मराठी विक्रम संवत निर्मित राजा
_____--_/\_--_____
_____.....................
सतीशकुमार सोळंके-देशमुख,
मराठी नवीन वर्षाची लवकरच सुरुवात होत आहे. दख्खनातील नवीन वर्षाचा पहिला दिवस गुढीपाडवा असतो. सार्वभौम चक्रवर्ती सम्राट दख्खनाधिपथेश्वर कल्याण नरेश षष्ठ विक्रमादित्य साळुंखे चाळुक्य राजाने आपल्या विस्तीर्ण पसरलेल्या साम्राज्यासाठी 'चाळुक्य विक्रम संवत' हे नवीन विक्रम संवत सुरू केले होते.
-------------------------
साळुंखे राजवंशाचा
वैभवशाली इतिहास
-------------------------
कल्याणीच्या उत्तरकालीन साळुंखे चाळुक्यांच्या शाखेतील हा अत्यंत महापराक्रमी आणि वैभवसंपन्न राजा होऊन गेला. सम्राट विक्रमादित्याने ५१ वर्षाहून अधिक काळ निम्म्याधिक भारतावर स्थिर शासन करताना अनेक इतिहास रचले. यातील अनेक पराक्रम आपण यापूर्वीच्या लेखांमध्ये पाहिले आहेत. त्या व्यतिरिक्त या कार्यकाळात अजून त्यांनी मरू (राजस्थान), माळवा, चेर (केरळ), चोळ, कलिंग आणि बंग आदी कित्येक राजांचा पराभव करून राजे साळुंखे चाळुक्यांच्या साम्राज्य सीमा दक्षिणेत कन्याकुमारी पासून उत्तरेत बंगालपर्यंत वाढविल्या.
-----------
श्लोक :
"एसव शकवर्षेमंमाणिसि विक्रमवर्षंमंदु तन्नय पेसरं
वसुमतिगे नेगळचिद साहसिंग जगदेकदानि धर्म्मविनोद ॥"
----------------------
अर्थ :
-------
सुप्रसिद्ध शकवर्षांचा अंत आणि 'विक्रम चाळुक्य साळुंखे' हे नवे मराठी वर्षे सुरू करून पॄथ्वीतलावर आपले नाव दैदिप्यमान करणारा तो पराक्रमी वीर होता. हा पराक्रमी वीर म्हणजे सम्राट विक्रमादित्य साळुंखे राजा जगदेकदानि म्हणजे जगातील एक अपूर्व दानी आणि धर्मकार्यात आनंद मानणारा राजा होता.
कल्याण नरेश विक्रमादित्य साळुंखे चाळुक्य राजाच्या दरबारात अनेक विद्वान लोक आश्रयाला होते, त्यातील 'विज्ञानेश्वर' यांनी 'याज्ञवल्क्य स्मृति' यावर 'मीताक्षरा' नावाचा टीकात्मक ग्रंथ लिहिला. 'मिताक्षरा' हा वर्तमान काळातल्या लोकशाहीतील प्रचलित हिन्दू कायद्याचा मुख्य आधार आहे. अशा या विज्ञानेश्वरांच्या नावाने गौरव म्हणून विक्रमादित्य साळुंखे राजाने जालना जिल्ह्यातील विज्ञानेश्वराचे आपेगाव येथे त्यांच्या नावाने महादेवाचे मंदिर बांधले. मात्र नंतरच्या काळात हे मंदिर जमीनदोस्त झाल्यानंतर या मंदिराचा पुढील काळात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी जिर्णोद्धार केला आहे. चाळुक्यकालीन प्राचीन मंदिराच्या खुना आजपण या ठिकाणी दिसून येतात.
विक्रमादित्य साळुंखे राजाला कला व साहित्याचे संरक्षक आणि संवर्धक मानले जाते. त्यांच्या दरबारात कन्नड आणि संस्कृतचे अनेक कवी राजाश्रयाला होते. विक्रमादित्य साळुंखे राजाचा लहान भाऊ कीर्तिवर्मा साळुंखे याने 'गोवैद्य' नावाचा पशुचिकित्सा ग्रन्थ लिहिलेला आहे. विक्रमादित्य यांच्या सात राण्यांपैकी स्वयंवरात वरलेली शिलाहार राजांची कन्या असलेल्या चन्दलादेवी नावाच्या राणीला राज्यातील लोकांमध्ये कलेची अभिनव सरस्वती म्हणून मान होता. ती एक चांगली उत्कृष्ठ नृत्यांगना सुद्धा होती.
सार्वभौम चक्रवर्ती सम्राट कल्याण नरेश विक्रमादित्य साळुंखे राजाने त्यांच्या दरबारातील एक विद्वान ब्रह्मशिव यांचेकडून 'समयपरीक्षे' नावाचा ग्रन्थ लिहून घेतला. ब्रह्मशिव हे त्या काळातील एक विद्वान कवि असल्याने राजा विक्रमादित्य यांनी त्यांना 'कविचक्रवर्ती' ही उपाधि बहाल केली. बाराव्या शतकाच्या आगोदर कोणीही इतके शिलालेख कोरले नसतील, तितके शिलालेख विक्रमादित्य साळुंखे षष्ठ यांनी कोरून ठेवले आहेत.
सार्वभौम चक्रवर्ती सम्राट दख्खनाधिपथेश्वर विक्रमादित्य साळुंखे चाळुक्य षष्ठ हा राजा एक पराक्रमी वीर विजेता योद्धा असला, तरी त्यांनी त्यांच्या दरबारात अनेक विद्वानांना सुद्धा राजाश्रय दिलेला होता. 'निरुगंद' येथील ताम्रलेखातून असे समजते, की राजे साळुंखे चाळुक्यांच्या राज्यातील विद्या वाढीसाठी त्यांनी ५०० तामिळी विद्वानांना राज्यात बसवले होते. विक्रमादित्य षष्ठ यांच्या दरबारात राजाश्रयाला असलेले कश्मीरी राजकवी विल्हण यांनी 'विक्रमांकदेवचरित' हा ग्रंथ लिहून या महाप्रतापी राजाच्या नावाला अजरामर केले आहे.
( अपूर्ण )
मार्गदर्शक :
प्रा. डॉ. नीरज साळुंखे,
(Dr. Neeraj Salunkhe )
असोसिएट प्रोफेसर,
पी.एचडी गाईड,
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा यूनिवर्सिटी औरंगाबाद.
@........
सतीशकुमार सोळंके-देशमुख,
बी.एड्., बी.पी.एड्.
सिद्धीविनायक कॉलोनी गेवराई,
ता. गेवराई, जि. बीड

No comments:
Post a Comment