृहाला असलेल्या अंतरंगमंडपाच्या (दर्शन मंडप) वरच्या चौकटीच्या वरती साळुंखे राजांनी वैकुंठाचे पट्टीशिल्प चित्रावले आहे. त्यात स्वत: विष्णू दाखविला असून त्यात वाद्य वादकांचा ताफाही चित्रावला आहे. शिल्पात मगरीवर बसलेले गण आदी शिल्पे कोरलेली आहेत. साळुंखे राजांनी दर्शनमंडप उंबऱ्यावर दोन्ही बाजूला दोन कीर्तीमुखे कोरलेली आहेत. देवाच्या अंतरंग (दर्शन) मंडपातून गर्भगृहात जाण्यासाठी गर्भगृहाला असलेल्या दगडी दरवाजाला पार करूनच आत जावे लागते. या दरवाजावर साळुंखे राजांनी द्वाररक्षक पट्टी कोरलेली आहे. ही द्वाररक्षक पट्टी महादेव गर्भगृहाचे पट्टिकेप्रमाणेच हुबहू कोरलेली आहे.
गर्भगृह उंबऱ्यावर दोन्ही बाजूला किर्तिमुखांची शिल्पे कोरली असून चौकटीच्या वरच्या बाजूवर लक्ष्मीपट्टी कोरली आहे. लक्ष्मीपट्टीच्या वरच्या बाजुला चौकटीवर साळुंखे राजांनी क्रमाने एका ओळीत काही देवतांची शिल्पे कोरली आहेत. त्यात सर्वप्रथम ब्रह्माचे शिल्प कोरलेले असून त्याशेजारी राग शांत होत नसलेल्या नृसिंह अवताराचे शिल्प आहे. शेजारी विष्णू शिल्प कोरलेले असून त्याच्या बाजूला साळुंखे राजांनी खास करून त्यांचे राजचिन्ह असलेले वराह अवतार शिल्प कोरले आहे. त्याशेजारी कोरलेले शेवटचे शिल्प भगवान शिवाचे आहे. मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश केल्यावर आत देवाच्या तांदळ्यावर काळ्या कातळाच्या दगडात कोरलेली विष्णू मूर्ती विराजमान आहे.
विष्णू मूर्तीच्या समोर उत्तर जलवाहिनी असलेली महादेवाची भव्य साळुंका आहे. मंदिराच्या मुख्य गर्भगृहात साळुंखे राजांनी विष्णू आणि शिव या दोन्ही देवतांना एकत्रितपणे प्रतिष्ठापित केल्यामुळे हे मंदिर हरि-हरेश्वराचे असल्याचे मानले जाते. या मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे मंदिर ज्योत्यावर प्रवेश करायच्या पायऱ्या असलेल्या दोन्ही बाजुंना साळुंखे राजांनी देव कोष्टकांची निर्मिती केली आहे. अतिक्रमणामुळे मंदिर नजरेखालून घालण्यासाठी मंदिराला परिक्रमा करणे अशक्य बनले आहे. मंदिराच्या बाहेरील (बाह्य) भिंतीवर साळुंखे राजांनी अजून पाच देव कोष्टकांची निर्मिती केली असून त्यात त्यांनी त्यांच्या वराह अवतार आणि इतर काही इष्ट देवतांच्या मूर्ती ठेवलेल्या आहेत.
चाळुक्य (साळुंखे) राजांच्या राजधानीचे शहर असलेल्या कल्याणी येथून हे मंदिर स्थित असलेले उमरगा शहर जवळच पडते. येथील मंदिराच्या चारही बाजुंनी उमरग्यातील आजूबाजूच्या लोकांनी बऱ्यापैकी अतिक्रमणे केल्यामुळे मंदिराचे अस्तित्व धोक्यात आहे. यामुळे मंदिराला पूर्ण परिक्रमा करणे देखील मुश्किल बनले आहे. मंदिराचे अस्तित्व टिकवून ठेवायचे असेल तर मंदिरा सभोवताली झालेली आक्रमणे हटविने जिकिरीचे आहे.
@........

सतीशकुमार सोळंके-देशमुख,




सिद्धीविनायक कॉलोनी गेवराई,
ता. गेवराई, जि. बीड




No comments:
Post a Comment