विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 19 August 2021

स्वराज्यरक्षक शिलेदार जिवाजी नाईक सर्कले/सरकाळे 👇👇👇 स्वराज्यासाठीची थरारक शौर्यगाथा आणि स्मृतिदिन

 



स्वराज्यरक्षक शिलेदार जिवाजी नाईक सर्कले/सरकाळे
👇👇👇
स्वराज्यासाठीची थरारक शौर्यगाथा आणि स्मृतिदिन
=========
-----------------
सतीशकुमार सोळंके-देशमुख
@.................✍️
औरंगजेब सरदार शहाबुद्दीनने गोरजाई गावातून एक हजार सैन्याची आपली पहिली तुकडी कावल्या बावल्या खिंडीच्या दिशेने पाठवली. मराठे आणि मोगली सैन्यात क्षणात लढाईला तोंड फुटले. हर हर महादेव गर्जना करून खिंडीतील स्वराज्यरक्षक जिवाजी नाईक सर्कले आणि नऊ मावळ्यांनी शत्रूवर तुटून पडत कापाकापीला सुरुवात केली. मराठा विरात कोणी भाले चढवीत होते, तर कोणी तलवार फिरवत होते. बाण आणि गोफणीने शहाबुद्दीन फौजेसमोर हे मावळे अक्षरशः काळाला नाचवीत होते. मावळ्यांच्या युद्धातील थयथयाटापुढे भैरवाचे आक्राळविक्राळ रूप फिके पडावे असे हे मावळे आक्रमक भासत होते. यावेळी काळाला यवनांच्या रक्ताचा रक्ताभिषेक घालून मावळे आपल्या तलवारी नाचवीत होते. मोठमोठे दगड शत्रूवर घरंगळत पडत होते. बघता बघता दहा मावळ्यांनी शहाबुद्दीनच्या हजार सैन्याला कंठस्नान घालून यमसदनाला पाठविले होते. या खिंडीतील घनघोर युद्धात दहा मावळ्यांनी जवळपास सात हजार मुघली सैन्याचा फडशा पाडून त्यांना यमाचा पाहुणचार दिला होता आणि स्वराज्यावर चालून आलेले एक मोठे संकट उधळून लावले होते.
२५ मार्च १६८९ चा तो दिवस, स्वराज्याचे शिलेदार श्रीमंत सरदार जिवाजी नाईक सर्कले/सरकाळे या राजे साळुंखे वंशीय वीराचा आज स्वराज्यासाठी बलिदान दिलेला दिवस... या बलिदानाला आज ३३२ वर्ष पूर्ण झालीत... हा दिवस स्वराज्यावर एक मोठे संकट घेऊन आलेला... संभाजी राजांची क्रूर पद्धतीने हत्या करून स्वराज्य बुडवायला निघालेल्या औरंगजेबाने स्वराज्याचे धाकले धनी राजाराम आणि त्यांच्या उर्वरित कुटुंबीयांना कैद करण्यासाठी पाठवलेल्या क्रूरनायक सय्यद शहाबुद्दीन या सरदारास, स्वराज्याचे शिलेदार श्रीमंत सरदार जिवाजी नाईक सर्कले आणि त्यांच्या नऊ मावळ्यांनी चांगलीच अद्दल घडवून ढुंगणाला पाय लावून पळवायला लावलेला हा दिवस!
इतिहासाच्या ब्राह्मणी वर्चस्ववादात राजे साळुंखे चाळुक्यांचे वंशज असलेल्या जिवाजी नाईक सर्कले या स्वराज्यासाठी मोठाच भीमपराक्रम केलेल्या पराक्रमी योध्याचे नावही कोणाला माहिती नसेल! ज्याने केवळ नऊ मावळ्यांना हाताशी धरून औरंगजेबाने पाठविलेल्या सात हजार फौजेचा फडशा पाडला होता. दहा मराठे विरुद्ध सात हजार मुघली सेना यांच्यातील तब्बल सोळा तास लढलेली ही मराठ्यांची शौर्यगाथा इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिण्याजोगी असली तरी, एवढी मोठी पराक्रमी शौर्यगाथा इतिहासात अभ्यासायला न मिळावी हे केवळ ऐतिहासिक दुर्दैव!
कावल्या बावल्या खिंडीतील या युद्धाचा वृत्तांत सांगायचा झाल्यास, औरंगजेबाने सय्यद शहाबुद्दीन या सरदारास राजाराम आणि कुटुंबीयांना कैद करण्यासाठी पाच हजाराची फौज घेऊन रायगडावर पाठवले. रायगडावर छत्रपती शिवरायांचे धाकले चिरंजीव राजाराम आणि त्यांचे कुटुंबीय होते. राजाराम आणि कुटुंबीयांना कैद करण्याचे फर्मान घेऊन शहाबुद्दिन निघालेला. वाटेत पुण्याजवळ मानकोजी नावाचा मराठा सरदार त्यांस दीड ते दोन हजाराची फौज घेऊन मिळाला. शहाबुद्दीन त्याची सात हजार फौज घेऊन रायगडाच्या दिशेने निघाला. शहाबुद्दीनच्या या फौजा रायगड जवळच्या कोकणदिवा पर्वताजवळ येऊन धडकल्या. सैन्याने घोळगारजाई गावाजवळ डेरा टाकला.
रायगडाच्या टकमक टोकावरून कोकणदिवा पर्वत स्पष्टपणे दिसतो. या पर्वताच्या कावल्या बावल्या खिंडीत स्वराज्य रक्षक शिलेदार जिवाजी नाईक सर्कले/सरकाळे आणि नऊ मावळे तैनातीवर होते. उत्तरकालीन कल्याणच्या राजे साळुंखे चाळुक्यांपासून सांदोशी गावचे वतनदार असलेल्या जिवाजी नाईक सर्कले यांचा परिवार पूर्वी नौसेना प्रमुख होता. महाराजांच्या काळात हे घर आले पुन्हा त्यांच्या सांदोशी गावात. यावेळी ते कोकण दिवा पर्वतावर स्वराज्य रक्षणार्थ सज्ज होते. एरव्ही त्यांना शहाबुद्दीनखान आल्याची चाहूल मिळाली होती. २५ मार्च १६८९ चा तो दिवस उजाडला. या दिवशी जिवाजी नाईक सर्कले यांच्यासमोर शहाबुद्दीनखान नावाचा एक मजबूत दुश्मन उभा होता.
‌ शत्रूला पिटाळल्याशिवाय मरायचे नाही, अशा जणू जिवाजी नाईक आणि या नऊ मावळ्यांनी शपथाच घेतल्या होत्या. जिवाजी नाईक आणि मावळे लढण्यासाठी तयार होते. शहाबुद्दीन खानाच्या एक हजार फौजेला संपविल्यानंतर, या तुकडीची खबर मिळत नसल्याने खानाने पाठविलेली दुसरी हजार सैन्याची तुकडी खिंडीत येऊन धडकली. मराठ्यांनी पुन्हा पहिलाच पराक्रम दाखवत खानाच्या याही तुकडीचा खात्मा केला. जिवाजी नाईक सरकाळे शत्रूला साक्षात काळभैरव भासत होता. नऊ मावळे आणि जिवाजी खिंडीत यमासारखे उभे राहुन शहाबुद्दीनी फौजेला कापीत होते. मोगली सेनेच्या दुसऱ्या तुकडीला देखील या दहा जिगरबाज मावळ्यांनी कापून काढले.
शहाबुद्दिन खानाची तिसरी हजार सैनिकांची तुकडी देखील जिवाजी नाईक आणि नऊ मावळ्यांनी अशीच कापून काढली. मरणाच्या आकांताने यातील काही सैनिकांनी पळ काढून खिंडीची खबर शहाबुद्दिन यास दिली. हे समजताच तो सगळी सेना घेऊन खिंडीजवळ आला. तोपर्यंत मावळ्यांनी त्याची अर्ध्याहून अधिक सेना कापून काढली होती. जिवाजी नाईक सर्कले आणि नऊ मावळ्यांच्या समोर जो येईल तो तलवारीच्या धारेने कापला जाऊन यमाचा पाहुणचार घेत होता. दहा तासात जिवाजी नाईक आणि मावळ्यांनी खानाच्या चार हजारांहून अधिक फौजेला कापून यमसदनी धाडले होते.
खिंडीतील लढाईची ही खबर सांदोशी गावात पोहोचल्यानंतर तिथून सरदार गोदाजी जगताप आणि साठ सत्तर मावळ्यांची ताज्या दमाची फौज जिवाजी नाईक सर्कले यांना येऊन मिळाली. पुन्हा भयानक रणकंदन पेटले. रणात रक्ताचे पाट वाहू लागले. जिवाजी आणि मावळ्यांच्या अंगातून निघणाऱ्या रक्ताच्या धारांनी या वीरांची शरीरे लालबुंद झाली होती. तरीसुद्धा जिवाजीने नऊ मावळ्यांना हाताशी धरून चार हजाराहून अधिकच्या मोगली सैन्याचे रणकंदन करून त्यांना कापून काढले होते.
स्वराज्यरक्षक शिलेदर सरदार जिवाजी नाईक सरकले आणि नंतर सामील झालेल्या ताज्यातवान्या गोदाजी जगताप व मावळ्यांनी शहबुद्दीनखानाची अख्खी सेना कापून काढली. शहाबुद्दीन खानाची सेना संपण्याच्या मार्गावर होती. त्याच्या पण हे लक्षात आले होते. संधी हेरून वाचलेल्या दीड-दोनशे सैन्यानिशी शहाबुद्दीनने शेवटी ढुंगणाला पाय लावले, असे करताना यावेळी मात्र त्याला पळताभुई थोडी झाली होती.
स्वराज्यरक्षक शिलेदार श्रीमंत सरदार जिवाजी नाईक सरकले कावल्या बावल्या खिंडीत स्वराज्य रक्षणार्थ धारातीर्थी पडले होते. सोळा तास खिंड लढवून धारातिर्थी पडेपर्यंत त्यांनी एकाही मोगली सैन्याला खिंडीतून पुढे जाऊ दिले नव्हते. तब्बल सोळा तास चाललेले हे रणकंदन थांबले होते. जिवाजी नाईक सरकले यांना त्यांच्या राहत्या सांदोशी गावी अंत्यविधीसाठी नेण्यात आले. सांदोशी गावात जिवाजी नाईक सरकाळे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जिवाजी नाईक हे उच्चकुलीन मराठा वीर असल्यामुळे त्यांच्या चितेवर त्यांच्या बायकाही सती गेल्या.
औरंगजेबाने पाठविलेले शहाबुद्दिनरुपी संकट जिवाजी नाईक सरकले यांनी नुसते थोपवूनच धरले नव्हते, तर ते यशस्वीरित्या संपविले सुद्धा होते. कावल्या बावल्या खिंडीतील हे युद्ध जिवाजी नाईक सरकले तब्बल सोळा तासाहून अधिक काळ लढले नसते, तर आज हा पराक्रमाने भरलेला मराठ्यांचा इतिहास काहीअंशी वेगळा वाचण्यास मिळाला असता!
जिवाजी नाईक सरकले यांचा कावल्या बावल्या खिंडीत धारातीर्थी पडलेला २५ मार्च हा पराक्रमी दिवस सांदोशी गावात विजय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हा विजय दिन रायगड जवळील सांदोशी गावात गेल्या कित्येक वर्षापासून साजरा केला जातो. विजय दिनानिमित्त गावात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. दोन दिवस साजरा होणाऱ्या या कार्यक्रमाचे स्वराज्याचे शिलेदार श्रीमंत सरदार जिवाजी नाईक सरकले यांच्या वंशजाकडून यावर्षी मलादेखील निमंत्रण होते. मात्र कोविड सदृश्य परिस्थितीमुळे सदरचा कार्यक्रम छोट्या स्वरूपात होणार असल्याने आणि आमच्या बीड जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाने लॉक डाऊन लावल्यामुळे मला या कार्यक्रमाचे हिस्सेदार होण्याचे भाग्य लाभले नाही. कावल्या बावल्या खिंडीत नऊ मावळ्यांना हाताशी धरून, सोळा तासात सात हजार मोगली फौजे बरोबर लढून चार हजारांहून अधिक मोगली सैन्याला कापत वीर गतीला प्राप्त झालेल्या राजे साळुंखे चाळुक्य वंशीय लढवय्या जिवाजी नाईक या वंशजाला आणि त्यांच्या इतर नऊ मावळे साथीदारांना त्रिवार मानाचा मुजरा...
🙏🙏🙏🙏🙏
( अपूर्ण )
मार्गदर्शक :
------------
डॉक्टर नीरज साळुंखे,
असोसिएट प्रोफेसर,
पी.एचडी गाईड,
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा यूनिवर्सिटी औरंगाबाद.
------------
@........✍
सतीशकुमार सोळंके-देशमुख,
👉मुख्य आयुर्विमा सल्लागार LIC,
👉ऑल इंडिया चेअरमन्स क्लब मेंबर
👉एम.डी.आर.टी. (USA)
👉"अग्निवंश",
सिद्धीविनायक कॉलोनी गेवराई,
ता. गेवराई, जि. बीड
👉9422241339,
👉9922241339.

No comments:

Post a Comment

राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला 🚩 भाग 9

  राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला भाग 9 लखुजीराजे जाधवरावांची हत्या भातवडीच्या युद्धानंतर मलिक ...