विनोद जाधव एक संग्राहक

Sunday 31 October 2021

महाराष्ट्रापुरूष...आदीपुरूष...!!

 


महाराष्ट्रापुरूष...आदीपुरूष...!!
पोस्त सांभार :शंतनू जाधव
महाराष्ट्रापुरूषांचं कर्तृत्व नाकारून काळाचं बंधन झुगारून त्यांच्या फायद्या तोट्याची गणिते बांधता येत नसतात.महाराष्ट्र हा विचारांची भूमी आहे हि विखाराची भूमी नाही.इथली माती पुरातन काळापासून विचारांच्या पेरणीला सुपीक आहे.हिच्याशी इमान राखलेल्यांना ती दूर लोटत नाही .महाराष्ट्राच्या सह्याद्री मंडळाच्या कुशीत अनेक राजकुळे नांदली बहरली.
सातवाहन,वाकाटक,चालुक्य,राष्ट्रकुट,कदंब ,शिलाहार ह्या राजसत्तांनी आस्तिक आणि नास्तिक दर्शनांना आपल्यात सामावून घेतले.उत्तरेसारखा नदी सोबत बदलत जाणारा गोत्र द्वेष इथे नांदला नाही.कि दक्षिणेसारखा टोकाचा शैव आणि वैष्णव वाद इथे नांदला नाही.भारताच्या सरहद्दीवर जन्म घेतलेला बुद्ध सह्याद्रीच्या दरीमंडळातील कातळात कोरला.अजिंठ्याच्या लेण्यातला निर्वाणाच्या बुद्धाच्या मुखावरचे समाधान इथल्या मातीतले आहे.जैनांचे लेणी वैभव ह्याच दक्षिणापथावरून पुढे जाऊन दख्खनेत शिल्प वैभव झाले.महाराष्ट्राच्या भूमीच्या साक्षीनै मोक्षाचा मार्ग सर्वच धर्ममतांनी चोखाळला तो लादला नाही.
महाराष्ट्राच्या समरसतेवर प्रेम करा.इथले पंथ संप्रदाय तीच समरसता इथल्या मातीत रूजवतात.गुजरातेतले चक्रधरस्वामी शिष्यांना महाराष्ट्र देशी वसावे हे बिनदिक्कत सांगतात.पंढरीच्या पांडुरंगाची विजयनगरच्या बिलोरी साम्राज्याला भूरळ पडते.जात्याच आक्रमक असलेल्या शिखांना नामदेवाची कवने धर्मग्रंथात समाविष्ट करून डोक्यावर घेऊन पूजावी वाटतात.हे दान इथल्या मातीच्या संचिताचं आहे ते अभेद्य आहे.इस्लाम चे आक्रमक शेख महंमदाच्या रूपात विठ्ठलाचे भक्त होतात.ईथे शाक्त ,शैव ,वैष्णव हे एकाच नाथ संप्रदायात गुंफले जातात.
महाराष्ट्राने जे जे उदात्त होते ते ते स्विकारले.
पाच मुसलमानी सत्ता उरावर नाचवून सुद्धा काशीच्या गागाभट्टाला मध्ययुगातला वेदोक्त राजाभिषेक सह्याद्रीच्या शिखरावर करावा लागला.शाक्तांच्या साधनेचा मान इथला वेदोक्त अभिषिक्त झालेला राजा ठेवतो.त्याचं जिवंतपणीचं पहिलं स्मारक शत्रूप्रदेशातील एक स्त्री उभी करते.त्याच्या नावाने इथल्या लेकरांच्या बारशाला "बाळ शिवाजी दख्खनचा राजाचे"चे सूर आळवले जातात.ह्याच राजाचा नातू "ब्राह्मण"पंतप्रधान अहद पेशावर तहद तंजावर प्रांत मिळवण्यासाठी नेमतो.त्या पंडीत पंतप्रधानाच्या बुद्धीवैभवाला शिंदे व होळकरांचं माणूसबळ साथ देतं.आणि स्वराज्याचा जरीपटका लाला किल्ल्यावर फडकतो.
इथे सुराज्याची मुहूर्तमेढ रोवणारे शाहूछत्रपतीं लोकमान्य वारले म्हणून जेवत्या ताटावरून दुखःद अंतकरणाने उठतात.त्याच कोल्हापूरच्या छत्रपतींवर स्वजातीय इसमाने अन्याय केला म्हणून टिळक आगरकर टिकेची झोड उठवतात.सयाजी राजांना बाबासाहेबांचं कौतुक तर हेच बाबासाहेब भगव्या ध्वजाची राष्ट्रध्वज म्हणून शिफारस करतात.
हा महाराष्ट्र आहे पसायदानात माऊलींनी मागितलेले दान नियतीने महाराष्ट्राला बहाल केले आहे.
निवडणूका येतील आणि जातील राज्यकर्ते सत्ता उपभोगतील ही.पण महाराष्ट्राचे हे दीपस्तंभ काळोखात ही पथदर्शी ठरतील त्यांच्या जातीचा वापर राजकारणासाठी नको.हि माणसे इथल्या मातीसाठी झगडली कारण इथल्याच मातीत सकस महाराष्ट्रपुरूषाच्या पुनरात्थानाची बीजे त्यांना पेरायची होती.संधीसाधू फोडायची संधी साधतील ती मिळू देऊ नका.महाराष्ट्रामाऊली नवरात्रीत हेच विनवून सांगत असेल...

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...