Vaishali BhosaleMaratha Empire

·
छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती राजाराम ह्यांस जिंजी येथे जावे लागले. त्या सुमारास कान्होजींचा पराक्रम कोकणपट्टीवर दिसू लागला.
१६९४–१७०४च्या दरम्यान त्यांनी पश्चिम किनारपट्टीतील मोगलाकडे गेलेले मराठ्यांचे सर्व किल्ले परत घेतले शिवाय कुलाबा जिंकून त्यास आपले प्रमुख ठिकाण केले व त्यांनी “आपण कोकणकिनाऱ्याचे राजे” अशी घोषणा केली.
छत्रपती राजाराम महाराज ह्यांनी त्यांची ही कामगिरी व पराक्रम लक्षात घेऊन त्यांस मराठी आरमाराचे आधिपत्य देऊन सरखेल हा किताब दिला. छत्रपती राजारामांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी महाराणी ताराबाई ह्यांनी कान्होजींस आपल्या पक्षात सामील करून घेऊन त्यांस राजमाचीचा किल्ला व भिवंडी प्रांताचा बंदोबस्त करण्यास दिला आणि सरखेल हा किताब कायम केला.
पुढे १७०७ मध्ये छत्रपती शाहू महाराज हे मोगलांच्या कैदेतून सुटून आल्यानंतर छत्रपतींच्या गादीबद्दल ताराबाई व शाहू ह्या उभयतांत वाद निर्माण झाला. पण अखेर शाहूंची सरशी होऊन सातारची छत्रपतींची गादी शाहूंस मिळाली. नंतर छत्रपती शाहूंनी कान्होजींवर बहिरोपंत पिंगळे ह्या आपल्या पेशव्यास धाडले. परंतु त्याचा काही उपयोग न होता तो कान्होजींच्या कैदेत मात्र पडला. तेव्हा शाहूंनी बाळाजी विश्वनाथ व कान्होजी ह्यांचे पूर्वीचे मैत्रीचे संबंध लक्षात घेऊन बाळाजी विश्वनाथ ह्या आपल्या पेशव्यास त्यांविरुद्ध धाडले.
बाळाजीने कान्होजींबरोबर तह करून त्यांस शाहूंच्या पक्षात सामील करून घेतले आणि त्यांस काही मुलुख, सरखेलपद आणि मराठी आरमाराचे आधिपत्य शाहूंकडून देवविले. ते अखेरपर्यंत, म्हणजे १७२९ पर्यंत शाहूंच्या पक्षात होते.
@maratha_riyasat ©
No comments:
Post a Comment