विनोद जाधव एक संग्राहक

Friday 20 August 2021

मराठ्यांचे आरमारप्रमुख...दर्याबहाद्दर कान्होंजी आग्रें--

 

मराठ्यांचे आरमारप्रमुख...दर्याबहाद्दर कान्होंजी आग्रें--

४ जुलै कान्होजी आग्रें यांचा स्मृतीदिनानिमित्त लेख!


            मध्ययुगीन भारताच्या  इतिहासात आरमाराचे महत्त्व  जाणणारे छत्रपती  शिवाजी महाराज हे भारतातील एकमेव राजे होते. त्यामुळेच शिवरायांना  आरमाराचे जनक म्हटले जाते.   ब्रिटिश  , पोर्तुगीज  व जंजिरांचा सिद्दीला तोंड देण्यासाठी  आपले आरमार मजबूत  असावे असा दुरदर्शी विचार  शिवरायांनी केला. शिवरायांचे आरमार उभे राहिले. मराठ्यांचे आरमार सशक्त करण्याची महत्त्वाची  कामगिरी कान्होजी आंग्रे यांनी  केली.   कान्होजींचा जन्म  पुणे जिल्ह्यातील खेडजवळील "कालोसे" गावी १६६९  झाला. कालोसे गावातील "आंगरवाडी" ह्या छोट्या भागावरून त्यांचे आंग्रे हे आडनाव रूढ झाले. मराठ्यांच्या आरमारांची धुरा पाव शतक सांभाळून त्यांची  शक्ती सतत वाढत ठेवणारे कान्होजी  आंग्रे यांना "मराठी आरमार प्रमुख  " हे बिरुद अभिमानाने लावले जाते. छत्रपती  राजाराम महाराजांच्या  काळात औरंगजेबाने मराठ्यांचे राज्य संपुष्टात  आणण्याचा चंग बांधला होता. ते अस्तित्व  टिकवण्यासाठी सर्वच मराठे सरदार एकदिलाने एकत्र आले होते. त्यांत आरमाराची बाजू फक्त सांभाळणे नव्हे तर त्यांची दहशत तमाम शत्रूच्या मनात निर्माण  करण्याची अनोखी किमया कान्होजींनी केली.

. इ.स.१६८८ च्या सुमारास सिद्दी कासम ह्या औरंगजेबाच्या सेनापतीस कान्होजींच्या अभ्यासपूर्ण योजनेपुढे आणि जिद्दीपुढे हार पत्करावी लागली. कान्होजींना  आमिष दाखवून कोकणातील किल्ले ताब्यात घेणार्‍या मोगलांचे स्वप्न अखेर धुळीस मिळाले . कान्होजींनी  सुवर्णदुर्गचा लढा यशस्वी करून  आपल्या पराक्रमास सुरुवात केली. तसेच ह्या विजयानंतर  मोगलांनी ताब्यात घेतलेले  सर्वच किल्ले काबीज करण्यास त्यांनी सुरुवात केली.  कान्होजींचे शौर्य व निष्ठेने  पाहून   राजाराम महाराजांनी त्यांना  ‘सरखेल’ हे सन्मानाचे पद दिले. कान्होजींनी अलिबागचा कुलाबा किल्ला जिंकून घेऊन आपली राजधानी तेथे थाटली. छत्रपती राजारामांनी आंग्रे यांना आरमाराचा प्रमुख केले आणि आंग्रे कोकण किनार्‍याचे राजे झाले. इ.स. १७०० मध्ये राणी ताराबाईंनीही ह्या पराक्रमी वीराला सन्मानित करून सावंतवाडी ते मुंबईपर्यंतची किनारपट्टी रक्षणासाठी ताब्यात दिली. ह्या नव्या आव्हानाबरोबर कान्होजींना अनेक   परकीयांशी एकाच वेळी लढा द्यावा लागला. कोकणाबरोबरच कच्छ, सौराष्ट्रापासून त्रावणकोर, कोचीनपर्यंतची सागरी सत्ता कान्होजींच्या हाती होती. सागरी भागात मुक्तपणे संचार करणार्‍या परकीयांवर  कान्होजींनी निर्बंध घातले. १६९८ पासून मराठी राज्याची सारी सागरी सत्ता कान्होजींकडे आली आली. त्यांच्या परवान्याशिवाय कोणीही सागरावर व्यापार करू शकत नव्हते. कान्होजींचा प्रतिकार करण्याचे परकीयांनी ठरविले. सर्व परकीयांनी एकत्रित येऊन कान्होजींना संपविण्याचे ठरविले होते.तरीही कान्होजींनी  इंग्रज, पोर्तुगीजांनाही पराभूत केले. शत्रूच्या आक्रमणांना तोंड देण्यासाठी कान्होजींनी दूरदृष्टीने अगोदरच अनेकांशी मैत्रीचे संबंध ठेवलेले होते. अशा संबंधांच्या मदतीने त्यांनी आपले आरमार अधिक शस्त्रसज्ज केले. पोर्तुगीजांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रनिर्मितीचा कारखाना आणि कुलाबा, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग येथे सुधारीत पद्धतीचे जहाज बांधणीचे कारखाने त्यांनी उभारले. या सुसज्जतेसह कान्होजींनी समुद्र किनार्‍यावर एक दबदबा निर्माण केला होता.  छत्रपती  शाहू महाराज ज्यावेळी १७०७ मध्ये औरंगजेबाच्या तुरुंगातून सुटून महाराष्ट्रात  आले. त्यावेळी पहिले पेशवे  बाळाजी विश्वनाथ   यांनी  कान्होजी आग्रेंना शाहू महाराजांची बाजू समजून दिली. कान्होंजी शाहू महाराजांच्या पक्षात  आले. त्यामुळे शाहू महाराजांची बाजू बळकट झाली.  पोर्तुगीज  व सिद्दी यांची धार्मिक  असहिष्णुता सर्वत्र परिचित होती.कान्होजींचा  हा लढा धार्मिक आक्रमणाची धार कमी करण्यासाठीही होती. कान्होजी आंग्रे यांनी कोकणातील मंदिरांसह पंढरपूर, आळंदी, जेजुरी, तुळजापूर येथील देवस्थानांना इनाम व रोख देणग्याही दिल्या.    कान्होजींनी स्वकर्तृत्वावर उत्तुंग  झेप घेतली.शत्रूची दाणादाण उडवणारे दर्याबहाद्दर कान्होंजी आग्रेंचे नाव मध्ययुगीन भारताच्या  इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिले गेले. दिनांक ४ जुलै, १७२९ रोजी कान्होजींनी जगाचा निरोप घेतला.


-- प्रशांत  कुलकर्णी  मनमाड

संदर्भ -

१.मराठ्यांना इतिहास खंड-१ व २ -अ.रा.कुलकर्णी 


No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...