


हरिश्चंद्रवंशीय राजा भोगशक्ती
-------------------
-------------------.......

सतीशकुमार सोळंके देशमुख,
महाराष्ट्राच्या भूमीत अनेक लहान-मोठे सामंत राजे होऊन गेले, मात्र त्यांचा इतिहास सूत्रबद्धरित्या लिहून ठेवलेला नसावा हे ऐतिहासिक दुर्दैव वाटते! त्यामुळे अशा लहान-मोठ्या राजवंशातील आजच्या महाराष्ट्रातील मराठ्यात कोणते वंशज असतील, याचा अभ्यास करणे कठीण होऊन बसते.
दक्षिणेतील मराठ्यांच्या आजच्या बहुतेक घरांण्यांना इतिहास असला तरी केवळ हा इतिहास सूत्रबद्ध लिहिला नसल्यामुळे या राजवंशाचे आजचे बहुतांश वंशज स्वतःच्या कुळाच्या आणि कुलाचाराच्या बाबतीत भ्रमिष्ट असल्याचे प्रमाण मोठे दिसते. ही छोटी छोटी राजवंशाची कुळे इतक्या सहजासहजी नामशेष होऊ शकतात हे अशक्य दिसते. त्यांचे आजच्या मराठ्यातील अभिमानी वंशज केवळ सूत्रबद्ध इतिहास लिहिला नसल्याने आज कुळाच्या बाबतीत रमित असण्याची शक्यता मोठी वाटते.
हरिश्चंद्रवंशीय भोगशक्ती हा राजा आठव्या शतकाच्या पूर्वार्धातील बदामी नरेश विक्रमादित्य साळुंखे चाळुक्य याचा सामंत राजा दिसतो. त्याचे अभिलेख नाशिक जिल्ह्यातील त्रंबक जवळील प्रसिद्ध अंजनेरी खेड्यात उपलब्ध झाले होते. हा ताम्रपट हरिश्चंद्रवंशीय भोगशक्ति याने दिलेला असून त्याची वंशावळी त्यात आहे. यामध्ये त्याचे पिता सिंहवर्मराज व पितामह स्वामीचंद्र इत्यादी नावे आली आहेत.
हा अभिलेख गोपराष्ट्र, पूर्व त्रिकूट, आम्रराजी, मैरिका, पूर्व व पश्चिम महागिरीहार, पल्लुसूढाम्बक राष्ट्राच्या रहिवाशांना उद्देशून आहे. या ताम्रपटाचा मुख्य उद्देश जयपूर शहरातील भोगेश्वर मंदिरात पूजा-अर्चासाठी साहित्य पुरविणे, इतर धार्मिक विधी करणे, इत्यादीसाठी आठ खेडी दान दिली हे नमूद करणे आहे. या आठ खेड्यामध्ये जयग्राम, अंबे अंगण, पलित्तपाटक, कोंकीलाक्षक, कलहर, मुद्गाहितक, क्षमगिरिक, आन्नग्राम यांचा समावेश होता.
बदामी चाळुक्य नृपति विक्रमादित्याचा सामंत राजा असलेला हरिश्चंद्रवंशीय भोगशक्ती हा दानकर्ता राजा आहे.ताम्रपटात देवालयाचे हक्क, अधिकार व उत्पन्न नमूद केलेले आहे.या देवालयाची व्यवस्था व्यापारी वर्गाकडे सोपवली होती. या बदल्यात व्यापाऱ्यांना जकात नाका, सरकारी अधिकाऱ्यांची राहण्याची सोय करणे, वगैरेसारख्या सेवेतून मुक्त केले होते. शहरातील व्यापारी वर्गाने निवडलेल्या पाच किंवा दहा व्यापारी प्रतिनिधींनी मंदिरातील चालू प्रथेप्रमाणे दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात पंधरा दिवस यात्रोत्सव करावा, दान दिलेल्या आठ खेड्यातील लोकांनाही विशिष्ट हक्क प्राप्त झाले होते, असे ताम्रपटात नमूद केलेले आहे.
अभिलेखात बदामी नरेश विक्रमादित्य साळुंखे चाळुक्याचे स्तवन आलेले दिसते. ताम्रपट याची सर्वात विशेष बाब म्हणजे, या ताम्रपटात 'कृष्णराजरूपक' या कलचुरींच्या नाण्याचा उल्लेख आलेला आहे.
अंजनेरी येथे अजून दुसरा एक ताम्रपट असून, तोदेखील बदामी नरेश विक्रमादित्य साळुंखे चाळुक्याचा सामंत असलेला हरिश्चंद्रवंशीय राजा भोगशक्ती याचा मुलगा पृथ्वीचंद्र भोगशक्ती याचा आहे. त्याने देखील या ताम्रपटातून काही गावे दान दिली आहेत. वरील दोन्ही ताम्रपटामुळे बदामी साळुंखे चाळुक्यांच्या अधिपत्याखाली पुरीकोकण व नाशिकच्या परिसरात सातव्या व आठव्या शतकात राज्य करणारे हरिश्चंद्रवंशीय राजे इतिहासाला माहिती होतात.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, कोणा अभ्यासकांना या हरिश्चंद्रवंशीय चाळुक्यांचा सामंत असलेल्या राजाचे महाराष्ट्रातील आजच्या मराठ्यातील कोण वंशज असतील? हे माहिती असल्यास कमेंट बॉक्समध्ये लिहावे.
-----------
मार्गदर्शक :
--------------
प्रोफेसर डॉ. नीरज साळुंखे,
(Dr. Neeraj Salunkhe ),
असोसिएट प्रोफेसर,
पीएचडी गाईड,
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा यूनिवर्सिटी औरंगाबाद.
--------------
@
शब्दांकन :
सतीशकुमार सोळंके-देशमुख,




सिद्धीविनायक कॉलोनी गेवराई,
ता. गेवराई, जि. बीड.


No comments:
Post a Comment