


राजा राणीचे शिल्प!
---------------------
@
गावाच्या नावासमोर तीर्थ आणि गावाच्या नावात त्यासमोर चाळुक्यांच्या अभिलेख मताप्रमाणे राजधानी वाचक शब्द आलेला आहे. अशा गावातील मंदिरासमोर पूजेला बसलेल्या राजाराणीचे दुर्मिळ शिल्प दिसावे हे विशेष! मात्र आज हे गाव कसल्याही तीर्थाचे ठिकाण नसले, तरी गावाच्या नावात तीर्थ आणि त्यासमोर चाळुक्य अभिलेखानुसार येणारा उपराजधानी वाचक शब्द, यामुळे पूर्वी हे गाव एखाद्या तीर्थाचे ठिकाण तर नसावे? अशी शंका उपस्थित होते.
गावात राजे साळुंखे चाळुक्यांच्या निर्मितीतील भव्य, सुंदर असे श्री विष्णू लक्ष्मी मंदिर आहे आणि अगदी या मंदिरासमोर प्रचंड मोठे पुष्करणी बारव तीर्थ आहे. मंदिर परिसरात काही मूर्त्या अस्ताव्यस्त पडलेल्या अवस्थेत दिसून येतात. अशा मूर्ती शिल्पांमधील एक शिल्प कोणाचे पण लक्ष वेधून घेईल असे आहे. हे शिल्प राजवंशातील राजा-राणी पूजेला बसलेले शिल्प आहे. सदरील शिल्प राजे साळुंखे राजवंशातील राजा-राणीचे असावे, अथवा साळुंखे राजवंशाचे मांडलिकत्व प्राप्त असलेल्या एखाद्या तत्सम व्यक्तीचेही असू शकते.
शिल्पातील राजा राणी पूजेला बसलेल्या अवस्थेत कोरलेले हे शिल्प आहे. पूजेतील प्रथेप्रमाणे राजा उजवीकडून तर त्याची अर्धांगिनी असलेली राणी डावीकडून बसलेली शिल्पात दिसत आहे. शिल्पातील राजाने आपले दोन्ही हात पूजेच्या प्रार्थनेसाठी जोडलेले असून राणीचे देखील हात जोडलेले असले तरी तिच्या हातात मात्र कुंकवाचा करंडा असावा हे लक्षात येते. राजाराणी दोघे सुद्धा मांडी घालून बसलेल्या अवस्थेत असून दोघांच्याही डोक्यावर राजेशाही टोप चढवलेला आहे.
राजाच्या कानात कुंडले, गळ्यात हार, जाणवे, दंडात बाजूबंद, पायात तोडे आहेत. तर राणीच्या गळ्यात आभूषणे, कानात कर्णफुले, हातात कुंकवाचा करंडा, दंडात बाजूबंद, हातात ककंण, पायात तोडे आणि पैंजण असा शृंगार आहे. मूर्तीची झीज झाल्यामुळे आणि लोकांनी मूर्तीवर कुंकू, प्रसाद चढविल्यामुळे मूर्तीचे सौंदर्य बटबटीत झाले आहे. वेळीच लक्ष दिले गेले नाही तर मंदिराच्या परिसरात अस्ताव्यस्त पसरलेली ही शिल्पे काळाच्या ओघात नष्ट होण्याचा धोका वाढला आहे.
लक्ष्मी विष्णूचे गावातील हे मंदिर व्याप्तीने मोठे असून ही व्याप्ती एकत्रित तीन मंदिराची मिळून आहे. एकंदरीत तीन मंदिरांचे मिळून एकच मंदिर बनवलेले असल्यामुळे आणि मंदिराच्या समोरच चिकटून भव्य मोठा पुष्करणी बारव असल्यामुळे मंदिराची रचना मोठी वाटते. राजे साळुंखे चाळुक्य हे राजे वैष्णव धर्मीय राजे असल्यामुळे त्यांच्या वास्तू निर्माणात त्यांनी विष्णूच्या दशावतार शिल्पांना मोठ्या प्रमाणात स्थान दिलेले दिसून येते.
सदरील मंदिरातील स्तंभावर विष्णूचे दशावतार कोरल्यामुळे हे मंदिर दशावतारी मंदिर म्हणून सुद्धा ओळखले जाते. या मंदिरावर साळुंखे राजांनी बुद्ध, कल्की, वामन, परशुरामासह विष्णूचे दशावतार वेगवेगळ्या स्तंभावर कोरलेले दिसतात. मंदिर प्रवेश करताना सर्वात अगोदर दिसणाऱ्या आणि पुढे पुढे सरकत जाणार्या स्तंभावर साळुंखे चाळुक्य राजांनी विष्णूचे अनुक्रमे मत्स्य, कच्छ, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, श्रीकृष्ण, बुद्ध आणि कल्की या दहाही अवतार शिल्पांना कोरले आहे.
( अपूर्ण )
मार्गदर्शक :
------------
डॉक्टर नीरज साळुंखे,
असोसिएट प्रोफेसर,
पी.एचडी गाईड,
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा यूनिवर्सिटी औरंगाबाद.
------------
@........

सतीशकुमार सोळंके-देशमुख,




सिद्धीविनायक कॉलोनी गेवराई,
ता. गेवराई, जि. बीड


No comments:
Post a Comment