सहाशे वर्षाचा राजवंश- राजे चोर घराणा आणि त्यांचा पराक्रमी इतिहास
-----------------
@
छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपणीचे मित्र म्हटले, की सरदार तुकोजी चोर, सरदार भिकाजी चोर आणि सरदार भैरव चोर या साळुंखे कुळातील पडनावाने राहाणाऱ्या तीन सरदार चोर बंधूंची आठवण कोणाला सुद्धा झाल्याशिवाय राहाणार नाही. या तिन्ही सरदार चोर बंधूंनी स्वराज्यासाठी आपले चांगलेच योगदान दिले होते. स्वराज्याच्या लढलेल्या पहिल्या लढाईत वरील तिन्ही चोर सरदार बंधूंनी मोठाच भीम पराक्रम केल्याचा इतिहास आहे. ज्या लढाईने फत्तेखानाचा पूर्णपणे धुव्वा उडविला होता.
महाराष्ट्रातील मराठयांच्या पराक्रमी इतिहासाचा वारसा असलेल्या घराण्यांचा अभ्यास करतांना अग्रक्रमाणे वरच्या क्रमांकावर विचार करायला लावणारे घराणे म्हणून राजे चोर या साळुंखे कुळातील पडनावाने राहाणाऱ्या घराण्याचे नांव खूप वरच्या स्थानावर येते. वेंगीच्या चाळुक्य उर्फ साळुंखे राज घराण्याचा सहाशे वर्षाचा वारसा लाभलेल्या या घराण्यातल्या चोर वंशजांनी, नंतरच्या काळात देखील आपले मनगटी शौर्य कमी होऊ दिले नाही हे विशेष आहे. अशा या पराक्रमी चोर घराण्यातील सरदारांनी शिवाजी राजांच्या सैन्याचे काही काळ सरनौबत पद देखील भूषविले होते.
चोर हा घराणा इतिहासाचे वलय लाभलेला मराठयांच्या इतिहासातील कायम चर्चेत राहिलेला एक पराक्रमी घराणा आहे. वरवर पाहाणाऱ्याला हा पराक्रमी सरदार घराणा वाटत असेलही, पण तो इतिहासाचा समृद्ध वारसा लाभलेल्या दक्षिणेतील चोळ-चाळुक्य राजवंशाचा वंशज घराणा आहे. सांगायचेच झाले तर चोर हे आडनाव दक्षिणी भारतातील एक प्रसिध्द राजवंश असलेल्या चोळ या आडनावाचा 'संस्कृत' शब्दातला अपभ्रंश आहे. याचाच अर्थ म्हणजे महाराष्ट्रातील आजचे जेवढे चोर वंशज असतील ते चोळ राजवंशाचे वारसदार आहेत.
चोर आडनावाच्या बाबतीत अजून दुसरी एक आश्चर्याची बाब सांगायची झाली तर महाराष्ट्रातील मराठ्यात असलेले आजचे चोर वंशज हे चोळ राजवंशाचे वारसदार वाटत असले, तरी ते वेंगीच्या चाळुक्य राजवंशातून चोळ राजवंशात दत्तक गेलेले आहेत. त्यामुळे चोर हे आडनाव चोळ आडनावाचा अपभ्रंश असले, तरी ते चाळुक्य उर्फ साळुंखे राजकुळाच्या भावकीतील एक प्रतिष्ठित उप आडनाव आहे.
इतिहासाची गौरवशाली परंपरा लाभलेल्या चोर घराण्यातील बहुतांश लोकांनी अलीकडच्या काळात चोर हे आडनाव बदलून ते साळुंखे असे परिधान केलेले आढळते. पूर्वी हे आडनाव अनेकदा ऐकण्यात आलेले होते, या आडनावातील सरदार लोकांचे पराक्रमही वाचण्यातून गेले होते. मात्र या आडनावाबद्दल खरी आपुलकी निर्माण झाली ती सातारा जिल्ह्यातील भादे, ता. खंडाळा या गावातील देविदास साळुंखे या चोर वंशज शिक्षकाची दोन वर्षापूर्वी भेट घडून आल्यामुळे!
या वेळी देविदास साळुंखे यांनी वदलेले एक वाक्य काही केल्या आठवणीतून जात नव्हते. ते म्हणाले होते की, "आम्ही चोर आहोत, कसे आहोत, का आहोत हे माहिती नाही, मात्र आम्ही आडनावाचे चोर असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे." एक वर्षापूर्वी म्हणजे दि. 6 फेब्रुवारी 2016 रोजी देविदास साळुंखे यांच्या तोंडून पुण्याच्या भेटीत ऐकलेले हे एक वाक्य मात्र कोणालाही विचारी बनवणारे असेच होते. त्यानंतर मी चोर साळुंखे यांच्या पाटण तालुक्यातील चोरे, बारामती तालुक्यातील चोराची उंडवडी, चोरवाडी, खंडाळा तालुक्यातील भादे, वाठार आणि अन्य काही गावांना भेटी दिल्या मात्र चोर हे आडनाव कसे निर्माण झाले असेल, याचे समाधानकारक उत्तर सापडत नव्हते.
चोर हे आडनाव कसे निर्माण झालेे असावे, याबाबत चोरांच्या अनेक गावांना भेटी देवून त्या लोकांमधून या आडनावाबद्दल खूप जाणून घ्यायचा प्रयत्न केला. मात्र हे आडनाव कसे पडले या बाबतित या लोकांकडून अनेक शक्यता ऐकवल्या गेल्या, पण त्यातून समाधानकारक असे उत्तर मिळाले नाही. चोर या आडनावा बाबतीत चोरांच्या गावातून खूप अभिमान दिसून आला, मात्र या आडनाव निर्माणाचे कन्फ्यूजन सुद्धा चोरांच्या सगळ्या गावांमधून दिसून आले होते.
चोर या आडनावाने राहाणाऱ्या चोरांची महाराष्ट्रातील बहुतेक गावे फिरल्यानंतर सुद्धा हाती काहीच न पडल्यामुळे, चोर हे आडनाव कसे निर्माण झाले असेल ते शोधण्यासाठी अजून प्रयत्न करावे लागणार होते. यासाठी बराच पिच्छा पुरविल्यानंतर तेव्हा कुठे चोर आडनावाची उत्पत्ती कशी झाली, त्याचे समाधानकारक उत्तर मिळाले. मात्र यासाठी इतिहास चिकित्सक आणि पी.एच.डी. गाईड डॉ. नीरज साळुंखे यांनी दिलेली चोर या नावाबद्दलची एक छोटीशी हिंट चांगलीच कामाला आली.
डॉ. नीरज साळुंखे यांच्या मते चोर या आडनावाच्या उत्त्पत्तीसाठी चोळ या राजवंशाचे आडनाव कारणीभूत असले पाहिजे. कारण चोळ या आडनावाच्या अपभ्रंशातूनच चोर या आडनावाची उत्पत्ती होणे शक्य आहे. त्यांच्या मतानुसार मराठीत 'ळ' आणि 'र' ही वर्णाक्षरे उच्चारासाठी सारखीच आहेत. यावरून दक्षिणेतील चोळ हेच महाराष्ट्रातील चोर या आडनावाचे उत्पत्तीस्थान आहे. नीरज सरांच्या वरील सिद्धांतानुसार चोळ राजवंशाला अभ्यासूनच चोर या आडनावाचे निर्माण धागे शोधावे लागणार होते.
दक्षिणेतील चोळ राजांचे वंशज हेच महाराष्ट्रातील चोर आहेत, हे पटण्यासारखे नव्हते! कारण चोर हे आडनाव महाराष्ट्रातील पराक्रमी मराठा घराणे असलेल्या साळुंखे या राजवंशाच्या आडनावाचे भावकीतील एक उप आडनाव होते, तर साळुंखे या आडनावाचे मूळ उत्पत्तीस्थान चाळुक्य हा राजवंश आहे. त्यामुळे चाळुक्य आणि चोळ या दोन्ही इतिहासातील भिन्न राजवटी (घराणे) असतील, तर चोळांचे वंशज असलेले चोर हे चाळुक्यांचे वंशज असलेल्या साळुंखे या आडनावाच्या भावकीचे आडनाव कसे होऊ शकते? हे देखील तितकेच खरे होते.
काही का असेना पण त्यानिमित्ताने का होईना हा प्रश्न मात्र नव्यानेच ऐरणीवर आला होता. पूर्वी युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक वेळा एखाद्या राजवंशाला वारस राहत नसे, त्यामुळे एका कुळातून दुसऱ्या कुळात दत्तक घेणे देणे हे प्रकार त्या काळात सर्रास घडून येत असत. त्यामुळे या आडनावाचे निर्मितीस्थान दत्तकातीलच तर एक प्रकार नसावा? म्हणून तशा शक्यतेला देखील तपासणे गरजेचे होते. चोर आडनावाच्या बाबतीतील हा प्रकार जर दत्तक प्रकारांतून घडलेला असेल, तर मराठयांतील चोर या आडनावाने राहणारे हे लोक मग चोळ की चाळुक्य ? हा दुसरा एक सवाल देखील त्यानिमित्ताने निर्माण झाला.
चोर आडनाव निर्माण होण्यासाठी दत्तक हे कारण असल्याचे जर मान्य करायचे ठरविले तर मग पुढचा आणखी एक प्रश्न निर्माण होणे क्रमप्राप्त होते आणि तो म्हणजे, 'चोळ चाळुक्यांमध्ये की चाळुक्य चोळांमध्ये' नेमके कोण कोणात दत्तक गेले? त्यानिमित्ताने का होईना हे अभ्यासने ज़रूरी बनले होते. या सर्व गोष्टीला काहीतरी ऐतिहासिक आधार हवा, म्हणून त्यासाठी भारतातील चाळुक्यांच्या बदामी, कल्याणी, वेंगी अशा प्रमुख राजवटींचा अभ्यास करणे आवश्यक होते.
बदामीचे चाळुक्य आणि कल्याणीचे चाळुक्य यांच्यामधून चोळ घराण्यात अथवा या दोन्ही चाळुक्यांमधून चोळ घराण्यात कोणी दत्तक गेल्याचे पुरावे इतिहासात कुठे दिसले नाहीत! त्यामुळे मराठयांमधील चोर आडनावाचा चाळुक्यांच्या बदामी आणि कल्याणी राजवटीशी कसलाही सम्बन्ध नसल्याचे जाणवले. चोरांचे मूळ शोधण्यासाठी आता मात्र वेंगीचे चाळुक्य आणि इतर काही छोट्या चाळुक्य राजवटींचा अभ्यास करणे ज़रूरी होते. हा अभ्यास केल्यानंतर मात्र महाराष्ट्रातील चोर आडनावाचेे मूळ वेंगीच्या चाळुक्यांमध्ये दडलेले सापडले.
वेंगीचा अर्थात पूर्वीचा चाळुक्य वंश दक्षिणी भारतातील एक प्रसिद्ध राजवंश होता. ज्याची राजधानी सध्याच्या आंध्रप्रदेशातील वेंगी येथे म्हणजे आजच्या एलुरू जवळ स्थित होती. बदामी सम्राट पुलकेशी चाळुक्य द्वितीय याने जिंकलेल्या कॄष्णा आणि गोदावरी नदीच्या आतल्या पूर्वेकडील प्रदेशावर त्याचा लहान भाऊ कुब्ज विष्णुवर्धन याची नेमणूक केली होती. त्याचा मुलगा जयसिंह प्रथम याने पूर्णपणे स्वतंत्र होत नव्या राज्याची घोषणा केली, तेच हे पूर्वेकडील वेंगी चाळुक्य होत.
पूर्वी चाळुक्यांनी सातव्या शतकाच्या प्रारंभीपासून इ.सन 1070 पर्यंत वेंगी येथे चाळुक्य म्हणून राज्य केले, तर हेच चाळुक्य चोळ राजवटीत दत्तक गेल्यानंतर चोळ-चाळुक्य बनून त्यांनी इ.सन 1070 पासून तेराव्या शतकाच्या अस्तापर्यंत राज्य केले. म्हणजे वेंगी चाळुक्यांनी जवळपास तब्बल सहाशे वर्ष वेंगी आणि चोळ राज्यात राहून आपले धर्मराज्य केल्याचा इतिहास आहे. वेंगीे चाळुक्य हे चोळ साम्राज्यात दत्तक गेल्यानंतर त्यांनी या राज्याच्या अस्तापर्यंत चोळ-चाळुक्य अशा जोड़नावाने वेंगी आणि चोळ या दोन्ही साम्राज्याचे संरक्षन केले.
वेंगी ही पूर्वी चाळुक्यांची अगोदरची राजधानी होती, ती नंतर राजमहेन्द्रवरम अर्थात राजमुन्द्री अशी करण्यात आली. पूर्वी अर्थात वेंगी चाळुक्यांचा बादामी चाळुक्यांसोबत जवळचा सम्बन्ध होता. वेंगीच्या राज्यामुळे चोळ साम्राज्य आणि पश्चिमी चाळुक्यांमध्ये कितीतरी युद्धे झाल्याचा इतिहास आहे. अशाच एका युद्धातून चोळ राजा राजराज याने पूर्वी चाळुक्यांवर आक्रमण करून त्यांचे वेंगी राज्य जिंकून घेतले. मात्र त्यानंतर पश्चिमी चाळुक्यांकडून आक्रमण होण्याची भीती वाढल्यामुळे चोळ राजाने थोडे नमते घेतले.
चोळ राजा राजराज यानेे पूर्वी चाळुक्यांचे राज्य जिंकलेले असतानाही, चाळुक्यांच्या सिंहासनावर शेवटी शक्तिवर्मन चाळुक्य यालाच बसविले आणि राजराज चोळ यांनी शक्तिवर्मन चाळुक्य याच्या विमलादित्य नावाच्या लहान भावा बरोबर स्वतःच्या कुंदवा नावाच्या मुलीचा विवाह सुद्धा लावून दिला. त्याच वेळात कलिंगचा गंग राजा हा चाळुक्यांच्या वेंगी राज्यावर आक्रमण करण्याच्या तयारीत होता, मात्र त्याला सुद्धा चोळ नरेश राजराज याने युद्धासाठी आमंत्रित करून पराजित केले.
पूर्वी (वेंगी) चाळुक्य नरेश कुलोत्तुंग चाळुक्य प्रथम (इ.सन 1070-1120) याची आई आणि त्याच्या वडीलांची आई या अनुक्रमे राजेंद्र (पहिला) चोळ अर्थात राजराज प्रथम याची मुलगी होती, तर कुलोत्तुंग चाळुक्य प्रथम हा स्वतः राजेंद्र चोळ (द्वितीय) याच्या मुलीबरोबर विवाहित झालेला होता. कुलोत्तुंग चाळुक्य याने अधिराजेंद्र चोळ यांच्या साथीने त्याच्या सभोवतीच्या होणाऱ्या सगळ्या आक्रमणांना परतवून लावले आणि आपल्या राज्याची परिस्थिती मजबूत बनविली. कुलोत्तुंग याने त्याच्या अंतिम काळापर्यंत संपूर्ण चोळ साम्राज्य आणि दक्षिणी कलिंग प्रदेशांवर सुद्धा आपले अस्तित्व जमवून राज्य केले.
विक्रम चोळ-चाळुक्य (इ.सन 1118-1133) हा कुलोत्तुंग नंतर चोळ-चाळुक्य राज्याचा उत्तराधिकारी म्हणून गादीवर आला. कुलोत्तुंग प्रथम नंतर चोळ-चाळुक्य यांनी जवळपास दोनशे वर्षे राज्य केले. या काळात विक्रम चोळ-चाळुक्य, कुलोत्तुंग द्वितीय (इ.सन 1133-1150), राजराज द्वितीय (इ.सन 1146-1173), राजाधिराज द्वितीय (इ.सन 1163-1179), कुलोत्तुंग तृतीय (इ.सन 1178-1218), राजेंद्र (इ.सन 1216-1246) या चोळ-चाळुक्य राजांनी आपले शासन केले. चोळ-चाळुक्य वंशाचा शेवटचा राजा हा राजेंद्र तृतीय होऊन गेला, त्याने इ.सन 1246-1279 या कालावधीत राज्य केले.
चोळ राजा अधिराजेन्द्र याला मूलबाळ नव्हते, तो निपूत्रिक राजा होता. कारण तो अल्पायुषी राजा होता, कमी वयातच त्याचा मॄत्यू झाला होता. चोळांच्या राज्यामध्ये घडलेल्या या आकस्मिक बदलांमुळे चोळ राज्यात काळजीचे मळभ निर्माण झाले होते. चोळ राज्याला वारस राहिला नसल्याने त्या शेजारील राज्यांकडून आक्रमणाची भीती वाढल्याने चोळ राज्यात भितीचे आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. कोणत्याही क्षणी शेजारील राज्यांकडून आक्रमण होण्याची भीती वाढल्याने मयत अधिराजेन्द्र चोळ यांच्या घरातही भितीचे वातावरण निर्माण झालेले होते.
राज्यातील लोकांची ही भीती ओळखून मयत पुत्र अधिराजेन्द्र चोळ यांच्या मॄत्यूपश्चात त्याच्या वयस्क पित्याने राज्यातील लोकांत मसलत केली आणि त्याचा जावाई अर्थात वेंगी राज्याचा सम्राट असलेल्या राजा, राजेन्द्र कुलोत्तुंग चाळुक्य यास चोळांचे राज्य सुपूर्द केले. चोळ राज्यात अचानक झालेल्या या घडामोडीमुळे चोळांचे राज्य चाळुक्यांच्या वेंगी राज्यात सामील झाले. अधिराजेन्द्र चोळ याचे राज्य देखील वेंगीच्या चाळुक्य राज्यात सहभागी झाल्यामुळे वेंगी राज्याच्या सीमा आपोआपच वाढल्या.
तसे पाहता चाळुक्य आणि चोळ या दोन्ही राज वंशामध्ये पूर्वापार पासूनचे सोईरसम्बन्ध असल्याचे लक्षात येते. यातील पिढीजात नाही पण काही तात्कालीन सोईरसम्बंधावर प्रकाश टाकायचाच म्हटल्यावर चोळ राजा राजराज प्रथम याने विमलादित्य चाळुक्य याला आपली मुलगी देवून सम्बन्धी बनवलेले होते. विमलादित्य चाळुक्य याच्या नंतर त्याचा मुलगा विष्णुवर्धन चाळुक्य हा पूर्वी चाळुक्य राज्याचा सम्राट बनला. त्याचा विवाह सुद्धा चोळवंशातील एका राजकुमारी बरोबर झाला होता.
राजा विष्णुवर्धन चाळुक्य याचा मुलगा राजेन्द्र हा वेंगी चाळुक्यातील एक पराक्रमी वीर होता, ज्याला कुलोत्तुंग चाळुक्य या दुसऱ्या नावाने सुद्धा ओळखले जात होते. अशा या पराक्रमी वीर असलेल्या राजेन्द्र उर्फ कुलोत्तुंग चाळुक्यांचा विवाह सुद्धा एका चोळ राजकुमारी बरोबर झाला होता, जी की अधिराजेन्द्र चोळ याची बहीण होती. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, की चाळुक्य आणि चोळ राजवंशातिल सोईरसम्बंध हे पिढीजात असेच होते. त्यांच्यातील अशा या नजीकच्या वैवाहिक सम्बंधामुळे या दोन वंशातील संबंध अधिकच दृढ बनले होते.
खरं तर चोळ वंशात दत्तक गेलेले चाळुक्य राजवटीतील पूर्वज हे खरोखरच हुशार म्हटले पाहिजेत. चोळ वंशात दत्तक जावून आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर सुद्धा त्यांनी स्वतःच्या चाळुक्य आडनावाचा स्वतःला विसर पडू दिला नाही. पुढे तेराव्या शतकाच्या उत्तरार्धात चोळ-चाळुक्य राजवट संपुष्टात आल्यानंतर या राजवटीतील चोळ वंशज दक्षिणेकडून महाराष्ट्रात येवून स्थिरावले. महाराष्ट्रात आल्यानंतर चोळ आडनावाचा अपभ्रंश चोर असा झाल्याने हे घराणे पुढील काळात चोर अशा नावाने ओळखले जावू लागले.
इ.सनाच्या सातव्या शतकापासून तेराव्या शतकाच्या अंतापर्यंत, दक्षिणी भारतात सहाशे वर्षाहून जास्त काळ एक राजवंश म्हणून चोळ-चाळुक्य यांनी सत्ता उपभोगलेली होती. त्यांचे वंशज असलेले चोर उर्फ साळुंखे महाराष्ट्रात येवून तेराव्या शतकानंतर सरदार घराण्यात केव्हा कन्व्हर्ट झाले हे त्यांनाच समजले नाही. तेराव्या शतकानंतर ते देशाला स्वातंत्र्य मिळण्यापर्यंतच्या कालावधीत देखील चोर उर्फ साळुंखे लोकांची पराक्रमी मनगटे महाराष्ट्राच्या रणभूमीवर चांगलीच तळपली होती.
छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपणीचे मित्र असलेले सरदार तुकोजी चोर, भिकाजी चोर आणि भैरव चोर या तिन्ही सरदार चोर बंधूंनी स्वराज्याची पहिली लढाई आपल्या पराक्रमी मनगटांच्या जोरावर गाजवली होती. त्यांनीच काय चोरांतील अनेक पराक्रमी मनगटांनी असा सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्याजोगा इतिहास निर्माण केलेला असेल, मात्र त्यातील बहुतांश इतिहास हा इतिहासाच्या डार्क पानांवर लिहिलेला असल्यामुळे दुर्दैवाने तो वाचता न यावा, हेच राजे चोर यांचे दुर्दैव म्हणावे लागेल.
@
सतीशकुमार सोळंके-देशमुख,
मुख्य आयुर्विमा सल्लागार LIC,
9422241339,
9922241339.
No comments:
Post a Comment