विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 19 August 2021

राजे साळुंखे चाळुक्यांचा इतिहास कितीही दाबला 👇👇👇 तरी असा फुटून बाहेर निघणार...

 



राजे साळुंखे चाळुक्यांचा इतिहास कितीही दाबला
👇👇👇
तरी असा फुटून बाहेर निघणार....
------------------------
------------------------
@
जत तालुक्यातील मल्लाळ येथे डोंगरावर दीपक माने यांची जमीन नांगरताना राजे साळुंखे चाळुक्य सम्राट विक्रमादित्य (सहावा) याच्या कारकीर्दीतील शिलालेख दीपक यांना सापडला. सांगली जिल्ह्यात विक्रमादित्याचा सापडलेला कालदृष्ट्या हा पहिला शिलालेख असल्याचा दावा मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक प्रा. गौतम काटकर आणि मानसिंगराव कुमठेकर यांनी केला आहे.
सन ११२० मध्ये एका शिवमंदिरासाठी जतचा प्रमुख दंडनायक बंकेय याने मल्लाळ येथील दहा मत्तर जमीन दान दिल्याचा उल्लेख या शिलालेखात आहे. या शिलालेखातून चाळुक्यसम्राट विक्रमादित्य याच्या कारकीर्दीतील नवी माहिती उजेडात आली आहे. जत तालुक्यात अनेक गावात चाळुक्य, कलचुरी, यादव यांच्या राजवटीतील शिलालेख मिळाले आहेत. जतपासून चार किलोमीटरवरील मल्लाळ गावनजिक डोंगरावर खडकाळ जमीन शेतकरी दीपक माने हे नांगरत असताना भगवान काळे यांना एक मोठा दगड मिळाला. त्यावर शिवलिंग, गाय-वासरू, कट्यार, सूर्य चंद्राचे शिल्पांकन आणि खालील बाजूस हळे कन्नड लिपीतील मजकूर आहे. याची माहिती प्रा.काटकर आणि कुमठेकर यांना मिळाली. त्यांनी त्याचा अभ्यास केला असता त्यामध्ये एकूण १३ ओळी आहेत. या शिलालेखाचे वाचन हंपी येथील कन्नड विद्यापीठाचे शिलालेखशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. कलवीर मनवाचार आणि महेंद्र बोलकोटगी (जमगी) यांनी केले. त्यामध्ये चाळुक्य राजा विक्रमादित्य याचा उल्लेख आहे.
षष्ठ चाळुक्य विक्रमादित्य हा महापराक्रमी होता. इसवी सन १०७६ मध्ये तो गादीवर आला. त्याने आपल्या राज्यारोहणानिमित्त स्वतःच्या नावाचा चाळुक्य विक्रम शक सुरू केला. कराडच्या शिलाहर राजवंशातील चंदलादेवी ही विक्रमादित्याची महाराणी होती. कराडमध्ये झालेल्या स्वयंवरात तिने विक्रम राजाला पती म्हणून निवडले होते. त्याने ५० वर्षे राज्य केले. त्याच्या काळात चाळुक्य राज्याच्या सीमा गुजरातपासून दक्षिणेत तमिळनाडूपर्यंत होत्या. त्याने कला, विद्या यांचा मोठा विकास केला. पश्चिम महाराष्ट्रात दीर्घकाळ सत्ता गाजवणाऱ्या चाळुक्य सम्राट विक्रमादित्याच्या काळात अनेक मंदिरे बांधली गेली. त्या मंदिरांसाठी जमिनी दान देण्यात आल्या. त्यासंबंधी अनेक शिलालेख उपलब्ध आहेत.
मल्लाळ येथे सापडलेला हा शिलालेख १ ऑगस्ट सन ११२० रोजी लिहिला गेला आहे. यामध्ये जतचा प्रमुख बंकेय याने जतमध्ये बांधलेल्या शिवमंदिराला बंकेश्वर या नावाने ओळखले जाते. जत परिसरात या दंडनायकाचे प्रभुत्व असल्याचे या शिलालेखातील मजकूरातून स्पष्ट होते. या शिलालेखात त्याच्या विशेषणांचा उल्लेख करण्यात आला आहे. चाळुक्य विक्रम शक ४५ शार्वरीनामसंवत्सरे, भाद्रपद शुद्ध पंचमी सोमवार या दिवशी जत येथील प्रमुख दंडनायक बंकेय याने शिव मंदिरासाठी १० मत्तर जमीन दान दिल्याचा उल्लेख आहे.
(संपादन : स्नेहल कदम)
टिप :
१) सांगली भागात विक्रमादित्य राजाचा पहिलाच शिलालेख असे लेखकाचे मत दिसते, मात्र यापूर्वी या भागात विक्रमादित्य चाळुक्यांचे इतरही शिलालेख सापडलेले आहेत.
२) प्रा. मानसिंगराव कुमठेकर आणि प्रा. गौतम काटकर यांनी विक्रमादित्य चाळुक्याच्या सासरा आणि महामंडलेश्वर असलेल्या जोगम कलचुरीचा वराडे येथील शिलालेख शोधलेला आहे.
३) पोस्टला लावलेले शीर्षक मी दिलेले आहे.
४) प्रा. मानसिंगराव कुमठेकर आणि प्रा. गौतम काटकर या शिलालेख वाचक द्वयींचे अखिल भारतीय राजे साळुंखे चाळुक्य प्रतिष्ठान परिवाराच्या वतीने मनःपूर्वक धन्यवाद!
🙏🙏🙏
@
सतीशकुमार सोळंके-देशमुख,
९४२२२४१३३९,
९९२२२४१३३९.

No comments:

Post a Comment

राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला 🚩 भाग 9

  राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला भाग 9 लखुजीराजे जाधवरावांची हत्या भातवडीच्या युद्धानंतर मलिक ...