विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 4 November 2021

देवासच्या पवारांचा इतिहास (थोरली पाती) भाग-6

 


देवासच्या पवारांचा इतिहास (थोरली पाती)
भाग-6
पोस्तसांभार ::
महेश पवार
राजे धार पवार युवा सामाजिक प्रतिष्ठान
बुंदेलखंड , रोहिलखंड व राजपुताना या प्रांतावरील स्वार्यां मध्ये तुकोजीराव पवार यांची कामगिरी.
राजपूत राजे यांनी एकत्र येऊन मराठ्यांच्या मुलुखावर स्वाऱ्या करण्याचे धोरण अवलंबिले, तेव्हा १७४६ च्या मे महिन्यात जयाप्पा शिंदे , तुकोजीराव पवार यांनी जैतपुरचे मजबूत ठाणे मोठा पराक्रम करून ताब्यात घेतले व बुंदेलास तह करण्यास भाग पाडले , याविषयी प्रधानांनी सरदारांच्या पराक्रमा विषयी खालील उद्गार काढले...
" जैतपुर जागा बाका होती, लेकिन तुम्ही सर्वांनी मेहनत तरतुद करुन फत्ते केली.शाबास तुमची व शाबास लोकांची. मोठी गोष्ट जहाली. तुम्हा सारखे उमदे सरदार इरेस पडल्यावर जैतपूरची काय कथा? याहून बिकट जागा हस्तगत कराल."
जयपूरचा राणा सवाई जयसिंग याच्या मृत्यूनंतर त्याचे मुलं ईश्वर सिंग व माधोसिंग यांच्यामध्ये गादीवरून वाद सुरू झाला. माधोसिंग मेवाडच्या राजकन्येचा मुलगा होता ; तेव्हा मेवाडचा राणा जगजीत सिंग याने माधोसिंगला मदत करण्याचे ठरविले असता ईश्वरसिंगाने मराठ्यांची मदत घेऊन जगतसिंगाच्या सेनेचे पराभव केला या लढाईत तुकोजीराव यांनी मोठा पराक्रम गाजवला होता.
इसवीसन १७४९ मध्ये मोगल बादशहाने पठाणांचा पाडाव करण्याचा निष्फळ प्रयत्न केला , पुढे बादशहाचा वजीर सफदरजंग यानेही पठाणांशी लढाई केली परंतु त्याचाही पूर्ण पराभव झाला. मराठे व जाट यांच्या मदतीशिवाय पठाणांचा पाडाव शक्य नाही अशी वजिराची खात्री झाल्याने , त्याने मराठ्यांची मदत पैसा देऊन मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले मराठ्यांना फौजांच्या खर्चासाठी एकंदर ५० लक्ष रुपये अगर रोज ३५००० रुपये देण्याचे वजिराने कबूल केले. या स्वारी मध्ये जयाप्पा शिंदे बरोबर तुकोजीराव पवार हे सुरुवातीपासून हजर होते. मराठ्यांनी कोळडाळेखराचा बंगश अधिकारी सादिलखान पठाण याला पळवुन लावले व पठाणांची कत्तल केली. हे कळताच अहमद खान बंगेश याने आलाहाबाद चा वेढा उठवून मराठ्यांवर आक्रमण केले परंतु त्याचाही पराभव करून १५००० पठाण मराठ्यांनी कापून काढले .अहमदखानने फारुकाबाद जवळ असलेल्या फत्तेगडाचा आसरा घेतला .मराठे व जाट यांनी फत्तेगडाला वेढा घातला अहमदखानचा मुलगा सादुल्लाखान हा त्याच्या मदतीला आला आणि दोघांनी मराठ्यांवर हल्ला चढवला परंतु मराठ्यांनी पठाणांचा पराभव केला तेव्हा सादुल्ला खान जीव घेऊन पळून गेला तर अहमद खान परत फत्तेगडाच्या आश्रयाला गेला. पुढे मराठ्यांनी १९/०४/१७५१ ला फत्तेगड जिंकला. १७५२ मध्ये रोहिले पठाणांनी मराठ्यांबरोबर तह केला. या लढाईत तुकोजीराव पवार आपल्या एक हजार च्या फौजेसह हजर होते, त्यांनी या लढाईत मोठा पराक्रम गाजवला होता.
पुढे १७५३ च्या मार्च महीन्यात मराठे उत्तर हिंदुस्थानाच्या स्वारीवर निघाले या स्वारीत शिंदे, होळकर, पवार व राघोबादादा हे सामील झाले होते . सुरजमल जाटने दिल्लीच्या बादशहाच्या विरुद्ध जाऊन दिल्लीवर हल्ला करून दिल्ली शहर लुटले, तेव्हा बादशाहने सुरजमल जाट विरुद्ध मराठ्यांची मदत घेतली मराठ्यांनी सुरजमल जाटच्या कुंभेरीच्या किल्ल्याला १७५४ मध्ये वेढा दिला. जाटांनी ३० लक्ष रुपयांचा खंडणीचा करार करून वेढा उठवला या कामगिरीत आरंभापासून तुकोजीराव पवार होते.
महेश पवार
संदर्भ :- पवार घराण्याचा इतिहास.
लेखक :- मा.वि.गुजर

No comments:

Post a Comment

राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला 🚩 भाग 9

  राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला भाग 9 लखुजीराजे जाधवरावांची हत्या भातवडीच्या युद्धानंतर मलिक ...